Thursday, September 26, 2019

माझ्या भाषणांची ५० वर्षे- प्रा.हरी नरके




















२ आक्टोबर १९६९ ला मी पहिले जाहीर भाषण केले होते. त्याला या आठवड्यात ५० वर्षे पुर्ण होतील. तेव्हा मी इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकत होतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात मी पहिल्यांदा बोललो होतो. पुणे महानगर पालिकेच्या मुंढव्याच्या माझ्या शाळा क्रमांक ५३ मध्ये हा मोठा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमाला शाळेतले सगळे शिक्षक, सुमारे आठशे विद्यार्थी आणि शंभरेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

भाषणाच्या शेवटी झालेल्या टाळ्यांच्या कडकडाटाची झिंग गेल्या ५० वर्षात किंचितही कमी झालेली नाही. भाषणांचे गारूड उतरायलाच तयार नाही. तेव्हापासून माझं प्रत्येक भाषण मी मनापासून एंजॉय करतो.
गेल्या ५० वर्षात मी किमान विसेक हजार भाषणं दिलीत. त्यात वर्गात घेतलेल्या लेक्चर्सचा समावेश केलेला नाही. माझा पाठांतरावर विश्वास नाही. मुद्दे काढणे, ते लक्षात ठेवणं, उत्स्फुर्तपणे बोलणं हीच माझी आवडती पद्धती. एकाच विषयावर एकापेक्षा जास्त भाषणं केली तरी ती दरवेळी वेगवेगळी असतात. भाषणांच्या पाठांतराचे कार्यक्रम सादर करणे, हुकमी कॅसेट बनवणं हा प्रकार मला आवडत नाही.

इयत्ता दहावीपर्यंत शालेय भाषणे, विविध स्पर्धांमधली भाषणे, निवडणुकीतली भाषणे, धार्मिक विषयावरील प्रवचने- भाषणे, सामाजिक चळवळीतील भाषणे यावर भर होता. याकाळात मी रजनीश, [ ओशो ] रावसाहेब कसबे, नरहर कुरूंदकर, पु.ल. देशपांडे, नरेंद्र दाभोळकर आदींची शेकडो भाषणं ऎकली. त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे, नाथ पै यांच्या भाषणांच्या ध्वनीफिती ऎकण्यातनं माझी वाढ झाली. ज्यांचं अनुकरण फार मोठ्या प्रमाणात केलं जातं, अशा धंदेवाईक वक्त्यांना, वक्तृत्वाच्या व्यावसायिक मठांना मी कधीही प्रमाण मानलं नाही.

प्रामुख्याने दहावीनंतर जाहीर भाषणांची निमंत्रणे वाढत गेली, त्यालाही आता ४० वर्षे झाली.  "महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन" या माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर [१९८९] गेल्या तीस वर्षात तर निमंत्रणांचा भडीमार सुरू झाला. दरवर्षी जेव्हढी निमंत्रणे स्विकारता येतात त्याच्या किमान पाचपट निमंत्रणे नाकारावी लागतात. लोक नाराज होतात. रागावतात. कधीकधी खुन्नसही ठेवतात.

महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ३६ जिल्हे भाषणांच्या निमित्ताने फिरता आले. गावोगाव जिव्हाळ्याची- सोयरे म्हणता येतील अशी हजारो घरं जोडता आली. अमाप प्रेम मिळालं. भाषणांच्या निमित्ताने वाचन, अभ्यास, चिंतन, चर्चा करता आल्या, त्यातनं जगण्याला बर्‍यापैकी आकार येत गेला. सुरूवात केली होती तेव्हा सोबतीला फारसं काही नव्हतं. आज मी जे काही आहे ती सारी पुण्याई भाषणांची आहे. देशविदेश, ३६ राज्ये आणि केंद्रशाषित प्रदेश पाहता आले. या पन्नास वर्षात भाषणं ऎकणं, भाषणं करणं हेच माझं पहिलं प्रेम राहिलं.

एक तोटा मात्र झाला. जे व्यक्त करायचं असतं ते बोलून करता येतं. लिहायला उर्जाच शिल्लक राहत नाही. लिहायचा जाम कंटाळा येतो.

