माझी आई अतिशय तापट स्वभावाची होती. आईला जेव्हा मी जातीबाहेरच्या मुलीशी लग्न करणार आहे असं सांगितलं तेव्हा ती जाम भडकली. तिनं खूप आदळआपट केली. तू झालास तेव्हा मी तुझ्या नरडीला नख लावून टाकायला हवं होतं. तू जातीबाहेर लग्न केलंस तू आम्हाला मेलास, ...वगैरे हिंदी, मराठी, कन्नड, तेलगू सिनेमातले संवाद तिने म्हणून दाखवले. आपल्या जातीत मुलींचा काय दुष्काळ पडलाय का? तुला हवी तशी मुलगी आणून उभी करते, तू पसंद कर असा तिने आदेश दिला. तू जातीबाहेर लग्न केलं तर आपले नातेवाईक-सोयरेधायरे काय म्हणतील? आपल्याला त्यांनी वाळीत टाकलं तर तुझ्या लहान भावाबहिणींची लग्नं कशी होणार? तिचा आंतरजातीय विवाहाला ठाम विरोध होता.
मी लग्न करणार तर ते जातीबाहेरच्याच मुलीशी, मात्र मी पळून जाऊन लग्न करणार नाही. लग्न झालं तर ते तुझ्या उपस्थितीतच होईल असा शब्द मी तिला दिल्यावर ती निर्धास्त झाली.
मधे काही वर्षं गेली. दरम्यान मी तिला माझ्या मित्रमैत्रिणींच्या घरी नेत असे. अनेकदा ती तिकडे मुक्काम करील अशी व्यवस्था करीत असे. त्यांना माझ्या घरी राहायला बोलवित असे. त्यांच्या आईवडीलांनाही माझ्याकडे राहायला बोलवित असे. आईसोबत ते राहतील अशी व्यवस्था करीत असे. मी शाळेत असल्यापासून सामाजिक चळवळीत क्रियाशील असल्याने घरी नानाविध जातीधर्माच्या लोकांचा कायम राबता असायचा. आईचीही त्यांच्याशी दोस्ती होत असे. माणसं एकत्र आली, एकत्र प्रवास केला, मुक्कामाला राहिली की जातीपातीचे गैरसमज गळून पडतात. माझी आईही अशीच हळूहळू निवळत गेली. तिची जातीपातीची जळमटं निघून गेली. माझा करीन तर जातीबाहेरच्याच मुलीशी लग्न करीन नाहीतर अविवाहीत राहीन हा निर्धार कायम असल्याचं बघून आईनं माझ्यासाठी जातीबाहेरची एक मुलगी पसंत केली. मी अतितात्काळ, अगदी निमुटपणे होकार दिला. मी याबाबतीत आत्यंतिक आज्ञाधारक मुलगा होतो. मी तिच्या शब्दाबाहेर नाही, तू म्हणशील तिच्याशी मी लग्न करतो असं मी म्हटल्यावर ती एकदम खूष झाली. मीही खूष होतो कारण आईची आणि माझी पसंत एकच होती. अर्थात हा केवळ योगायोग नव्हता तर त्यामागे काही वर्षांची मेहनत होती. चिकाटी आणि विश्वास होता.
प्रख्यात चित्रकार आणि सन्मित्र संजय पवार यांनी एक कलात्मक डिझाईन असलेली निमंत्रणपत्रिका तयार केली. आमच्या दोघांच्या सहीचं ते साधंसं पत्र होतं. आम्ही १ मे १९८६ ला आंतरजातीय विवाह करतोय. शुभेच्छा आणि आशिर्वाद द्यायला तुम्ही आप्तेष्ठ आणि मित्र नक्की यावे असा त्यात मजकूर होता.
आंतरजातीय विवाह करतोय ही पत्रात स्पष्ट नोंद करण्यामागे २ कारणं होती. एकतर आमचे काही जवळचे नातेवाईक फार बेरकी होते. तुम्ही अशा जातीबाहेरच्या लग्नाला कशाला गेलात असं जर कुणी नंतर त्यांना विचारलं असतं तर ते सरळ असं सांगून मोकळे झाले असते की लग्न जातीबाहेर होतंय हे आम्हाला माहितच नव्हतं. दुसरं म्हणजे आंतरजातीय विवाहशिवाय जातीनिर्मुलन शक्य नाही हा फुले-शाहू- गांधी-आंबेडकर यांचा विचार आम्हाला पटलेला होता. मग ताकाला जाऊन भांडं का लपवा?
लग्न करायचं ठरलं तेव्हा ते कोणत्या पद्धतीनं करावं याबाबत स्पष्टता होती. सत्यशोधक पद्धतीनं लग्न करून त्याची नोंदणी करायची असा आमचा निर्णय झालेला होता. तेव्हा मी साडॆसतरा नळी येथील वस्तीत राहत होतो. आजुबाजूला झोपडपट्टी आणि आमचंही घर कच्च्या विटांचं {भेंड्यांचं} वर गवताचं छप्पर. नळ नाही. संडास - बाथरूम नाही. संगिता मुंबईची. तिला याची सवय नसल्यानं या सगळ्याचा त्रास होणार. मग पहिली गोष्ट केली म्हणजे पिंपरीला अजमेरा कॉलनीत वन रुम किचनचा फ्लॅट बूक केला.
लग्न अजिबात खर्चिक असू नये पण ठरवून आंतरजातीय करतोय तर गपचूप किंवा पळून जाऊन केलं असं होऊ नये म्हणून मोजक्या मित्र, नातेवाईकांच्या उपस्थितीत ते करावं असं ठरवलं होतं. पुण्याच्या हॉटेल श्रेयसच्या अंबर सभागृहात विवाह नोंदणी आणि स्वागत समारंभ एकत्रित पार पडला. श्रेयस हॉटेलचाही एक मजेदार किस्सा झाला. आमचे एक मित्र, मार्गदर्शक आणि नेते असं म्हणाले की, " लग्न साडेसतरा नळीवरच करायचं. अवघ्या १० ते १५ लोकांनाच बोलवायचं आणि आलेल्यांना फार फार तर चहा फक्त द्यायचा. बाकी काहीही खर्च करायचा नाही."
मला हे पटत नव्हतं. आलेल्यांना जेवन द्यावं. माझा गोतावळा प्रचंड असल्यानं निदान १०० लोकांना निमंत्रित करावं असं मला वाटत होतं. नेते मानायलाच तयार नव्हते. शेवटी मी भाईंकडे { पु.ल.देशपांडे यांच्याकडे} गेलो. त्यांना माझी अडचण सांगितली. ते म्हणाले, " हरी, तू अजिबात काळजी करू नकोस. लग्न ही एरंडेल पिऊन स्मशानात करायची गोष्ट नाही. तो आयुष्यतला आनंदसोहळा असतो. तो खर्चिक असू नये हे ठिक आहे. पण आलेल्यांना तुला जेवन द्यायचंय तर अवश्य दे. एकतर आपण पुणेकर आधीच आतिथ्यासाठी "जगप्रसिद्ध " आहोत. त्यात आणखी भर नको. मी बघतो या नेत्यांकडे."
भाईंनी नेत्यांना फोन केला. बोलवून घेतलं. भेटीत त्यांना भाई म्हणाले, " हरी - संगिता लग्न करतायत. तुम्ही जरा लक्ष घाला. काही मंडळी लग्नात त्यांनी जेवन देऊ नये, हॉल घेऊ नये, घरीच लग्न करावं, फक्त चहाच द्यावा असला हेकटपणा करीत असल्याचं माझ्या कानावर आलंय. तुम्ही जरा बघा, ही कोण मंडळी आहेत ते. नी त्यांना सांगा, समजवा. गरज पडली तर मीही त्यांना भेटायला येतो. तुमच्यावर ही जबाबदारी मी सोपवू ना?"
नेते सटपटले. म्हणाले, " मी करतो व्यवस्था. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हीच लग्नाला येताय नी तुमची इच्छा आहे म्हटल्यावर काहीच अडचण नाही भाई."
भाई म्हणाले, "ही हरी - संगिताची इच्छा आहे, नी लग्न त्यांचं आहे, तेव्हा, तुम्ही लागा कामाला."
लग्नाला ज्येष्ट विचारवंत गं.बा. सरदार, पु.ल. नी सुनिता देशपांडे, निळू फुले, बाबा आढाव, विद्या बाळ, भाई वैद्य, लक्ष्मण माने, प्रा. ग.प्र. प्रधान, सय्यद भाई, पन्नालाल सुराणा, लक्ष्मण गायकवाड, सदा डुंबरे, अरूण खोरे, साधना व डॉ. नरेश दधिच, संजय पवार, सुनिल तांबे, ह.मो.मराठे, डॉ. सत्यरंजन साठे, डॉ. अनिल अवचट, यदुनाथ थत्ते, डॉ. निलम गोर्हे, जयदेव गायकवाड, विनय हर्डीकर, उज्वला मेहेंदळे आणि प्रा.शशि भावे आणि इतर अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. जवळचे नातेवाईक, मित्र आणि सामाजिक चळवळीतले सहकारी असे सगळे मिळून सुमारे १०० लोकं असतील.
