Thursday, May 1, 2014

आज लग्नाला २८ वर्षे झाली.

आज १ मे..महाराष्ट्र दिन..आंतरराष्ट्रीय कामगार दिन.






आज आमच्या लग्नाला २८ वर्षे झाली. दिवस किती भरभर जातात. कालपरवा लग्न झालं असच वाटतय.एकमेकांच्या साथीने, सोबतीने कधी मजेत, कधी धडपडत, ठेचकाळत पण सतत परिस्थितीशी झगडत, एव्हढा प्रवास कधी झाला ते कळलच नाही.
२८ वर्षापुर्वीच्या आणि या २८ वर्षातल्या कितीतरी छान आठवणी आहेत.
लग्न करायचं ठरलं तेव्हा ते कोणत्या पद्धतीनं करावं याबाबत स्पष्टता होती. नोंदणी पद्धतीनं, सत्यशोधक पद्धतीनं ते करायचा निर्णय झालेला होता. तेव्हा मी साडॆसतरा नळी येथील वस्तीत राहत होतो. आजुबाजूला झोपडपट्टी आणि आमचंही घर कच्च्या विटांचं{भेंड्यांचं} वर गवताचं छप्पर. नळ नाही. संडास - बाथरूम नाही. संगिता मुंबईची.तिला याची सवय नसल्यानं या सगळ्याचा त्रास होणार.मग पहिली गोष्ट केली म्हणजे पिंपरीला अजमेरा को‘लनीत वन रुम किचनचा फ्ले‘ट बूक केला.
लग्न अजिबात खर्चिक असू नये पण ठरवून आंतरजातीय करतोय तर गपचूप किंवा पळून जाऊन केलं असं होऊ नये म्हणून मोजक्या मित्र, नातेवाईकांच्या उपस्थितीत ते करावं असं ठरवलं होतं. हो‘टेल श्रेयसच्या अंबर सभागृहात विवाह नोंदणी आणि स्वागत समारंभ एकत्रितच पार पडला. श्रेयस हो‘टेलचाही एक मजेदार किस्सा झाला. आमचे एक मित्र, मार्गदर्शक आणि नेते असं म्हणाले की, " लग्न साडेसतरा नळीवरच करायचं. अवघ्या १० ते १५ लोकांनाच बोलवायचं आणि आलेल्यांना फारफार तर चहा फक्त द्यायचा.बाकी काहीही खर्च करायचा नाही. मला हे पटत नव्हतं. आलेल्यांना किमान जेवन द्यावं आणि आमचा गोतावळा प्रचंड असल्यानं निदान १०० लोकांना निमंत्रित करावं असं मला वाटत होतं. नेते मानायलाच तयार नव्हते. शेवटी मी भाईंकडे {पु.ल.देशपांडे यांच्याकडे} गेलो. त्यांना माझी अडचण सांगितली. ते म्हणाले, " हरी, तू अजिबात काळजी करू नकोस.लग्न ही एरंडेल पिऊन स्मशानात करायची गोष्ट नाही.तो आयुष्यतला आनंदसोहळा आहे. तो खर्चिक असू नये हे ठिक आहे.पण आलेल्यांना तुला जेवन द्यायचय तर अवश्य दे. एकतर आपण पुणेकर आधीच आतिथ्यासाठी "जगप्रसिद्ध "आहोत. त्यात आणखी भर नको. मी बघतो नेत्यांकडे."
भाईंनी नेत्यांना फोन केला. म्हणाले, "हरी संगिता लग्न करतायत. तुम्ही जरा लक्ष घाला. काही मंडळी त्यांनी लग्नात आलेल्यांना जेवन देऊ नये, हो‘ल घेऊ नये, घरीच लग्न करावं, फक्त चहाच द्यावा असला हेकटपणा करीत असल्याचं माझ्या कानावर आलंय. तुम्ही जरा बघा, ही कोण मंडळी आहेत ते. नी त्यांना सांगा, समजवा. गरज पडली तर मीही त्यांना भेटायला येतो. तुमच्यावर ही जबाबदारी मी सोपवू ना?"
नेते सटपटले. म्हणाले, " मी करतो व्यवस्था. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हीच लग्नाला येताय नी तुमची इच्छा आहे म्हटल्यावर काहीच अडचण नाही भाई."
भाई म्हणाले, "ही हरी संगिताची इच्छा आहे, नी लग्न त्यांचं आहे, तेव्हा, तुम्ही लागा कामाला...."

