या भव्य ऎतिहासिक सोहळ्यातील भाषणात मी मांडलेल्या मुद्यांचा सारांश-
1] 11 मे 1888 ला मुंबईतल्या हजारो कष्टकर्यांनी जोतीराव फुले यांच्या सत्कारार्थ आयोजित केलेल्या सोहळ्याची मला आज आठवण होते. या सामान्य माणसांनी जोतीरावांना महात्मा ही पदवी दिली. डॉ. आ.ह. साळुंखे यांचे गेल्या 55 वर्षातले चौफेर आणि अफाट कार्य पाहता त्यांना आपण "सत्यशोधक महान पंडीत" हा सन्मान बहाल करायला हवा.
2. "धर्मशास्त्राचा इतिहास" हा महाग्रंथ लिहिल्याबद्दल पां.वा.काणे यांना "भारत रत्न" हा सर्वोच्च सन्मान बहाल करण्यात आला. डॉ. आ.ह. साळुंखे यांनी गेली 55 वर्षे अपार व्यासंग आणि संशोधनाद्वारे लिहिलेल्या 53 ग्रंथांमधून धर्मशास्त्र, संस्कृती, इतिहास यांच्या क्ष्रेत्रात फेरलेखन करून नवा अन्वयार्थ लावून ज्ञानाची नवनिर्मिती केलेली आहे. याबद्दल "भारत रत्न" हा सन्मान त्यांच्याकडे चालत यायला हवा होता.
3. निवडणुक काळात ज्यांना बहुजनांची आठवण येते त्यांचेच राज्यात 15 वर्षे आणि केंद्रात 10 वर्षे सरकार होते. त्यांनी हे का केले नाही?
4. एका सत्कार सोहळ्यात एक महानेते म्हणाले, साळुंखे सरांच्या पायावर डोके ठेवावेसे वाटते. आता डोके ठेवणारांनी आपली सत्ता असताना गेल्या 15 वर्षात डॉ. आ.ह. साळुंखे यांनी तयार केलेले राज्याचे सांस्कृतिक धोरण का लागू केले नाही?
5. एका जातीला टार्गेट करून राजकीय सत्ता मिळवता येत असेलही, पण सामाजिक परिवर्तन नाही करता येत. सगळ्याच जातीत चोर आहेत नी भली माणसंही आहेत.
6. साळुंखेसर फक्त बहुजनांचे नाहीत ते समग्र भारताचे आहेत. त्यांना छोटं करू नका.
7. ज्यांनी त्यांना कधीही कुलगुरू केले नाही, डी.लीट दिली नाही, त्यांची पुस्तकं विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमाला लावली नाहीत, त्यांचे प्रेम खरे आहे की निव्वळ राजकीय, ते तपासले पाहिजे.
8. डॉ. आ.ह. साळुंखे यांचे अनंत पैलू मला भावतात. प्रतिभावंत संशोधक, धर्मशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, शिस्तबद्ध प्रशासक, कुटुंबवत्सल, निसर्गप्रेमी, प्रवासात रमणारा आणि सामान्य माणसात खुलणारा, अतिशय हळवा, संवेदनशील, कोवळ्या मनाचा, आरपार विनयी, सहृदय भला माणूस.
सरांना 125 वर्षांचे उदंड आयुरारोग्य लाभो.
-प्रा.हरी नरके
No comments:
Post a Comment