Thursday, May 29, 2014

सामान्य माणसाची स्मरणशक्ती

1.
माणसाची शैक्षणिक अर्हता आणि त्याची गुणवत्ता ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात हे ज्यांना नव्याने कळले त्यांचे हार्दीक अभिनंदन. याचा अर्थ शिक्षणाने माणसाची योग्यता कमी होते असा घेतला जाऊ नये इतकेच. वसंतदादा पाटील, इंदीरा गांधी, जे.आर.डी.टाटा, धीरूभाई अंबानी यांचे औपचारिक शिक्षण पदवीइतकेही झालेले नव्हते.सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर, आशा भोसले, यांचे शिक्षण फारसे नसले तरी ती ही यशस्वी आणि गुणवान मंडळी आहेत.
मूळची प्रतिभा, व्यावहारिक शहाणपण, कष्ट, संधी आणि झोकून देण्याची वृत्ती यातूनच माणसं सिद्ध होतात.शिक्षणाने त्यात भर पडते.पैलूच पडतात म्हणाना. मात्र शिक्षणाने ही गुणवत्ता कमी होते असे मानायची गरज नाही.
अशा स्थितीत देशातल्या सगळ्या विद्यापिठांचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ आणि संशोधक यांच्याशी ज्यांचा संबंध येणार त्या खात्याच्या मंत्रीपदी उच्चशिक्षित किमान पदवीधर व्यक्तीची नियुक्ती झाली असती तर ......

.........................................
2.
सामान्य माणसाची स्मरणशक्ती फार कमजोर असते, असे म्हणतात. श्री.टी.एन. शेषन हे देशाच्या स्मृतीचे महत्वाचे संरक्षक मानायला हवेत. त्यांनी निवडणुकीतील उमेदवाराने निवडणुकीत प्रतिज्ञापत्राद्वारे स्वत:बद्दल माहिती देण्याची पद्धत सुरू केली. त्यामुळे २००४ साली पदवीधर असणारे १० वर्षांनी म्हणजे २०१४ साली पदवीधरऎवजी अवघे एफ.वाय. बी.को‘म. होऊ लागले. हा चमत्कारच म्हणायला हवा.धन्यवाद शेषनजी.
नैतिकतेवर नेहमीच ज्यांचा भर असतो, जे शिक्षणात "नैतिक शिक्षण" दिले पाहिजे असे म्हणतात त्यांची शिक्षणमंत्र्यांच्या या नैतिकतेवरची प्रतिक्रिया काय?
......................................................
3.
माझ्या माहिती आणि समजुतीनुसार यावेळी निवडणुकीत श्री.नरेंद्र मोदींचे ४ मुख्य विषय होते, सुशासन, विकास, महागाई, आणि भ्रष्टाचार. लोकांनी मोदी सरकारला दिलेला जनादेश म्हणजे या ४ मुद्यांना धरून दिलेले जनसमर्थन होय. असे असेल तर मग पहिल्याच दिवशी सरकारने कलम ३७० चा मुद्दा चर्चेला घेणे कितपत योग्य होते? जम्मू काश्मिर या एका राज्याशी संबंधित विषय हा संपुर्ण देशासमोरचा एकमेव महत्वाचा विषय कसा बनला? तो देशाचा आजचा सर्वाधिक अग्रक्रमाचा विषय आहे काय? आणि सुशासन, विकास, महागाई, आणि भ्रष्टाचार या ४ विषयांशी त्याचा कसा संबंध येतो? जनतेने ३७० च्या मुद्यावर मोदी सरकारला हे जनसमर्थन दिलेले आहे काय? चर्चा उपस्थित करताना काही काळ-वेळ बघायची असते की नाही?हा विषय जर एव्हढाच तातडीचा होता तर तो या निवडणुकीत अग्रक्रमाने का मांडण्यात आला नाही? श्री. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात तो का आला नव्हता? हे आम्हा सामान्य नागरिकांना समजेल अशा पद्धतीने कोणी सांगेल काय?

