संगिता नरके आणि प्रमिती नरके
माहेर, मार्च २०१४, पृ.५२ ते ५४
पिढी तुझी - माझी
संगिता नरके आणि प्रमिती नरके
सामाजिक मागासलेपणा आणि आर्थिक चणचण हातात हात घालून असतात. पण इच्छाशक्ती,बुद्धी आणि कष्टाच्या जोरावर त्यावरही मात करता येते.संगीता ही त्या पिढीची प्रतिनिधी.या प्रयत्नांना प्रामाणिकपणाची जोड असेल तर पुढच्या पिढीचा पाया सर्वार्थाने भक्कम होतो, तिला भरारी घ्यायला बळ देतो, जसं प्रमितीला मिळालं. वाचा या मायलेकींच्याच शब्दात-
--संगिता
माझं बालपण मुंबईत गेलं. महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाच लग्न झालं. आमचा आंतरजातीय प्रेमविवाह असल्यानं खूप विरोध झाला. माझं माहेर भटक्या-विमुक्त समाजातलं. हा समाज म्हणजे निरक्षरता, कुपोषण, गुन्हेगारीचा शिक्का बसलेला समाज. पोटासाठी चोर्यामार्या करावं लागण्याचा वारसा लाभलेला समाज. आई-वडीलांनी मुंबईच्या फूटपाथवरून त्यांच्या आयुष्याची सुरूवात केलेली. वडील सामाजिक चळवळीत काम करीत असूनही मुलगाच हवा या हट्टापायी आम्हा ५ बहिणांना जन्म दिला गेला. त्यामुळं कोणतीही हौसमौज वाट्याला आली नाही. आपल्याला जे मिळालं त्याच्यापेक्षा जास्त चांगलं आपल्या मुलांना द्यायचं आणि आपल्याला जे मिळालं नाही ते सगळंही त्यांना मिळायलाच हवं अशी खूणगाठ कळत्या वयात मनात बांधलेली.
वडील कधी घरी नसायचेच. घरात सतत कार्यकर्त्यांचा राबता असायचा. त्यामुळं काही झालं तरी कार्यकर्त्याशी लग्न करायचं नाही असा निश्चय केलेला होता. नामांतर आंदोलनात हरीची भेट झाली. तो टेल्कोत रात्रपाळीची पूर्णवेळ नोकरी करीत महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याचवेळी त्यानं चळवळीलाही वाहून घेतलेलं होतं. त्यामुळं त्यानं जेव्हा मला प्रपोज केलं तेव्हा मी चक्क नकार दिला. पुढं आम्ही "झोळ्या जाळा-बेड्या तोडा" परिषदेला औरंगाबादला भेटलो. त्यानंतर अजिंठा - वेरूळचा एकत्र प्रवास झाला. महाडच्या चवदार तळ्यावरील स्त्रीमुक्ती परिषदेनंतर रायगड-प्रतापगड-महाबळेश्वर सहल झाली. आपला जोडीदार शिकलेला हवा. स्त्री-पुरूष समानता मानणारा हवा. व्यसनी नी अंधश्रद्धाळू नसावा. जात, दिसणं, सांपत्तिक स्थिती या गोष्टी फारशा महत्वाच्या नाहीत हे मात्र मनात पक्कं होतं. साडेसतरा नळीच्या झोपडीवजा घरात हरी राहायचा. तिकडे "होल वावर इज अवर-गो एनी व्हेअर" अशी पद्धत असल्यानं स्वच्छतागृहाची सोयही नव्हती. तिथल्या मंडळींना त्याची गरजही वाटत नव्हती.