 लग्नाला ज्येष्ट विचारवंत गं.बा. सरदार, पु.ल. नी सुनिता देशपांडे, निळू फुले, बाबा आढाव, विद्या बाळ, भाई वैद्य, लक्ष्मण माने, प्रा. ग.प्र. प्रधान, सय्यद भाई, पन्नालाल सुराणा, लक्ष्मण गायकवाड, सदा डुंबरे, अरूण खोरे, साधना व नरेश दधिच, संजय पवार, सुनिल तांबे, ह.मो.मराठे, सत्यरंजन साठे, अनिल अवचट, यदुनाथ थत्ते, निलम गोर्‍हे, जयदेव गायकवाड, विनय हर्डीकर, उज्वला मेहेंदळे आणि प्रा.शशि भावे आदी आवर्जून उपस्थित होते. जवळचे नातेवाईक, मित्र आणि सामाजिक चळवळीतले सहकारी असे सगळे मिळून सुमारे १०० लोक असतील.
नोंदणी अधिकारी  अंबर पवारही मित्रच असल्याने त्यांनी नोंदणी फीही घेतली नाही आणि लग्नाचे नोंदणी प्रमाणपत्रही मोफत घरपोच केले.
लग्नात मित्रवर्य अ‘ड. उपेंद्र खरेने खूप मेहनत केली. डो‘.मंदार परांजपेने त्याची कार घरी जायला दिलेली. रफिक शेख या मित्राने व्हिडीओ शुटींग केलेले.विद्या कुलकर्णीने फोटो काढलेले. संजय पवारने रोजनिशीच्या पानाची सुंदर नी कलात्मक लग्नपत्रिका बनवलेली.
मी तर प्रचंड गांगरून गेलेलो. माझे फोटो इतके बावळट आलेत की बघितले की आपण असे का वागत होतो? असा प्रश्न पडतो. पुर्वानुभव नसल्याने असे होणारच ना?  खरेदी अशी काही केलीच नव्हती. घर सोडले तर!
माझी आई, भाऊ, मामा, मावशा, नी सगळेच नातेवाईक डेक्कन जिमखान्यावरच्या  श्रेयस हो‘टेलमध्ये आयुष्यात पहिल्यांदाच जेवले.कदाचित कोणत्याही हो‘टॆलात जाण्याचा त्यांचा आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग असणार.
मुलीकडचे पाहुण्यासारखे आले. जेवले नी गेले. मुलीच्या लग्नाची काहीही तोशिष आपल्याला पडली नाही, काडीचाही खर्च करावा लागला नाही याचा तरी त्यांना अनंद झाला की नाही, माहित नाही.
लग्नानंतर कितीतरी वर्षे घरात टि.व्ही. नव्हता. कृष्णधल पोर्टेबल टि.व्ही. आला तोच पाचेक वर्षांनी. फ्रीज नी फोन यायला तब्बल १२ वर्षे लागली. घरात सोफा नी डायनिंग टेबल यायला तर २० वर्षे लागली.
काही लोक दागिने मोडून खातात तर काही गरिबी!!! आम्हाला तसे करायचे नाही.
 आमचा प्रवास झकास झाला तो परस्पर विश्वासाने, सोबतीने. साथीने. दिवस कसे भुर्कन उडून गेले. संकटे आली, हल्ले झाले, अजुनही होतात, होतीलही, कारण भुमिका घ्यायची म्हटलं, की प्रस्थापित व्यवस्थेतल्या ज्यांचे हितसंबंध धोक्यात येतात ते अंगावर येणारच. आम्हाला अजातशत्रू व्हायची आकांक्षा नाही. ज्यांची मानसिकता मुलत:च लुटीची, भिकेवर पोसलेली, गुन्हेगारीवृत्तीची आणि दरोडे घालणारी असते त्यांच्याशी मैत्री कशाला? ते विरोधात असणे हेच सन्मानाचे नाही का?
म्हणता म्हणता २८ वर्षे झाली....दिवस किती भुरकन गेले. कालपरवा लग्न झालं असंच वाटतय..."नांदा सौख्यभरे" हे तुमचे आशिर्वाद जगणं सुखाचं करून गेले...सगळ्यांना धन्यवाद. संगिता, मी तुझा कृतज्ञ आहे...!

No comments:

Post a Comment