हे आहे भाजप नेत्या पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना लिहिलेले पत्र. २०११ सालच्या सामाजिक-आर्थिक-जात गणनेची माहिती त्यांनी ओबीसींचे २७ टक्के राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी मागितली होती याचा लेखी पुरावा. ही गणना करण्याच्या कामात दिवंगत गोपीनाथ मुंडेसाहेब यांनी छगन भुजबळांना खंबीर साथ दिली होती. त्यांच्या कन्या सध्या काय बोलताहेत? केंद्र सरकारकडे डेटा मागू नका. मग तुम्ही का मागितला होता ताई? बाबासाहेब आंबेडकर ओबीसींना न्याय देण्यासाठी अग्रभागी होते. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी रामदास आठवल्यांनी सहकार्य केले नाही. गेल्या दीड वर्षात आठवलेसाहेब या विषयावर चकार शब्द बोलत नाहीयेत. आठवलेसाहेब, असे घुमजाव का? फक्त सत्तेसाठी?
Tuesday, June 29, 2021
पंकजाताई गोपिनाथ मुंडे व रामदास आठवले यांचा नाकर्तेपणा-
Author of 54 Books, Professor, Researcher and Editor of Dr Babasaheb Ambedkar & Mahatma Phule's Books.
54 पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक
प्राध्यापक आणि विभागप्रमुख - महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे [निवृत्त]
Saturday, June 26, 2021
माझी ११ वर्षांपुर्वीची पोस्ट- Sat June 25, 2011: शाहुजयंतीचे जनक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर-
माणगाव, जि.कोल्हापुर येथील परिषदेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "मुकनायक"चा राजर्षी शाहु महाराज विशेषांक काढायचे ठरवुन महाराजांना पत्र लिहिले. हेच पत्र हा अभ्यासकांसाठी पुरावा म्हणुन पुढे महत्वाचा दस्तावेज ठरले.माणगाव परिषदेत बाबासाहेबांनी शाहुराजांचा वाढदिवस सनउत्सव म्हणुन साजरा करण्याचा ठराव केला होता. शिवजयंती सुरु करणारे महात्मा फुले आणि शाहुजयंती सुरु करणारे बाबासाहेब ही वैचारिक विण समजुन घेतली पाहीजे.
कोल्हापुर सोडुन अन्यत्र शाहुजयंती होत नसे. मी स्वत: राज्यात सर्वत्र शाहुजयंती करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांना समक्श भेटुन ११ वर्षांपुर्वी दिले.त्यांनी त्याचा जी. आर. काढावा यासाठी मी पाठपुरावा केला. मला त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील तत्कालीन ज्येष्ट सनदी अधिकारी श्री. भुषण गगराणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तेव्हा शाहुमराजांची जन्मतारिख २६ जुलै मानली जात असे.त्याप्रमाणे पहिला जी. आर. निघाला. शाहुजयंती शासनातर्फ़े सुरु झाली.
आम्हाला खुप आनंद झाला.
श्री. सुशिलकुमार शिंदे मुख्यमंत्री व श्री. छगन भुजबळ उपमुख्यमंत्री असताना मी मागणी करुन शासनाला हा दिवस "सामाजिक न्यायदिवस" म्हणुन घोषित करायला लावला. त्याकामी ज्येष्ट आय.ए.एस.अधिकारी श्री. संजय चहांदे जे तेव्हा मुख्यमंत्री सचिवालयाचे सचिव होते, त्यांची फ़ार मदत झाली.
पुढे डॉ. बाबासाहेबांचे हे पत्र वाचताना लक्षात आले की, बाबासाहेबांनी शाहुमहाराजांची जन्मतारिख २६ जुन नोंदवली आहे. डॉ. बाबासाहेब लिहिताना फार काटेकोर असत. महाराजांचे अधिक्रुत चरित्रकार लठ्ठे, कीर,जाधव,पवार आदी सर्वांनी नोंदवलेली २६ जुलै ही जन्मतारिख चक्क चुकली होती. एकटे डॉ. बाबासाहेब तेव्हढे बरोबर होते, हे संशोधनातुन सिद्ध झाले. माझे मित्र श्री. खान्डेकर यांनी त्यासाठी अपार परिश्रम घेतले. आम्ही त्यांचा त्यासाठी कोल्हापुरात भव्य सत्कार केला होता. माझ्याच हस्ते हा कार्यक्रम पार पडला होता.
पुन्हा शासनदरबारी हेलपाटे मारुन आम्ही जी. आर. बदलुन घेतला व शाहुराजांची जयंती २६ जुनला करु लागलो.
या सर्व कामात कोल्हापुरचे श्री. बाबुराव धारवाडे यांचा उल्लेख केला पाहीजे.तसेच आमचे मित्र भिकशेट पाटील, डॉ. रमेश जाधव, डॉ. जयसिंगराव पवार, खराडे, डॉ. कणबरकर यांचा व सध्याचे श्री. शाहुमहराज यांचाही ऋणनिर्देश केला पाहिजे
Posted by Prof. Hari Narke प्रा. हरी नरके at Saturday, June 25, 2011
https://harinarke.blogspot.com/search/label/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%20%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82
Author of 54 Books, Professor, Researcher and Editor of Dr Babasaheb Ambedkar & Mahatma Phule's Books.
54 पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक
प्राध्यापक आणि विभागप्रमुख - महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे [निवृत्त]
Thursday, June 17, 2021
ओबीसींचे अतिरिक्त नव्हे तर सगळेच राजकीय आरक्षण गेलेय- प्रा. हरी नरके
विकास किसन गवळी वि. महाराष्ट्र सरकार या निकालपत्राचा माध्यमांनी लावलेला अर्थ चुकीचा आहे. यामागे त्यांचे अज्ञान आहे की कटकारस्थान याचा शोध घ्यावा लागेल.
१] हा निकाल फक्त ५ जिल्हा परिषदांनाच लागु आहे काय?
उ- नाही हा निकाल महाराष्ट्रातील सर्व म्हणजे ३६ जिल्हे, [३४ जिल्हा परिषदा] २७ महानगर पालिका, ३६४ नगर परिषदा,नगर पंचायती, नगर पालिका, तालुका पंचायती व २८ हजार ग्रामपंचायतींना लागू आहे. गेले २५ वर्षे मिळणारे महाराष्ट्रातील सर्व राजकीय आरक्षण या निकालाने संपलेले आहे. यापुढे एकाही व्यक्तीला ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळणार नाहीये. या निकालाचा फटका सर्वच्या सर्व म्हणजे सुमारे ५६ हजार ओबीसी प्रतिनिधींना बसणार आहे.
२] हा निकाल संपुर्ण देशाला लागू आहे काय?
उ- होय. या निकालामुळे संपुर्ण देशातील,सर्व ओबीसींचे राजकीय आरक्षण संपलेले आहे. देशातील सुमारे ८ ते ९ लाख ओबीसी लोकप्रतिनिधींचे राजकीय आरक्षण या निकालामुळे संपलेले आहे.
३] सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे राजकीय आरक्षण १०० टक्के कायमचे बंद केले आहे काय?
उ- नाही. या निकालाने ओबीसींना दिलेले [ ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीद्वारे आलेले ] राजकीय आरक्षण घटनात्मकदृष्ट्या वैध ठरवलेले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे राजकीय आरक्षण १०० टक्के, कायमचे बंद केलेले नाही. तर त्याची अंलबजावणी ३ अटींची पुर्तता होईपर्यंत संपुर्ण थांबवलेली आहे. ह्या अटी म्हणजे, ओबीसींची लोकसंख्या, त्यांचे मागासलेपण व त्यांचे प्रतिनिधित्व यांचा इंपिरिकल डेटा जमा केल्याशिवाय हे आरक्षण पुन्हा सुरु करता येणार नाही. कोणत्याही परिस्थितीत अनु. जाती,जमाती व ओबीसी [विमुक्त भटके व विमाप्र यांच्यासह] यांचे राजकीय आरक्षण ५० टक्क्यांच्यावर जाता कामा नये असे सर्वोच्च न्यायालय म्हणते. याचा अर्थ फक्त ५० टक्क्यांवरचे आरक्षण गेले असे प्रिंट मिडीया व सर्व चॅनेलवाले सांगत आहेत. जे की चुकीचे, दिशाभूल करणारे व ओबीसींच्या अज्ञानावर, दु:खावर मिठ चोळणारे आहे. ५० टक्क्याच्या वरचे आरक्षण तर कायमचेच गेलेले आहे, ते आता कधीही मिळणार नाहीये. परंतु त्याच्या आतलेसुद्धा ओबीसी आरक्षण तीन अटींची पुर्तता करीपर्यंत गेलेले आहे.
४] या तीन अटींची पुर्तता कशी व कधी होणार?
उ- केंद्र सरकारने [ मनमोहन सिंग सरकारने] २०११ सालच्या २ ऑक्टोबर पासून नेहमीपेक्षा वेगळी एक जनगणना केलेली आहे. तिचे नाव " सामाजिक-आर्थिक व जाती जणगणना २०११" असे आहे. ती रजिस्ट्रार जनरल यांच्यामार्फत केलेली नाही. त्यामुळे दर दहा वर्षांनी होणारी जनगणना व ही जणगणना यात गल्लत करू नये. या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याची आकडेवारी मोदी सरकारकडे गेली सात वर्षे पडून आहे. त्यांनी ती फक्त रोहिणी आयोगाला दिली होती. त्याच्या आधारे ओबीसीचे चार तुकडे करण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. हा ओबीसींमध्ये फूट पाडण्याचा कटच आहे,.
मोदी सरकारने ही माहिती महाराष्ट्र सरकारला दिली तर ओबीसीचे राजकीय आरक्षण ताबडतोब परत सुरु करता येईल. आता ओबीसींचे भवितव्य सुरक्षित करणे वा संपवणे हे मोदी सरकारच्या हाती आहे.
-प्रा. हरी नरके, १७/६/२०२१
Author of 54 Books, Professor, Researcher and Editor of Dr Babasaheb Ambedkar & Mahatma Phule's Books.
54 पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक
प्राध्यापक आणि विभागप्रमुख - महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे [निवृत्त]
Monday, May 31, 2021
ओबीसी व विजाभजच्या राजकीय आरक्षणावर कुर्हाड- प्रा. हरी नरके
प्रश्न १- ओबीसींना हे आरक्षण कुणी दिले होते ? कधी? हे आरक्षण फकत ओबीसींना होते काय?
उत्तर- ओबीसींचे पंचायत राज्यातील २७ टक्के राजकीय आरक्षण मंडल आयोगाची व घटना दुरुस्ती ७३ व ७४ यांची अंमलबजावणी करण्यासाठी १९९४ साली आले. श्री छगन भुजबळ व ओबीसी चळवळीच्या मागणीवरून हे आरक्षण श्री शरद पवार यांनी दिले होते. हे २७ टक्के आरक्शण राज्यातील सर्व भटके विमुक्त,[अ,ब,क,ड] व विशेष मागास प्रवर्ग आणि ओबीसी यांना एकत्रित मिळून होते. शिक्षण आणि शासकीय नोकर्या यात भटके विमुक्त, [अ,ब,क,ड] यांना ११ टक्के, विमाप्र यांना २ टक्के व ओबीसी यांना १९ टक्के असे स्वतंत्र आरक्षण असले तरी राजकीय आरक्शण मात्र या तिघांनाही एकत्रित असे दिलेले आहे व ते ३२ टक्के नसून २७ टक्केच आहे. त्यामुळे निवडणुकीत विजाभज, विमाप्र व ओबीसी यांना एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागते. त्यांना वेगळे वेगळे आरक्शण मिळत नाही. त्याच्यावर कुर्हाड तीन महिन्यांपुर्वी ४ मार्चला [२०२१] बसली असली तरी तमाम लाभार्भी व समाज, जाती, वर्ग सारेच गप्प आहेत. गाढ झोपेत आहेत बिचारे. डोक्यावरचे छप्पर गेले तरी निद्रेत असलेले हे सगळे समाज राजकीय दृष्ट्या किती मागासलेले आहेत ते दिसतेच आहे.
प्रश्न २- हे आरक्षण कुठेकु्ठे होते? आहे?
उ- राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंयती, ३६४ पंचायत समित्या, नगर परिषदा, नगर पालिका, ३४ जिल्हा परिषदा व २७ मनपा यात हे आरक्षण होते.यात सर्व मिळून सुमारे २ लाख ५० हजार जागा आहेत. त्यातल्या २७ टक्के म्हणजे सुमारे ५६ हजार जागा ओबीसीला मिळतात.
प्रश्न ३- आजवर याचा लाभ किती ओबीसींना झाला?
उ- सुमारे ३ लाख ओबीसी स्त्रीपुरूषांना याचा लाभ झाला.
प्रश्न ४- हे आरक्षण कमी का गेले?
उ- विकास किसन गवळी यांनी सर्वोच्च न्यायलयात जाऊन या आरक्षणाला आव्हान दिले. ते सुप्रिम कोर्टाने मान्य केले आणि ह्या आरक्षणाची अंमलबजावणी थांबवली.
प्रश्न ५- गेले तर गेले, काय फरक पडतो? या आरक्षणाची मुळात गरजच काय?
उ- मुळात देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली तरी देशाच्या राजसत्तेत तमाम भटके विमुक्त, [ अ, ब, क, ड] व विशेष मागास प्रवर्ग आणि ओबीसी यांना ४ टक्के सुद्धा प्रतिनिधित्व मिळालेले नाही. आपला भारतीय समाज जातीपातींनी बनलेला आहे. आपली सामाजिक जाणीव ही मुलत: जातजाणीव आहे. त्यामुळे जो तो समाज स्वत:पुरते बघतो. ज्यांच्या हाती राजसत्ता त्यांच्या हाती देशाच्या तिजोरीच्या चाव्या. त्यामुळे त्यांचाच विकास. रोजगार, आरोग्य, शिक्शण आणि प्रशासन यात तेच. माध्यमात तेच. परिणामी जे राजसत्तेत गैरहजर त्यांचा आवाज उमटतच नाही. इंग्रजी राजवट आपण का घालवली? तर ती परकी होती. गोरे गेले पण आले ते काळे कोण होते? आहेत? मूठभर त्र्यवर्णिक सत्तेत आले. आरक्षणामुळे थोडी जागृती अनुसुचित जाती, जमातींची झाली. पण त्यांनाही त्यांचा हक्काचा वाटा मिळालेला नाहीच. मंडल आयोगामुळे व ७३/७४ व्या घटना दुरुस्तीमुळे भटके विमुक्त, [अ, ब, क, ड] व विशेष मागास प्रवर्ग आणि ओबीसी यांना आत्ता कुठे मिळू लागले नाहीतर ते काढूनही घेतले गेले.
या आरक्षणाचा फायदा असा झाला की तमाम भटके विमुक्त, [अ, ब, क, ड] व विशेष मागास प्रवर्ग आणि ओबीसी यांचे राजकीय प्रशिक्शण होऊ लागले. राजसत्ता काय असते ते यांना कळू लागले. त्यांच्यात राजकीय महत्वाकांक्षा जाग्या होऊ लागल्या. ते चक्क विधान सभा व लोकसभेला उमेदवारी [ तिकीटं] मागू लागले. त्यामुळे मालक लोकांची राजसत्तेवरची व गावगाड्यावरची पकड ढिली होऊ लागली.
अनु.जाती,जमाती, अल्पसंख्याक व हे घटक मिळून पंचायत राज्यात राजकारणाची नवी समिकरणं बनु लागली. हे काळ्या इंग्रजांना कसे खपावे?
