Wednesday, July 30, 2014

आख्खे गाव दरड कोसळून गाडले गेले

निसर्गाचा प्रकोप: आख्खे गाव दरड कोसळून गाडले गेले
भिमाशंकरजवळील डोंगराच्या कुशीत वसलेले माळीण गाव दरड कोसळून होत्याचं नव्हतं झालं. आज सकाळी सात-साडेसात वाजता ही दुर्घटना झाली. डिंभे धरणाच्या उभारणीमुळे हे गाव डोंगराखाली नव्याने उभारण्यात आले होते. तोच डोंगर गावावर कोसळला आणि आख्खे गाव मातीखाली पुरले गेले.हा परिसर माझ्या डोळ्यासमोरचा आहे.
निसर्गाचा प्रकोप किती महाभयंकर असतो त्याचा हा आणखी एक पुरावा.
गावातील सुमारे ४४ घरं या ढिगार्‍याखाली अडकली असून सुमारे २०० लोक यात अडकलेले असावेत. गेले बारा तास बचावकार्य चालू असून त्यातले जे कोणी वाचतील तो चमत्कार असेल. आशा करूया की काही लोक नक्कीच वाचतील. मृतांच्या नातेवाईकांवर दु:खाचा कडा कोसळलेला आहे. त्यांना दु:ख सोसण्याचे बळ मिळो... हा परिसर माझ्या डोळ्यासमोरचा आहे.
बघ्यांनी गर्दी न करता  नागरिकांनी बचाव कार्याला मदत करावी ही नम्र विनंती....


Tuesday, July 29, 2014

"गुणवत्तेच्या जोरावर मुसंडी मारा, आरक्षण नाकारून झेप घ्या"

"गुणवत्तेच्या जोरावर मुसंडी मारा, आरक्षण नाकारून झेप घ्या"
गुणवंत विद्यार्थ्यांना प्रा. हरी नरके यांचा सल्ला
पुणे दि. २७: {विजय लडकत यांच्याकडून}
"यशस्वी होण्यासाठी आजच्या मागासवर्गीय तरूणांनी ज्ञान आणि कौशल्ये यांच्या जोरावर झेप घ्यावी, आरक्षणाचं आता काही खरं नाही, ते संपल्यातच जमा आहे. यशाला शो‘र्टकट नसतो. मेहनत, अपार परिश्रम आणि जिद्द यांच्याशिवाय आता दुसरा कोणताही पर्याय नाही. जागतिकीकरणात खाजगीकरणामुळे सरकारी क्षेत्र संपत चालले आहे. खाजगी क्षेत्रात कोणतेही आरक्षण नाही. आपण आरक्षणाचे समर्थक होतो, आहोत, राहू, मात्र ते फक्त दुर्बलांना मिळायला हवे. यापुढे विरोध, घुसखोरी, अतिक्रमण आणि अपहरण यामुळं आरक्षण शुन्यवत होणार हे ओळखून  आरक्षणाशिवाय जगायची सवय करून घ्या," असा सल्ला आज येथे प्रा. हरी नरके यांनी दिला.ते दरोडे सभागृहात महात्मा फुले मंडळाने आयोजित केलेल्या गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते.अध्यक्षस्थानी कमल ढोलेपाटील होत्या. यावेळी महापौर चंचला कोद्रे,स्थायी समितीचे अध्यक्ष बापूसाहेब कर्णे, कृष्णकांत कुदळे,माध्यमिक शिक्षण विभागप्रमुख मीनाक्षी राउत,सुनिल पाषाणकर, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यशस्वी झालेले निखील पिंगळे, उपस्थित होते. बाबुराव धायरकर आणि चांगदेव पिंगळे व त्यांचे सहकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची भरगच्च उपस्थिती होती.
प्रा. नरके पुढे म्हणाले, " जातीची ओळख सोडून द्या. आजचे जग स्पर्धेचे आहे. संगणक आणि सोशल मीडिया यांच्याशी मैत्री करा. ग्रंथांशी झुंज घ्या. कोणतेही काम हलके मानू नका. घाम गाळायची लाज वाटू देऊ नका. चोरी, भ्रष्टाचार, भिक आणि लाचारी यांची नफरत बाळगा. जोतीराव-सावित्रीबाईंचा वारसा पुढे चालवायचा असेल तर स्त्री-पुरूष समता, ज्ञाननिर्मिती,चिकित्सा, जातीनिर्मुलन यांची कास धरा.आपल्यापेक्षा जे दुबळे आहेत त्यांना मदतीचा हात द्या.जातीपाती गाडा. सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय एकात्मता यांच्यावर प्रेम करा.आपली स्वत:ची खणखणीत मोहोर निर्माण करा. जग तुमची दखल नक्की घेईल."
यावेळी अध्यक्ष कमल ढोलेपाटील, महापौर चंचला कोद्रे,स्थायी समितीचे अध्यक्ष बापूसाहेब कर्णे, कृष्णकांत कुदळे, सुनिल पाषाणकर, आणि लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ३५३वा क्रमांक मिळवलेल्या निखील पिंगळे यांचीही   भाषणे झाली.





[महेश जांभुळकर यांच्याकडून]
महात्मा फुले मंडळाच्यावतीने माळी समाजातील दहावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह व पुष्पगूछ देऊन जेष्ठ विचारवंत हरि नरके यांच्याहस्ते गुणगौरव करण्यात आला . शिवाजीनगरमधील बी. एम. सी. सी. कॉलेजजवळील महात्मा फुले वसतिगृहाच्या दादासाहेब दरोडे हॉलमध्ये हा एस. एस. सी. विद्यार्थी गुणगौरव समारंभ पार पडला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कमल ढोलेपाटील , महापौर चंचला कोद्रे , दि. सासवड माळी शुगर कारखान्याचे अध्यक्ष कृष्णकांत कुदळे , स्थायी समिती अध्यक्ष बापूसाहेब करणे , चंद्रकांत दरोडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शैलजा जगताप , यु. पी. एस. सी. उत्तीर्ण निखिल नंदकुमार पिंगळे , महात्मा फुले वसतिगृहाचे विश्वस्त सुनील पाषाणकर , महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष चांगदेव पिंगळे , बाबुराव धायरकर , माळी आवाजाचे विजयकुमार लडकत आदि मान्यवर उपस्थित होते .
      यावेळी जेष्ठ विचारवंत हरि नरके यांनी सांगितले कि , यशाला कोणताही शोर्टकट नाही , आपण सर्व जण मेहनतीने यश प्राप्त केले आहे , त्यामुळे आपल्या भावी यशामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी केलेले बहुमोल कार्य विसरू नका , त्यांचे विचारांनी आपली वाटचाल करा आपण नक्कीच यशाचे आणखी शिखरे जिंकाल , आज त्यांचे पुणे विद्यापीठाला दिले आहे , यातून त्याच्या कार्याची आपणास प्रचीती होते .
     यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि उपस्थितांचे स्वागत महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष चांगदेव पिंगळे यांनी केले तरपाहुण्यांची ओळख प्रा. भगवान डोके यांनी करून दिली .  सूत्रसंचालन पांडुरंग गाडेकर यांनी केले तर आभार सतीश भुजबळ यांनी मानले . राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली .
  कार्यक्रमाचे संयोजन दिगंबर आल्हाट , अड. रंगनाथ ताठे , सुधाकर आरु , दिलीप करपे , गिरीश झगडे , गुलाबराव रासकर , दत्तात्रय भुजबळ , विजय झगडे , बाळासाहेब बुणगे , मधुकर राउत , धोंडीबा भोंग , हनुमंत टिळेकर यांनी केले होते .

Monday, July 28, 2014

संजय सोनवणी यांचा लढा

सामाजिक विचारवंत संजय सोनवणी यांचा लढा


मित्रवर्य आणि ख्यातनाम सामाजिक संशोधक, विचारवंत आणि योद्धे श्री.संजय सोनवणी गेले २ दिवस कोथरूडच्या करिष्मा चौकात उपोषण करीत आहेत.त्यांना तीव्र मधुमेह असल्याने या दीर्घ उपोषणाने त्यांची प्रकृती बिघडली आहे.
त्यांनी सुरू केलेला लढा अभुतपुर्व आणि ऎतिहासिक असा आहे. या लढ्याने प्रथमच काही मुद्दे  देशासमोर चर्चेला आणलेले आहेत.
१...आरक्षणधारकांसाठी सर्वमान्य आचारसंहिता असावी.
२. सध्या आरक्षण मिळणार्‍या ज्या जाती/जमातींची प्रवर्ग बदलण्याची मागणी आहे, त्या सर्वांना एकत्र आणून त्यांच्यात संवाद, जागृती आणि व्यापक ऎक्य घडवून त्यांचा सर्वांचा एकत्रित लढा उभारणे.
३. जे घटक आज खुल्या गटात आहेत त्यातल्या दुर्बलांना आरक्षण मिळावे.
४. सर्व जातीजमातींमध्ये राष्ट्रीय ऎक्यभावना वाढवण्यासाठी म.फुले आणि म.गांधी यांच्या मार्गाने जागरण आणि अभिसरण निर्माण करणे.
हे सगळेच मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. त्यासाठी नेटाने आणि २४*३६५* आमरण काम करण्याची गरज आहे.
श्री.सोनवणी हे देशाचे वैभव आहेत. भारतीय जातीपातीची मानसिकता बदलण्यासाठी आजवर अनेकांनी काम केलेय. या कार्याला फुले, शाहू, आंबेडकर,शिंदे, सयाजीराव, गांधी असा फार मोठा वारसा आहे. हे काम राष्ट्रीय आव्हानात्मक काम आहे.
श्री.सोनवणी त्यासाठी गेले अनेक वर्षे समर्पित वृत्तीने काम करीत आहेत.
माझ्या माहितीत असा हा पहिलाच माणूस आहे की ज्याने स्वत: लाभार्थी नसताना आणि सर्वप्रथम स्वत:  डिकास्ट होऊन विविध जातीजमातींचा इतिहास शोधणे, लिहून प्रकाशित करणे, त्यावर चर्चा घडवणे, व्याख्याने देणे,सोशल मिडीयाच्या {ब्लो‘ग, फेसबुक} माध्यमातून रात्रंदिन वैचारिक मांडणी करणे असे तळमळीचे काम गेली अनेक वर्षे सातत्त्याने लाऊन धरलेले आहे.
श्री.सोनवणी हे "ऎशी कळवळ्याची जाती! करी लाभाविना प्रिती!" या वृत्तीचे चालताबोलते प्रात्यक्षिक आहेत.
अशा माणसांची आज आपल्या समाजाला गरज आहे.
या दोन दिवसात हजारो लोकांनी त्यांना भेटून आणि फोनवरून उपोषण सोडण्याची विनंती केली. आमच्या सर्वांच्या आग्रहाला मान देऊन त्यांनी आत्ताच उपोषण मागे घेतले असले तरी या विषयांना न्याय मिळण्यासाठी आमरण कार्यरत राहण्याचा आणि नेटवर्कींगला आयुष्य वाहून घेण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे. त्यांच्या या सर्व कामाला आमच्या हार्दीक शुभेच्छा...
संजय सोनवणी भाऊ,  आम्हाला तुमचा अभिमान वाटतो....

Wednesday, July 16, 2014

Vaidik-Saeed Meeting: The NDA Mirror Has Cracked

http://www.ndtv.com/article/opinion/vaidik-saeed-meeting-the-nda-mirror-has-cracked-558769?pfrom=home-otherstorieshttp://www.ndtv.com/article/opinion/vaidik-saeed-meeting-the-nda-mirror-has-cracked-558769?pfrom=home-otherstoriesAds by Google
(Kumar Ketkar is a senior journalist, political commentator, globe trotter and author. He has covered all Indian elections since 1971 and significant international events. He is a frequent participant on TV debates.)

About two years ago, Ved Pratap Vaidik, the well-known writer-journalist had said publicly that Mohammed Ajmal Kasab, the only 26/11 terrorist captured alive, should have been tortured and hanged in a public square. That was on November 21, 2012. Today, the same RSS sympathizer, Vaidik, is in the news for attempting to bring about a "change of heart" in the man who masterminded Kasab's terror operation, Hafeez Saeed, by meeting him in Pakistan. Vaidik is known as a "philosopher" who is close to the self-styled yoga guru Baba Ramdev.

In June 2009, the special court which tried Kasab issued a non-bailable warrant against Hafeez Saeed, the chief of operations and the head of the Lashkar-e-Taiba accusing him of planning the attack on Mumbai and killing over 160 innocent people. The warrant is still pending. For years, the Pakistani authorities have refused to even recognize that Hafeez was propagating hatred against India and was also organizing terrorist groups. Hafeez had also said that there will be more terrorist attacks on India and his aim is to cut India into pieces. 

Hafeez himself has always claimed that he is a social worker and an Islamic preacher. However, recently Hafeez, the head of the Lashkar-e-Taiba, was declared by the United States government as one of the most dreaded terrorists in the world; it even announced a $10 million award for his capture. Hafeez is an expert in changing the names of his terrorist groups to evade arrest and trial. But it is common knowledge that the Pakistani authorities, both political and military, always protect Hafeez and even use him for anti-India propaganda. He is also a fanatic campaigner for the "freedom of Kashmir."

Yet, the journalist cum self-declared track-2 negotiator with Pakistan, Vaidik thought that he would serve the patriotic and humanist cause of building confidence and friendship with the neighbour who has been at war with India since Independence.

The timing of making public the ill-famed meeting, which took place a fortnight ago, of the the terrorist with the yogi-disciple, is also intriguing. Almost immediately after Prime Minister Narendra Modi left for Brazil for the BRICS summit, the relaxed photo of the twosome appeared in the media, with the bizarre conversation that has embarrassed the NDA government to no end within just two months of coming to power.

The reported conversation makes it reasonably clear that Vaidik was acting on behalf of the Sangh Parivar, and most likely the BJP and NDA, notwithstanding their hypocritical denial. We have only Vaidik's version of the conversation. We have no idea as to what actually transpired  between the two and whether Vaidik has given some kind of "veiled message" to Hafeez. We don't know whether Vaidik asked in his "friendly conversation" about how he recruited Kasab and his terrorist gang, how he runs the terrorist camps, how he manages to get support from the establishment of Pakistan.

The BJP denial about having blessed the meeting is absolutely not convincing, because it is well known that Baba Ramdev is not only close to Modi, but also a guru to a large number in the Parivar. Also Ajit Doval, the NSA boss and top intelligence man of the NDA government, is part of the Vivekanand Trust run by Ramdev. That raises doubt about the claim made by Vaidik that he was merely being a well-meaning journalist.

Vaidik, in fact, has given a clear enough indication that he was meeting Hafeez to persuade him to even welcome Modi, if not invite him. The BJP is red faced because during the UPA regime, their partymen had virtually taken the Parliament by storm and fire for even establishing a dialogue with Pakistan. The BJP and Shiv Sena protested when there was a proposal to hold a cricket match between the two countries. The debate in the House was stalled by noise and gheraos.

But we can just imagine how the BJP and the whole Parivar would have gone to town shouting and screaming if the government in Delhi was that of the UPA and Hafeez had met with someone close to the Congress. It is not a question of a journalist being free to interview or converse with anyone. Indeed, a journalist does enjoy considerable freedom. But clearly Vaidik was not exercising his journalistic right.

The meeting with Hafeez could not have been even arranged without the involvement of the ISI and the political establishment of Pakistan. That makes it a sinister track-2 approach of the NDA government. Hafeez has a clear agenda. He wants to overcome the American warrant on him and whitewash his sins. Vaidik has helped the most dreaded terrorist in the Indian subcontinent to enter into the dialogue between India and Pakistan. The NDA mirror has cracked and now there are multiple mutilated images.

Disclaimer: The opinions expressed within this article are the personal opinions of the author. NDTV is not responsible for the accuracy, completeness, suitability, or validity of any information on this article. All information is provided on an as-is basis. The information, facts or opinions appearing in the article do not reflect the views of NDTV and NDTV does not assume any responsibility or liability for the same.

Friday, July 11, 2014

जगातील पहिल्या २०० विद्यापिठांचे निकष काय?


जगातील पहिल्या २०० विद्यापिठात एकही भारतीय विद्यापिठ नसावे आणि ५०० मध्ये आय.आय.टी, पवई आणि बंगलुरूची सायन्स इन्स्टीट्यूट या दोनच संस्था आहेत असे सांगितले जाते. त्याची भारतीयांना खंतही वाटते. प्रश्न हा आहे की, जागतिक क्रमवारी लावते कोण? त्यांचे निकष काय असतात?
 इंग्रजी भाषेतून अध्यापन करणे, संस्थेत जास्तीत जास्त परदेशी विद्यार्थी असणे, आरक्षणाला विरोध, चकचकीत इमारती,भपका आणि डामडौल हवा, यासारखे निकष लावले जात असतील तर ते आपल्यासारख्या बहुविविधता असलेल्या गरिब देशासाठी अन्यायकारक नाहीत काय?
असे असेल तर मग गरिब कष्टकरी बहुजन, दलित-आदिवासी, भटके-विमुक्त, अल्पसंख्यांक, महिला, इतर मागास वर्ग अशांना शिक्षण देणार्‍या आपल्या संस्था भले जगातील पहिल्या २०० किंवा ५०० मध्ये नसल्या तरी काही बिघडत नाही, कारण शिक्षणातून सामाजिक न्याय प्रस्थापित करणे महत्वाचे आहे, असे म्हणायचे की नाही? तुम्हाला काय वाटते?

"भांडारकरमध्ये अभिजात मराठी भाषा अभ्यास केंद्राची स्थापना

"भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये अभिजात मराठी भाषा अभ्यास केंद्राची स्थापना."
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या भारतीय भाषा अध्ययन विभागातर्फे "अभिजात मराठी भाषा अभ्यास केंद्राची" स्थापना करण्याचा निर्णय आज संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या केंद्राच्या प्रमुखपदी प्रा.हरी नरके यांची नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या अभिजात मराठी भाषा समितीच्या वतीने करण्यात आलेल्या मराठीच्या अभिजातता विषयक संशोधनात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा प्रमुख सहभाग होता. संस्थेतर्फे प्रा. हरी नरके, प्रा. श्रीकांत बहुलकर, प्रा. मैत्रेयी देशपांडे आदींनी हा प्रस्ताव तयार करण्याच्या कामी प्रा. रंगनाथ पठारे समितीला महत्वपूर्ण सहभाग दिलेला होता. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत आजवर गेले शतकभर प्रामुख्याने संस्कृत, पाली, अर्धमागधी, प्राकृत भाषांचा अभ्यास केला जात असे. आता संस्था मराठी भाषाविषयक संशोधन प्रकल्प हाती घेणार आहे. मराठी भाषेचे अद्ययावत संशोधन व अध्ययन केंद्र भांडारकरमध्ये निर्माण करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
...............................................................................................
भांडारकरचा कारभार आता मराठीतून
पुणे, दि.११: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था या शताब्धीच्या उंबरठ्यावर असलेल्या जागतिक किर्तीच्या संस्थेचा कारभार यापुढे मराठीतून करण्याचा निर्णय आज एकमताने घेण्यात आला. नवनिर्वाचित नियामक मंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत प्रा.हरी नरके, शाम सातपुते, श्रीनिवास कुलकर्णी, मंडलेकर डी.एन., प्रा. श्रीकांत बहुलकर, वसंत वैद्य, पं.वसंत गाडगीळ, प्रमोद जोगळेकर, राहुल सोलापुरकर,एड.विनायक अभ्यंकर, संजय पवार,भुपाल पटवर्धन यांनी हा विषय उपस्थित केला. त्याला सर्वांनी पाठींबा दिला. आजवर या जागतिक किर्तीच्या संस्थेचा सगळा कारभार इंग्रजी भाषेतून चालत असे. संस्थेचे सदस्य जगभर असल्याने त्यांनी यापुढे मागणी केल्यास इंग्रजीतही कागदपत्रे पुरवली जातील. वर्जित प्रयोजने वगळता बाकी कारभार मात्र मराठीत चालेल. संस्कृत, पाली, अर्धमागधी, प्राकृत भाषांचा प्रकाशन, अध्यापन, अध्ययन, संशोधनपर अभ्यास करणार्‍या या संस्थेने यापुढे मराठीत कारभार करण्याचा घेतलेला निर्णय ऎतिहासिक स्वरूपाचा होय.हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
भांडारकर संस्थेचे आजवर महाभारताची चिकित्सक आवृत्ती, १९ खंड, भारतरत्न पां.वा.काणे यांचे धर्मशास्त्राचा इतिहास, पाच खंड, प्राकृत शब्दकोश, छ.संभाजीमहाराज यांचे बुधभूषण, {प्रकाशन १९२६,} हे ग्रंथ गाजलेले आहेत.

