गोदावरी परूळेकर यांच्या " जेव्हा माणूस जागा होतो" या पुस्तकाला यावर्षी ५० वर्षे पुर्ण झाली. आत्मकथन आणि समाजशास्त्रीय दस्तऎवज म्हणून हे पुस्तक मोलाचे आहे. त्याचा सुवर्णमहोत्सव लक्षात ठेऊन हेरंब कुलकर्णी यांनी "आदिवासी भागातील विकास: काय झालं, काय राहिलं" या विषयावर मौजेच्या यावर्षीच्या दिवाळी अंकात काहीजणांना बोलतं/लिहितं केलेलं आहे. मेधा पाटकर, विवेक पंडित, प्रकाश आमटे, वाहरू सोनवणे, बंड्या साने व पुर्णिमा उपाध्याय आणि अशोक ढवळे यांनी मांडलेला लेखाजोखा वाचनीय आहे. हेरंब कुलकर्णी यांचा बीजनिबंध अभ्यासपुर्ण आहे.
मेळघाटातील धाणा या गावातील आदिवासींनी जंगलात पिकं घेतली. ही जमिन वनखात्याच्या मालकीची असल्याने आम्ही ती पिकं उध्वस्त करू असे अधिकार्यांनी घोषित केले. पिक तुडवण्यासाठी हत्ती मागवण्यात आला. आदिवासींच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार अशी ही परिस्थिती होती. पुर्णिमा उपाध्याय यांनी नागपूर उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना पत्र लिहिले. कोर्टाला शनिवार-रविवारची सुट्टी होती. तरिही हे पत्र हीच याचिका माणून त्या न्यायाधिशांनी सरकारी वकिल, वनअधिकार्यांना बोलावून घेतले व पिकांची नासाडी करण्याला मनाईहुकुम बजावला. या लेखात त्या न्यायाधिशांचे नाव असायला हवे होते. सध्या न्यायव्यवस्थेचे ज्या प्रकारे राष्ट्रीयकरण झालेले आहे ते पाहता असे वेगळे काम करणार्या न्यायाधिशांना दाद द्यायला हवी. हा लेख चांगला आहे,पण त्यात गोदावरी बाईंच्या सदर पुस्तकाचा उल्लेख दिसला नाही. १९०७ साली भीमराव रामजी उर्फ बाबासाहेब आंबेडकर हे मॅट्रीकची परीक्षा पास झाले. ते मुंबई प्रांतातील पुर्वास्पृश्यातील पहिले विद्यार्थी होते. त्यानंतर बरोबर शंभर वर्षांनी २००७ साली मेळघाटातील चिलाटी गावचा पहिला आदिवासी मुलगा एस.एस.सी.ची परिक्षा पास झाला. या दोघांच्या मार्कांमध्येही विलक्षण साम्य आहे. लेखिकेने या मुलाचे नाव द्यायला हवे होते.
मेधा पाटकरांना आजचे शिक्षण विद्रोह जागा करीत नाही असे वाटते. आजची शिक्षण पद्धती ज्ञानाऎवजी कौशल्याला महत्व देते हे धोरण त्यांना चुकीचे वाटते.
ढवळे यांचा लेख म्हणजे त्यांच्या पक्षाने किती आणि कोणत्या निवडणूका जिंकल्या यांची भली मोठी यादी होय. आदिवासींना जे काही मिळाले ते केवळ ढवळे यांच्या पक्षामुळेच असा जोरदार दावा ते या लेखात करतात. पंडित यांच्या लेखात त्यांनी ढवळ्यांच्या या पक्षीय कामांचा पोलखोल केलेला आहे. वाहरू सोनवणेंना बाहेरच्या लोकांच्या आदिवासींमधील कामांमागे कॉन्स्पीरशी थेयरी दिसते.
सगळेच लेख वाचनीय आहेत.
- प्रा. हरी नरके
No comments:
Post a Comment