भाषणं वाहून जातात, पुस्तकं जास्त टिकतात, असं जाणकार म्हणतात.

गोविंद तळवलकर यांचं माझ्यावर नितांत प्रेम होतं. ते म्हणायचे भाषणं बंद कर. त्यांचं मी ऎकलं नाही म्हणून ते संतापलेही. म.टा.मध्ये माझं तोंडभरून कौतुक करणार्‍या त्यांनी भाषणांमुळे माझी सालटंही काढली. आज वाटतं, त्यांचं ऎकायला हवं होतं. किमान भाषणं आणि पुस्तकं यांचा समतोल राखायला हवा होता.

प्रा. हरी नरके, २६ सप्टेंबर २०१९

Wednesday, September 25, 2019

फादर फ्रान्सिस दिब्रिटो- महान परंपरेचा गौरव









फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे लेखन अतिशय प्रवाही, रसाळ आणि वाचनीय असते. त्यांच्या धर्मगुरू असण्याचा सगळा गोडवा त्यांच्या शैलीत उतरलेला आहे. अतिशय नम्र, सौजन्यशील आणि मित्रकुलाचे ही त्यांची खरी ओळख. लोण्यासारखा मृदू आणि कमालीचा ऋजू स्वभाव. त्यांच्यामुळे अनेक साहित्यविषयक कार्यक्रमांना वसईला गेलो. त्यांच्या संपादककाळात सुवार्ता मासिक नियमितपणे घरी येत असे. त्यांच्या निवडीमुळे मराठी भाषेला श्रीमंत करणार्‍या फादर स्टीफनसन, आद्य मराठी व्याकरणकार विल्यम कॅरी, पहिले मराठी शब्दकोशकार मोल्सवर्थ, पं. रमाबाई, पहिले मराठी कादंबरीकार बाबा पदमनजी, स्मृतिचित्रे कार लक्ष्मीबाई टिळक, कविवर्य रे. टिळक या महान परंपरेचा गौरव झालेला आहे.

फादर दिब्रिटो सुवार्ता मासिकाचे संपादक असताना खूपदा मला त्या मासिकासाठी लिहिते करीत. माझ्यासारख्या आळशी माणसाकडून लिहून घेणं ही सोपी गोष्ट नव्हती. नाही. तेव्हा आम्ही पिंपरीला, अजमेरा कॉलनीत राहत होतो. एकदा दिब्रिटोंना मी घरी घेऊन गेलो. प्रमिती तेव्हा जेमतेम दीडेक वर्षांची होती. तिला त्यांनी उचलून कडेवर घेतलं आणि " काय नाव तुझं बाळ?" असा तिला प्रश्न विचारला. तिनं स्वत:चं नाव सांगितलं आणि ती त्यांच्या चेहर्‍याकडे बघत राहिली. फादर म्हणाले, " काय झालं? माझं काही चुकलं का? काय बघतेयस?"

त्यावर ती म्हणाली, " काका, तुमच्यात स्वत:चं नाव सांगायची पद्धत नसते काय? मी माझं नाव सांगितलं. आता तुमची पाळी आहे."

फादर दिब्रिटो चमकले, लाजले आणि त्यांनी स्वत:चं नाव सांगितलं. त्यावर ती म्हणाली, " दिब्रिटोचा अर्थ काय?"

त्यांनी त्याचा अर्थ सांगितला. जाताना मला म्हणाले, " यापुढे मी कोणत्याही लहान मुलाला त्याचे नाव विचारण्याआधी माझे नाव सांगत जाईन. इतर प्रश्न विचारीन आणि मगच त्याचे/तिचे नाव विचारीन. सगळेच जण भेटल्याभेटल्या लहान मुलांना पहिला प्रश्न विचारतात, तुझे नाव काय? मुलं किती इरीटेट होत असतील ना? प्रमितीमुळे मला हा धडा शिकायला मिळाला.