Sunday, May 25, 2014

गंभीर नी ज्ञानमय कार्यक्रम

अक्षर मानव या संस्थेचा "लेखन कार्यशाळा" हा मोलाचा उपक्रम आहे. दर महिन्याला एका रविवारी विविध क्षेत्रातील १०० ते १५० लोक एकत्र जमून एका वाड्मय प्रकारावर अकादेमिक चर्चा करतात. आधी दीडतास विषयाची मांडणी केली जाते. नंतरचा दीडतास चर्चा आणि संवादाचा असतो. पार मुंबई नी नगरपासून लोक येतात. अर्धा दिवस एकत्र घालवतात. साहित्यविश्वाची सफर करतात. यावेळी मला दिलेला विषय होता, "संशोधनपर लेखन, चरित्रपर लेखन- वैचारिक लेखन" आपल्याकडे "संशोधनपर लेखन, चरित्रपर लेखन- वैचारिक लेखन" याचे दालन अतिशय समृद्ध आहे. फुले-आंबेडकर,लोकहितवादी, टिळक, आगरकर,रानडे, राजारामशास्त्री भागवत, सर रा.गो.भांडारकर, राजवाडे, केतकर, भारतरत्न पां.वा.काणे, सावरकर,तर्कतीर्थ, शेजवलकर, गं.बा.सरदार, इरावतीबाई, घुर्ये, मिराशी, ते य.दि.फडके, धनंजय कीर, मे.पुं.रेगे, नरहर कुरूंदकर, खैरमोडे, पगडी, कोलते, बागूल, रा.चिं.ढेरे, शरद पाटील, रावसाहेब कसबे, ग.भा.मेहेंदळे, मोरे आदींनी या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केलेली आहे. तटस्थ, सत्यनिष्ट, साधार, सप्रमाण, तर्कशुद्ध, काटेकोर, तारतम्यबुद्धीचे लेखन करणे, दुषित पुर्वग्रहांपासून मुक्त राहणे, व्यक्तीगत नी जातीगत हितसंबंधावर मात करणे, कायम हार आणि प्रहार स्विकारण्याची तयारी ठेवणे, अजातशत्रू होण्याची आस बाळगण्याऎवजी भुमिका घेणे, लिंगभाव, वर्ग, धर्म, प्रांत, भाषा यांची दडपणे झुगारून निर्भीडपणे मांडणी करणे या संदर्भात वरील मंडळींचे योगदान अतिशय मोलाचे राहिलेले आहे. भारतीय समाजातील फुले-आंबेडकरवादी, मार्क्सवादी, गांधीवादी, सावरकरवादी {हिंदुत्ववादी} अशा विविध विचारधारा आणि त्यांच्या सामर्थ्य व मर्यादा यासंदर्भातील भान ठेवण्याची गरज असते. विभुतीपुजा, उदात्तीकरण, आरत्या ओवाळणे किंवा द्वेषबुद्धीने केवळ विकृतीकरण/मुर्तीभंजन करणे यापासून सावध राहण्याची गरज असते. चिकित्सा करताना निर्वैर वृत्ती हवी. उमदेपणा, खिलाडूपणाही हवा.पुराभिलेखागारातील दस्तावेज, ग्रंथालयतील विविध संदर्भग्रंथ, हस्तलिखित पोथ्या, शिलालेख, ताम्रपट यांचे पुराव्याचे दृष्टीने असलेले महत्व, अंतर्गत प्रमाणे, शिस्त आणि ज्ञाननिर्मितीची ओढ यांचे स्थान अशा विविध मुद्यांवर सखोल चर्चा झाली. आजच्या अस्मितेच्या राजकीय वातावरणात संशोधनपरलेखन करणे अवघड बनत चालल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.आज जातीयवादी शक्ती चढ्या सुरात, विकृत पद्धतीने करीत असलेले इतिहासाचे फेरलेखन घातक असल्याचे अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाला दर्दी मंडळींची उत्तम उपस्थिती होती. या गंभीर नी ज्ञानमय कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल श्री.राजन खान व त्यांच्या सहकार्‍यांचे आभार.....
 

Monday, May 19, 2014

सुट्टीतील कामातूनच घडलो

http://epaper.eprabhat.net/274165/Pimpri-Chinchwad-Edition/pimpri-edition#page/18/2..
Prabhat, Pune, Good Morning Pune, Sunday, 18 May, 2014, pg 5


सुट्टीतील कामातूनच घडलो- प्रा.हरी नरके
 {मोठे जेव्हा छोटे होते}
प्रभात, पुणे, गुडमो‘र्निंग, रविवार, दि.१८मे २०१४, पान ५
सुट्टीचं पान

