Thursday, January 17, 2019

लक्ष्मणराव पाटील : एक भारी राजकारणी -


लक्ष्मणराव पाटील : एक भारी राजकारणी - प्रा.हरी नरके राष्ट्रवादीचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे आज पहाटे निधन झाले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावच्या स्मारक निर्मितीनिमित्त त्यांचा माझा प्रदीर्घकाळ संबंध आला होता. पंचायत राज्यातून लोकसभेपर्यंत वाटचाल केलेले पाटील हे बेरकी राजकारणी होते. साखर कारखाना त्यांच्या ताब्यात होता. तेव्हा त्यांनी एकदा माझे व्याख्यानही ठेवले होते. त्यांचा माझ्यावर एक बहुजन कार्यकर्ता म्हणून विशेष लोभही होता. मी त्याकाळात बहुजन ऎक्याच्या विचारांनी संमोहित झालेलो होतो. मात्र मी पुण्याहून नायगावला येऊन सावित्रीबाईंचे स्मारक आणि संपुर्ण गावाचा कायापालट करण्याच्या कामात पुढाकार घेत असल्याचे बघून ते सावध झाले. मला या भागातून निवडणूक लढवायची असावी अशी त्यांची धारणा बनली. स्पर्धक भावनेने ते अस्वस्थ झाले. माझ्या स्मारकाच्या कामाला विरोध करू लागले.मोडता घालू लागले. सातारा जिल्ह्यातील सर्व आमदार खासदारांना भेटून मी त्यांनी त्यांचा विकासनिधी स्मारकासाठी द्यावा असा प्रयत्न चालवला होता. त्यावेळी मंत्री असलेल्या रामराजे निंबाळकर यांनी ह्या आवाहनाला विधायक प्रतिसाद दिला. ते इतर सर्वांशी बोलले. त्यांनी सर्व आमदार,खासदारांची बैठक बोलावली. मलाही बोलावले. पण कुठून तरी सुत्रे हलली. बैठक रद्द करायला सांगण्यात आली. सज्जन रामराजे बिचारे मनापासून हळहळले. मी खासदार लक्ष्मणराव पाटील यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. चर्चा झाली. मी खासदारनिधीचा विषय काढताच ते म्हणाले, "तुम्ही उशीरा आलात. माझा निधी तर केव्हाच संपला." मी जिल्हाधिकारी कचेरीतून सगळी माहिती काढलेली होती. त्यांच्या निधीतले २५ लाख रूपये शिल्लक असल्याचे मी त्यांना सांगताच ते वरमले. मला म्हणाले, "तुम्ही कशाला या फंदात पडता? सावित्रीबाईंशी आपला काय संबंध? त्यांचा समाज बघून घेईल त्यांच्या स्मारकाचे." सावित्रीबाईंचे कार्य सर्वांसाठीच असल्याचे मी त्यांना सांगितले. ते म्हणाले, "माझा पुतण्या पोलीसखात्यात अधिकारी आहे. त्याची अमूक तमूक पोलीस स्टेशनला बदली करायला गृहमंत्र्यांना सांगा. ते सावित्रीबाईंच्या समाजाचे आहेत. बदली झाली तर मी माझा खासदारनिधी नक्की देतो. खरंतर असल्या उद्योगात पडायचे नाही असा माझा नियम होता. पण आपदधर्म म्हणुन मी गृहमंत्र्यांशी बोललो. ते माझ्यावर चिडले. पण त्यांनी खासदार पाटलांच्या पुतण्याच्या बदलीचे काम केले. मी खासदार पाटलांना ही बातमी सांगायला फोन केला आणि आतातरी सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी निधी द्या असं आवाहन केलं. खासदार पाटील मला म्हणाले, "ही बदली तर मी डीजींकडून स्वत: करून घेतलीय. त्यात गृहमंत्र्यांचा काहीही संबंध नाही. सावित्रीबाईंचे समाजबांधव मला मतं देत नाहीत. मी निधी देऊ शकत नाही." एकदा नायगावचे एक ग्रामस्थ माझ्याकडे आले. आपला मुलगा एस.एस.सी. बोर्डात सोळावा आल्याचे त्यांनी मला सांगितले. सावित्रीबाईंच्या वंशातला हा मुलगा इतके यश मिळवतो, याचा मला आनंद झाला. मी ३ जानेवारीच्या जयंती उत्सवात त्या मुलाचा जाहीर सत्कार करायचे ठरवले. शासकीय कार्यक्रम पत्रिकेत सत्काराचा हा विषय घातला. कार्यक्रम पत्रिका वाचून खासदारांचा जवळचा एक कार्यकर्ता मला भेटला. "तो मुलगा १६ वर्षांपुर्वी बोर्डात आला होता, आता त्याचा सत्कार कशाला करता?" असे त्याने मला विचारले. मी सत्कार रद्द केला. जयंती समारंभाला तो मुलगा, त्याचे आईवडील सजून धजून आले होते. कार्यक्रम संपत आल्याचे बघून ते स्टेजवर माझ्याकडे आले. मी त्यांना १६ वर्षांपुर्वी तुमचा मुलगा बोर्डात आल्याने त्याचा सत्कार आता करणे बरे दिसणार नसल्याने तो रद्द केल्याचे बोललो. त्यांनी मला मुलाची गुणपत्रिका दाखवली. ती तर त्याच वर्षाची होती. म्हणजे मुलाचे वडील खरे बोलत होते. मी स्वत:च कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करीत असल्याने उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधी या मुलाचा सत्कार केला. मुलगा आणि त्याचे आईवडील आनंदून गेले. कार्यक्रम संपल्यावर मी खासदारांच्या त्या कार्यकर्त्याला स्टेजवरच जाब विचारला. " हा मुलगा तुमच्या भावकीतला असूनही तुम्ही माझ्याशी असं खोटं का बोललात?" असं मी त्याला चिडून विचारलं. त्यावर तो थंड आवाजात सराईतपणे म्हणाला, "आम्ही काहीही सांगू. तपासून घ्यायची जबाबदारी तुमची आहे." खासदारसाहेब त्याला टाळी वाजवून दुजोरा देत होते. ग्रामीण भागातले लोक आणि कार्यकर्ते भलेच असतात असा माझा तोवर भाबडा समज होता. पण ती माझी नशा तात्काळ उतरली नी माणसं ग्रामीण असोत की शहरी ती सारखीच असतात याचा धडा मला मिळाला. सातारचे कलेक्टर अनिल डिगीकर, सीईओ दिलीप बंड आणि एस.पी. सुरेश खोपडे यांचे मला या स्मारकाच्या आणि गावाच्या विकासाच्या कामी ड्युटीप्लस सहकार्य लाभले. गावातल्या महिला आणि युवकांनी या स्मारकासाठी मनापासून झटून योगदान दिले. -प्रा.हरी नरके,१७ जाने. २०१९

No comments:

Post a Comment