"भारतात प्रत्येक जात हे स्वतंत्र राष्ट्र आहे"... डा. बाबासाहेब आंबेडकर
भारत सरकारच्या मानववंशशास्त्र सर्वेक्षण विभागाच्या "भारताचे लोक" या पाहणीनुसार भारतात आज रोजी एकुण ४६३५ जाती आहेत.
"जातीव्यवस्था आता कालबाह्य झालेली आहे." "जातपंचायती आणि जाती संघटना यांना थारा द्यायला नको."
"दुसर्या जातींचा द्वेष नको पण आपल्या जातीचा अभिमान बाळगायला काय हरकत आहे?"
"दुबळ्या जातीतील विखुरलेल्या लोकांना संघटीत करण्यासाठी जातीसंघटनेचा आधार घ्यावा लागतो. पण प्रगत आणि प्रभावशाली जातींनी मात्र जातीच्या संघटना बनवणं चूक आहे." "आरक्षण जातीच्या आधारावर असल्याने जातीपातींना खतपाणी मिळते."
अशी काही मतं आजूबाजूला ऎकायला मिळत असतात.
त्यात कितपत तथ्य असतं?
जातीव्यवस्थेबद्दल आजवर रग्गड लिहिलं गेलय. फुले, भांडारकर, इंथोवेन, रसेल, हिरालाल, आत्रे, कालेलकर, केतकर, इरावतीबाई, घुर्ये, बाबासाहेब, श्रीनिवासन, शरद पाटील, संजय सोनवणी आदींची मांडणी महत्वपूर्ण आणि दिशादर्शक राहिलेली आहे. जातीअंतर्गत लग्न करून जाती जोपासल्या गेल्या. सांभाळल्या गेल्या. एका स्कूलच्या मते भारतात आधी वर्ण होते,सुरुवातीला दोनच वर्ण होते. नंतर तिसरा आणि पुढे चौथा वर्ण निर्माण झाला. त्यातून काळाच्या ओघात जाती बनत गेल्या. चौथ्या शतकात अस्पृश्यता निर्माण केली गेली. जाती कठोर आणि निर्दयी बनत गेल्या. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्णाचे पुरूष हे जातीव्यवस्थेचे तीन लाभार्थी होते. तर सर्व स्त्रिया आणि शूद्र {अतिशूद्र, दलित व आदिवासी } हे जातीव्यवस्थेचे शोषित व बळी होते. राजदंडाच्या आधारे त्र्यवर्णिकांनी जुलुम केले, शोषण केले.श्रेणीबद्ध विषमता निर्माण केली गेली. तिला धर्माचा आणि सत्तेचा मुलामा दिला. हे कामाचे वाटप न राहता ते काम करणारांचे जन्मावर आधारित वाटप होते. तिने गुणवत्ता आणि समता यांची हत्या केली. कामाची, कौशल्याची आणि ज्ञानाची ताटातूट केली. भारताला दरिद्री आणि करंटे बनवले.
मात्र दुसर्या स्कूलच्या मते आधी जाती नव्हत्या. वर्णही नव्हते. कामांचे कौशल्यावर आधारित खुले गट होते. ते ११-१२ व्या शतकाच्या काळात परकिय आक्रमणे, अर्थव्यवस्थेवरील अरिष्ठे, दुष्काळ,वाढती स्पर्धा आदी कारणांनी हे कामांचे गट बंदिस्त बनले. जन्मावर आधारित बनले. जातीतल्या जातीत लग्ने करून जात मजबूत केली गेली.
बंदीस्त वर्ग म्हणजे जात असं बाबासाहेब म्हणायचे. स्वातंत्र्यानंतर मात्र प्रत्येक जातीत नवे वर्ग तयार झाले आणि निवडणूक तंत्रात संख्येला महत्व आल्याने जातीच्या मतब्यांका महत्वाच्या ठरल्या. महाराष्ट्रात राजकीय सत्तेच्या नाड्या ज्यांच्या हातात गेली ५५ वर्षे एकवटलेल्या आहेत त्या स्वत:ला नैसर्गिक सत्ताधिश समजणार्या जाणत्या नेत्यांनी तोंडाने अहोरात्र फुले-शाहू-आंबेडकर यांचे जप करायचे, नावे घ्यायची पण त्याचवेळी आपापल्या जातीसंघटना पोसायच्या, सगळ्याच जातपंचायती जपायच्या, सर्वच जातीच्या नेत्यांना रसद पुरवायची आणि दुसर्यांच्या [ दलित ओबीसी भटक्यांच्या ] खांद्यांवर बंदूक ठेऊन तिसर्याला त्यांचा शत्रू घोषित करून ठोकायचा, त्यात राज्यकर्त्यांचे स्वत:चे अपयश चतुराईने दडवायचे, स्वत: धनदांडगे व्हायचे, पैशाच्या जोरावर आश्रित पाळायचे, पोसायचे, त्यांना आपसात भिडवायचे असा उत्तम कार्यक्रम मुत्सद्दीपणे राबवला.