- प्रा. हरी नरके,२५ सप्टेंबर २०१९ 

Thursday, September 19, 2019

विचारवंत घडताना- राजन सुमन खान







विचारवंत घडताना- राजन सुमन खान

मी ज्या वयाचा आहे, त्यात आपल्या डोळ्यादेखत एखादा माणूस विचारवंत म्हणून घडत जातो, असं मी पाहिलेलं एकमेव माणूस म्हणजे हरी नरके. आपल्या आधीच्या पिढीचे अनेक विचारवंत आधीपासून आपल्याला उपलब्ध असतात, कारण ते आपल्या आधी जन्माला आलेले असतात आणि त्यांची घडण होऊन ते आपल्याला आयते मिळालेले असतात. आपण त्यांना ऐकत, वाचत वाढत असतो. हरिभाऊचं माझ्याबाबतीत तसं झालं नाही. आम्ही दोघं साधारण एका वयाचे. हरिभाऊला मी त्यांच्या कोवळ्या शैक्षणिक आयुष्यापासून पाहत आलोय. एकाच गावात एकमेकांच्या आसपास राहत आलो आम्ही दोघं, त्यामुळं त्यांचे वाढीचे बारकेसारके संदर्भही माझ्या आयुष्यात येत राहिले. एका माणसाच्या नावाला आकारउकार कसा येत जातो, हे मला हरिभाऊंच्या बाबतीत दिसत राहिलं.
हा माणूस मला पहिल्यांदा दिसला तेव्हा, हा भविष्यातला मोठा विचारवंत आहे, हे काही जाणवलं नव्हतं, ते शक्य नव्हतं, पण हा एक अभ्यासू मुलगा आहे, ही माझी हरिभाऊंची माझ्या मनावरची पहिली प्रतिमा आजही आठवते. अभ्यासू म्हणताना त्या प्रतिमेला गांभीर्य होतं, पण त्यात जडजंबाळ किंवा सुतकी गांभीर्य नव्हतं, तर एक साधेपणा होता आणि एक सहजता होती. एक गोष्ट मोठी होती तेव्हाही, ती अशी की, तारुण्य असूनही त्यांच्या वागण्याबोलण्यात थिल्लरपणा अजिबात नव्हता. एक सौम्यसं गांभीर्य आणि विचारशीलता त्या वयातही त्यांच्या प्रतिमेत होती. पण ते गांभीर्य म्हणून जगण्याची रसिकता आणि आयुष्याच्या सगळ्या रंगांमध्ये रस घेण्याची वृत्ती त्यांच्यात नव्हती, असं नव्हतं.
त्यावेळी जाणवलेले हरिभाऊ आज ठळक दिसतात. आज त्यांच्या नावाला विचारवंत हे वलय आहे. पण विचारवंत म्हणून जी एक साचेबद्ध प्रतिमा असते, त्यात ते अजिबात बसत नाहीत. विचारवंतांचा अभ्यास खोल असावा लागतो, तो हरिभाऊंचा निश्चित आहे, पण विचारवंत हा जड असावा लागतो, त्यानं लोकांशी अनाकलनीय आणि डोक्यावरून जाणाऱ्या भाषेत बोलावं लागतं आणि थोर ठरावं लागतं, त्यानं आयुष्यात अभ्यासाचा ठरलेला कुठला तरी एक विषय सोडून जगण्याच्या दुसऱ्या विषयांमध्ये रस घ्यायचा नसतो, त्यानं विनोद ऐकायचे नसतात आणि विनोद करायचे नसतात, त्यानं लोकांमध्ये सहज वावरायचं नसतं, चेहरा कायम मख्ख ठेवायचा असतो, तोंडानं हसण्याचं माप एकदाच ठरवून ठेवायचं असतं आणि आयुष्यभर तेवढ्याच मापाचं हसायचं असतं, हे असलं काही हरिभाऊंकडं अजिबात नाही. हा विचारवंतांची पारंपारिक प्रतिमा मोडणारा विचारवंत आहे. हा लोकांमधला विचारवंत आहे. त्यांची बोलण्याची, लिहिण्याची भाषा सहज, साधी, सोपी आहे, लोकांची आहे, पण विचारवंत असण्याला जो दांडगा अभ्यास लागतो तो त्यांचा आहे आणि लोकांना नवी दृष्टी द्यावी लागते, ती ताकद त्यांच्यात आहे.