Monday, July 7, 2014

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ






नामांतराचे हार्दीक स्वागत
पुणे विद्यापिठाचे नामांतर आता "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ" असे झाले आहे. हा समस्त स्त्रीवर्गाचा गौरव आहे. सावित्रीबाई या महान शिक्षणतज्ञ होत्या. वयाच्या सहाव्या वर्षापासून शेती आणि औद्योगिक शिक्षण सक्तीचे करण्याचा दिलेला विचार आणि स्त्रिया नी दलित यांच्या मानवी अधिकाराची चळवळ गतिमान करण्यासाठी शिक्षणाचा मुलभूत अधिकार त्यांनी मागितला, दिला आणि त्या क्षेत्रात पायाभूत काम केले. पुणे ही सावित्रीबाईंची कर्मभुमी. जोतीराव- सावित्रीबाईंनी १८४८ला पुण्यात काम सुरू केले.१९४८ ला पुणे विद्यापिठाची स्थापना झाली. सर्व तरूणाईला सावित्रीबाईंच्या नावाचा विशेष अभिमान वाटतो. स्त्री शिक्षण, अधिकार आणि स्त्रीसत्ता स्थापनेला यातून बळकटी मिळॆल. विद्यापिठाचे कुलगुरू डा.वासुदेव गाडे, सिनेट, व्यवस्थापन परिषद आणि महाराष्ट्र सरकार विशेषत: श्री छगन भुजबळ यांचे हार्दीक अभिनंदन...

Friday, July 4, 2014

प्रमिती नरके सर्वप्रथम..सुवर्णपदकाची मानकरी


बी.ए. नाट्यशास्त्र,पुणे विद्यापिठात प्रमिती नरके सर्वप्रथम..सुवर्णपदकाची मानकरी
 पुणे, शुक्रवार, दि.४ जुलै२०१४ {संगिता नरके:------}
पुणे विद्यापिठाच्या ललित कला केंद्राच्या बी.ए. नाट्यशास्त्र परिक्षेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला होता. गुणपत्रिका आज मिळाल्या. या परिक्षेत पुणे विद्यापिठात  सर्वाधिक गुण मिळवून बी.ए. नाट्यशास्त्रात प्रमिती नरके सर्वप्रथम आली.प्रमिती सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे.तिला पद्मश्री प्रा. सतिष आळेकर, विभागप्रमुख डा. शुभांगीकर बहुलीकर, प्रा. प्रविण भोळे, डा.राजीव नाईक, प्रा.समर नखाते आदिंचे मार्गदर्शन लाभले. तिचे बाबा प्रा.हरी नरके यांनी १९८७ साली बी.ए. मराठीत पुणे विद्यापिठात सर्वप्रथम येऊन सुवर्णपदक मिळवले होते. आमच्या मुलीने ही परंपरा कायम राखली याचा मला विशेष अभिमान वाटतो. विशेष म्हणजे वार्षिक परिक्षेच्या दिवसात दिवसा पेपर द्यायचे आणि रात्री लघुपटांचे चित्रणात प्रत्यक्ष भाग घ्यायचा असा दररोजचा प्रमितीचा परिपाठ होता.परिक्षेच्या एकदिवस आधीपर्यंत ती मुंबई-पुणे प्रवास करून कार्यरत होती. प्रमितीचे अभिनंदन...
.......................................
आधीची बातमी:
{ललितकला केंद्राचे संगित,नाट्य, नृत्य असे तीन विभाग आहेत. या सर्व विभागांमध्ये एकत्रित विचार करता बी.ए.ला सर्वाधिक गुण मिळवून मैत्रेयी साने प्रथम आली आहे.
http://epaper3.esakal.com/22Jun2014/Enlarge/PuneCity/Pune1Today/page9.htm
Sakal, Pune Today, Sunday 22 June 2014 pg 9
PUNE UNI.Lalitkala Kendra News....Results...
पुणे विद्यापिठाच्या ललित कला केंद्राच्या बी.ए. व एम.ए.परीक्षांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले.बी.ए.परिक्षेत मैत्रेयी साने एम.ए.परीक्षेत श्रुती पत्की यांना सर्वाधिक गुण मिळाले.प्रमिती नरके,नेहा दराडे, रागिणी नागर, रोहन चिंचोरे,रमा कुकनूर व अमोल पाटील विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाले.}
.......................................................

Thursday, July 3, 2014

४९८अ - गैरवापर होत आहे काय?

