Friday, June 1, 2018

1 जून- गुरूजींनी लावलेली जन्मतारीख -



माझ्या लहानपणी आम्ही ज्या गरीब वस्तीत राहात होतो, तिथं माझ्या आईची एक मानलेली बहीण होती.
ही शांतामावशी माझ्या आईला सतत सांगायची, "सोनाई, पोराला शाळेत घाल."

आमच्या घरात कष्टाची परंपरा होती, शिक्षणाची नव्हती. त्यामुळं आई टाळाटाळ करायची. कुठं शिकून पोराला ब्यालीस्टर व्हायचंय? शेतात राबायला कशाला पाह्यजे साळा? उलट सिकलेली पोरं कामचुकार  बनतात, असा तिचा सवाल होता. शिवाय मी त्याकाळात शेजारच्या स्मशानात साफसफाईचं काम करायचो. शाळेमुळे तो रोजगार बुडणार ही आईला भिती. महिन्याला बख्खळ 5 रूपये पगार मिळायचा मला.

एके दिवशी मात्र शांतामावशीच्या भुनभुनीला आई कंटाळली. माझ्या थोरल्या भावाला म्हणाली, "उद्या हरीला मुंढव्याच्या साळंत घेऊन जा. त्या शांताचा एक बाबासाह्यब म्हणुन नातेवाईक हाय, त्यानं तिचं न तिनं माझं डोस्कं खाल्ल्यंया. नुसतं साळा, साळा, आन साळा.
घाल एकदाच साळंत. बघू काय दिवं लावतोया ते!"

दुसर्‍या दिवशी डोक्याला ओंजळभर खोबरेल तेल चोळून, तेलाचे ओघळ दोन्ही गालावरून वाहात असलेली आमची वरात पुणे मनपा शाळा क्रमांक 53 वर धडकली.
भाऊ म्हणाला, "गुर्जी, याला साळंत घ्या."
गुरूजी म्हणाले, " तुम्ही फार उशीर केलात. आता वर्षं संपलं. पुढच्या वर्षी 1 जूनला या."

भाऊ म्हणाला, "शिकलेले हुकलेले असतात असं ऎकलं होतं. अहो, काल आमचा पाडवा झाला. नवं वर्सं सुरू झालं. आन तुम्ही म्हणताय वर्षं संपलं. असं उलटं अस्तय शिक्षाण."

शालेय वर्ष, मार्च-एप्रिल वार्षिक परीक्षा, पाडवा, 1 जून, शाळेचा पहिला दिवस असं कायकाय गुरूजी भाऊला सांगत राहिले.
भाऊ म्हणाला, "आमचं हातावरचं पोट हाये. आज खाडा झाला. दिवसाचा पगार बुडाला.

परत दोन महिन्यांनी 1 जुनला साळंत येण्यासाठी खाडा करणं परवडत नस्तंय. नाहीतरी शिकून काय ब्यालीस्टर होणारेय व्हयं पोरगा?"

गुरूजी समंजस होते. त्यांनी नाव, जन्मतारीख, पत्ता असं कायकाय भावाला विचारलं. भावाला माझी जन्मतारीख काय सांगता आली नाय.

"गोकूळ अस्टमीला जनमलाय. नाव क्रिस्ना ठेवायचं होतं. पण आमचे एक काका त्या नावचं असल्यानं ह्याचं नाव हरी ठेवलं बघा. पुण्याचं धरण फुटून 2 वर्सं झालती बघा."

गुरूजींनी हिशेब केला, पानशेत धरण फुटलं 1961 ला. त्यानंतरची 2 वर्ष म्हणजे 1963. गोकुळ अष्टमी असतीय जुलै-आगष्ट्ला. पण शाळा सुरू होते 1 जूनला. तर "ह्याची जन्मतारीख 1 जून 1963, काय?"
भाऊ म्हणाला, "चालतय. लिहा कायपण. काय फरक पडतोया?"
गुरूजींनी तसं एका कागदावर लिहिलं. त्यावर भावाचा अंगठा घेतला आणि एकदाची माझी उदारणार्थ प्रवेशप्रक्रिया वगैरे संपन्न झाली.

गुरूजी मला म्हणाले, "वस्तीतल्या मुलांसोबत 1 जून 1969 पासून शाळेला यायचं. गैरहजेरी चालणार नाय, काय?"

कांबळे गुरूजी वैराग बार्शीचे होते. आम्हाला चौथीला खुप छान शिकवायचे. फार भला माणूस. ते मला वाचायला चांदोबा आणि इतर पुस्तकं द्यायचे.
घरी नेऊन जेऊ घालायचे.

त्यांच्या घरात बाबासाहेबांचा फोटो होता.

ह्यांच्या सांगण्यामुळंच शांतामावशीनं आईला सांगून मला शाळेत घातलं.
तर मी गुरूजींकडून बाबासाहेबांचा एक फोटो मागून घेतला. त्याला लाकडी फ्रेम करून तो आमच्या झोपडीत लावला. वर्षं होतं 1972.

आई त्या फोटोपुढं दररोज संध्याकाळी दिवा लावायची. उदबत्त्या लावायची. सणवाराला त्याला हार घालायची.

"माह्या शांताचा नातेवाईक हाय. लई मोठ्ठा ब्यालीस्टर व्हता बाबा. ह्याच्यामुळंच आमच्या हरीला मी साळंत घातलं," असं आल्यागेल्याला कौतुकानं सांगायची.
आमचे काही नातेवाईक मात्र चिडले. हा फोटू आपल्या घरात कशाला? वाळीत टाकतील ना जातवाले.
त्या फोटोपायी मला त्यांचा मारही खावा लागला.

पण आई ठाम होती. "फोटू काढणार नाय."
" आमच्या वाईट काळात कोण नातेवाईक आल्ता मदतीला का जात आल्ती?
ह्या बाबासाह्यबामुळं माझं पोरगं शिकतया.  फोटो राहणार म्हणजे राहणारच.

ज्यांना हा फोटू आवडत नाय त्यांनी आमच्या झोपडीत येऊ नाय.

त्यांच्यावाचून आमचं कायपण अडलेलं नाय!"
आईनं नातेवाईकांना ठणकावलं.
-प्रा. हरी नरके

No comments:

Post a Comment