Thursday, March 20, 2014

"दि रेप" एकपात्री- आयुकात सादरीकरण










जागतिक महिला दिन आणि ज्ञानजोती सावित्रीबाई फुले स्मृतीदिन यानिमित्ताने या आठवड्यात विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. निर्भया खटल्यातील आरोपींची फाशीची शिक्षा कायम करणे, शक्ती मिल घटनेबाबत सुरक्षाभिंत बांधणे याबाबतचे निकाल याच आठवड्यात उच्च न्यायालयाने दिले. पुणे विद्यापिठात नुकतेच एकतर्फी प्रेमातून काही घटना झाल्या. या पार्श्वभुमीवर आयुका आणि पुणे विद्यापिठाचे अर्थशास्त्र व समाजशास्त्र विभाग यांनी विशेष प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे या गंभीर प्रश्नावर चर्चा घडवून आणली. काही वर्षांपुर्वी फ़्रं‘का रामे या इटालियन लेखिका आणि अभिनेत्रीने स्त्रीप्रश्नावर "दि रेप" चे लेखन करून ते एकपात्री प्रयोगाद्वारे सादर केले आहे. तिचे हे स्वानुभवावर आधारित एकपात्री सादरीकरण जगभर गाजले आहे. नराधमांनी तिच्यावर केलेल्या सामुदायिक बलात्काराचा अनुभव तिने धैर्याने मांडला. प्रेक्षकांना विचार करायला लावणारा, हलवणारा आणि सुन्न करून जाणारा हा प्रयोग पुणे विद्यापिठाची [ललित कला केंद्राची] नाट्यशास्त्राची विद्यार्थिनी प्रमिती नरके हिने सादर केला.या संहितेचे मराठी भाषांतरही प्रमितीनेच केलेले आहे. आयुकात झालेल्या कार्यक्रमाला ख्यातनाम शास्त्रज्ञ डा‘. जयंत नारळीकर, आयुकाचे संचालक डा‘. अजित केंभावी आणि अनेक शास्त्रज्ञ उपस्थित होते. या एकपात्री प्रयोगातून प्रमितीने स्त्रियांच्या समकालीन परिस्थितीवर केलेले भाष्य अस्वस्थ करून जाते. सर्व स्त्री-पुरूष या अनुभवाने सुन्न होतात. तरूण मुलांमुलींनी या कलात्मक प्रयोगाला विशेष दाद दिली. प्रमितीने मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमधून हा प्रयोग सादर केला.शमा भाटे, प्रा. श्रुती तांबे, प्रा. धनमंजिरी साठे प्रयोगांना उपस्थित होते. एक रंगकर्मी म्हणून आपण या प्रयोगाद्वारे तरूणांना समकालीन प्रश्नांवर बोलते करण्यासाठी हा प्रयोग करीत असल्याचे प्रमितीने सांगितले. विद्यापिठाच्या विविध विभागांमध्ये जाऊन युवकांना या प्रयोगाद्वारे स्त्री प्रश्नांवर जागृत करण्याचा तिचा मानस आहे. तिला डा‘. सतिष आळेकर यांचे या प्रयोगासाठी मार्गदर्शन लाभले आहे.

No comments:

Post a Comment