हे आरक्षण गेल्याने यापुढे विजाभज, विमाप्र, ओबीसी यांचे राजकीय प्रशिक्षण, जागृती आणि प्रतिनिधित्व जाणार. पुन्हा एकदा सगळी राजसत्ता मालक लोकांच्या हातात एकवटणार. अनु. जाती, जमातीही पुन्हा मागे फेकल्या जाणार. थोडक्यात या घटकांचा राजकीय अंत होणार.
प्रश्न ६ - याचिकाकर्ते स्वत: कथित ओबीसी असताना त्यांनी असा पायावर दगड का पाडून घेतला असेल बरे?
उ- लहान मुलांना सुद्धा आपला स्वार्थ, { फायदा} कळतो. पण मानसिक गुलाम असलेल्या ओबीसींना त्यांच्या स्वत:च्या हाताने मालक लोक घर जाळायला लावतात आणि हे दीडशहाणे अविचार करून बसतात. जे आत्मनाशाला, आत्महत्त्येला उत्सुक असतात त्यांना त्यांचे मालक ऑपरेट करीत असतात. ओबीसी हा स्वत:च्या धडावर परक्याचे डोके आणि तेही मेंदूविहीन वागवत असतात, असा आजवरचा इतिहास आहे, अनुभव आहे. याचिकाकर्ते आपण ओबीसी असल्याचे सांगत असले तरी ते उच्चवर्णीय असल्याचे त्यांना ओळखणारे सांगतात. त्यांचे वडील आमदार होते.
प्रश्न ७- सुप्रिम कोर्टाचा निकाल विरोधात का गेला?
उ - स्वत:ला निवडणुक प्रचारापुरते ओबीसी म्हणवणार्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी २०१० ते २०१४ याकाळात मनमोहन सिंग सरकारने केलेल्या शैक्शणिक, आर्थिक, सामाजिक जनगणनेचे आकडे गेले सात वर्षे रेशीमबागेच्या आदेशावरून दाबून ठेवलेत नी २०१४ ते २०१९ याकाळात मुख्यमंत्री असलेल्या फडणविसांनी ओबीसी, भटकेविमुक्त, विमाप्र यांची जनगणना केली नाही म्हणून हा निकाल विरोधात गेला. हे पाप मोदी-फडणविसांचे आहे. ही वाटचाल आरक्षणमुक्त, विषमतावादी हिंदुराष्ट्राकडे सुरु आहे.
प्रश्न ८- आता पुढे काय?
उ- मविआ सरकारने ताबडतोब ओबीसी आयोग नेमुन ओबीसी, विजाभज, विमाप्र यांची जणगणना करावी व यांचे २७ टक्के राजकीय आरक्षण पुन्हा द्यावे.
प्रश्न ९- सुप्रिम कोर्टाने कोणत्या तीन अटी घातलेल्या आहेत?
12. Be that as it may, it is indisputable that the triple test/conditions required to be complied by the State before reserving seats in the local bodies for OBCs has not been done so far. To wit, (1) to set up a dedicated Commission to conduct contemporaneous rigorous empirical inquiry into the nature and implications of the backwardness qua local bodies, within the State; (2) to specify the proportion of reservation required to be provisioned local body wise in light of recommendations of the Commission, so as not to fall foul of overbreadth; and (3) in any case such reservation shall not exceed aggregate of 50 per cent of the total seats reserved in favour of SCs/STs/OBCs taken together. In a given local body, the space for providing such reservation in favour of OBCs may be available at the time of issuing election programme (notifications). However, that could be notified only upon fulfilling the aforementioned preconditions. Admittedly, the first step of establishing dedicated Commission to undertake rigorous empirical inquiry itself remains a mirage. To put it differently, it will not be open to respondents to justify the reservation for OBCs without fulfilling the triple test, referred to above.
१. राज्याने ओबीसी आयोग नेमून ओबीसींची जणगणना करावी.त्यांची लोकसंख्या, मागसपण आणि राजकीय प्रतिनिधित्व शोधावे.
२. आयोगाने शिफारस केलेले प्रतिनिधित्व जास्त असल्यामुळे संविधानाने [सर्वोच्च न्यायालयाने] आखून दिलेली मर्यादा ओलांडली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
आणि
३.कोणत्याही परिस्थितीत अनु. जाती, जमाती व हे समाज घटक [ओबीसी, भटकेविमुक्त व विमाप्र] यांना सर्वांना मिळून दिलेले एकत्रित आरक्षण ५० टक्क्यांच्या वर जाता कामा नये.
प्रश्न १०- हा निकाल तर ठाकरे-पवार सरकारच्या काळात आला मग याला फडणविस जबाबदार कसे?
उ- हा निकाल जरी तीन महिन्यांपुर्वी आला व त्यावरची पुनर्विचार याचिका जरी दोन दिवसापुर्वी फ़ेटाळली गेली तरी हा निकाल ज्या कृष्णमुर्ती निकालावर आधारित आहे तो निकाल फडणविसांच्या काळातला आहे. फडणविसांना हे माहित होते की ओबीसी, विजाभज, विमाप्र यांची जनगणना केल्याशिवाय हे आरक्षण टिकनार नाही, तरिही त्यांनी जनगणना केली नाही. कारण त्यांचा रिमोट ज्यांच्या हाती होता तेच सामाजिक न्यायाच्या विरोधी, विषमतावादी, जातीयवादी, उच्च जातीवर्णवादी आहेत. चोराच्या उलट्या बोंबा म्हणून ओबीसींचा पुळका दाखवत असले तरी हे लोक आरक्शणविरोधी आहेत.
- प्रा. हरी नरके,
३१ मे २०२१
Author of 54 Books, Professor, Researcher and Editor of Dr Babasaheb Ambedkar & Mahatma Phule's Books.
54 पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक
प्राध्यापक आणि विभागप्रमुख - महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे [निवृत्त]
Thursday, May 13, 2021
Expert committee for production of film on Mahatma Phule-
Maharashtra govt sets up expert committee for production of film on social reformer Mahatma Phule- By Sanjay Jog
Author of 54 Books, Professor, Researcher and Editor of Dr Babasaheb Ambedkar & Mahatma Phule's Books.
54 पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक
प्राध्यापक आणि विभागप्रमुख - महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे [निवृत्त]
Tuesday, May 4, 2021
करोनाचा कहर आणि केंद्र सरकारची निष्क्रियता- प्रा.हरी नरके
काय दिवस आलेत. करोनाने कहर केलाय. देशभरातली बाधितांची संख्या २ कोटीच्या पुढे गेलीय आणि करोनानं ज्यांचे जीव घेतले त्यांची संख्या २ लाखाच्या पुढे गेलीय. एका वर्षात २ लाख घरांवर दु:खाचे कडे कोसळले. ह्या आपदेला जबाबदार कोण? सदोष मनुष्य वधाचे गुन्हेच दाखल करायचे असतील तर कोणावर करावेत? कुठेय मोदी सरकारचे आपत्ती व्यवस्थापन?
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गेले सव्वा वर्षे उलटले तरी याबाबतीतली सगळी सुत्रं स्वत:च्या हातात ठेवलीयत. पीपीई किट, रेमिडिसिविर औषद, लस, प्राणवायू [ ऑक्सिजन ] सारं काही मोदीच ठरवणार. मग राज्यं सरकारं घटनेत आहेत ती काय फक्त यांच्यापुढे माना तुकवायला? लस राज्यांनी द्यायची, प्रमाणपत्रांवर फोटो मात्र यांचा झळकणार. केंद्रीय आरोग्य मंत्री नावाचं बुजगावणं तर कुठं गायब झालंय कोण जाणे! मंत्रीमंडळातले बहुतेक सारे पोपट फक्त वचावचा बोलभांडपणा करतात किंवा मौनात जातात. हे मंत्रीमंडळ आहे की भाटांचा जमावडा?
हे सरकार कुणालाच बांधील नाही?
लाखो स्थलांतरित मजूर हकनाक मेले ते या सरकारच्या नाकर्तेपणामुळे. कोट्यावधींच्या तोंडचा घास आणि जिवलग हिरावले गेले ते या कसलेही धोरणच नसलेल्या लकवा मारलेल्या मोदी सरकारमुळे! कोण कुठला तो उठवळ ट्रंप त्याला भारतात बोलवून त्याचा उदौदो करण्यातून लक्षावधींना बाधा झाली. कुंभमेळ्याच्या अचरटपणापाई आणि सत्तेच्या हव्यासासाठी लादलेल्या ५ राज्यातील निवडणुकांमधून लक्षावधींना लागण झाली. लसीच्या आणि रेमिडिसिविर औषद तसेच प्राणवायू [ ऑक्सिजन ]च्या तुटवड्यापाई दररोज हजारो मरताहेत.
इतकं असंवेदनशील आणि निश्क्रीय सरकार गेल्या ७५ वर्षात देशानं पाहिलं नव्हतं. हे निकम्मं सरकार कोर्टांनी झाडल्यावरही आता तरी काही उपाययोजना करणार आहे की जनतेला असंच हकनाक मरू देणार आहे?
- प्रा. हरी नरके
Author of 54 Books, Professor, Researcher and Editor of Dr Babasaheb Ambedkar & Mahatma Phule's Books.
54 पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक
प्राध्यापक आणि विभागप्रमुख - महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे [निवृत्त]
Wednesday, April 14, 2021
भारतभाग्यविधाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर : प्रा. हरी नरके
डॉ. बाबासाहेबांच्या राजकीय योगदानाची चर्चा करताना ती दोन पातळ्यांवर करावी लागते. एका पातळीवर त्यांनी अस्पृश्यांच्या हक्कांसाठी केलेले राजकारण आणि दुसर्या पातळीवर सर्वच भारतीयांसाठी आणि अंतिमत: मनुष्यजातीच्या मुक्तीसाठी केलेले योगदान समजावून घ्यावे लागते. बाबासाहेबांचे महिला, इतर मागासवर्गिय, कामगार, शेतकरी आदींच्या मुक्तीचे राजकारण तुलनेने दुर्लक्षित राहते. ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यांनी भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अस्पृश्यतेचा प्रश्न राजकीय पातळीवर नेला आणि त्यांच्यासाठी राजकीय हक्कांची मागणी केली. संविधानात ते मिळवूनही दिले. सामाजिक न्यायासाठी प्रतिनिधित्व मिळावे यासाठी शिक्षण, सरकारी नोकर्या आणि पंचायत राज्य ते संसद येथे राजकीय आरक्षण मिळवून दिले. त्यामुळे दलितांचे मुक्तीदाता हा त्यांचा पैलू अनेकदा प्रखरपणे मांडला जातो, ठळकपणे पुढे येतो. आंबेडकरवादी जनसमुह लक्षावधींच्या संख्येने त्यांच्या अभिवादनाला पुढे येतो, मात्र मध्यमवर्गीय, पांढरपेशे, बुद्धीजिवी आणि इतर मागास जातींचे लोक बाबासाहेबांना नाकं मुरडत दूर राहतात.