 हुंड्याच्या कारणावरून होणार्‍या छळाच्या घटना रोखण्यासाठी संबंधित कायद्यात ४९८अ ची तरतूद करण्यात आली. २००९ साली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिस श्री. के.जी. बालकृष्णन यांनी ह्या कायद्याचा गैरवापर वाढत असल्याबद्दल जाहीरपणे चिंता व्यक्त केली. आज मा. सर्वोच्च न्यायालयाने याबाबतची वस्तुस्थिती निदर्शक आकडेवारी देऊन गैरवापर होत असल्याचा ठपका ठेवला.सासरच्या मंडळींना अटक करण्यापुर्वी पोलीसांनी पुरावे पाहावेत असेही न्यायालयाने सुचवले.
स्त्रियांवर अन्याय होतो आणि त्यांच्या संरक्षणासाठी या कायद्याची गरज आहे यात शंकाच नाही. तथापि काही प्रमाणात त्याचा गैरवापर होतोय हे नाकारण्यात हशील नाही. या कायद्याचा हा वाढता गैरवापर रोखण्याचीही गरज निर्माण झालेली आहे.त्याला पायबंद घातला नाही तर खर्‍या घटनांमध्येही संशयाचे ढग तयार होऊ लागतात. असे असले तरी सर्वोच्च न्यायालयाच्या या पावलाचे स्वागत करणे म्हणजे तथाकथित पुरोगाम्यांच्या नजरेत खलनायक बनणे असणार, लगेच तुम्हाला
पुरूषी, स्त्रीविरोधी, प्रतिगामी ठरवले जाणार. हे तथाकथित पुरोगामी आतून सत्य स्विकारायला कसे तयार नसतात याचे अशावेळी दर्शन घडते आणि खेद दाटून येतो. सनातनी जसे आणि जितके हट्टी आणि तर्कविरोधी असतात तितकेच हेही लोक एकतर्फी, अविवेकी आणि न्यायविरोधी असतात असे म्हण्णे भाग आहे.
याबाबतची चर्चा दोन वाहिन्यांवर पाहिली.
लिहायला खेद वाटतो की, माझे अनेक वर्षांचे परिचित, काही सहकारी आणि मित्र असलेले आणि सामाजिक चळवळीत बरेच वर्षे कार्यरत असलेले चळवळीचे प्रतिनिधी वाहिनीवर जी मांडणी करीत होते ती व्यक्तीश: मला पटली नाही. ही एकतर्फी,सरधोपट आणि एकांगी मांडणी होती. जणू काही या विषयाला दुसरी बाजूच नाही असे ते रेटून सांगत होते.त्यातला अभिनिवेष तर असे सांगत होता की स्त्रिया म्हणजे हाडामांसाच्या कुणी नसून त्या साक्षात देवता असतात.मात्र सगळे पुरूष  तेव्हढे वाईटच असतात.जी मंडळी तथाकथित पुरोगामी, स्त्रीमुक्तीवादी म्हणून ओळखली जातात ती याबाबत आत्यंतिक भावनिक होऊन बोलत होती. "मुळात कोणतीही स्त्री गैरवापर करीलच  कशाला?" असा प्रश्न जेव्हा ही मंडळी विचारीत होती तेव्हा त्यांच्या भाबडेपणाला काय म्हणावे तेच कळत नव्हते. दुसरीकडे जगात सगळ्याच कायद्यांचा गैरवापर होत असतो नी गैरवापर होण्यात काय वावगे आहे? असाही ते प्रश्न उपस्थित करीत होते." ही सगळीच मांडणी एकतर्फी, सरधोपट आणि स्त्रियांना माणूस मानण्यापेक्षा ’आदर्श देवी’ वगैरे मानणारी होती.
अशावेळी तथाकथित चळवळीतील ही मंडळी सामान्य माणसाच्या विवेकाला, त्याच्या अनुभवाला, त्याच्या सामुदायिक शहाणपणाला किती पारखी झालेली असतात आणि ती किती सामान्यांशी नाळ तोडून जगत असतात त्याचे विदारक चित्र पाहायला मिळते.
मात्र ज्येष्ठ आणि प्रयोगशील पोलीस अधिकारी श्री सुरेश खोपडे आणि दोघी महिला कायदेतज्ञ यांची मांडणी मोलाची वाटली.