स्त्रीपुरूष समता, सर्वांना शिक्षण, संसाधनांचे फेरवाटप, आंतरजातीय विवाह आणि धर्मचिकित्सा हा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीचा मूळ अजेंडा होता. फुल्यांचा विरोध प्रस्थापित नेतृत्वाला होता. त्यावेळी धर्मसत्ता, प्रशासन, ज्ञानसत्ता, सांस्कृतिक सत्ता, सगळीकडेच प्रामुख्याने ब्रिटीशांच्या छत्राखाली ब्राह्मण पुरूषांचा वावर होता. त्यामुळे फुल्यांची ब्राह्मणवादावरची टिका ब्राह्मणांवरची टिका असल्याचे भासवून सत्यशोधक चळवळीचे अलगद अपहरण करून तिचे रूपांतर "ब्राह्मणेतर" चळवळीत करण्यात आले. ती सत्ताशोधक चळवळ बनवली गेली. सत्यशोधक चळवळीत सगळेच होते. ब्राह्मणही होते नी ब्राह्मणेतरही होते. सत्यशोधन हा मुख्य कार्यक्रम होता. "ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी " हा फुल्यांचा नारा होता. ब्राह्मणेतर चळवळीने आपला एकमेव शत्रू ब्राह्मणांना ठरवले.या चळवळीत असण्यासाठी सत्यशोधक असण्याची गरज नव्हती. त्यामुळे त्यात सत्यशोधक होतेच असे नाही. या चळवळीने वि.रा.शिंदे, सयाजीराव गायकवाड, राजारामशास्त्री भागवत यांना खड्यासारखे वगळले. तोंडाने फुल्यांच्या जप करीत आचरणात मात्र एकजातीय सत्ता, दाखवायला तेव्हढे दुय्यमतिय्यम पदांवर बलुतेदार असे राजकारण केले गेले.
आज सगळ्याच जातींना आरक्षण हवेय.बहुधा मागासपणाचे डोहाळे लागलेत.
आम्ही चिकित्सा करू. पण चिकित्सेचा अर्थ दुसर्यांवर टिका करू असा घेतला गेला. " डीकास्ट " होणे ही जातीनिर्मुलनाची पुर्वशर्त असते. आपल्या जातीवर टिका करायला कोणालाच आवडत नाही. दुसर्यांच्या जातींच्या नावाने पावत्या फाडणे फारच सोपे असते.
बाबासाहेबांनी १९२७ च्या महाड सत्याग्रहाच्या वेळी "तुम्ही चळवळीत ब्राह्मण घेऊ नका" ही जेधे जवळकरांची मागणी धुडकाऊन लावली आणि "माझा विरोध ब्राह्मण्याला आहे. वृत्तीला आहे. ब्राह्मण व्यक्तींना नाही. ब्राह्मण्यवृत्ती सगळ्याच जातींमध्ये असते. ती ब्राह्मणेतरातही असते. त्यामुळे ब्राह्मण्य सोडलेले ब्राह्मण मला हवेत मात्र ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणॆतर मला नकोत" असे बाबासाहेबांनी सांगितले. त्याला आज ८८ वर्षे झालीत.
त्यांनी एका ब्राह्मण डाक्टर महिलेबरोबर विवाह केला त्याला आज ७० वर्षे झालीत.
फुल्यांनी ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला. त्याला अधिकार मिळावेत यासाठी मृत्यूपत्र केले. ते सरकारदरबारी नोंदवले. त्यावर मित्रवर्य भांडारकरांची साक्षीदार म्हणून सही घेतली. शुद्रातिशूद्रांना दासानुदास मानणार्या आर्यभट-ब्राह्मणांची सावली माझ्या शवावर पडू देऊ नका असे त्यात नमूद केले. पण यातले शुद्रातिशूद्रांना दासानुदास मानणार्या हे अर्थनिर्णायक शब्द वगळून सर्वच ब्राह्मणांची सावली नको असे सांगण्याची, भडक प्रचार करण्याची पद्धत पाडण्यात आली.
या असत्यकथनामागचे राजकारण आम्हाला कळणार की नाही हा खरा सवाल आहे. आम्ही आत्मटिका करणार की फक्त वितंडवाद घालणार? हेत्वारोप करणे फारच सोपे असते.
आम्हाला आजवर वापरूण घेणारेच आमचे मित्र आहेत आणि शिळ्या कढीला उत आणून ते आम्हाला जातीय गुंगीत ठेवीत आहेत हे आमच्यावरचे उपकार आहेत असे ज्यांना वाटते त्यांचे जाऊद्या.
बदलते राजकारण, जातकारण, अर्थकारण यांचा अर्थ आम्हाला समजावून सांगणार्या विचारवंतावर चिडायचे नी आत्मघात करून घ्यायचा की आत्मपरिक्षण करायचे निवड आपली आहे.
No comments:
Post a Comment