Sunday, May 13, 2018

तुम्ही हे वंगाळवक्टं काम सोडा-





निळूभाऊ, तुम्ही हे वंगाळवक्टं काम सोडा- प्रा.हरी नरके

मित्रांच्या संगतीनं एकदा मोठा भाऊ पिऊन आला. आईनं रात्री त्याला शांतपणे झोपू दिलं. सकाळी उठल्यावर त्याला खडसावून विचारलं, त्यानं चूक झाल्याचं कबूल केलं. पुन्हा करणार नाही असं वचन दिलं. पण मुलावर चांगले संस्कार करण्यात आपण कमी पडलो म्हणून आईनं उपोषण सुरू केलं.
आई दररोज दिवसभर मोलमजुरीला जायची. लोकांची घरकामं करायची. तिला खुपच अशक्तपणा आला होता.
आम्ही सारे तिला विनवून थकलो.पण ती ठाम होती.

तिनं निर्धारानं दहा दिवस उपवास केला.
शेवटी मोठ्या मामानं येऊन तिला उपास सोडायला लावला.
पण ही अठवण म्हणून ती दरवर्षी दहा दिवस उपवास करायची.
आईच्या धाकानं आम्ही सगळे भाऊ मद्याच्या व्यसनापासून कायम चार हात दूरच राहिलो.

आई अतिशय तापट होती. पण अफाट कर्तृत्ववान. खुप काटक. कामाला वाघीणच. दररोज किमान 16 ते 18 तास राबायची.
वयाच्या 85 व्या वर्षीही ती कधी आराम करीत बसलीय असं झालं नाही.
सतत कसलं ना कसलं काम करणं यात ती स्वत:ला गुंतवून घ्यायची.

सुंदर गोधड्या शिवायची. कुरडया, पापड्या, पापड बनवायची. घरातली तर सगळीच कामं आवडीनं करायची.
तिचा एक जबरदस्त फंडा होता. ती म्हणायची माणसाला कधीही कष्टाची, कामाची लाज वाटता कामा नये. कोणतंही काम हलकं नसतं. लाज चोरी, शिंदळकी [ व्याभिचार] आणि आयतं खाण्याची वाटायला हवी. खोटं बोलण्याची लाज वाटायला हवी. कामाची कसली अलीय लाज?

त्यामुळं एक फायदा झाला, वयाच्या पाचव्या वर्षापासून सोळाव्या वर्षापर्यंत स्मशानात प्रेतं पुरण्याचं, स्मशानाच्या साफसफाईचं काम करावं लागलं तरी त्यात कमीपणा वाटला नाही.
दुसर्‍यांच्या शेतात मोलमजुरी करणं, बांधकामावर काम करणं, पेरू विकणं, रसवंती गृहावर किंवा हाटेलात राबणं याचीकधीही लाज वाटली नाही.

वडील मी खुप लहान असताना गेले. तेव्हा मी इतका लहान होतो की वडील गेले म्हणजे नेमकं काय झालं ते मला समजलंच नाही. पण आई रडली म्हणून मी रडलो.

निळूभाऊ [फुले] एकदा घरी आले होते. आई प्रचंड संतापली. या हलकट माणसाला कशाला घरी आणलं? असा तिचा करडा सवाल होता.
मी म्हटलं तू चहा कर. चहा घेऊन ते जातील. तर ती चहा पण करायला तयार नव्हती.
शेवटी तिनं चहा केला कसाबसा पण तो द्यायला ती बाहेर आली नाही.
पण भाऊ महावस्ताद.

ते म्हणाले, "आई, चहा एकदम फर्माश झालाय. बेस्ट. माझी आई करायची बघा असा चहा. तिचं पण नाव सोनाई होतं. परवा तुळशीराम भेटला होता.तुमची चौकशी करीत होता."
भाऊंनी थेट माझ्या सख्ख्या मामांचं नाव घेतल्यानं आई स्वयंपाक घरातून बाहेर आली.
त्यांना म्हणाली, "तुमची कशी वळख त्याच्याशी?"
मग भाऊ त्यांची मामांशी कशी आणि किती जवळची मैत्री आहे ते सांगू लागले.
आई बरीच निवळली.

मला हळूच म्हणाली, "तसा मानूस बरा दिसतोय."
मग भाऊंना म्हणाली, "तुमच्या इतक्या चांगल्या मानसांशी वळखीपाळखी असताना असलं वंगाळवक्टं काम करू ने मानसानं. सोडा तो चुकीचा धंदा."
भाऊ म्हणाले, "आई ते खोटं असतं. पोटापाण्यासाठी करावं लागतं."
आई ताडकन म्हणाली, " मी अडाणी बाय हाय. मला जास्तीचं काय कळत नाय. पण मी म्हन्ते एका सिनेमात खोटं असंल, दुसर्‍या सिनेमात खोटं असंल, पण सगळ्याच सिनेमात कसं काय खोटं असंल, सांगा बरं? दिसली बाई की लागला बाबा मागं, हे चांगलं नाय. माण्सानं इज्जत - अब्रूनं राहावं. नाय चांगलं काम मिळालं तर पोटात काटं भरावंत. पण असलं वंगाळवक्टं काम करू ने."
भाऊ जायला निघाले, तेव्हा ते गाडीत बसल्यावर ती त्यांच्याजवळ गेली आणि त्यांना कळकळीनं म्हणाली, "मी काय म्हन्ते, आमच्या हरीच्या मायंदाळ वळखीपाळखी हायती. तुम्ही हे काम सोडा. तो पवारसायबांना नाय तर टाटा सायबांना सांगून चांगलं काम देईल तुम्हाला. पण तुम्ही हे वंगाळवक्टं काम सोडाच."
पुढं भाऊ आईला शुटींग बघायला घेऊन गेले. तेव्हा कुठं आईची खात्री पटली.
मग तिचा निळूभाऊंबद्दलचा गैरसमज दूर झाला आणि ती भाऊंची फॅन झाली.
- प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment