अबकी बार - मोदी सरकार
संघपरिवाराची रणनिती, विकासाचे गुजरात मो‘डेल, अमेरिकन पद्धतीचे मिडीय़ा मार्केंटिंग, केंद्रातील [अलाइअन्स] युती सरकारचा धोरणलकवा व नरेंद्र मोदींचे व्यापारी व्यवस्थापन कौशल्य आणि को‘न्ग्रेसची पराभूत मानसिकता या सगळ्यांतून नरेंद्र मोदींचा हा ऎतिहासिक विजय साकार झालेला आहे. मंडल पर्व ते ओबीसी नरेंद्र मोदींचे पर्व हा भारतीय लोकशाहीचा फार मोठा प्रवास आहे. गेल्या २५ वर्षात प्रथमच एका पक्षाला संपुर्ण बहुमत मिळण्याचा अर्थ भारतीय लोकशाही अधिक पक्व झाली असा लावायचा की १९५२ आणि १९७२ नंतर प्रथमच अधिकृतपणे विरोधीपक्ष नेता नसलेली लोकसभा अस्तित्वात येऊन लोकशाही कमकुवत झाली असे मानायचे? भारतीय जनता मुर्ख असल्याने "ज्यांचा लोकशाहीप्रणालीवरच विश्वास नाही त्यांच्याकडेच सत्तासुत्रे सोपवून तिने पायावर दगड मारून घेतला असे काहींचे म्हणणे आहे. ही भुमिका मला तरी लोकशाहीविरोधी वाटते. मोदींच्या यशाचा आदर केला पाहिजे.जनादेशाचा सन्मान राखायला हवा. तथापि जनता सर्वज्ञ असते हेही खरे नाही. जनता सतत प्रयोग करून बघत असते. नरेंद्र मोदींनी जी स्वप्ने दाखवली त्यावर लोकांनी विश्वास ठेवला.गेल्या ३७ वर्षात संघपरिवाराने अथक परिश्रमाने जे कार्यकर्त्यांचे विविध क्षेत्रात जाळे उभारले त्याचे हे यश आहे. लोकांना बदल हवा होता. आधीच्या सरकारच्या १० वर्षातल्या दारूण अपयशाला जनता वैतागली होती. ती भ्रष्टता आणि निकम्मेपणाला कंटाळली होती. गवर्नन्सच्या अभावी निर्माण झालेली पोकळी आपण गुड गवर्नन्सने भरून काढू असे नरेंद्र मोदींनी जे सांगितले त्यावर जनता विसंबली. १९६७ साली राम मनोहर लोहियांनी सुरू केलेल्या को‘न्ग्रेसेतरवादाची परिनती २०१४ला मोदी सरकारमध्ये झाली असे मानणे म्हणजे को‘न्ग्रेसच्या संधीसाधूपणावर आणि पराभूत मानसिकतेवर पांघरूण घालणे होय.महाराष्ट्रातील महायुतीचे अभुतपुर्व यश हे नरेंद्र मोदींचे वरिल समिकरण अधिक गोपीनाथ मुंढेचे सोशल इंजिनियरिंग यांचे जसे यश आहे तसेच ते सत्यशोधक नी ब्राह्मणेतर चळवळीचे ज्यांनी अपहरण करून, "बहुजनांच्या नावावर" फक्त एकजातीय सत्ताधारी मानसिकता घडवली, पोसली त्यांना जनतेने दिलेली ही चपराक आहे असे मला वाटते.
एकेकाळी उद्योगपती, माध्यमे, उच्चवर्णीय आणि उच्च तसेच मध्यमवर्गाचे मनमोहन सिंग अतिशय लाडके होते. आज ती जागा नरेंद्र मोदींनी घेतली आहे. को‘न्ग्रेसने आपला जनाधार गमावला आहे. दलित-आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यांक हे आजवर को‘न्ग्रेससोबत राहिले. त्यांनाही आपली फसवणूक झाली असे का वाटते? २ आक्टोबर २०११ला सरकारने ओबीसींच्या मागणीवरून आर्थिक व शैक्षणिक जनगणना सुरू केली. जे सरकार १२५ कोटींची दशवार्षिक जनगणना अवघ्या सहा महिन्यात पुर्ण करते त्यांनी अडीच वर्षे झाली तरी हे काम लोंबकळत ठेवले आहे.राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि ओबीसीद्वेष यातून हे घडले असे त्यांनी का मानू नये?
सत्ताधारी मानसिकतेला पराभव पचवणे शक्य होणार नाही. ते आत्मवंचना करीत राहणार. मोदींना टार्गेट करून त्यांनीच मोठे केले. चतुर, मुत्सद्दी आणि कष्टाळू मोदींनी असा सापळा लावला की सत्ताधारी अलगदपणे त्यात येऊन पडले. सत्ताधार्यांनो, उठसूठ मोदींना शिव्याशाप देण्याऎवजी जरा आत्मपरिक्षण करा. एकजातीय सत्ता मग ती पहिल्या वर्णाची असो की दुसर्या या देशात फार काळ टिकत नाही हे कधीतरी समजून घ्या. मस्ती, मग्रुरी, दादागिरी यांचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा जनता तिसरा डोळा उघडते.तिला गृहीत धरणारे, खिश्यात घालून फिरणारे, आपणच महाराष्ट्राचे एकमेव दुकानदार असे माणणारे यांना जनतेने नाकारले आहे.
अच्छे दिन आनेवाले है, आरामच आराम मिळे, जादुगार मोदी जादूची कांडी फिरवतील आणि सारा भारत सुखी-संपन्न होईल असे मी मानत नाही.विकासात माताबालक मृत्यू दर, शिक्षण, कृषि, वीज, पाणी,रस्ते यात महाराष्ट्र गुजरातपेक्षा पुढे असूनही स्वातंत्र्यानंतर प्रथमच महाराष्ट्रात प्रस्थापितांचे एव्हढे भयंकर पानीपत का झाले? जातीयवाद आणि फसवणूक यांनी कळस गाठल्याने प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी जनता का एकवटली यावर आत्मचिंतन होणार की सत्ता जाण्याचे सूतक पाळणारे, फक्त उरबडवेपणा करीत बसणार हे येणार्या काळात दिसेलच.सत्ताधार्यांना विरोधात बसायची सवय नाही.सत्तेत असताना अनेक वर्षे निष्क्रीय राहिले किंवा खिसे भरत राहिले, आता ५ वर्षे आराम करतील.
No comments:
Post a Comment