कृष्णकांतभाऊ गेली काही वर्षे कॅन्सरने आजारी होते. त्याही काळात ते नेहमी प्रसन्न असायचे. भाऊ अतोनात उपक्रमशील होते. त्यांच्या डोक्यात सदैव नवनव्या कल्पना असायच्या. त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी ते पदरमोड करायचे. सर्वदूर समाजातल्या गुणी लोकांचा गोतावळा भाऊंच्या पथिकवर कायम जमलेला असायचा.
गेल्या ३१ वर्षात त्यांना मी दुर्मखलेलं कधीही पाहिलं नाही.
आपल्या कर्तबगारीच्या जिवावर मोठे झालेले भाऊ अतिशय नम्र, संयत आणि सदासतेज असायचे. समोरच्या प्रत्येक माणसाबद्दलचा अगत्यभाव त्यांच्या देहबोलीतून कायम झळकायचा. पुणे फेस्टीव्हल, समता परिषद, अ.भा.माळी शिक्षण परिषद, माळीनगर साखर कारखाना, पथिक परिवार, नर्गिस दत्त सहकारी पतसंस्था, पुणे व्यासपीठ आणि आणखी कितीतरी संस्थांचे काम भाऊ बघायचे. भाऊ शेकडो संस्था आणि उपक्रमांचे आधारवड होते. ते सदैव कामात बुडालेले असूनही कधीही कातावलेले, वैतागलेले नसायचे.सदा हसतमुख.राहणी उच्च आणि अभिरूचीही दर्जेदार.
३१ वर्षांपुर्वी सावता माळी भवनमधल्या माझ्या एक भाषणाला ते आलेले होते. भाषण खूप आवडल्याचे त्यांनी भेटून आवर्जून सांगितले. दुसर्या दिवशी डेक्कन जिमखान्यावरच्या त्यांच्या घरी नास्त्याला बोलावले. भाऊंची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम होती आणि मी मात्र अतिशय फाटका माणूस. सायकलवरून त्यांच्या बंगल्यावर गेलो. त्यांनी मनापासून स्वागत केलं. एखादा श्रीमंत माणूस केवळ आपलं भाषण ऎकून आपल्याला एव्हढं सन्मानानं वागवतोय हा माझा पहिलाच अनुभव होता. तोवर वर्ग बदलला की माणसं बदलतात हाच अनुभव घेतलेला. श्रीमंत माणसं गरिबांबद्दल कमालीचा तिरस्कार बाळगणारी असतात हे अनुभवलेलं. त्यामुळे अशांपासून मी मैलभर दूर राहणारा.
भाऊंनी चक्क दोस्तीचा हात पुढे केला. तो कायम निभावला.
आमच्यातल्या आर्थिक परिस्थितीतल्या फरकामुळे आमच्यात कधीही अंतर पडणार नाही याची भाऊंनी कायम काळजी घेतली. भाऊ माझ्याशी कायम सोयर्याप्रमाणे वागले.
माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी माझ्याकडची आणि प्रकाशकाकडची सगळी पुंजी संपली. एका राजकीय नेत्याच्या निवडणुकांसाठी मी शाळकरी वयापासून खिशातून खर्च करून अनेक भाषणं केलेली, राबलेलो, गडी पुढे केंद्रीय मंत्री झाला, खुप मोठा झाला. मी त्यांना एक हजार रूपये दोन महिन्याच्या बोलीवर उसने मागितले. त्यांनी त्यासाठी माझ्याकडे बॅंक गॅरंटी आणि पुण्यातल्या ५ नामवंतांची हमीपत्रं मागितली.
एकदा पुस्तकाचं काम कशामुळे अडलय ते भाऊंनी विचारलं. मी सांगायची टाळाटाळ करीत होतो. त्यांनी कसं कोण जाणे पण बरोबर ओळखलं. म्हणाले, " मला तुमच्या पुस्तकाच्या ५० प्रती हव्यात." ॲडव्हान्स बुकींगची रोख रक्कम त्यांनी तात्काळ हातावर ठेवली. माझे डोळे ओले झाले. त्यांची माझी नुकतीच ओळख झालेली होती. फारशी ओळखदेख नसतानाही भाऊंनी असं करणं फारफार उमेद वाढवणारं ठरलं.
भाऊ म्हणाले, "हरी, हे उपकार नाहीत. तुमच्या पुस्तकाचा विषय माझ्या जिव्हाळ्याचा आहे.पुस्तक वाचायला मी उत्सुक आहे. माझ्या मित्रपरिवाराला त्याच्या प्रती मी भेट देणार आहे. पुढच्या भेटीत पुस्तक घेऊनच या."
पुस्तक तयार झाले. मी भाऊंकडे त्यांचा फोटो मागायला गेलो. त्यांनी फोटो द्यायला नकार दिला. म्हणाले, " हरी, मी आर्थिक मदत केली म्हणुन माझा फोटो पुस्तकात छापू नका. मी तुम्हाला मदत केलेली नाही तर माझ्या आवडत्या विषयाचं पुस्तक लवकर यावं यासाठी आगाऊ नोंदणी केलेली आहे.हा विषय परत काढायचा नाही. नाहीतर आपली दोस्ती कटाप."
पुणे फेस्टीव्हलमुळे हेमा मालिनी, मिनाक्षी शेषाद्री, विनोद खन्ना, अमिताब बच्चन अशा सगळ्या नामवंतांशी त्यांची दोस्ती झालेली.पण भाऊंचं वैशिष्ट्य म्हणजे हे व्यावसायिक संबंध त्यांच्या मधाळ आणि सुहृद वागण्या बोलण्यांनी कौटुंबिक नात्यात बदलत असत. नर्गिस दत्त त्यांना सख्ख्या भावासारखं मानायच्या.
सुनिल दत्त त्यांचे खास दोस्त. जगभरातले अनेक क्रिकेटपटु भाऊंच्या गोतावळ्यात असत. राजकारणी तर सगळ्याच पक्षांचे भाऊंचे साक्षात मित्र असत. श्री सुरेश कलमाडी आणि श्री छगन भुजबळ यांचा भाऊंवर विशेष लोभ होता. सुशिलकुमार, पवारसाहेब, विलासराव, मुंडेसाहेब यांच्याशी भाऊंचा घरोबा होता.
साहित्य आणि साहित्यिक हे त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचे क्षेत्र. पुल, नेमाडे, दळवी, जीए, विंदा, या सार्यांनी पथिकवर उतरावं यासाठी त्यांचा प्रयत्न असे. दर्जेदार मासिकं आणि पुस्तकं यांचा भाऊंकडे संग्रह असे. निळूभाऊ, जब्बार, डॉ. लागू यांच्याशी गप्पांचे फड रंगवायला भाऊंना आवडे.
३१ वर्षातल्या असंख्य आठवणी आहेत. पुन्हा केव्हातरी---
प्रिय कृष्णकांतभाऊ, विनम्र आदरांजली...........
प्रा.हरी नरके, १० फेब्रुवारी २०१९
No comments:
Post a Comment