नोंदणी अधिकारी श्री. अंबर पवारही मित्रच असल्यानं त्यांनी नोंदणी फीही घेतली नाही आणि लग्नाचं नोंदणी प्रमाणपत्रही मोफत घरपोच केलं.
माझ्या लग्नात सन्मित्र अॅड. उपेंद्र खरेनं खूप मेहनत केली. मित्रवर्य डॉ. मंदार परांजपेनं त्याची कार आम्हाला घरी सोडायला दिलेली. रफिक शेख या मित्रानं व्हिडीओ शुटींग केलेले. विद्या कुलकर्णीनं फोटो काढलेले. संजय पवारनं रोजनिशीच्या पानाची सुंदर नी कलात्मक लग्नपत्रिका बनवलेली.
लग्नात मी तर प्रचंड गांगरून गेलेलो. माझे फोटो इतके बावळट आलेत की बघितले की आपण असे का वागत होतो? असा प्रश्न पडतो. पुर्वानुभव नसल्यानं बहुधा असं होत असावं. खरेदी अशी काही केलीच नव्हती पिंपरीचा फ्लॅट सोडला तर!
माझी आई, भाऊ, मामा, मावशा, नी सगळेच जवळचे नातेवाईक डेक्कन जिमखान्यावरच्या श्रेयस हॉटेलमध्ये आयुष्यात पहिल्यांदाच जेवले. कदाचित कोणत्याही हॉटॆलात जाण्याचा त्यांचा आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग असावा.
मुलीकडचे लोक अगदी पाहुण्यासारखे आले. जेवले नी गेले. मुलीच्या लग्नाची काहीही तोशिष आपल्याला पडली नाही, काडीचाही खर्च करावा लागला नाही याचा तरी त्यांना अनंद झाला की नाही, माहित नाही. कायम स्वत:वरची जबाबदारी दुसर्यावर झटकून जगणारे आप्पलपोटे लोक.
लग्नानंतर कितीतरी वर्षे घरात टि.व्ही. नव्हता. कृष्णधवल पोर्टेबल टि.व्ही. आला तोच पाचेक वर्षांनी. फ्रीज नी फोन यायला तब्बल १२ वर्षे लागली. घरात सोफा नी डायनिंग टेबल यायला तर २० वर्षे लागली.
काही लोक दागिने मोडून खातात तर काही गरिबी! आम्हाला तसे काहीच करायचे नव्हते. नाही.
आमचा प्रवास झकास झाला तो परस्पर विश्वासानं, सोबतीनं. साथीनं. दिवस कसे भुर्कन उडून गेले. संकटे आली, हल्ले झाले, अजुनही होतात, होतीलही, कारण भुमिका घ्यायची म्हटलं, की प्रस्थापित व्यवस्थेतल्या ज्यांचे हितसंबंध धोक्यात येतात ते अंगावर येणारच. आम्हाला अजातशत्रू व्हायची आकांक्षा नाही. ज्यांची मानसिकता मुलत:च लुटीची, भिकेवर पोसलेली, गुन्हेगारीवृत्तीची आणि दरोडे घालायची असते त्यांच्याशी मैत्री कशाला? ते विरोधात असणे हेच सन्मानाचं नाही का?
म्हणता म्हणता ३२ वर्षे झाली....दिवस किती भुरकन गेले. कालपरवा लग्न झालं असंच वाटतय..."नांदा सौख्यभरे" हे तुम्हा आप्तेष्ठांचे आशिर्वाद जगणं सुखाचं करून गेले.
- प्रा.हरी नरके, २१ सप्टेंबर २०१८ [ पुनर्लेखन ]
...............................
मित्रवर्य श्री. धर्मेंद्र जोरे यांनी सुचना केल्यावरुन लग्नाची काही क्षणचित्रे {१ मे १९८६} सोबत दिली आहेत. छायाचित्रात सोबत: आदरणीय सुनिता देशपांडे, {आहे मनोहर तरी} प्रा. ग.प्र. प्रधान,श्री.पन्नालाल सुराणा, श्री.सय्यदभाई, माझी आई दिवंगत सोनाई आणि माझा मोठा भाऊ लक्ष्मण, संजय पवार, विद्या कुलकर्णी, सुनिल तांबे, सविता कुडतरकर, आमदार डा. निलम गोर्हे, नोंदणी अधिकारी श्री. अंबर पवार, स्थळ: अंबर हाल, हो‘टेल श्रेयस, डेक्कन जिमखाना, पुणे..दि.१ मे १९८६
आणि हे आजचे छायाचित्र.
 










 
 
 
No comments:
Post a Comment