Friday, September 7, 2012

हमोंचा जातीय प्रचारअ.भा.मराठी साहित्य संमेलनात वाद हे झडलेच पाहिजेत असा महामंडळाच्या घटनेत एखादा नियम आहे किंवा कसे याची मला माहिती नाही.सालाबादप्रमाणे चिपळुणला होणा-या संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणुक गाजु लागली आहे.गेल्या ८५ साहित्य संमेलनात न घडलेली जातीय प्रचाराची घटना यावर्षी प्रथमच पाहायला मिळत आहे.त्याचे मानकरी आहेत लेखक आणि अध्यक्षपदाचे एक उमेदवार श्री.ह.मो.मराठे. हमोंनी या निवडणुकीत जातीय प्रचार करुन या निवडणुकीला झेडपीच्या निवडणुकीच्या पातळीवर उतरविले आहे.
काही लोक दागिने मोडुन खातात,काही आपली गरिबी मोडुन खातात तशी हमोंनी निवडणुक प्रचारात स्वता:ची जात "मोडुन खायला" सुरुवात केली आहे.
{आपले आडनाव ’मराठे’ असले तरी} आपण "ब्राह्मण" आहोत आणि आपणच एकमेव ब्राह्मणांचे तारणहार आहोत असे त्यांनी आपल्या प्रचारपत्रकात सुचकपणे नमुद केलेले आहे.ब्राह्मण समाजाच्या विरुद्धच्या सगळ्या अपप्रचाराला वाचा फोडण्याचे "ईश्वरी कार्य" आपण हाती घेतल्याची माहिती हमोंनी या पत्रकात देवुन मते मागितली आहेत.
हमो म्हणतात, "गेल्या दिडशे वर्षांपासुन महाराष्ट्रात ब्राह्मणद्वेषाचे वातावरण पद्धतशीरपणे तयार करण्यात येत असुन सध्या त्याचा कळस गाठण्यात येत आहे." याचा अर्थ हमोंचा रोख महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याकडे आहे.दिडशे वर्षांपुर्वी त्यांचे स्त्री व दलित शिक्षणाचे काम  सुरु झाले होते. हमोंचा अंगुलीनिर्देश तिकडेच आहे.
ब्राह्मण पुरुषांच्या सरसकट कत्तली करण्याची चिथावणी देणा-या पुरुषोत्तम खेडेकरांच्या विखारी पुस्तकाविरुद्ध हमोंनी भुमिका घेतल्याचे ते या पत्रकात ब्राह्मणांना आवर्जुन सांगतात.तेव्हा ते हे दडवुन ठेवतात  की खेडेकरांच्या या पुस्तकाविरुद्ध पोलीसात तक्रार करणारे हमो नसुन शाम सातपुते,संजय सोनवणी आणि मधुकर रामटेके हे होते.हमोना केवळ लाजेकाजेस्तव नंतर भुमिका घ्यावी लागली पण पोलीसकेस झाल्यानंतर हे "शुर शिपाई"  तब्बल सहा महिने  पुस्तकावर मुग गिळुन गप्प राहिले होते.
या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण मतदार असल्याने त्यांना "भिक्षांदेही करण्यासाठी" हमोंनी हे पत्रक काढल्याची टिका एबीपी माझा वाहिनीने थेटपणाने करुन या जातीय प्रचाराचे वस्त्रहरण केले. टिका सुरु झाल्यावर हमोंनी साळसुदपणाचा आव आणुन केलेला खुलासा  अतिशय विनोदी होता. "एबीपी माझा" शी बोलताना ते म्हणाले, "मी पत्रकात असे कुठे  लिहिलेय की मी ब्राह्मण आहे म्हणुन ब्राह्मण मतदारांनो मला मत द्या."
वा: हमो! तुम्ही मतदारांना आणि महाराष्ट्राला बोळ्याने दुध पिणारे समजता काय?तुमचे जातीय डावपेच आम्हाला कळत नाहीत काय?
