Tuesday, June 19, 2012

व्यंगचित्राचं राजकारण


व्यंगचित्राचं राजकारण

पळशीकर ब्राह्मण आणि यादव ओबीसी आहेत म्हणून त्यांच्यावर हेत्वारोप, हल्ले होणार असतील आणि सारे आंबेडकरवादी त्यावर सोयीस्कर मौन धारण करणार असतील तर ते चळवळीचंच नुकसान करणारं ठरेल. यापुढं मित्रशक्ती बाबासाहेबांवर लिहिताना ताकही फुंकूनपितील.
एका व्यंगचित्रानं गेल्या महिन्यात आपलं समाजजिवन ढवळून काढलं. एन.सी.ई.आर.टी.या केंद्रीय अभ्यासक्रमाची पुस्तकं तयार करणार्या संस्थेनं इयत्ता अकरावीच्या राज्यशास्त्राच्या पाठय़पुस्तकात छापलेल्या एका व्यंगचित्रावरुन हा गदारोळ माजला. संसदेत खासदारांनी जोरदार हल्ला केल्यानंतर सरकारनं हे व्यंगचित्र पुस्तकातून काढून टाकल्याची प्रथम घोषणा केली. नंतर हे पुस्तकच अभ्यासक्रमातून काढून टाकलं गेलं. त्याच्या निर्मितीची चौकशी करण्यासाठी आंबेडकरवादी डॉ. सुखदेव थोरात यांची समिती नेमण्यात आली. या समितीचा अहवाल येईल तेव्हा ग्रंथाच्या निर्मितीमागची चित्तरकथा कळू शकेल. भारत सरकारच्या या पावलांचा निषेध नोंदविण्यासाठी ग्रंथसमितीचे डॉ. सुहास पळशीकर आणि डॉ. योगेंद्र यादव यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. त्यांच्यावर खटले भरावेत अशी मागणीही करण्यात आलीय.
जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार शंकर यांनी 1949 साली ‘शंकर्स विकली’त प्रकाशित केलेलं हे व्यंगचित्र आहे. ते स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं असणार. मात्र त्यांनी त्याला आक्षेप घेलल्याचं दिसत नाही. डॉ.बाबासाहेब हे अतिशय खिलाडू वृतीचे होते. इतरांनी केलेल्या टिकेवर  ते चिडत नसत. स्वागतच करीत. ते स्वतःही अनेकांवर तुटून पडत.
हे पुस्तक गेली सहा वर्षे अभ्यासक्रमात शिकवलं गेलं आहे. मायावती सत्तेवर असताना ते उत्तर प्रदेशात शिकवलं गेलं. त्याला त्यांनी कधीही हरकत घेतली नाही. रामदास आठवले काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत असताना संसदेत या पुस्तकावर पाच वर्षांपूर्वी चर्चा झाली तेव्हा त्यांनी पुस्तकाला विरोध केला नाही. केंद्रीय मंत्री अर्जुनसिंग यांनी सरकारतर्फे तेव्हा हे पुस्तक मागे घेणार नाही असं सांगितलं. आता मात्र त्याच पक्षाचे मंत्री कपिल सिब्बल यांनी ते लगेच मागं घेतलं. द्रमुकचे लोकही तेव्हा गप्प होते. आता तेही विरोधात पुढं आहेत. राजकीय परिस्थिती बदलली की पुस्तकाकडं बघण्याचा दृष्टीकोन बदलतो काय? होय. संसदेत आज सरकार आरोपांच्या जाळ्यात अडकलेलं आहे. मायावती, आठवले, द्रमुक हे सारेच अडचणीत आहेत. मायावती, आठवले आदींना लोकांचे लक्ष स्वतःकडं वेधून घेण्यासाठी आणि सरकार तसंच द्रमुकला लोकांचे लक्ष दुसरीकडं वेधण्यासाठी मुद्दा हवाच होता. तो त्यांना मिळाला. सचिन खरात यांच्या संघटनेनं डॉ. पळशीकर यांचं पुणे विद्यापीठातलं डॉ . बाबासाहेबांच्या पुतळ्याशेजारचं डॉ. आंबेडकर भवनातलं कार्यालय तोडलं. बाबासाहेबांना अपार प्रिय असलेल्या पुस्तकांची नासधूस केली. पळशीकरांना निळी शाई फासण्याचा त्यांचा प्रयत्न होता. विद्यापीठातील काही बौध्द प्राध्यापकांनी कडं करून पळशीकरांचं संरक्षण केलं. खरातांचे कार्यकर्ते चॅनलवाल्यांना सोबत घेऊनच गेले होते. बाबासाहेबांची मानहानी झाली असं कोणाचं मत असेल तर त्यांनी वैचारिक प्रतिवाद करायला हवा होता. बाबासाहेबांच्या संविधानाच्या मार्गाने जायला हवे होते. आंबेडकरी चळवळ आता प्रगल्भ झालेली आहे. आम्ही बाळ गांगल आणि अरुण शौरींनाही वैचारिक प्रत्युत्तर दिलेलं होतं. यापुढंही कोणाचाही प्रतिवाद करण्याची आमची क्षमता आहे. हिंसक हल्ले ही बुद्ध-फुले-आंबेडकरांच्या मार्गाने जाण्याची रित आहे काय? या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. या हल्ल्याने बाबासाहेबांचाच अवमान झालेला आहे. आम्ही वैचारिक लढाया करायला सक्षम नाही अशी कबुली यातून दिली गेली आहे. जी मला मान्य नाही. हा मला आंबेडकरी चळवळींचाच अपमान वाटतो.
