डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी साहित्य हे आंबेडकरी चळवळीचा जीव की प्राण.
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे" यांचे २२ खंड प्रकाशित करणारी राज्य शासनाची ग्रंथ समिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपुर्ण कब्ज्यात गेलेली आहे.
या समितीचे सदस्य सचिव प्रा.अविनाश डोळस यांना त्यांच्या अकाली दु:खद निधनापुर्वी ११ दिवस आधीच समितीवरून हटवण्यात आलेले होते. स्मृतीशेष प्रा.अविनाश डोळस यांच्यासह प्रकाश आंबेडकर, प्रा. जनार्दन वाघमारे, प्रा. आ.ह.साळुंखे, बाबा आढाव, जनार्दन चांदूरकर, प्रा. जयसिंगराव पवार,प्रा. रमेश जाधव, प्रा. रावसाहेब कसबे, प्रा.दत्ता भगत, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, नितीन राऊत यांनाही समितीवरून कमी करण्यात आले.
डोळस यांच्या जागेवर सुधाकर बोकेफोडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
रा.स्व.संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते, रमेश पांडव, सुनिल भंडगे, वैजनाथ सुरनर, शामराव अत्रे, मिलिंद कांबळे, प्रविण रणसुरे, ईश्वर नंदापुरे, श्यामा घोणसे, संजय साळवे, पी.जी.जोगदंड यांची नवे आंबेडकरी तज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. साहित्यिक नामदेव कांबळे, शरणकुमार लिंबाळे व राजन गवस यांनाही या समितीवर नेमलेले आहे.
शिक्षण मंत्री विनोद तावडे हे समितीचे अध्यक्ष आहेत.
ही समिती ४० वर्षांपुर्वी स्थापन करण्यात आली असून या समितीवर स्मृतीशेष वसंत मून, प्रा.हरी नरके, प्रा.दत्ता भगत आदींनी संपादक तथा सदस्य सचिव म्हणून १९७८ ते २०१० या काळात काम केले होते.
२०१० ते ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत प्रा.डोळस समितीवर काम करीत होते. ११ नोव्हेंबर २०१८ ला त्यांचे अकाली निधन झाले.
रा.स्व.संघाच्या या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांची पुस्तके चाळलेली वा वाचलेली असणार असे मी गृहीत धरतो. यापुढे ते बाबासाहेबांचे साहित्य अधिक जोमाने व प्रामाणिकपणे प्रकाशित करतील अशी अपेक्षा आहे. या नव आंबेडकरी तज्ज्ञांना हार्दीक शुभेच्छा.
प्रा.हरी नरके, १९ डिसेंबर २०१८
No comments:
Post a Comment