Wednesday, January 16, 2019

व्ही.पी.सिंग : मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न्याय यांचे प्रतिक

- सोमनाथ चटर्जीपंतप्रधान व्ही.पी.सिंग हे सर्वसहमती, मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न्याय यांचे प्रतिक होते.त्यांनी मंडल आयोगाचा अहवाल लागू केला.त्यातून सामाजिक उलथापालथ झाली.उत्तरेकडील राज्यात हिंसाचार उसळला. या प्रश्नावर संसदेत मी म्हणालो, " मंडल शिफारशींना माझा पाठींबा आहे. आजही देशातील इतर मागास वर्गाची दारूण पिळवणूक होते आहे. त्यांची प्रगती आणि विकास व्हावा यासाठी देशाची साधने आणि संसाधने वापरली जात नाहीयेत."

गुणवत्तेचा प्रश्न नेहमी आरक्षणाच्या संदर्भात पुढे केला जातो. गुणवत्ता ही उच्चवर्णियांची मक्तेदारी आहे असे मी मानत नाही. आरक्षण धोरण कायदेशीर आणि न्यायालयीन तपासणीत टिकलेले आहे.

प्रसारमाध्यमांची मंडल आयोगावरील प्रतिक्रिया निराशाजनक होती. माध्यमांनी व्ही.पी.सिंग यांना खलनायक म्हणून रंगवले. नैतिक आणि स्वच्छ राजकारणासाठी लढणारा एक शिपाई ही त्यांची खरी प्रतिमा पुसून टाकून त्यांच्याविरूद्ध अत्यंत दुष्ट आणि बदनामीकारक प्रचार करण्यात आला. हा प्रकार इतिहासात तरी कधीही घडलेला नव्हता.

संसदेत मी त्यावर म्हणालो, "प्रसारमाध्यमांनी योग्य प्रकारे लोकशिक्षण करायला हवे. दोन्ही बाजूंचे चित्र नीट मांडायला हवे. शिफारशी काय आहेत नी विरोध कशाला आहे हे व्यवस्थित मांडले गेले तर दुषित जनमत बदलू शकेल. आईवडील आणि शिक्षक लहान कोवळ्या मुलांना भडकावित आहेत. विरोधी चळवळ समाजविघातक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हातात गेलेली आहे."

"देशाच्या राजधानीत मंडल समर्थक आमदार खासदारांना घेराव घाला, त्यांना केरोसिनमध्ये बुडवून पेटवून द्या " असा विखारी प्रचार खुलेआम चालू होता. त्याचवेळी भाजपच्या अडवानींनी रथयात्रा काढली. अयोध्येच्या राम मंदिराचा मुद्दा दाखवण्यापुरता होता. त्यांची मुख्य लढाई मंडल आयोगाविरूद्ध होती. मंडल आयोगामुळे मागास जाती संघटित होत होत्या. त्यांच्या विरोधात त्यांना आव्हान देण्यासाठी उच्च जातींचे संघटन करण्यासाठी अडवानींचा हा खटाटोप होता. त्यासाठी धर्माचा वापर केला गेला. संकुचित राष्ट्रवादाला खतपाणी घालणारी भाषणे रथयात्रेता झाली. देशभर विलक्षण धर्मविद्वेषी परिस्थिती तयार करण्यात आली.

अडवानींना बिहारमध्ये अटक झाली. भाजपाने व्ही.पी.सिंग सरकारचा पाठींबा काढला. अडवानींना देशात धर्माच्या नावावर युद्धे घडवायची होती. रथयात्रेच्या मध्यभागी ठळकपणे भाजपाचे निवडणूक चिन्ह मिरवले गेले.

व्ही.पी. सिंगांनी राजीनामा दिला.

सत्ता गमावली तरी एक मुत्सद्दी राजकारणी म्हणून त्यांचा आब वाढला. त्यांची निष्ठा आणि पारदर्शी सरकार देण्याचा त्यांचा प्रयत्न याचे मला फारच कौतुक वाटले. प्रसार माध्यमे अत्यंत कट्टरपणे त्यांच्या विरोधात होती. त्यांनी व्हीपींच्या अश्लाघ्य बदनामीची मोहीमच राबवली. व्हीपींनी जे काही केले ते योग्यच होते. त्यांची पद्धतही योग्यच होती असे मला वाटते.

-सोमनाथ चटर्जी, तत्वनिष्ठेची जपणूक, [आत्मचरित्र], अनुवाद- शारदा साठे, राजहंस प्रकाशन, पुणे, २०१४, किं.३२५ रूपये.

-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment