Monday, June 25, 2012

गाथासप्तशती अभिजाततेचा बहुमूल्य पुरावा

{सौजन्य: श्री.अरुण जाखडे, दिव्य मराठी,रविवार, दि.२५ जुन २०१२}गेल्या दहा वर्षांत भाषांविषयक ज्या महत्त्वाच्या घडामोडी भारतात झाल्या, त्यापैकी महत्त्वाची म्हणजे भारत सरकारने संस्कृत, तामिळ, तेलुगू आणि कन्नड या चार भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला आहे. या चार भाषांइतकीच मराठी ही अभिजात भाषा असून तिला असा दर्जा मिळायला हवा, अशी इच्छा आपण मराठी भाषकांची असणे योग्यच आहे. पंतप्रधान कार्यालयातून वरील चार भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मान्य झाला त्या वेळी सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री होते. ‘लोकराज्य’च्या दिवाळी अंकात हरी नरके यांनी मराठी अभिजात भाषा असल्याबद्दलचा लेख लिहिला होता आणि तेथून ही चर्चा ऐरणीवर येत गेली. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान कार्यालयातून चार भाषांना अभिजाततेचे प्रमाणपत्र दिले, पण आता त्यांना मात्र मराठी ही अभिजात भाषा आहे, असे वाटले तरी केंद्र सरकारकडे त्यासंबंधी काही पुराव्यांसह मांडणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी एक समिती नेमली आहे. हरी नरके हे समितीचे समन्वयक तर डॉ. श्रीकांत बहुलकर, डॉ. मैत्रेयी देशपांडे, डॉ. कल्याण काळे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. मधुकर वाकोडे, सतीश काळसेकर असे सदस्य आहेत. वर्तमानपत्रातून या बातम्या आपण वाचल्या; परंतु अभिजात भाषा म्हणजे काय? त्याचे कोणते निकष आहेत, त्या निकषावर मराठी ही कशी अभिजात आहे, हे जाणून घ्यायला हवे. अभिजात भाषेचे चार निकष आहेत 

1.     भाषेचे वय 1500 ते 2500 वर्षे असावे.

2.     त्या भाषेत श्रेष्ठ दर्जाचे साहित्य असावे.

3.     भाषेने स्वत:च्या मूळ रूपांपासून आजपर्यंत केलेल्या प्रवासात अंतर अथवा खंडितता आली असेल तरीही, भाषेची चौकट कायम असेल आणि ती भाषा बोलणा-यांनी लिखित स्वरूपात फार मोठे साहित्य निर्माण केलेले असले पाहिजे.

4.     त्या भाषेत सातत्याने लिखित स्वरूपात साहित्य लिहिलेले असावे. वरील चार निकष मराठी भाषा पूर्ण करत आहे. त्यासाठी समिती ज्या मुद्द्यांचा आधार घेत आहे, त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे -

-  जुन्नरजवळील नाणे घाटातील शिलालेख, ज्यावर ब्राह्मी लिपीत ‘महारथी’ असा उल्लेख आढळतो.

-  2500 वर्षांपूर्वीच्या ‘विनयपिटक’ या बौद्ध धर्मग्रंथात असलेला महाराष्‍ट्राचा उल्लेख.

-  श्रीलंकेतील सिंहली लिपीतील ‘दीपवंश’ आणि ‘महावंश’ या 1500 वर्षांपूर्वीच्या ग्रंथात महाराष्‍ट्री भाषेचा असलेला उल्लेख.

-  वररुची या पाणिनीच्या समकालीन विद्वानाने प्राकृत भाषांचे व्याकरण लिहिले आहे. त्याने शोरशनी, पैशाची, अर्धमागधी, महाराष्‍ट्री या प्राकृत भाषांचे व्याकरण लिहिले आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे, त्याने ‘शेषमहाराष्‍ट्रीवत’ हा ठळक नियम केला आहे. त्यानुसार सर्व प्राकृत भाषांचे उरलेले नियम मराठीप्रमाणे होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत असलेली 80 हस्तलिखिते ही प्राचीन आहेत आणि या पुराव्यांना बळकटी देणारी आहेत.

-  संपूर्ण भारतात 1000 लेणी आहेत. त्यातील 800 एकट्या महाराष्‍ट्रात आहेत. या लेण्यांतील सर्व शिलालेख जुन्या मराठीत आहेत.

- ‘गाथासप्तशती’ हा मराठातील आद्यग्रंथ आहे. तो हाल सातवाहनाच्या काळातील आहे. 

या सर्व पुराव्यांतून स्पष्ट होते की मराठी भाषा ही पुरातन भाषा असून ती जुनी मराठी, मध्य मराठी आणि अर्वाचीन मराठी अशा तीन काळांतून प्रवाहित राहिली आहे. पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या मदतीस महत्त्वाचा ग्रंथ आहे तो म्हणजे ‘हाल सातवाहनाची गाथासप्तशती’.‘गाथासप्तशती’ हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा मराठीतील आद्यग्रंथ होय. अस्सल मराठमोळे नागरी, ग्रामीण व वन्य लोकजीवन या गाथेत ललितमधुर सौंदर्याने नटलेले आहे. शृंगाराबरोबरच जीवनाची करुण, दारुण व हृद्य अशी सर्व अंगे सारख्याच कुशलतेने गाथासप्तशतीत रेखाटलेली आहेत. मानवी जीवनातील शाश्वत मूल्यांचा पुरस्कार करणारा हा आद्य मराठीतील श्रेष्ठ ग्रंथ होय.

कै. स. आ. जोगळेकर यांची प्रदीर्घ अभ्यासपूर्ण चारशे पन्नास पानांची प्रस्तावना, संपादन, भाषांतर व टीका हे या ग्रंथाचे आणखी वेगळे वैशिष्ट्य आहे. हा ग्रंथ 1956 ला प्रकाशित झाला, त्यानंतर तो अद्याप उपलब्ध नव्हता. पद्मगंधा प्रकाशनाने तो आता प्रकाशित केला आहे.

या ग्रंथामुळे मराठी भाषा अभिजात भाषा सिद्ध झाली व तसा दर्जा मिळाला तर मराठीला केंद्र सरकारकडून दरवर्षी किमान 500 कोटी मिळतील. ही रक्कम मराठी भाषेच्या विकासासाठी, उपक्रमांसाठी वापरली जाऊ शकते.