या सगळ्या खुणा त्यांच्या कोवळ्या वयात मी पाहत होतो दुरून. मी काही त्यांच्या वर्तुळातला नव्हतो, तेही माझ्या वर्तुळातले नव्हते, पण त्यांची माझी काही वर्तुळं एकमेकांत मिसळण्याच्या काही जागा होत्या. पुण्यात किंवा महाराष्ट्रातल्या काही चळवळी, काही स्वयंसेवी, सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था, काही साहित्यिक-सामाजिक उपक्रम, पु. ल. देशपांडे, निळू फुले ही आमची वर्तुळं एकमेकांत मिसळण्याची ठिकाणं होती आणि त्यातून मला त्यांच्या जगण्यावागण्याचे संदर्भ मिळत होते. हा माणूस आजही प्रत्येक गोष्टीचा प्रचंड अभ्यास करतो, खूप वाचत असतो, ही त्यांची सवय हे त्यांच्या कोवळ्या वयातलंही वैशिष्ट्य होतं. त्या वयातही हा माणूस त्यावेळच्या अनेक दिग्गजांमध्ये ऊठबस करतो आणि अभ्यासू चर्चा करतो, ते लोक या माणसाचं नाव फार गांभीर्यानं आणि आपुलकीनं घेतात, हे मी पाहत आलो होतो.
त्या काळात हरिभाऊंच्या जगण्याची खाजगी गोष्ट मला माहीत नव्हती. ती नंतर कळत गेली. अवाढव्य गरिबी आणि भुकेचा जोरदार संघर्ष हे हरिभाऊंचं आयुष्य होतं. पण तेव्हाची आणि आजचीही मोठी गोष्ट अशी की, ती गरिबी आणि ती भूक हरिभाऊनं कधी जगण्याचं, मोठं होण्याचं भांडवल म्हणून वापरली नाही. त्या संघर्षाच्या काळात या माणसानं अभ्यासाचा नाद सोडला नाही आणि केवळ प्रचंड अभ्यासाच्या जिवावर मोठा झाला. अभ्यासाच्या बळावरच त्यानं आपल्या हक्काचं जे आहे ते मिळवलं, त्यासाठी गरिबी आणि भुकेचा मुद्दा त्यानं कधीच पुढं केला नाही. एक लखलखीत वैचारिक श्रीमंतीचं आयुष्य हा माणूस जगला.
हरिभाऊ सतत होतेच आसपास, त्यांचं मोठं होणंही कळत होतं, पण हा माणूस माझ्या आयुष्यात जास्त ठळक कधी झाला, हे मला आज आठवत नाही. तो कायमच आपल्या आयुष्यात ठळक होता असं आज वाटत राहतं. त्यांचं अक्षर मानवकडून दर पावसाळ्यात घेतल्या जाणाऱ्या माणूस संमेलनाला नियमित येणं आठवतं. तिथं सर्वांमध्ये मिसळून राहणं, स्वतःचं वेगळेपण न दाखवणं, कसलाही भाव न खाणं, महत्वाचं म्हणजे समोर बोलणारा भारी माणूस असो की साधा, प्रत्येकाचं बोलणं मन लावून ऐकणं आणि सतत प्रत्येकाच्या बोलण्याची टिपणं काढत राहणं, (अशी कुणाच्याही बोलण्याची नेकीनं टिपणं काढत राहणारा हा मी पाहिलेला एकमेव विचारवंत.) हे मला हरिभाऊंचं जास्त आठवतं.