पुरूष हक्क समितीचे लोक एकांगी आहेत असे मी आजवर मानत आलोय. आज मात्र त्यांच्याही बोलण्यात काही तथ्य असावे असे वाटले. तथापि ते मांडत होते ते लंबकाचे दुसरे टोक होते.तेही रेटून अतिशयोक्ती करीत होते. सत्य या दोघांच्या मध्ये कुठेतरी अन्यत्रच होते.  चळवळीतली म्हणून वाहिन्यांवर आलेली स्त्री-पुरूष मंडळी एकांगी आणि आतातायी वाटली.कोणत्या जगात ही मंडळी वावरतात कोण जाणे? पुरूष खोटे बोलतात, पुरूष हिंसा नी अत्याचार करतात.कायद्याचा गैरवापर करतात. हे जर खरे आहे तर स्त्रियाही माणसेच आहेत. त्या या दोषांपासून मुक्त आहेत असे माणणे म्हणजे  सत्याशी प्रतारणा करणे होय. ती करणारे लोक एकतर लांगूलचालन तरी करीत असतात किंवा  पुरूषांबद्दलच्या  आकसातून त्यांचे हे वागणे येत असणार.
यातून अंतिमत: चळवळीचे नुकसान होत असते.
माझ्या ओळखीत अलिकडे हुंड्याच्या छळाबाबत  अशा तीन घटना घडल्या. त्यातली एक खरी होती. ती मुलगी बळी गेली याची यातना खोलखोल आहे. दोन घटनांमध्ये मात्र उघडपणे गैरवापर झालेला होता. त्यामुळे दोन मोठे निष्ठावंत स्त्रीवादी  आणि निरपराध साहित्यिक भरडले गेले. त्यांचा काही्ही दोष नसताना त्यांची फरपट झाली. "त्यामुळे स्त्रिया कशाला गैरवापर करतील" हे मत भंपकपणाचे आहे. मात्र सरसकट गैरवापर होतो हेही खरे नाही.
 कोणत्याही चिकित्सेला भक्तमंडळी जशी कधीच तयार नसतात, तसेच या चळवळीतील सहकार्‍यांचे होत असलेले बघून खेद वाटतो.गेली ३५ वर्षे मी स्त्रीवादी आणि समतावादी चळवळीत काम करतोय.झटपट नेता होण्याच्या आणि मग टोकदार आणि सनसनाटी बोलून हे नेतृत्व टिकवून धरण्याच्या स्पर्धेतून हे घडत असावे असे मला वाटते. आम्ही सांगतो तेव्हढेच सत्य, विरोधी भुमिका मांडणारे सगळे प्रतिगामी, पुरूषी, स्त्रीविरोधी अशी यांची समिकरणे.आज ती  इतकी लोकप्रिय झालीत की आपले मत उघड्पणे मांडायचीही आजकाल भिती वाटते.हा दहशतवाद खुल्या चर्चेला घातक आहे, आमची मते आम्ही तपासून घ्यायला तयार आहोत, त्यात सुधारणेला वाव आहे, अशी भुमिका नसेल तर कोणत्याही चळवळीला ते मारक आहे असे माझे मत आहे. चळवळीतली असहिष्णुता दिवसेंदिवस वाढत चालल्याचे मी पहातोय. काही मंडळींना गैरवापर करणे हा आपला जन्मसिद्ध हक्कच वाटत असेल तर ती मात्र त्यांची रोजगार हमी योजना असणार.
४९८अ हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करणे,या एका कलमान्वये देशात एका वर्षात एकुण २ लाख लोकांना आरोपी म्हणून अटक केली गेली.अशा खटल्यांमध्ये १५लोकांना शिक्षा होते आणि ८५ टक्के लोकांना निर्दोष म्हणून मुक्त केले जाते. यातल्या काही घटना या सबळ पुराव्याअभावी सुटलेल्या असल्या तरी किमान ७५ टक्के खटले हे बनावट असतात असे मानायला जागा आहे असे दिसते.
सध्या असे देशात एकुण ३ लाख ७२ हजार खटले प्रलंबित असून देशातील हा रोख पाहता यातील सुमारे ३ लाख १७ हजार आरोपी निर्दोष सुटू शकतील. तथापि त्यापुर्वीच त्यांची झालेली अटक, बदनामी, मनस्ताप आणि आर्थिक नुकसान यांची भरपाई कशी होणार?
आपल्या देशात दरवर्षी सुमारे एक कोटी लग्न होतात. त्यातील ४ ते ५ लाख लग्ने काही ना काही कारणामुळे मोडतात. यातून दाखल होणार्‍या सगळ्याच केसेस खोट्या असतात असे कोणीच म्हणणार नाही. या कारणावरून एकाही स्त्रिचा छळ होणे दंडनीयच ठरले पाहिजे यात शंकाच नाही. मात्र मोडीत निघणार्‍या सुमारे निम्म्या प्रकरणात महिला अशा खोट्या केसेस दाखल करतात असे दिसते, हे खेदजनक आहे. अशावेळी ह्या कायद्याचा होणारा दुरूपयोग रोखण्याऎवजी तो करण्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हातभार लावणे चळवळीची हानी करणारे ठरेल.