लग्नात मानसिक, शारिरिक, वैचारिक, अनुरूपतेच्या बाबी भक्कमपणे जुळायला हव्यात असं मला वाटे. मुख्य म्हणजे बलदंड प्रेम हवं. प्रेमामुळं शेवटी माझा कार्यकर्त्याशी लग्न न करण्याचा निर्धार ढासळला. आम्ही मोजक्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने लग्न केलं. माझं महाविद्यालयीन शिक्षण चालू राहिलं. फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या प्रभावातून आम्ही दोन निर्णय घेऊन टाकलेले होते. उच्चशिक्षण पुर्ण झाल्याशिवाय मुल होऊ द्यायचं नाही. नी मुलगा होवो की मुलगी एका अपत्यावर कुटुंबनियोजन करायचं. लग्नाआधीच हरीनं पिंपरीत सदनिका घेतली होती. सासरी चुलीवर स्वयंपाक व्हायचा, पण हरीनं शाळेत असतानाच ग‘स बुक केलेला होता. त्यानं वयाच्या ५ व्या वर्षापासून स्मशानात नोकरी करीत पुणे मनपाच्या शाळेतून शिक्षण घेतलेलं होतं. त्याच्या घरात पिढ्यानपिढ्या शेतमजुरीची परंपरा असल्यानं कष्टाची गोडी होती. मात्र भीक आणि चोरीची प्रचंड नफरत होती. त्याचे वडील तो लहान असताना औषेधपाण्याविना गेले होते. त्यामुळे काटकसर त्याच्या नको इतकी हाडीमाशी मुरली होती. त्याचा कधीकधी अतिरेक झाला की मला त्रास होई. पण तरिही आम्ही उमेदीचे दिवस पोटाला चिमटे घेऊन अतिशय काटकसरीने काढले. आम्हाला त्याचा फायदा असा झाला की आमच्या गरजा अतिशय मर्यादित राहिल्या. पुस्तके विकत घेण्याचे व्यसन वगळता आम्हाला दुसरे कोणतेही व्यसन नाही. भिकेचा आणि लाचारीचा तिटकारा पण चांगल्या जीवनमानाची ओढ यामुळे आम्ही आधी झोपडी, मग दोन खोल्यांची सदनिका आणि पुढे कोथरूडला चार खोल्यांचे घर असा प्रवास केला.सध्या मी लोणकर माध्यमिक विद्यालयात मुंढवा,पुणे येथं काम करते.
प्रमिती ३ महिन्यांची असतानाच मला मोठा अपघात झाला. तिचे खूप हाल झाले. तिला चांगल्या शाळेत घालता यावं म्हणून आम्ही पिंपरीहून कोथरूडला राहायला आलो. तिला मराठी माध्यमात घालायचं आमचं ठरलेलं होतं. अभिनव विद्यालयाचे प्रमुख चिं.स.लाटकर अण्णा यांनी तिला प्रवेश द्यायचं मान्य केलेलं. मात्र आम्हाला तिला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायचं आहे असं ते गृहीत धरून चाललेले. त्यामुळे अभिनव मराठी माध्यमाची शाळा सुरू झाली तरी इंग्रजी शाळेचे प्रवेश उशीरा असल्याने ते निवांत होते. आम्ही हादरलो. मराठी शाळेत घालून आम्ही तिचे नुकसान करू नये असे त्यांना मनापासून वाटत होते. शेवटी आमच्या हट्टापुढे त्यांनी नमते घेतले आणि तिला मराठी शाळेत प्रवेश दिला.
हरी एकतर फुले-आंबेडकर ग्रंथ प्रकाशनाच्या कामासाठी मुंबईला मंत्रालयात किंवा व्याख्यानांच्या दौर्यांवर सतत घराबाहेर असायचा. मी मुंढव्याच्या लोणकर विद्यालयातली माझी नोकरी सांभाळून प्रमितीच्या अभ्यासाचं बघायचे. प्रमितीच्या शाळेतील कार्यक्रमांना मीच उपस्थित असायचे. प्रमिती अभ्यासात हुशार होती. परंतु तिने पहिला-दुसरा क्रमांक मिळविण्याऎवजी अभ्यासेतर उपक्रमातही भाग घ्यावा असे मला वाटत असे. बालवाडीपासूनच मी तिला त्यासाठी प्रोत्साहन देत होते. ती कथाकथन, काव्यवाचन, नाट्यछटा, वक्तृत्व, नाट्यवाचन, नृत्य यात सहभागी व्हायची. मात्र बक्षीस घ्यायला व्यासपीठावर जायला बुजायची. ती चित्रकला व गायनाच्या क्लासलाही जायची. पण तिला त्यात फारशी रुची निर्माण झाली नाही. मात्र पोहणे तिने मनापासून एंजा‘य केले. पोहण्याचे सर्व प्रकार तिने आत्मसात केले. आम्ही तिला भरपूर बालनाट्यं दाखविली. तिला त्याची इतकी गोडी लागली की अनेकदा ती एकट्याने जायची. काही नाटकं तिने अनेकवेळा पाहिली. तिला कविता करायला आवडतं. त्या ती मला आवर्जुन वाचून दाखवते. त्या बाबाला दाखव म्हटलं की मात्र ती आपल्या दोघीतलीच गंमत आहे असं म्हणते. सुट्ट्यांमध्ये ट्रेक, ओरीगामी, सुदर्शन मंच यात ती गर्क असायची. सहावीत असताना तीने एकट्याने हिमाचल, पंजाबचा प्रवास केला होता. चारित्र्य प्रतिष्ठानचा आंतरशालेय आदर्श विद्यार्थीनीचा पुरस्कार तिला मेधा पाटकरांच्या हस्ते टिळक स्मारकला मिळाला होता. त्यावेळी ती म्हणाली होती," आमच्या घरात पुस्तके राहतात आणि उरलेल्या जागेत आम्ही राहतो."