आज मात्र या माणसाचं न् माझं जगण्याचं वर्तुळ एक आहे आणि मित्र म्हणावा एवढा हा माणूस जवळचा वाटतो.
आज वक्ते संपलेल्या काळातला हरिभाऊ हा माणूस राज्यातला महत्वाचा, लोकप्रिय आणि दुर्मिळ अभ्यासू वक्ता आहे. अनेक चळवळींमध्ये या माणसाचा प्रत्यक्ष सहभाग असतो. लेखन चालू असतं. वाचन (विचारवंत असूनही) अजूनही जबर चालू असतं. टीव्ही मालिकांसाठी पण हा माणूस सहभाग देतो. अभिजात मराठीसाठी झटतो. लोकोपयोगी उपक्रमांमध्ये सामील असतो. खूप प्रवास करतो. पाहुणा म्हणून बोलावलं तर कसलेच नखरे करत नाही. दर्जेदार विनोदही करतो. दिग्गज माणसांच्या असंख्य आणि साक्षात अनुभवलेल्या आठवणी त्याच्याकडं आहेत. कितीही बोलला तरी कंटाळवाणं होत नाही आणि संदर्भहीन, मुद्देहीन कधी बोलत नाही. आणि हाक कधीही मारा, हा सतत कार्यरत असलेला हा माणूस वेळ नाही असं कधीच म्हणत नाही. जिथं गरज खरी, तिथं आमचा हरी, अशी आमच्यात म्हण आहे.
त्याच्या आणि माझ्यात जुळणारा 'भाव' म्हणजे, आमचा बाप महात्मा फुले आहे. त्या अर्थानं हरिभाऊ माझा भाऊ आहे.
या खऱ्या मोठ्या माणसाशी अक्षर मानवचा पुढचा संवाद सहवास होतोय.
|| अक्षर मानव संवाद सहवास : तेरा ||
अतिथी : डॉ. हरी नरके
समाजात राबलेल्या एका मान्यवर, अभ्यासू व्यक्तीला बोलवावं आणि सलग त्या व्यक्तीच्या संगतीत राहावं, त्याला, त्याच्या कामाला समजून घ्यावं आणि आपण, आपला समाज उन्नत होण्यासाठी काही घावतंय का ते शोधावं, असा एक 'संवाद सहवास' नावाचा अनोखा उपक्रम अक्षर मानवकडून नियमित घेतला जातो. या आधीचे संवाद सहवास डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. गणेश देवी, डॉ. अनिल अवचट, डॉ. तारा भवाळकर, निखिल वागळे, विनायकदादा पाटील, कुमार केतकर, राजदत्त, नागराज मंजुळे, नागेश भोसले, अतुल पेठे, रामदास फुटाणे यांच्याशी झाले.
आता तेरावा संवाद सहवास होतोय सामाजिक-वैचारिक क्षेत्रांत ज्यांचं मोठं काम आहे अशा डॉ. हरी नरके यांच्याशी.
निवांत, शांत ठिकाणी (आयोजनाच्या दृष्टीनं, व्यवस्थेवर ताण येऊ नये आणि सभेच्या गोंधळापेक्षा नीट संवाद व्हावा म्हणून) फक्त मोजक्या माणसांनी जमावं आणि मनमोकळ्या संवादाचा अनौपचारिक आनंद घ्यावा, विचारमंथन व्हावं असा हा कार्यक्रम आहे.
सर्वांना मुक्त प्रवेश. राहणं-जेवणं विनाशुल्क.
दिनांक : १२, १३ ऑक्टोबर २०१९
स्थळ : इंदापूर, जि. पुणे
नावनोंदणी संपर्क -
सतीश इंदापूरकर : ९६२३११४३९३
शैलेश काटे : ९८९०२५७८७२

