सध्या मोठी माणसे छोटी करण्याचा उद्योग तेजीत आहे. सर्व महापुरूषांना आणि स्त्रियांना जातीत कोंबण्याची, बंदीस्त करण्याची धडपड सर्वत्र दिसून येतेय. जर एखाद्या जातीत महापुरूष झालेले नसतीलच तर आपापल्या जातीचे महापुरूष बनविण्याचेही काम अग्रक्रमाने हाती घेतले गेल्याचे आढळते.
अशा विचित्र परिस्थितीत असेही काही द्रष्टे लोक आहेत की ज्यांची जातीच्या पाठबळाअभावी अबाळ झालीय.उपेक्षा झालीय. त्यांना कोणी वालीच नाहीये.
महाराजा सयाजीराव गायकवाड--
जन्म ११मार्च १८६३ मृत्यू -६ फेब्रूवारी १९३९
बडोदा संस्थानचे राजे म्हणून सलग ६४ वर्षे कारभार पाहिला.
स्वत: अल्पशिक्षित असूनही अपार व्यासंगाच्या जोरावर संस्कृत, हिंदी, गुजराती आणि मराठी भाषांवर एव्हढी हुकमत मिेळवली की कोल्हापूरला झालेल्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे महाराज अध्यक्ष होते.
ते हिंदी आणि संस्कृत साहित्य संमेलनांचेही अध्यक्ष होते.
अमेरिका, इंग्लंड, जपान अशा विविध देशांमध्ये झालेल्या अकरा जागतिक परिषदांचे महाराज अध्यक्ष होते.शिकागोला भरलेल्या दुसर्या जागतिक धर्म परिषदेचे अध्यक्ष आणि उद्घाटक सयाजीराव होते.
१८८२ साली त्यांनी बडोदा संस्थानात दलित आदीवासींना प्राथमिक शिक्षण मोफत द्यायला सुरूवात केली. १८९२ साली राज्यातील सर्वच प्रजाजनांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. दलितांसाठी ३८५ शाळा काढल्या. त्यातून एकावेळेला ८२००० मुले-मुली शिकत होती. आजच्या बडोद्यात अनेक घरात असे चित्र दिसते की घरातील पणजी आणि आजी अधिक शिकलेल्या असतात आणि आई, मुलगी किंवा सून मात्र कमी शिकलेली आढळते. कारण आधिच्या काळात स्त्री शिक्षण सक्तीचे होते आणि स्वातंत्र्यानंतर मात्र स्त्री शिक्षणाचा बोजवारा उडाला.
बडोद्यातील जुन्या पिढीत एकही दलित किंवा आदीवासी निरक्षर नव्ह्ता. आज मात्र तशी खात्री देता येणार नाही.
महाराजांनी राज्याच्या मंत्रीमंडळात शिक्षणमंत्री हा मंत्रीमंडळातील क्रमांक एकचा मंत्री राहिल याची खबरदारी घेतलेली होती.
सयाजीराव बनारस हिंदू विद्यापिठाचे कुलपती होते आणि पं. म.मो. मालवीय कुलगुरू होते.
त्यांनी देशातील शेकडो शिक्षण संस्था आणि विद्यापिठांना कोट्यावधी रूपयांच्या देणग्या दिल्या. हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन परदेशात शिकायला पाठवले. रियासतकार सरदेसाई, विनोदकार चिं. वि.जोशी, चित्रकार राजा रविवर्मा, असे अनेक दिग्गज महाराजांकडे नोकरीत होते.
बालगंधर्व, बडे गुलाम खान, दादाभाई नौरोजी, लो.टिळक, योगी अरविंद, विवेकानंद, आणि आणखी कितीतरी लोकांना त्यांनी आर्थिक मदत केली.
महात्मा फुले, सावित्रीबाई, डा.यशवंत, म.वि.रा.शिंदे, क.भाऊराव पाटील, डा.बाबासाहेब आंबेडकर, अशा अनेकांना कर्तव्यबुद्धीने अर्थसहाय्य केले.
श्री सयाजी विजय माला या ग्रंथ प्रकाशन योजनेतून २५० अभिजात असे संदर्भ ग्रंथ प्रकाशित केले. बालवाचक घडविण्यासाठी मुलांसाठी विज्ञानमाला चालवून त्यातून १९२ ग्रंथ प्रकाशित केले.
डा.बाबासाहेब आंबेडकरांना १९०८साली भेट मिळालेले बुद्ध चरित्र याच ग्रंथमालेत प्रसिद्ध झालेले होते. त्यातून आपण प्रभावित आणि प्रेरित झालो आणि बुद्धाकडे वळलो असे बाबासाहेब स्वत: लिहितात. केळूसकरांचे शिवचरित्र याच मालेत प्रकाशित झाले होते.
महाराजांनी १९१० साली जपानमधून बुद्धमुर्ती बनवून आणून ती ज्युबिली बागेत बसवली.
उद्योग, शेती, कला, व्यापार, निती, कारागिरी, यांना शिक्षणात स्थान देऊन प्रत्येक शिक्षित माणूस स्वावलंबी बनवला.
प्रागतिक विचार, समाजसुधारक वृत्ती, आधुनिक मुल्यांचा पुरस्कार, ज्ञाननिर्मितीचा आग्रही आणि व्यापार-उद्योगाचा पुरस्कर्ता असा दुसरा राजा दाखवता येत नाही, असा भला आणि द्रष्टा महापुरूष.
त्यांच्या कार्याचा गौरव करताना फुले-आंबेडकर, म.गांधी, लो.टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, रविंद्रनाथ टागोर, इतिहासाचार्य राजवाडे, कोषकार दाते, विवेकानंद आणि राजगोपालाचारी यांना शब्द अपुरे पडत होते.
ज्यांची व्यासंगी भाषणे, पत्रे, प्रवास वर्णने, लेखन आणि राजपत्रे यांचा सगळा ऎवज छापील सुमारे पन्नास हजार पृष्ठे भरेल एव्हढा आहे.
जो राजा काळाच्या फार पुढे होता, ज्याने देशात प्रथम अस्पृश्यता निर्मुलन कायदा केला, पंचायत राज्य व्यवस्था आणली, बालविवाह बंदी केली, विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार दिला, गाव तेथे शाळा आणि ग्रंथालय उभारले, आधुनिक शेती आणि व्यापार-उद्योंगांना प्रोत्साहन दिले त्या सयाजीरावांची उपेक्षा का झाली असावी?
............................
[ ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रकाशक श्री बाबा भांड आणि त्यांचे साकेत प्रकाशन यांनी गेली काही वर्षे मिशनरी वृत्तीने महाराजा सयाजीरावांचे चरित्र, साहित्य आणि कार्यकर्तृत्व प्रकाशझोतात आणण्यासाठी अतिशय मोलाचे काम केलेले आहे. त्यांना धन्यवाद. ]
No comments:
Post a Comment