राष्ट्र सेवादलाची वार्षिक शिबिरे ती चुकवायची नाही. तिथे एका वर्षी प्रसिद्ध दिग्दर्शक अतुल पेठे तिला भेटले. त्यांनी तिची अभिनय क्षमता हेरली. त्यांनी तिची सत्यशोधक नाटकातील सावित्रीबाईंच्या भुमिकेसाठी निवड केली. तिने तालमीही केल्या. पुढे ललित कलाच्या वर्गांमुळे तिला ते सोडणे भाग पडले. सत्यशोधक खूप गाजले. पर्ण पेठेने तो रोल उत्तम केला. परंतु तिच्या उच्च महाविद्यालयीन शिक्षणामुळे ती पुढील प्रयोगांसाठी वेळ देऊ शकत नव्हती. प्रयोग पाहिल्यावर सतिश आळेकरांनी पेठेंना या रोलसाठी प्रमितीचे नाव सुचविले, या योगायोगाची मला गंमत वाटली.
दहावीनंतर पुढे काय करावे याबाबत तिचा निर्णय होत नव्हता. तिचा निर्णय तिनेच घ्यावा असे आम्ही तिला सांगितले होते. अभिनयात तिला रस होता. मात्र या क्षेत्रातील अनिश्चितता व स्पर्धा बघता जोडीला आणखी एक आधार असावा असे तिला वाटत होते. त्यासाठी ती जर्मन, मानसशास्त्र, मासकौम यांचाही विचार करित होती. हरीने भारतीय प्रशासनसेवेचे क्षेत्रही सुचवुन ठेवले होते. तिने फर्ग्युसनला अकरावी कला शाखेला प्रवेश घेतला. दरम्यान बारावीतच तिचा ललित कला केंद्रात प्रवेश घेण्याचा निर्णय पक्का झाला होता.
हरी आरक्षण धोरणाचा समर्थक असला तरी मुलीने मात्र ललितकलाला खुल्या गटातूनच प्रवेश घ्यावा यासाठी तो आग्रही होता. प्रवेश परिक्षेत जर यश नाही आले तर १ वर्ष थांबून पुन्हा प्रवेश परिक्षा द्यायची पण तिकडेच जायचे यावर प्रमिती ठाम होती. तिने कसून तयारी केली. चंद्रकांत कुलकर्णींसारख्या नामवंत परिक्षकांनी तिची निवड केली. गेल्या ३ वर्षात या क्षेत्राचा ध्यास घेऊन ती करीत असलेला अभ्यास, सकाळी ८ ते रात्री १ किंवा २ वाजेपर्यंत तिच्या चालणार्या वर्ग, तालमी यात ती आरपार बुडालेली असते. ललितला जातानाची प्रमिती आणि आजची प्रमिती यात खुप फरक पडलाय. तिला कष्टाचे महत्व कळावे, घामाचे पैसे मिळवताना काय वाटते, हा अनुभव यावा यासाठी तिने विद्यापिठाच्या "कमवा आणि शिका" योजनेत भाग घेतला. सुट्टीत बिग बझार आणि इतर अनेक ठिकाणी काम करून अर्थार्जन करीत शिक्षण घेतले.
मितुची पिढी अतिशय प्रैक्टीकल आहे. बोल्ड आहे. जेंडर सेंसेटिव्ह आणि अर्थातच न्यायासाठी आग्रही आहे. ती जिथे जाईल तिथे तिने आपली स्पेस मोठी करण्यासाठी झटावे एव्हढीच अपेक्षा आहे. हरीला सामाजिक चळवळीत आणि लेखन-संशोधनात रस होता, आहे. मला स्वत:ला अभिनयाची आवड होती. मी तिकडे जावे असे मी एकदा माझ्या पालकांना बोलून दाखवले तेव्हा ते उडाले होते. ते तसा विचारही करू शकत नव्हते. माझ्या मुलीने हे क्षेत्र निवडले याचा मला आनंद आहे. तिचे आवडीचे क्षेत्र तिनेच निवडले आहे. तिच्यात कोणताही भाबडेपणा नाही. कठोर परिश्रमांची तिची तयारी आहे. तिने स्वाभिमानी, निर्भीड, कष्टाळू, संवेदनशील असावे. कितीही स्पर्धा असली तरी ती तिची मुद्रा नक्की उमटविल असा मला विश्वास आहे.