डॉ. बाबासाहेबांना नियतीने त्यांच्यावर सोपविलेल्या व्यापक जबाबदारीची जाणीव होती. खोतीविरोधी शेतकरी परिषदेत ते म्हणाले होते, "माझा जन्म सर्व साधारण जनतेची जबाबदारी घेण्यासाठीच असावा. मीदेखील मजूरवर्गापैकी एक असून इम्प्रूमेंट ट्रस्टच्या चाळीत राहतो. इतर बॅरिस्टरांप्रमाणे मलादेखील बंगल्यात रहाता आले असते, पण माझ्या शेतकरी व अस्पृश्य बंधूंकरता चाळीत राहूनच काम केले पाहिजे. याबद्दल मला केव्हाही वाईट वाटत नाही."
त्यांनी आपला पहिला राजकिय पक्ष, " स्वतंत्र मजूर पक्ष" स्थापन केला तेव्हा तो सर्वांसाठी खुला होता. त्याला त्यांनी "दलित पक्ष" असे नाव दिले नाही. मूकनायक आणि बहिष्कृत भारतचा वाचकवर्ग मर्यादित असल्यामुळेच पुढे त्यांनी "जनता" हे नविन वर्तमानपत्र काढले. ते सर्वांसाठी असावे म्हणून संपादकपदी दलितेतराची नियुक्ती केली. आयुष्याच्या शेवटी त्यांना सगळ्यांसाठी असलेल्या आर.पी.आय.ची स्थापना करायची होती. त्यांना त्यातून दलित, आदिवासी, ओबीसी, महिला यांच्या एकजुटीवर आधारलेले भारतीय राजकारण करायचे होते. ते म्हणतात, "मला जातीचे बहुमत नकोय, मला विचारांचे बहुमत हवेय."
२७ जानेवारी १९१९ रोजी साऊथबरो आयोगासमोर आपली साक्ष नोंदवताना डॉ. बाबासाहेबांनी सर्वच भारतीयांसाठी प्रौढ मत अधिकाराची मागणी केली. सर्व भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी सर्वप्रथम करणारे बाबासाहेब होते हे लोकांना माहित नसते. सायमन आयोग आणि गोलमेज परिषदेत त्यांनी ही मागणी लावून धरली. भारतीय संविधानात मताधिकारासाठी शिक्षणाची अट घालावी असा काही सदस्यांचा आग्रह होता. डॉ. बाबासाहेबांनी त्याला ठामपणे विरोध केला. शाळेच्या जगातील साक्षरता महत्वाची असली तरी जगाच्या शाळेतले सामान्य लोकांचे " सामुहिक शहाणपण" आणि भारतीय राजकीय साक्षरता लक्षात घेता सर्वांना मताधिकार दिला जाण्याची गरज त्यांनी लावून धरली. महत्वाचे म्हणजे महात्मा गांधी आणि बाबासाहेबांमध्ये अनेक मुद्द्यांवर मतभेद असले तरी सर्व भारतीयांना मतदानाचा अधिकार असावा याला त्यांचाही पाठींबा होता. ज्यांनी शुद्रांना शिक्षण नाही आणि गुणवत्ता नाही असे सांगून मताधिकार नाकारला होता, ज्यांनी मंडल आयोगाला कडाडून विरोध केला होता, त्याच सनातनी, जातीयवाद्यांच्या मागे ओबीसी आज उभे आहेत.
अमेरिकेसारख्या देशातही महिलांना मताधिकारासाठी खूप मोठा लढा द्यावा लागला होता. भारतीय महिलांना मताधिकार आणि समान कामाला समान दाम ही व्यवस्था बाबासाहेबांनी त्वरित केली पण म्हणून किती महिलांना याची जाणीव आहे? कितीजणी आठवणीने त्यांना अभिवादन करतात? बाबासाहेबांना विसरणं ही कृतघ्नता नाही का माताभगिनींनो?
डॉ. आंबेडकरांनी १५ आगष्ट १९३६ रोजी मुंबईत स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. अस्पृश्यता निवारणाचा लढा जरी अस्पृश्य श्रमजिवी जनतेला स्वतंत्रपणे लढावा लागणार असला तरी आर्थिक लढ्यात मात्र स्पृश्य आणि अस्पृश्य शेतकरी - कामगार वर्गाचे हितसंबंध एकजीव असल्याची पक्षाची राजकीय भुमिका होती. हा लढा लढताना जात - पात - धर्म - प्रांत हे सारे भेद मनात न आणता " मजूर तेव्हढे एक ही वर्गभावना" मनात ठसवून आपला पक्ष काम करील असे त्यांनी जनता पत्रातून स्पष्ट केले होते.