हल्ल्याचा निषेध करायला सगळे आंबेडकरी विचारवंत पुढे यायला हवे होते. पण तसे घडले नाही. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरपणे निषेध केला हे चांगले झाले. त्यांनी पळशीकर-यादवांचा राजीनामा स्वीकारला जाऊ नये, अशीही मागणी केली. बाकी बरेचजण मूग गिळून गप्प बसले किंवा अवमानावर बोलताना पळशीकर-यादवांना प्रतिगाम्यांचे हस्तक ठरवून मोकळे झाले. हे दोन वेगळे मुद्दे आहेत. मी त्यांची गल्लत करणार नाही.व्यंगचित्रावर बोलण्याचा माझा हक्क सुरक्षित ठेवून मी काही प्रश्न उपस्थित करु इच्छितो.
पळशीकर-यादव हे आंबेडकरी चळवळीचे जवळचे मित्र आहेत. पुरस्कर्ते आहेत. त्यांच्यावर प्रतिगाम्यांचे हस्तक असा शिक्का मारणं अन्यायकारक आहे. त्यांच्याशी मतभेद होवू शकतात. नव्हे माझेही त्यांच्याशी अनेक मतभेद आहेत. राहतील. पण मी त्यांच्या हेतूंवर शंका घेणार नाही. उलट त्यांच्यासारखे प्रागतिक लोक अभ्यासक्रम ठरविण्यात होते म्हणून पहिल्यांदाच संविधान निर्मितीचे योग्य श्रेय बाबासाहेबांना दिले गेले. त्यांना तिथून हटविण्यासाठी उजव्या शक्ती देव पाण्यात घालून बसल्या होत्या. त्या जिंकल्या. एका व्यंगचित्राचा भावनिक इश्यू करुन आंबेडकरवाद्यांच्याच काठीने त्यांनी आंबेडकरवादी पुस्तक रद्द करवले. क्या बात है! याला म्हणतात, शांत डोक्याने सापळा लावा, चळवळीतील लोकांचा वापर करून घ्या आणि आंबेडकरवादाला खतपाणी घालणारा अभ्यासक्रम रद्द करवून घ्या. ते पुस्तक न वाचताच रद्द करा अशी मागणी पुढे आली. गदारोळ करण्यात आला. पुस्तक रद्द झालेही.
अभ्यासक्रम तयार करण्याची यंत्रणा आजवर कायम, हिंदुत्ववादी, मार्क्सवादी किंवा गांधीवादी यांच्या हातात राहिलेली आहे. फुले-आंबेडकरवादी तिकडे फिरकूही शकणार नाहीत, याचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. म्हणूनच पळशीकर-यादव या चळवळीच्या मित्रांचे तिथं असणं गरजेचं होतं. एन.सी.ई.आर.टी.चे माजी प्रमुख आणि प्रतिगामी विचारांचे हस्तक जे.एस.रजपूत यांनी `यादव-पळशीकर हटाव’ मोहीम हातात घेतली होती. ती मायावती, आठवले आणि महायुतीतील महानुभावांच्या मदतीनं फत्ते झाली.
हे व्यंगचित्र पाठय़पुस्तकात आज वापरण्याची खरंच गरज होती काय? हे व्यंगचित्र बाबासाहेबांचा अवमान करतं काय? हे व्यंगचित्र पळशीकर-यादवांनी बाबासाहेबांच्यावरील आकसापोटी मुद्दाम काढून घेऊन पुस्तकात छापलं आहे काय? पुस्तकात हे एकच व्यंगचित्र आहे की सगळं पुस्तकच इतर अनेक मान्यवरांवरील व्यंगचित्रांनी भरलेलं आहे? पाठय़पुस्तकात व्यंगचित्रं वापरुन ते रंजक करावं काय? त्यामुळं मुलांची अभ्यासाची भीती घालवून त्यांच्या मनातली अभ्यासाबद्दलची अढी/दहशत नष्ट करणं योग्य आहे काय? चळवळीला व्यंगचित्रांचं वावडं असावं काय? आम्ही व्यंगचित्र हे व्यंगचित्र म्हणून पाहूच शकत नाही काय? बाबासाहेबांनी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर अवघ्या साडेपाच महिन्यात पहिला मसुदा सादर केलेला असताना विलंबाला त्यांना जबाबदार ठरविणं योग्य ठरते काय? घटना समितीत ज्यांचे 80 टक्के बहुमत होते ते सत्ताधारी पक्षाचे लोक दोन वर्षे चर्चेचे गुर्हाळ लावून बसले हा दोष बाबासाहेबांचा कसा? बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष झाले 29 ऑगस्ट 1947 रोजी. त्यांनी तयार केलेला घटनेचा पहिला मसुदा `गॅझेट ऑफ इंडिया’त प्रकाशित झाला, 20 फेब्रुवारी 1948 रोजी. त्यावर पुढं सुमारे दोन वर्षे चर्चा होऊन घटना 26 जानेवारी 1950 ला अमलात आली. असे अनेक प्रश्न आहेत. त्याच्या उत्तरांच्या शोधातूनच सत्त्याकडं जाता येईल. पळशीकर ब्राह्मण आणि यादव ओबीसी आहेत म्हणून त्यांच्यावर हेत्वारोप/हल्ले होणार असतील आणि सारे आंबेडकरवादी त्यावर सोयीस्कर मौन धारण करणार असतील तर ते चळवळीचंच नुकसान करणारं ठरेल. यापुढं मित्रशक्ती बाबासाहेबांवर लिहिताना ताकही फुंकूनपितील.
आजवर इतरांची कठोर चिकित्सा करणारे आणि दुसर्यांवर टीकेचे जोरदार आसूड ओढणारेच जर आज हळवे बनून आम्ही टीका खपवून घेणार नाही, असं म्हणणार असतील तर मग या महाराष्ट्रात यापुढं छत्रपती शिवरायांप्रमाणेच बाबासाहेबांचाही देव केला जाईल, ही काळ्या दगडावरची रेघ होय. म्हातारी मेल्याचं दुःख आहेच पण काळही सोकावतोय. विचारी माणसंही भावनिक सापळ्यात कशी अडकतात त्याचा हा पुरावाच नव्हे काय? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जनक बाबासाहेब हेच मुस्कटदाबीसाठी वापरले जात असताना आम्ही काय करणार आहोत?
प्रा. हरी नरके

2 comments:

  1. सर नमस्कार,
    कोकणातल्या खेडयात माझा जन्म झाला. शाळेत, वर्गात अनेक जातीचे मित्र होते. तेव्हा जात-पात, धर्म असले विचार आम्हाला कधी शिवलेही नाहीत, त्याचे कारण आमचे गुरूजन. वयाने मोठा होत गेलो, मुंबई शहरात आलो. इथे अधिक प्रगल्भता असायला हवी होती. पण त्या उलट इकडे जाती धर्माचे दलालच सगळा कारभार हाकताना दिसले. स्वत:च्या फायद्यासाठी शिवाजीमहाराज ते बाबासाहेब सगळ्यांचाच वापर करताना दिसले. समाजमन कलुषीत केलं आहे ते या पुढारी म्हणवणार्‍यांनीच. यांची वळवळ असते ती सत्तेसाठी चळवळीसाठी नव्हे. बाकी कपील सिब्बल, रामदास आठवले यांच्याबाबतीत न बोललेलच बरं. लेख खुप आवडला. शेवटच वाक्य "विचारी माणसंही भावनिक सापळ्यात कशी अडकतात त्याचा हा पुरावाच नव्हे काय?" हे खटकलं. ज्या सर्वांनी हे केलं त्यांना विचारी माणसं कसं म्हणता येईल?

    ReplyDelete
  2. FROM -FACEBOOK: Mangesh:"nice one. i like it
    21 hours ago · Unlike · 1

    Jayashree Hari Joshi: avadala. mi mazya wall var share karu shakate ka?
    20 hours ago · Unlike · 1

    Sanjay Kadam: Sagali mothi manase karayache te kaam karun gele, lokanni ekdusaryawar chikhalfek karanyapksha tya mothhyancha kiman ekhada gun aatmasaath karawa....
    20 hours ago · Like

    Santosh Govind Gawai Sir thode high resolution upload karave hi vinanti...its not legible to read...
    16 hours ago · Like

    Abhijeet Pandit: sir... akshar barik zalyane wachta yet nahi ho.......
    12 hours ago · Like

    Jayashree Hari Joshi: jpg madhye kinva pdf madhye save karun enlarge karun vachata yeil...

    ReplyDelete