Wednesday, September 11, 2019

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा अमृत महोत्सव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७४ वर्षांपुर्वी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. [ १३ सप्टेंबर १९४५] { काही पुस्तकांमध्ये ही स्थापना ८ जुलै १९४५ ला झाल्याचीही नोंद आहे} हे संस्थेचे अमृत महोत्सवी वर्ष. या संस्थेने आजवर अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले. अनेक मान्यवरांना संस्थेकडून खूप काही मिळाले.

विशेषत: औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयातून दलित [आंबेडकरी] साहित्याचे शिल्पकार म्हणता येतील अशा दिग्गजांची जडणघडण झाली. संस्थेच्या नव्या शाखा निघाल्या. संस्थेचे आकारमान वाढले. विद्यार्थी तसे प्राध्यापकांची संख्या वाढली. उपक्रम वाढले. इमारती वाढल्या.


डॉ. बाबासाहेबांनी ते एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिकत असतानाच आपण शिक्षण संस्था काढायची, तिचे महाविद्यालय गुणवंत-नामवंत असेल अशी उभारणी करायची असे मनाशी ठरवले होते. बी.ए.च्या परिक्षेत त्यांच्या वर्गात पहिल्या आलेल्या गजेंद्रगडकरांनाच त्यांनी पुढे आपल्या महाविद्यालयात पहिले प्राचार्य म्हणून नियुक्त केले. समाजातील खूप नामवंत आणि गुणवंत असलेल्या व्यक्तींना आपल्या संस्थेत आवर्जून बोलावून घेतले. प्राचार्य म.भि.चिटणीस, प्राचार्य म.ना.वानखडे, मधू दंडवते, भालचंद्र फडके, रा.ग.जाधव, वा.ल.कुलकर्णी, मे.पु.रेगे, शां.शं.रेगे, स.गं.मालशे आदींची निवड करताना त्यांनी निवडलेली माणसं किती भली होती याची खात्री पटते.


२० जुलै १९४२ रोजी डॉ. बाबासाहेब व्हॉईसरायच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले. त्यांच्याकडे दहा मोठया खात्यांचा कार्यभार होता. त्यांनी अनुसुचित जातींसाठी केंद्रीय नोकर्‍यांमध्ये ८.३३ टक्के आरक्षणाची तरतूद करून घेतली. मात्र लवकरच त्यांच्या लक्षात आले की, शिक्षणाअभावी अनुसुचित जातींमधून पात्र उमेदवार मिळायला अडचण येते. त्यांनी तातडीने शिक्षण संस्था उभारणीला सुरूवात केली. मंत्रालयासमोरच्या शासकीय बराकींमध्ये संस्थेचे वर्ग भरत असत. मुंबईत तेव्हा नोकरी करून शिकणार्‍या गरिब, होतकरू मुलांमुलींसाठी सकाळचे एकही महाविद्यालय नव्हते. ती उणीव बाबासाहेबांनी भरून काढली.

फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि विनोदी लेखक बाळ गाडगीळ हे गरिब ब्राह्मण कुटुबांतले. गाडगीळ नोकरी करून शिकले ते बाबासाहेबांच्या या महाविद्यालयामुळे. यांनी आपले आत्मचरित्र बाबासाहेबांना अर्पण केलेले आहे.

अशा असंख्य ज्ञात अज्ञातांच्या वाटचालीत पीपल्स एज्युकेशनने शिक्षणाची सावली दिली.
बाबासाहेबांनी आपला अफाट ग्रंथसंग्रह पीपल्सच्या ग्रंथालयांना दिला. पालीभाषा, बौद्ध संस्कृती, आधुनिक ज्ञानविज्ञान या बाबतीत ही संस्था अग्रेसर राहावी असे त्यांचे स्वप्न होते. " शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा" हा मूलमंत्र बाबासाहेबांनी या संस्थेला दिला. पहिल्या दोनांवर जेव्हढा भर दिला गेला तितके लक्ष तिसर्‍याकडे दिले गेले काय?

संस्थेचे आजवरचे योगदान मोठेच आहे, तथापि बाबासाहेबांना जे अभिप्रेत होते ते संशोधन आणि ज्ञाननिर्मितीचे कार्य इथे घडले काय? अपेक्षित उंची, गुणवत्ता संस्था निर्माण करु शकली काय? याचेही आत्मपरीक्षण यानिमित्ताने व्हायला हवे. इतर संस्थांच्या तुलनेत पीपल्स एज्युकेशन सोसायटी नेमकी कुठे कमी पडली? मुंबई, पुणे, औरंगाबाद, महाड, नांदेड, कोल्हापूर, दापोली, पंढरपूर, बंगलोर आणि बुद्धगया यापलिकडे संस्थेच्या शाखा किती निघाल्या? संस्था उभारणे, त्या सुरळीतपणे चालवणे, त्यांचा विकास करणे आणि संस्थेचा नावलौकिक-गुणवत्ता यात सातत्याने वाढ करणे यात बहुजन का कमी पडतात, ज्ञानी माणसं जोडणं, माणसं सांभाळणं हे आम्हाला का जमत नाही? यावरही प्रकाश टाकला जायला हवा.