संतती नियमनाच्या लोक चळवळीचा रात्रंदिन ध्यास-
कुटुंबनियोजनाची सर्वांनाच सक्ती करायला हवी हा निवडणूक जाहीरनामा १९३७ साली फक्त या एकाच पक्षाचा होता. सत्तेवर येता आले नाही तरी बाबासाहेबांनी कुटूंब नियोजनासाठी अशासकीय विधेयक आणले. १० नोव्हेंबर १९३८ ला त्यावर विधीमंडळात चर्चा झाली. "जन्मदर महत्वाचा नसून पोषणदर महत्वाचा " असतो. लोकसंख्येचा वाढणारा भस्मासूर देशाला परवडणारा नसून भारतीय नागरिकांनी एक किंवा दोन अपत्यांवरच थांबले पाहिजे आणि मुलामुलींचे उत्तम पालनपोषण केले पाहिजे असे या विधेयकात बाबासाहेबांनी म्हटलेले होते. छोटे कुटुंब असणारांना पुरस्कार आणि सवलती दिल्या जाव्यात मात्र मुलामुलींचे लटांबर जन्माला घालणारांना तुरूंगवासाची कठोर शिक्षा करण्यात यावी असेही त्यांचे मत होते. देशात त्यावेळी दुसरा कोणताही राजकीय नेता किंवा पक्ष या विषयावर बोलायला तयार नव्हता. त्यावेळचे राष्ट्रीय काँग्रेस, हिंदु महासभा, मुस्लीम लिगसह कम्युनिष्ट हे सर्वच बाबासाहेबांचा द्रष्टेपणा ओळखायला कमी पडल्याने व त्यांनी बिलाला विरोध केल्याने हे विधेयक फेटाळले गेले. १९५२ सालच्या निवडणूकीतही बाबासाहेबांनी हा विषय त्यांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्यात मांडला होता. देशाच्या खांद्यावर लोकसंख्येचे अवजड ओझे असल्याने प्रत्येक पतीपत्नीने एकाच अपत्यावर थांबायला हवे असे डॉ. बाबासाहेबांनी १९३८ मध्येच सांगितले होते. आज भारताची लोकसंख्या सुमारे १३७ कोटी आहे. जगातली अवघी २ टक्के भुमी असलेल्या भारतात जगातली १८ टक्के लोकसंख्या राहते. हे असेच चालू राहिले तर हा देश नजिकच्या भविष्यात कोलमडून पडेल. १९३० च्या दशकात लोकसंख्येच्या विस्फोटाचा हा धोका ओळखून संतती नियमनाची लोक चळवळ देशात सर्वप्रथम उभी करणारे पहिले राजकीय नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. त्यांनी १० नोव्हेंबर १९३८ रोजी पक्षाच्या वतीने मुंबई विधीमंडळाच्या अधिवेशनात संतती नियमन विधेयक सादर केले. [ पाहा- मुंबई विधीमंडळ चर्चा, खंड, ४, भाग ३, पृ.४०२४ ते ३८ ] स्वतंत्र मजूर पक्षाचे अहमदनगर जिल्ह्यातले आमदार पी. जे. रोहम यांनी सादर केलेले हे विधेयक डॉ. बाबासाहेबांनी तयार करून दिलेले होते. रोहम यांनी केलेले भाषण मराठीत होते. पुरस्कार आणि शिक्षा पद्धतीद्वारे कुटूंब नियोजन मोहीम चालवा, सरकारतर्फे सर्व विवाहीतांना कुटुंब नियोजनाची साधने मोफत पुरवा, शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहन द्या, मुलं किती असावीत आणि कधी होऊ द्यावीत याचा निर्णय पत्नीला घेऊ द्या, स्त्रियांच्या आणि बालकांच्या आरोग्याची हमी द्या, प्रगत देशांच्या तुलनेत भारत खूप मागे असताना, याच वेगाने लोकसंख्या वाढली तर भारत संकटात सापडेल. गुणवत्तापुर्ण शिक्षण, आरोग्य, पोषण आहार, निवारा, घरं, रोजगार आणि आनंदी जीवनमान प्रत्येक मुलामुलीला मिळणं हा त्यांचा हक्क आहे. भारतात जास्त मुलं जन्माला घालणं हा "राष्ट्रीय गुन्हा " ठरवला पाहिजे, हे बाबासाहेबांचे द्रष्टे विचार आजही कालसुसंगत नी मार्गदर्शक आहेत.
प्रगत देशातील दरडोई Consumption आणि भारतातली अपुरी उपलब्धता सांगताना डॉ. बाबासाहेब, दूध, मटण, फळं, साखर, गहू, भाजीपाला यांची सरळ आकडेवारीच देतात. हिंदू महासभा, मुस्लीम लिग, काँग्रेस, अगदी कम्युनिष्ट या सार्यांनीच या बिलाला विरोध केला. परिणामी ते फेटाळले गेले. ८३ वर्षांपुर्वी या बिलाचे स्वागत करणारे फक्त दोघेच द्रष्टे लोक भारतात होते. समाजस्वास्थकार प्रा. र. धो. कर्वे आणि उद्योगपती जे. आर. डी. टाटा. कर्व्यांनी समाजस्वास्थमधून या विषयावर समाजजागृती चालवली होती. त्यांच्यावर सनातन्यांनी अश्लीलतेच्या नावाखाली खटले भरले तेव्हा त्यांचे वकीलपत्र घेऊन बॅरिस्टर बाबासाहेब त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. कुंटुंब नियोजन बिल फेटाळले गेले तरी लगेच १० डिसेंबरला [ १९३८ ] डॉ. बाबासाहेबांनी मुंबईत युवक परिषद घेऊन एकाच अपत्यावर थांबा असा सल्ला युवकांना दिला.