तिचा जोडीदार निवडताना तिने जात, धर्म, वर्ण, वंश, प्रांत, भाषा असला कोणताही विचार करून तिचे निवडीचे क्षेत्र संकुचित करू नये असे आम्ही तिला सांगितलेले आहे. ती जे ठरविल त्याला आमचा संपुर्ण पाठिंबा असेल. तिने चांगला माणूस बनावे एव्हढीच आमची अपेक्षा राहणार. तसे संस्कार आम्ही तिच्यावर केलेले आहेत.
..............................
प्रमिती--
माझी लहानपणीची पहिली आठवण म्हणजे बालवाडीत असताना शाळेच्या छोट्याशा सभागृहात पन्नास एक वर्गमित्र-मैत्रिणी आणि पाच-सहा शिक्षकांच्या समोर घाबरत घाबरत केलेलं वक्तृत्व स्पर्धेतलं बिरसा मुंडावरचं छोटसं भाषण. पण त्या भाषणाच्या आधिचा आणि नंतरचा तासभर माझं अंग आणि मन ज्या गतीने, ज्या प्रकारे थरथर कापलं होतं ते म्हणजे काही विचारता सोय नाही. त्यानंतर प्रत्येकच स्पर्धेच्यावेळी एन्गझायटीच्या परमोच्च बिंदूशी गाठ पडणं काही चुकत नव्हतं. परंतु तरीही बक्षिसं मिळवणंही चुकत नसल्याने वारंवार स्पर्धेत उतरतच होते. या सगळ्यात शालेय जिवनातच कधीतरी कलेची, अभिनयाची, नाटकाची गोडी लागली. घरातून आईचा मिळणारा संपूर्ण पाठींबा आणि बाबाचा असलेला आदर्श याचीही खूप मदत झाली. हे सगळं करत असताना तेंव्हा गंभीरपणे करीयर म्हणून अभिनयाचा तसा विचार केला नव्हता. पण मनातल्या मनात मी अभिनेत्री व्हायची स्वप्नं नेहमीच रंगवत होते. पण गुप्तपणे. उघडपणे नाही. कारण, एक म्हणजे बाबाची मी आय.ए.एस. व्हावं ही अपेक्षा आणि दुसरं म्हणजे " ज्यांना दुसरं काही जमत नाही, ते पूर्णवेळ अभिनय करतात " हा शाळेत, समाजात असलेला गैरसमज. त्यात मी दिसायला तशी चारचौघींसारखी. त्यामुळे अभिनेत्री व्हायचं असं म्हटल्यावर वर्गातली चार टाळकी फिदीफिदी हसणार याची खात्री होती. पण तरी धीर करून एकदा, "सुंदर दिसण्याचा अभिनयाशी काहीही संबंध नाही" यावरून शाळेतल्या बाईंशी वाद घातल्याचं मला आठवतं. तेंव्हापासूनच माझी "उद्धट" म्हणून प्रसिद्धी होऊ लागली होती.
शाळा संपली. पण पुढे काय करायचं हे माझं काही ठरत नव्हतं. माझं "गुप्त स्वप्न" तर मला पूर्णत्वास न्यायचच होतं. पण कसं? हा प्रश्न होताच. बाबाच्या अपेक्षा अन माझ्या मनाचा कल पाहता आईने हुशारीने एक मध्यममार्ग सुचवला. तो म्हणजे मासकौम. जेणेकरून "पत्रकारीता" असं ऐकून बाबाही खूश होणार होता आणि "अभुनयाच्या जवळपास जाणारच हे क्षेत्र आहे" ही तात्पुरती गोळी मलाही पुरणार होती. त्यानुसार ११ वी कला शाखेत प्रवेश घेतला. मराठी माध्यमातून थेट फर्ग्युसन मधल्या सगळ्या कॊन्व्हेंटच्या क्राऊडशी मेचअप करताना आधी नाकी नऊ आलेले. अभ्यासात मन रमेना अन आर्ट सर्कल मधल्या अंतर्गत राजकारणामुळे तिथेही घुसता येईना. हा काळ म्हणजे माझ्यासाठी करीअरच्या दृष्टीने अगदीच अंधूक आणि घाबरवून सोडणारा होता. पण त्याचा उलट परिणाम असा झाला, की अनेक पर्याय चाचपडल्यानंतर मी आपल्याला काय करायचं नाहीये, ते पक्कं करून टाकलं. या सर्व घडामोडींची पूर्णवेळ साक्षीदार म्हणजे माझी मम्मा. माझा कलाक्षेत्राकडे १२०, १३० वरून थेट १८० अंशात वळलेला कल पटवून देऊन बाबाचं मन वळवण्यात ती सफल झाली. आणि मी १२ वी नंतर पूर्णवेळ नाट्यशास्त्राला ललितकला केंद्रात प्रवेश घ्यायचा निर्णय झाला. माझ्या आनंदाला आता पारावार उरला नव्हता.
