Wednesday, November 4, 2020

बेस्ट कन्नड टेलिव्हीजन शो पुरस्काराच्या निमित्ताने- प्रा. हरी नरके


आजकाल आपण एका विपरीत काळामधून जातो आहोत. एखाद्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमातील प्रश्नानेसुद्धा धार्मिक भावना दुखावल्याचा कांगावा करून त्या कार्यक्रमाविरुद्ध आणि त्याच्या सुत्रसंचालक व निर्मात्याविरूद्ध गुन्हे दाखल होण्याचा हा काळ आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भारतीय संविधानाने दिलेले मुलभूत अधिकार हे सारे खुंटीला टांगून उलट्या पावलांचा प्रवास करणार्‍या सनातन्यांसाठी हा सुगीचा काळ आहे. अशा काळात समाजक्रांतिकारक डॉ० बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीराव - सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर रंजनातुन प्रबोधन, जागरण करणार्‍या टिव्ही मालिका निर्माण करणे, त्या सुरळीतपणे पार पाडणे हे किती जोखमीचे काम आहे त्याबद्दल न बोललेले बरे. अशा मालिकांना सुजाण प्रेक्षकांचा मिळणारा भरिव आणि दणकट प्रतिसाद उमेद वाढवणारा ठरतो. अशा मालिकांना पुरस्कार मिळण्याची सुतराम शक्यता नसते. निदान मराठीत तरी ते शक्य नाही. जोतीराव -बाबासाहेब यांना हयातभर भेदभाव आणि पक्षपात सहन करावा लागला. ते गेल्यानंतर आज एव्हढ्या वर्षांनी परिस्थिती वरवर सुरळीत दिस असली तरी गुंतागुंत अनेकपटींनी वाढलेली आहे. अनेकांच्या मनातला उच्चत्वाचा अहंगंड, सुप्त पातळीवर मनात फुलवलेला विखार आणि परिवर्तनाबद्दलची अढी, समकालीनांबद्दलचा इसाळ यात कोणतीही कसर दिसत नाही. 

आमचे काही लढवय्ये परिवर्तनवादी मित्र तर अशा कामांच्या मागे सुक्ष्मदर्शक भिंगं लावूनच बसलेले असतात. अशा वैचारिक प्रबोधनाच्या कामांमध्ये विरोधकांनी आणलेले अडथळे समजून घेता येतात पण स्वकीयांच्या छावणीतून होणारे हल्ले वेदनादायी असतात. एकवेळ मदत करू नका पण किमान कामाला गतीरोध तरी निर्माण करू नका. या आमच्या विद्वान दोस्तांचं समकालीन परिस्थितीचं आकलन तोकडं आणि दळभद्री. हे स्वत: संपुर्ण निष्क्रिय असतात मात्र दुसर्‍यांच्या कोंबड्याने प्रबोधनाचा सुर्य उगवताच कामा नये यासाठी ते जिवाचा आटापिटा करीत असतात. त्यांच्याकडून शाबासकीचे दोन शब्द सोडा सतत फक्त जळफळाट आणि हेंद्रेपणा वाट्याला येतो. निदान आमची तरी त्यांच्याकडून तशीच अपेक्षा असते, अनुभवही तसाच आहे. हे चक्रम लोक इतके कडवट, द्वेष्टे, करंटे आणि विखारी आहेत की एकवेळ विरोधी छावणी परवडली पण यांचे बोचकारे नकोत.  

जे टीआरपीच्या तगड्या स्पर्धेत असतात त्या इतर मालिकावाल्यांकडून अशा कामांबद्दल बरं बोललं जाण्याची सुतराम शक्यता नसते. त्यामुळे आपली बाबासाहेबांवरील मराठी मालिका दर्जेदार झाली, चार भल्या लोकांना ती आवडली हाच आमचा पुरस्कार आम्ही मानला. कोणी दखल घेवो न घेवो, कोणी शिव्या देवोत, जहरी टिका करोत, नाकं मुरडोत, आपण आपलं कर्तव्य करीत राहायचं. चार शिव्या कमी मिळाल्या तर तोच बोनस समजायचा असा हा विपरीत काळ आहे. महापुरूषांचे विचार कोट्यावधींपर्यंत पोचवण्याचा, मालिकेच्या निर्मितीचा आनंद मोठा असला तरी सतत टांगती तलवार आणि अचुक राहण्याचा भयंकर ताण हे ओझे असते की बक्षीस?  

अशा काळात आपल्या हिन्दीतील मालिकेच्या कन्नड भाषेत डब केलेल्या टिव्ही शोला यावर्षीचा बेस्ट कन्नड टेलिव्हीजन शोचा पुरस्कार मिळावा ही आश्चर्य वाटावे अशी अगदी चमत्कारसदृश्य घटनाच म्हटली पाहिजे.

-प्रा. हरी नरके,

०४/११/२०२०

No comments:

Post a Comment