डॉ. बाबासाहेब : शेतकर्यांचे सच्चे मित्र-
१०३ वर्षांपुर्वी म्हणजे १९१८ साली डॉ. बाबासाहेबांनी शेतीवर " स्मॉल होल्डींग्ज इन इंडीया " हा शोधग्रंथ लिहिला होता. त्यात त्यांनी शेती आणि शेतकरी यांच्या समस्या सोडवण्याचा मार्ग सांगितला होता.
शेतकरी निरक्षरता व अन्य कारणांनी कुटुंबनियोजन करीत नाहीत त्यामुळं होणारी जास्त मुलं आणि मग शेतीचे होणारे वाटे म्हणजे तुकडे यातून उभे राहणारे अनेक प्रश्न यांची चर्चा त्यांनी केली होती. तुकडेबंदीचा मार्ग सांगुन त्यांनी अशी शेतं एकत्र करून शेतकर्याला एका ठिकाणी दिल्यास शेती करणं सोयीचं होईल असं सुचवलं. पुढं स्वतंत्र भारतात असा जमीन एकत्रीकरणाचा कार्यक्रम राबवला गेला.
बाबासाहेब म्हणतात, मुख्य समस्या आहे शेतीवर वाढणार्या बोजाची. शेतीवर ज्याकाळात ८० टक्के लोक अवलंबून होते तेव्हा ते म्हणतात यातले ६० टक्के लोक इतर क्षेत्रात हलवले पाहिजेत. शेतीवर वाढणारा बोजा कमी करण्यासाठी शेतकर्यांनी आपली मुले शेतीवर अवलंबून न ठेवता त्यांना व्यापार, उद्योग, शिक्षण, सेवा क्षेत्रात घातले पाहिजे.
शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा ही त्यांची मुख्य शिफारस आहे. त्यामुळं उद्योगाला जशी शासकीय मदत मिळते तशी शेतीला मिळेल.
शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावेत यासाठी शासकीय धोरणं आखली जावीत.
शेतीला २४ तास आणि ३६५ दिवस सिंचनाची सोय उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे असं ते म्हणतात.
शेती आधुनिक पद्धतीनं करायला हवी. शेतीला जोडधंदे, पुरक उद्योग, दुध, अंडी, लोकर आदींची जोड द्यायला हवी.
असें झालं नाही तर शेतकरी संकटात सापडेल आणि त्याला जगणं मुश्कील होईल अशा इशारा त्यांनी १०३ वर्षांपुर्वी दिला होता हे त्यांचे द्रष्टेपण होते. आज आपल्या देशात शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आत्महत्त्या करीत आहेत. बाबासाहेब १०३ वर्षांपुर्वी जणू काही हा इशाराच देत होते. गेले पाच महिने देशाच्या राजधानीत शेतकरी आंदोलन करीत आहेत पण त्यांच्याकडे बघायला केंद्रातील सरकार तयार नाही.
मुंबई प्रांताचे आमदार असताना ओ.बी.एच. स्टार्ट कमिटीचे सदस्य म्हणून डॉ. बाबासाहेबांनी १९३० साली सर्वप्रथम ओबीसी प्रवर्गालाही कायदेशीर मान्यता व संरक्षण दिले जाण्याची शिफारस केली होती. अनु. जाती व जमाती यांच्यासोबतच ओबीसी हा अंगमेहनती कष्टकरी वर्ग असल्याने त्यालाही घटनात्मक सवलती द्यायला हव्यात असा त्यांनी आग्रह धरला. ओबीसींना जरी अस्पृश्य मानले गेले नसले तरी हजारो वर्षे शूद्र म्हणून अपमानित जीवन जगावे लागलेले आहे. शिक्षण, सामाजिक प्रतिष्ठा, संपत्ती, सत्ता आणि मानवी अधिकार यापासून वंचित राहावे लागलेले होते. तेव्हा या वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी महात्मा फुल्यांनंतर झटणारे बाबासाहेबच होते. राज्यघटनेच्या ३४० व्या कलमाच्या निर्मितीद्वारेही त्यांनी ह्या घटकाला हक्क मिळवून दिले. मात्र ओबीसी समाज अज्ञानामुळे किंवा जातीय मानसिकतेमुळे असेल पण बाबासाहेबांपासून कायम फटकून राहिला. त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनाम दिला त्यामागे ५ कारणे होती. त्यातले एक कारण केंद्राने ओबीसी आयोग स्थापन केला नाही हे होते.
स्त्रिया, शूद्र, शेतकरी, कामगार यांना आपला मुक्तीदाता आणि आपल्याला गुलाम करणारे यांच्यातला भेद उशीरा का होईना पण कळू लागला आहे. ज्यादिवशी त्यांना भारत भाग्यविधाता बाबासाहेब हेच आपले खरे सोयरे होते हे समजेल तोच सुदिन असेल.
- प्रा. हरी नरके
Author of 54 Books, Professor, Researcher and Editor of Dr Babasaheb Ambedkar & Mahatma Phule's Books.
54 पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक
प्राध्यापक आणि विभागप्रमुख - महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे [निवृत्त]