हमोंच्या चार पानी पत्रकातील पुर्ण दोन पाने या ब्राह्मणकार्याची जाहीरात करणारी आहेत. त्यात हमोंनी घटनेने दिलेल्या सामाजिक  आरक्षणाविरुद्धही गरळ ओकलेले आहे. त्यांनी सामाजिक न्यायाऎवजी त्याला "जातवार आरक्षण"असे संबोधले आहे. कष्टक-यांना जमिनीची मालकी देणा-या कुळकायद्यालाही हमोंचा विरोध आहे. रानडे,आगरकर,केशवसुत,कर्वे,लोकहितवादी यांची तोंडदेखली नावे घेणारे हमो नेमके कुणाचे वारसदार आहेत?गं.बा.सरदार,य.दि.फडके,अरुण साधु,वसंत बापट,लक्ष्मण्शास्त्री जोशी आदींचा वारसा हमोंना नको आहे.त्यांना सदानंद मोरे यांनी वाहिनीवर  जातविरहीत प्रचाराचे प्रमाणपत्र देवुन त्यांची तळी उचलुन धरली असली तरी हमो हे विष्णुशास्त्री चिपळुणकरांचेच वारसदार आहेत आणि रानडे-केशवसुतांची नावे घेवुन ते त्यांना बदनाम करीत आहेत हे स्पष्ट आहे.
 मतदारांमध्ये दोन जातींचे लोक प्रामुख्याने आहेत.एकुणात ४० टक्के मतदार ब्राह्मण असल्याचे हमो सांगत असले तरी प्रत्यक्षात हे प्रमाण ५५ते ६० टक्केपर्यंत असावे असे जाणकारांचे मत आहे.त्याखालोखाल मतदार सत्ताधारी जातीचे आहेत.या दोघांची जुंपल्याचे चित्र निर्माण करुन हमोंना "विरोधीभक्त" ब्रिगेडकरवी ते मतदारांसमोर बिंबवायचे आहे. दोन प्रतिगाम्यांमध्ये कायम संगनमत असते हे अनेकदा दिसुन आले आहे.ही मिलीभगत ईथेही नसेलच असे नाही.
हमो म्हणतात,"पुढे जेम्स लेनचे पुस्तक व तो स्वत: यांची भारताच्या सुप्रीम कोर्टाने निर्दोष मुक्तता केली."हमोंची ही मांडणी सत्याला धरुन नाही. सरकारने  लेनच्या बदनामीकारक आणि विकृत पुस्तकावर  बंदी घातली होती. घटनेच्या कलम १९ नुसार असणा-या लेखन व अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार न्यायालयाने  ही बंदी उठवली.ती उठवण्यात आली कारण सरकारने हा आदेश काढताना खुप चुका केलेल्या होत्या.त्याचा फायदा पुस्तकाला मिळाला.पण ही याचिका लेनने केलेली नव्हती.किंवा लेनला निर्दोष ठरवावे अशीही मागणी नव्हती.पुस्तक वाचायला मिळावे अशी वाचकांची याचिका होती.लेनला कोर्टाने निर्दोष मुक्त केले ही हमोंची माहिती त्यामुळेच दिशाभुल करणारी आहे.
 हमोंनी या पुस्तकातील वादग्रस्त मजकुर आपल्या पत्रकात जसाच्यातसा उद्धृत करुन आणखी एक घोडचुक केलेली आहे.ही चुक यापुर्वी फक्त संभाजी ब्रिगेडने हजारो पत्रके छापुन केलेली होती. तीच ब्रिगेड आत्ता हमोंना त्यासाठीच टार्गेट करीत आहे.आहे की नाही मिलीभगत?प्रागतिक मतदार यातुन हमोंपासुन दुरावले तरी सनातन्यांची मते पक्की करण्याच्या तसेच संभाजी ब्रिगेडसारख्या अतिरेकी आणि जातीयवादी मराठा संघटनांना जेम्स लेनचे कोलीत देवुन चिथवायचे आणि तटस्थ मतदारांची सहानुभुती मिळवुन निवडुन यायचे अशी गणिते धुर्तपणे  मांडुन हमोंनी हे पत्रक काढलेले असावे.
हा वाद ओढवुन घेवुन सहानुभुती मिळवायची आणि निवडुन यायचे असा डावपेच यामागे असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.हा वाद कसे वळण घेतो त्यावर मराठे जिंकणारकी हरणार ते ठरेल.
प्रबोधनकार ठाकरे यांच्या "माझी जीवनगाथा" या आत्मचरित्रात एक आठवण दिलेली आहे.
१९२३ च्या राजकीय निवडणुकीत भास्करराव जाधव यांनी, "सातारा जिल्हा मराठा मतदारांचा असुन आपण मराठा आहोत सबब मराठ्यांची मते मराठ्यासच मिळाली पाहिजेत" असे प्रचारपत्रक काढले होते.{पान.२४४}
आज कायदे बदललेले आहेत. असा थेट जातीय प्रचार करता येत नसल्याने आजच्या "आडनावांच्या मराठ्यांनी"अधिक चतुर मार्ग वापरला आहे इतकेच.पण वृती तीच आहे.प्रागतिक महाराष्ट्राने याचा धिक्कार केला पाहिजे.