Thursday, May 29, 2014

सामान्य माणसाची स्मरणशक्ती

1.
माणसाची शैक्षणिक अर्हता आणि त्याची गुणवत्ता ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात हे ज्यांना नव्याने कळले त्यांचे हार्दीक अभिनंदन. याचा अर्थ शिक्षणाने माणसाची योग्यता कमी होते असा घेतला जाऊ नये इतकेच. वसंतदादा पाटील, इंदीरा गांधी, जे.आर.डी.टाटा, धीरूभाई अंबानी यांचे औपचारिक शिक्षण पदवीइतकेही झालेले नव्हते.सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर, आशा भोसले, यांचे शिक्षण फारसे नसले तरी ती ही यशस्वी आणि गुणवान मंडळी आहेत.
मूळची प्रतिभा, व्यावहारिक शहाणपण, कष्ट, संधी आणि झोकून देण्याची वृत्ती यातूनच माणसं सिद्ध होतात.शिक्षणाने त्यात भर पडते.पैलूच पडतात म्हणाना. मात्र शिक्षणाने ही गुणवत्ता कमी होते असे मानायची गरज नाही.
अशा स्थितीत देशातल्या सगळ्या विद्यापिठांचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ आणि संशोधक यांच्याशी ज्यांचा संबंध येणार त्या खात्याच्या मंत्रीपदी उच्चशिक्षित किमान पदवीधर व्यक्तीची नियुक्ती झाली असती तर ......

.........................................
2.
सामान्य माणसाची स्मरणशक्ती फार कमजोर असते, असे म्हणतात. श्री.टी.एन. शेषन हे देशाच्या स्मृतीचे महत्वाचे संरक्षक मानायला हवेत. त्यांनी निवडणुकीतील उमेदवाराने निवडणुकीत प्रतिज्ञापत्राद्वारे स्वत:बद्दल माहिती देण्याची पद्धत सुरू केली. त्यामुळे २००४ साली पदवीधर असणारे १० वर्षांनी म्हणजे २०१४ साली पदवीधरऎवजी अवघे एफ.वाय. बी.को‘म. होऊ लागले. हा चमत्कारच म्हणायला हवा.धन्यवाद शेषनजी.
नैतिकतेवर नेहमीच ज्यांचा भर असतो, जे शिक्षणात "नैतिक शिक्षण" दिले पाहिजे असे म्हणतात त्यांची शिक्षणमंत्र्यांच्या या नैतिकतेवरची प्रतिक्रिया काय?
......................................................
3.
माझ्या माहिती आणि समजुतीनुसार यावेळी निवडणुकीत श्री.नरेंद्र मोदींचे ४ मुख्य विषय होते, सुशासन, विकास, महागाई, आणि भ्रष्टाचार. लोकांनी मोदी सरकारला दिलेला जनादेश म्हणजे या ४ मुद्यांना धरून दिलेले जनसमर्थन होय. असे असेल तर मग पहिल्याच दिवशी सरकारने कलम ३७० चा मुद्दा चर्चेला घेणे कितपत योग्य होते? जम्मू काश्मिर या एका राज्याशी संबंधित विषय हा संपुर्ण देशासमोरचा एकमेव महत्वाचा विषय कसा बनला? तो देशाचा आजचा सर्वाधिक अग्रक्रमाचा विषय आहे काय? आणि सुशासन, विकास, महागाई, आणि भ्रष्टाचार या ४ विषयांशी त्याचा कसा संबंध येतो? जनतेने ३७० च्या मुद्यावर मोदी सरकारला हे जनसमर्थन दिलेले आहे काय? चर्चा उपस्थित करताना काही काळ-वेळ बघायची असते की नाही?हा विषय जर एव्हढाच तातडीचा होता तर तो या निवडणुकीत अग्रक्रमाने का मांडण्यात आला नाही? श्री. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात तो का आला नव्हता? हे आम्हा सामान्य नागरिकांना समजेल अशा पद्धतीने कोणी सांगेल काय?

No comments:

Post a Comment