- प्रा. हरी नरके, ११ सप्टेंबर २०१९






Monday, September 9, 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवगाथेची उद्या सेंच्युरी- प्रा.हरी नरके













आजकाल अनेक वाहिन्यांवर मालिकांची भाऊगर्दी असते. त्यातल्या पाचपन्नासांनी शेकडो भाग पुर्ण केलेले असतात. अशा स्थितीत गौरवगाथेची सेंच्युरी होणं ही काही फार मोठी अपुर्वाई नसावी.

आधुनिक भारताचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवनावर आजवर कोणत्याही भाषेत, कोणत्याही वाहिनीने मालिका केलेली नाही. अशास्थितीत मराठी मालिका तयार करण्याचा धाडशी निर्णय दशमी आणि स्टार प्रवाहने घेतला. मराठी भाषकांची लोकसंख्या सुमारे दहा कोटी आहे. त्यातल्या निम्म्या लोकांपर्यंत ही मालिका आजच पोचली आहे. जिथे जिथे मराठी माणसं राहतात तिथे तिथे ही मालिका आवर्जून बघितली जाते. गेल्या १७ आठवड्यात ही मालिका बघणारांची संख्या सातत्याने वाढते आहे. मालिकेचे एकुण २०० भाग असणार आहेत. उद्या मालिकेचा अर्धा टप्पा पुर्ण होईल.


अतिशय संवेदनाशील आणि आव्हानात्मक विषयाला भिडताना दशमी या निर्मिती संस्थेने आणि स्टार प्रवाह या वाहिनीने सर्व प्रकारची दक्षता घेतलेली आहे असे तुम्हाला नक्कीच जाणवत असणार.

या मालिकेला आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग मानणारे कोट्यावधी प्रेक्षक मिळणे हीच आम्हाला सर्वात मोठी दाद वाटते. बाबासाहेबांची सम्यक ओळख करून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न तुम्ही रसिकांनी उचलून धरला याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.

इतर मालिका आणि स्टार प्रवाहवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील गौरवगाथा यात तुम्हाला खरंच काही फरक वाटतो काय?  असल्यास नेमका कोणत्या प्रकारचा फरक वाटतो? दशमी क्रिएशनची ही निर्मिती हटके आहे असे तुम्हाला जाणवते काय? यातील कथाविस्तार, पटकथा, संवाद, संशोधन यावर विशेष मेहनत घेतल्याचे तुम्हाला मालिकेद्वारे प्रतित होते काय?

ही मालिका तुम्हाला थेटपणे भिडते काय? या मालिकेचे सादरीकरण, लेखन, दिग्दर्शन, छायाचित्रण, नेपथ्य, संकलन, संगीत अशी एकुणच सर्व निर्मिती तुम्हाला भावतेय काय?  या मालिकेतील विविध भुमिकांसाठी अभिनेते/अभिनेत्री यांची केलेली निवड तुम्हाला कशी वाटते? ते आपल्या भुमिकांना न्याय देताहेत असे तुम्हाला वाटते ना? आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.


दररोज दाखवण्याची एखादी मालिका बनवायची म्हटले की तिला वेळेची मर्यादा असते. वेळेबरोबरच इतरही अनेक बाबींची कमतरता असते. अशा स्थितीत विषयाशी प्रामाणिक राहून मालिका बनवणे ही एक मोठी कसरतच असते.

बाबासाहेबांसारखा हिमालयाच्या उंचीचा महापुरूष आणि त्यांचा १८९१ ते १९५६ हा काळ यावरील बायोपिक तयार करण्याचे आव्हान किती मोठे आहे हे त्यातल्या जाणकारांनाच समजू शकेल.

यानिमित्ताने या मालिकेच्या निर्मिती आणि यशासाठी झटणार्‍या सर्व चमुंचे हार्दीक अभिनंदन. जाणत्या प्रेक्षकांचे मन:पुर्वक आभार. असाच स्नेह कायम ठेवावा ही विनंती.

