1. स्वत: सावित्रीबाई व महात्मा फुले यांना मूलबाळ झाले नव्हते. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला होता.त्याला त्यांनी डाक्टर केले.पण आपला वारसा त्याच्याकडे सोपवतानाही त्याला काही अटी घातल्या. त्यावरून स्पष्ट होते की फुले जैविक वारसा महत्वाचा मानत नव्हते तर वैचारिक वारसा महत्वाचा मानत होते. हे लोक डा.यशवंत जोतीराव फुले यांचेही वंशज/ वारस नाहीत. ते जोतीरावांच्या भाऊबंदापैकी असलेल्यांचे वंशज/ वारस आहेत. . जे भाऊबंध फुल्यांच्या हयातीत त्यांच्या विरोधात होते त्यांनाच फुल्यांचे वंशज म्हणुन पुढे आणण्याचा प्रयत्न करणे हे नैतिकदृष्ट्या उचित नाही.
2. महात्मा फुले यांचे मृत्यूपत्र त्यांनी सरकार दरबारी नोंदवले होते. ते मी स्वता: 25 वर्षांपुर्वी शोधून "महात्मा फुले :समग्र वाड्मयात" प्रसिद्ध केले आहे. { पाहा, पृ.635 ते 648 } त्यात फुल्यांनी त्यांचे थोरले बंधू राजाराम तसेच राजारामचा मुलगा गणपत हे आपले वारसदार नाहीत असे स्पष्ट केले आहे. आज याच घराण्यातील मंडळी फुल्यांचे वारसदार म्हणून मिरवित आहेत हे अनैतिहासिक होय.
3. आपला मयत भाऊ राजाराम व आपण स्वतंत्र होतो, तो आता वारलेला आहे पण त्याच्या मुलाचा गणपतचा आपल्या मालमत्तेवर हक्क किंवा दावा नाही. तसेच तो आपला वारस नाही असे फुले यात नोंदवतात. फुल्यांच्या निधनानंतर जेव्हा भाऊबंध आपण फुल्यांचे वारस असल्याचा दावा करू लागले तेव्हा तो सावित्रीबाईंनी अमान्य केला व स्वत: अंत्ययात्रेचे नेतृत्व केले. तेव्हा जे भाऊबंद कधीच फुल्यांसोबत नव्हते ते जर आपण फुल्यांचे वारस आहोत असा दावा करीत असतील तर ते हास्यास्पद आहे.
4. फुल्यांचे वैचारिक वारसदार डा. बाबासाहेब आंबेडकर, म.वि.रा.शिंदे, रा. शाहू, कर्मवीर भाऊराव आणि ना.म.लोखंडे, केशवराव विचारे हे होते. पुढच्या काळात हा वारसा गं.बा.सरदार,य.दि.फडके, गो.पु.देशपांडे, बाबा आढाव, भा.ल.भोळे, शरद जोशी, रावसाहेब कसबे, भालचंद्र नेमाडे आदींनी पुढे नेला.
जे कधीच फुल्यांच्या चळवळ व विचारांसोबत नव्हते ते फुल्यांच्या मृत्यूनंतर 125 वर्षांनी आज अचानक वारसा सांगायला पुढे सरसावले आहेत.
त्यांनी कोणत्या संघटनेत जावे हे त्यांचे स्वातंत्र्य आहे पण ते फुल्यांचे वारसदार म्हणुन प्रमाणपत्रांचे वाटप करू शकत नाहीत एव्हढेच.
No comments:
Post a Comment