1. Immortal, Iran, Hadi Mohaghegh -
गेल्या वर्षात जगभरात तयार करण्यात आलेल्या बहुतेक सर्व दर्जेदार चित्रपटांमधून मानवी भावभावनांचे सखोल दर्शन पाहायला मिळाले.
’सुख जवापाडे, दु:ख पर्वताएव्हढे” असे संत तुकाराम सांगून गेलेत. जगणे म्हणजे अपार दु:खाचा प्रवास असतो असे सांगणारा Iran चा Hadi Mohaghegh यांचा Immortal हा चित्रपट अगदी थेट होता. चित्रपटाची सुरूवात होते ती, डोंगराची तीव्र चढण असलेला कठीण रस्ता आणि त्यावरून बंद पडलेली मोटर सायकल ढकलत चाललेला नायक इब्राहिम, यादृश्याने. त्याचे आजोबा अयाझ अपराधभावाने ग्रस्त आहेत. ते बस चालक आहेत. त्यांच्या हातून नातेवाईकांच्या लग्नाहून परतताना झालेल्या अपघातात कुटुंबातील सगळे लोक ठार झालेत. ही बोच इतकी जबरदस्त आहे की अयाझची जगण्याची इच्छाच मेलीय. सगळी कार्यप्रेरणा नष्ट झाल्याने तो पुन्हापुन्हा आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न करतोय. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी इब्राहिम झटतोय. दरम्यान अयाझला झालेला पायाचा आजार, त्याच्या अपार वेदना यांच्या खिळऊन टाकणार्या थेट चित्रणाने हा चित्रपट अंगावर येतो.
2. Enclave, Serbia, Gorana Radovanovica -
ताजा विषय. अप्रतिम मांडणी, नेत्रदिपक छायाचित्रण, गोळीबंद पटकथा, तगडा अभिनय आणि कलात्मक दिग्दर्शन यांचा श्रेष्ठ अविष्कार म्हणजे Enclave हा चित्रपट होय.
सर्बियामधील कोसोवातील मुस्लीम आणि ख्रिश्चन समुदायातील वैर सर्वदूर परिचित आहे. पहाडी मुलखात, सैन्याच्या निगराणीखाली राहणारे एक ख्रिश्चन कुटुंब असते.शेती करणारे वडील आणि मरनासन्न अवस्थेत असलेले आजोबा. त्यातला दहा वर्षाचा लहान मुलगा नेनाद हा शाळेत शिकतोय. मिलीट्रीच्या संरक्षणात त्यांच्या वाहनातून दररोज त्याला शाळेत यावेजावे लागते. वर्गात तो एकटाच शिकतोय. त्याच्या वर्गशिक्षिकेला अचानक गाव सोडावे लागते. आजोबांचा मृत्य़ू झालाय. त्यांच्या अंत्यविधीसाठी धर्मगुरूंना बोलवायला गेलेला नेनाद त्याचे काही मुस्लीम मित्र आणि विरोधक यांच्या कच्याटात सापडतो. त्यातून उद्भवलेल्या संकटात त्याचा जीव धोक्यात सापडतो. इकडे वडीलांना स्वसंरक्षणार्थ बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या आरोपावरून पोलीस पकडतात. नेनादची आत्या तिच्या मुलीसह तिच्या वडीलांना भेटायला आलीये. वडीलांचे प्रेत बघून ती अंत्यविधीसाठी जिवाच्या कराराने धडपडतेय. इकडे मुस्लीम मुलाने भितीपोटी घरच्यांना खोटे सांगितल्याने मुस्लीम समुदाय सूडाने पेटून ख्रिश्चन स्मशान उद्ध्वस्त करून टाकतो. त्या जाळपोळीत नेनादचा जीव आणखीन धोक्यात येतो. श्वास रोखून धरायला लावणारी कथा अनेक वळणे घेत पुढे सरकते. शेवटी नेनाद वाचतो की मरतो? त्याच्या आजोबांचा दफनविधी होतो की नाही? धार्मिक शत्रुत्व, नैसर्गिक मैत्री आणि कोवळी माणुसकी यांच्या संघर्शातून अखेर काय जिंकते? काळजाची पकड घेणारी महान कथा. मनाचा कोपरा कायमचा व्यापून टाकणारी एक श्रेष्ठ निर्मिती.
3. Absolution, Finland, Petri Kotwica -
मुळात सज्जन असलेली माणसे जेव्हा नैतिक पेचात सापडतात तेव्हा त्यांचे वर्तन कसे असते याची विलक्षण कहाणी म्हणजे हा जागतिक दर्जाचा श्रेष्ठ चित्रपट होय.
अस्सल कथा, नैसर्गिक अभिनय, महान सादरीकरण आणि नितांतसुंदर दिग्दर्शन यातून किती थोर कलाकृती जन्माला येते त्याचा वस्तुपाठ म्हणजे फिनलंडचा Petri Kotwica यांचा
Absolution हा चित्रपट होय.
किया ही 34 आठवड्यांची गरोदर महिला रात्रीच्या घनघोर अंधारात कार चालवताना तिला अचानक कळा सुरू होतात. तिला जीवघेणी कळ येते आणि तिच्या कारची धडक कशाला तरी बसते. ती तिच्या धर्मगुरू असलेल्या पतीला, लौरीला कोण जखमी झाले ते बघून यायला सांगते. त्याच्या पत्नीचा आधीच्या वेळी तीन वर्षांपुर्वी अकाली गर्भपात झालेला असल्याने पत्नीला अतितात्काळ दवाखान्यात नेण्यासाठी तो बहुधा तिच्याशी खोटे बोलतो. कोणी माणूस जखमी झालेला नसून ते बहुधा हरीण असावे असे तो तिला सांगतो. दवाखान्यात पोचल्यावर किया एका गोंडस बाळाला जन्म देते. दवाखान्यातून घरी येताना तिची हनाशी भेट होते. हनाचा नवरा अपघातात जखमी होऊन कोमात गेलेला असतो. कियाच्या लक्षात येते की बहुधा तिनेच धडक दिल्याने हनाचा नवरा जखमी झालेला असावा. ती हनाला परोपरीने मदत करायचा प्रयत्न करते. हना तिला देवदूत समजत असते. पोलीस तपासातून हनाच्या हे लक्षात येतेकी कियाच्या नवर्याने धडक दिल्यानेच तिचा नवरा आज मरणासन्न अवस्थेत आहे. खूप प्रयत्न करूनही तिचा नवरा वाचत नाही. पुढे थंड डोक्याने ती कट रचते आणि कियाच्या नवर्याचा लौरीचा सूड घेते का? कसा? किया मात्र अतिशय धीरोदात्तपणे या सार्या संकटाला कशी सामोरी जाते? अपार करूणा, अपराधभाव, सत्याची चाड, नैसर्गिक पेच आणि दुसरीकडे सूडबुद्धीची कठोर कृती यातून रंगणारे विलक्षण मनोहारी नाट्य यांचे दर्शन घडवणारा हा चित्रपट अतिशय श्रेष्ठ चित्रपट होय.
क्रमश:
...............