निर्णय तर झाला. पण प्रवेश प्रक्रीया सोपी नव्ह्ती. लेखी परीक्षा आणि मग शोर्टलिस्टेड मुलांची प्रत्यक्ष मुलाखत अन परफोरमन्स टेस्ट व्हायची होती. त्यात लिमिटेड सीटस - फक्त दहा. आता पूर्वीसारखा थरकाप उडत नसला तरी टेन्शन खूप आलं होतं. दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय आमच्या पिताश्रींनी ओबीसी कोट्यातून प्रवेश न घेता ओपन केटेगरीतून प्रवेश मिळवायचा असे आपले धोरण जाहीर केले. बरं त्यामागे भक्कम विचारधारणा असल्याने मला काही बोलताही येईना. झपाटून तयारी केली आणि प्रवेश परिक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
ललितला आल्यानंतर अभिनयाकडे, नाटकाकडे बघण्याची एक वेगळीच दृष्टी मला मिळाली. ललित हा माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा टप्पा म्हणावा लागेल. सतिश आळेकर, प्रविण भोळे, समर नखाते, राजीव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मी केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही समृद्ध झाल्याचे मला जाणवते. शालेय जिवनातही मी नाटकात कामं केली. पण इथे आल्यावर मी " जाणीवपूर्वक ’ नाटक करायला शिकले. याकाळात मी माझ्या स्वत:च्या चार संहिताही लिहिल्या.फर्ग्युसनच्या सुरुवातीच्या दिवसांत मला नेहमी खंत वाटत असे, की माझ्या पालकांनी मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले नाही. पण आता मला याच गोष्टीचा प्रचंड फायदा होत आहे. माझ्याच वर्गातील इंग्रजी माध्यमातून शाळा शिकलेल्यांना जी भाषा दुर्बोध व त्यामुळे कंटाळवाणी वाटते ती मी सहज समजून घेऊ शकते, माझं मराठी साहित्य मला जवळचं वाटतं. संहिता समजून घेणे, संदर्भ जुळवणी, शैलीचा अभ्यास यासाठी लागणारी समज प्रगल्भ होत गेली. अभिनयाच्या वेगवेगळ्या शैलींचा अभ्यास करत असताना मी शेक्सपिअरच्या हेम्लेट आणि अ मिडसमर नाईटस ड्रीम, मेक्झीम गोर्कीचं द लोअर डेप्थ, विजय तेंडुलकरांचं मित्राची गोष्ट, बर्टोल्ट ब्रेक्थचं दी कोकेशिअन चोक सर्कल इ. नाटकांत कामे केली. दी कोकेशिअन चोक सर्कलचे मुंबईला पृथ्वी थिएटर, दिल्लीला आंतरराष्ट्रीय भारतरंग महोत्सवामध्ये प्रयोग केले. सकाळ व हिंदू मध्ये याची परिक्षणे आली. संदेश कुलकर्णी, अनिरूद्ध खुटवड यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या हाताखाली काम करताना नाटकाच्या अनेक अंगांचा अभ्यास करता आला.
"संहिता ते प्रयोग" या अभ्यासक्रमांतर्गत लेखक आणि दिग्दर्शक याही पातळ्यांवर विचार करण्याची संधी मिळाली.मीही दोन संहिता लिहिल्या.त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. या सर्व अनुभवांतून माझ्या पुढ्च्या आयुष्याची दृष्टी मिळत गेली. आमच्या घरात स्वतंत्र ग्रंथालय काढता येईल एवढी पुस्तकं आहेत. याचा मला खूपच फायदा झाला. केवळ नाटकांचीच नाही तर कथा, कादंबर्या, कविता, संदर्भग्रंथ पटकन हाताशी असतात. यासाठी मी स्वत:ला प्रचंड लकी मानते.
आता मी ललितकला केंद्रातून पदवीधर होऊन बाहेर पडते आहे. अजून खूप काही शिकायचे आहे.
....................................
No comments:
Post a Comment