Tuesday, January 1, 2019

भिडेवाडा दुर्लक्षित का?







स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके

शनिवारवाडा, लालमहाल, विश्रामबागवाडा अशा ऎतिहासिक स्थळांचा विकास झाला, स्मारके झाली, मग स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक असलेल्या भिडेवाड्याकडे दुर्लक्ष का? हा वाडा कोणत्याही क्षणी कोसळेल अशा स्थितीत आहे. गेल्या १३ वर्षात स्मारकाच्या घोषणा अनेकदा झाल्या. बैठका, चर्चा रंगल्या. मोर्चे झाले.तरिही वाड्याचे जतन का होत नाहीये?
हे स्मारक कोणाला नकोय?
वाड्यातले भाडेकरू, दुकानदार, बॅंक,स्थानिक लोकप्रतिनिधी, पुण्याचे आजीमाजी कारभारी यांना हा वाडा नष्ट करण्यात रस का आहे?
पुणे महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत २१ फेब्रुवारी २००६ ला भिडेवाड्याचे स्मारक करण्याचा एकमताने ठराव झाला.

वाडा शासनाच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया ५ जून २००८ ला सुरू झाली. स्मारकाला विरोध असलेले भाडेकरू, दुकानदार, बॅंक ८ डिसेंबर २०१० ला मुंबई उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने भूसंपादनाच्या कामाला स्थगिती दिली. तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी व पुण्याचे आजीमाजी कारभारी यांचे आर्थिक हितसंबंध ह्या वाड्यात गुंतलेले असल्याने मनपा आणि राज्य सरकारचे वकील,न्यायालयात अनेकदा गैरहजर राहिले. मनपा अधिकार्‍यांना बिल्डरने खिश्यात घातल्याने ते इथे सावित्रीबाईंची मुलींची पहिली शाळा नव्हतीच अशी पोपटपंची करु लागले. आर्थिक प्रलोभन, राजकीय संगनमत आणि जनतेची उदासिनता यामुळे गेली ८ वर्षे एकही पाऊल पुढे सरकलेले नाही.
शाळेचे समकालीन दस्तावेजांमधील असंख्य पुरावे सादर करूनही ते वारंवार गहाळ केले जातात.
शाळा नसल्याचेच ढोल सगळे मिळून वाजऊ लागतात.

जोतीराव,सावित्रीबाई, भिडे,चिपळूणकर, गोवंडे, जोशी, भवाळकर,म्हस्के, शिंदे,लहुजी वस्ताद,राणबा महार,धुराजी चांभार, गणू मांग,फातिमा आणि उस्मान शेख असे उच्च वर्णीय, बहुजन,दलित, अल्पसंख्यांक एकत्र येऊन १७० वर्षांपुर्वी
एक ऎतिहासिक काम सुरू करतात. देशातली मुलींची पहिली भारतीय शाळा सुरू होते. स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे संस्कारकेंद्र उभे राहते.ज्ञानार्जनाचे, ज्ञाननिर्मितीचे उर्जाकेंद्र साकारले जाते.

आज पुणे हे देशातले सर्वात मोठे आणि प्रगत शैक्षणिक शहर आहे.इथे शेकडो महाविद्यालये व डझनांनी विद्यापिठे आहेत.
स्त्री,बहुजन,दलित चळवळीचे हे शहर म्हणजे मोहळ आहे. मग तरिही लिप सर्व्हीस वगळता काहीच का घडत नाही?
कोणाच कारभार्‍याला हा वाडा टिकवावा असे का वाटत नाही?
-प्रा.हरी नरके, १ जानेवारी २०१९

No comments:

Post a Comment