- प्रा.हरी नरके, १० सप्टेंबर २०१९

Thursday, September 5, 2019

राधाकृष्णन भांडारकरच्या निवडणुकीत पराभूत झाले होते






५ सप्टेंबर हा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असल्याने शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.
ब्रिटीश सरकारचे निष्ठावंत म्हणून त्यांना "सर" हा किताब देण्यात आला होता.
आयुष्यातील बहुतेक सगळा काळ त्यांनी परदेशी विद्यापिठांमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करण्यात घालवला.

त्यांनी २ टर्म भारताचे उपराष्ट्रपती आणि एक टर्म राष्ट्रपती म्हणूनही काम पाहिले. ते अपक्ष असूनही या पदांवर नियुक्त केले गेले. वेदांतावरचे वलयांकित विचारवंत असल्याने त्यांना हे सन्मान दिले गेले. त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान "भारत रत्न " ही दिला गेलेला आहे.विशेष म्हणजे हा पुरस्कार त्यांना दिला गेला तेव्हा ते तो देणार्‍या पदावर कार्यरत होते. देणाराने स्वत:लाच पुरस्कार घ्यावा हे ग्रेट आहे. राष्ट्रपती हे आपल्या देशात सर्वोच्च पद आहे. त्या पदावर असताना स्वत:चा वाढदिवस शिक्षकदिन म्हणून सुरू करा असा आदेश देणारे सर्वपल्ली राढाकृष्णन मला अतिशय थोर वाटतात. शिक्षणाने / शिक्षकाने बालकांच्या मनावर चारित्र्याचे संस्कार करणे अभिप्रेत असते. डॉ. राधाकृष्णन यांच्या चारित्र्याचे जे वाभाडे त्यांच्याच मुलाने [ थोर विद्वान प्रो.गोपाल यांनी ] काढलेले आहेत ते वाचनीय आहेत.


ज्या अर्थी त्यांची जयंती शिक्षक दिन म्हणून पाळली जाते त्या अर्थी त्यांनी शिक्षक म्हणून काहीतरी असाधारण काम केलेले असणार. तथापि ते काम कोणते याबद्दल मी आजवर असंख्य शिक्षकांना विचारले असता त्याचे नेमके उत्तर एकही शिक्षक देऊ शकला नाही.

त्यांनी शिक्षण क्षेत्राला काहीतरी महत्वाचे योगदान दिलेले असेल या दृष्टीने माहिती घ्यायचा प्रयत्न केला असता परदेशात ते प्राध्यापक होते हेच त्यांचे सर्वात मोठे योगदान असल्याचे सांगितले गेले. त्यांनी शिक्षणशास्त्राला काहीतरी भरिव दिले असेल असे म्हणावे तर ना त्यांनी कोणतीही शिक्षणविषयक थिएरी मांडली ना ते शिक्षणशास्त्राचे शिक्षक, प्राध्यापक होते. ना त्या विषयावर त्यांनी काही लेखन केले.

ते धर्मशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचे लेखन वेदांतावर आहे. ते उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती होते म्हणून त्यांच्या नावे शिक्षक दिन होत असेल असे म्हणावे तर आजवर डझनावारी लोक या पदांवर बसून गेलेत.

भारतविद्या, प्राचीन विद्या, धर्मशास्त्र, संशोधन या विषयातील सर्वोच्च काम असलेल्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेच्या निवडणुकीला ते उभे होते, तेव्हा मात्र त्यांचा दणदणीत पराभव झालेला होता. संस्थेच्या विद्वान मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले होते. विशेष म्हणजे तेव्हा ते देशाचे उपराष्ट्रपती होते आणि तरिही भांडारकरच्या निवडणुकीत ते हारले होते. उपराष्ट्रपती या पदावर असताना एका संस्थेच्या निवडणुकीत पराभूत होण्याचा विक्रम त्यांच्या एकट्याचाच नावे जमा आहे.

ज्या अर्थी त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा केला जातो त्या अर्थी त्यांचे शिक्षक म्हणून देशाला काहीतरी अभुतपुर्व योगदान असणारच. ते नेमके कोणते यावर कोणी प्रकाश टाकील काय?

-प्रा. हरी नरके, ५ सप्टेंबर २०१९