Sunday, May 18, 2014

मंडल ते मोदी



हे छायाचित्र आहे, मंडल आयोगाची अंमलबजावणी त्वरित झाली पाहिजे या लढ्याबद्दल आदरणीय नानासाहेब गोरे यांच्या हस्ते झालेल्या माझ्या सत्काराचे. मंडल आयोगाचा अहवाल १९८० साली आला. त्यावेळी त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, देशातील मजूर, कामगार, कष्टकरी असलेल्या अठरा अलुतेदार-बारा बलुतेदार, ओबीसी वर्गाला न्याय आणि घटनात्मक संरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आम्ही वयाच्या अवघ्या १७/१८ वर्षाचे असताना संघर्ष करीत होतो.गंमत बघा, त्यावेळी ज्यांचा याला उघड आणि संपुर्ण विरोध होता त्यांनी विरोधासाठी सगळे मार्ग वापरून पाहिले. सतत दहापंधरा वर्षे त्यांचे हे फंडे यशस्वी होत नाहीत असे बघून त्यांनी आपली रणनीती बदलायचे ठरवले. त्यावेळी मंडल पर्वाला प्राणपणाने विरोध करणारे पुढे इतके बदलले की त्यांनी मंडल कार्ड वापरून आज देशात संपुर्ण बहुमत मिळवले. मंडल ते मोदी याप्रवासाचे स्मरण देणारे हे छायाचित्र. एक ओबीसी {तेली समाजाचा} माणूस देशाचा पंतप्रधान होत असताना त्या सगळ्या आठवणी दाटून आल्या.....दुसरे काय म्हणणार? "कालाय तस्मै: नम:! नमो नम:!"

Saturday, May 17, 2014

जादुगार मोदी


                                       

अबकी बार - मोदी सरकार
संघपरिवाराची रणनिती, विकासाचे गुजरात मो‘डेल, अमेरिकन पद्धतीचे मिडीय़ा मार्केंटिंग, केंद्रातील [अलाइअन्स] युती सरकारचा धोरणलकवा व नरेंद्र मोदींचे व्यापारी व्यवस्थापन कौशल्य आणि को‘न्ग्रेसची पराभूत मानसिकता या सगळ्यांतून नरेंद्र मोदींचा हा ऎतिहासिक विजय साकार झालेला आहे. मंडल पर्व ते ओबीसी नरेंद्र मोदींचे पर्व हा भारतीय लोकशाहीचा फार मोठा प्रवास आहे. गेल्या २५ वर्षात प्रथमच  एका पक्षाला संपुर्ण बहुमत मिळण्याचा अर्थ भारतीय लोकशाही अधिक पक्व झाली असा लावायचा की १९५२ आणि १९७२ नंतर प्रथमच अधिकृतपणे विरोधीपक्ष नेता नसलेली लोकसभा अस्तित्वात येऊन लोकशाही कमकुवत झाली असे मानायचे? भारतीय जनता मुर्ख असल्याने "ज्यांचा लोकशाहीप्रणालीवरच विश्वास नाही त्यांच्याकडेच सत्तासुत्रे सोपवून तिने पायावर दगड मारून घेतला असे काहींचे म्हणणे आहे. ही भुमिका मला तरी लोकशाहीविरोधी वाटते. मोदींच्या यशाचा आदर केला पाहिजे.जनादेशाचा सन्मान राखायला हवा. तथापि जनता सर्वज्ञ असते हेही खरे नाही. जनता सतत प्रयोग करून बघत असते. नरेंद्र मोदींनी जी स्वप्ने दाखवली त्यावर लोकांनी विश्वास ठेवला.गेल्या ३७ वर्षात संघपरिवाराने अथक परिश्रमाने जे कार्यकर्त्यांचे विविध क्षेत्रात जाळे उभारले त्याचे हे यश आहे. लोकांना बदल हवा होता. आधीच्या सरकारच्या १० वर्षातल्या दारूण अपयशाला जनता वैतागली होती. ती भ्रष्टता आणि निकम्मेपणाला कंटाळली होती. गवर्नन्सच्या अभावी निर्माण झालेली पोकळी आपण गुड गवर्नन्सने भरून काढू असे नरेंद्र मोदींनी जे सांगितले त्यावर जनता विसंबली. १९६७ साली राम मनोहर लोहियांनी सुरू केलेल्या को‘न्ग्रेसेतरवादाची परिनती २०१४ला मोदी सरकारमध्ये झाली असे मानणे म्हणजे को‘न्ग्रेसच्या संधीसाधूपणावर आणि पराभूत मानसिकतेवर पांघरूण घालणे होय.महाराष्ट्रातील महायुतीचे अभुतपुर्व यश हे नरेंद्र मोदींचे वरिल समिकरण अधिक गोपीनाथ मुंढेचे सोशल इंजिनियरिंग यांचे जसे यश आहे तसेच ते सत्यशोधक नी ब्राह्मणेतर  चळवळीचे ज्यांनी अपहरण करून, "बहुजनांच्या नावावर"  फक्त एकजातीय सत्ताधारी मानसिकता घडवली, पोसली त्यांना जनतेने दिलेली ही चपराक आहे असे मला वाटते.
एकेकाळी उद्योगपती, माध्यमे, उच्चवर्णीय आणि उच्च तसेच मध्यमवर्गाचे मनमोहन सिंग अतिशय लाडके होते. आज ती जागा  नरेंद्र मोदींनी घेतली आहे. को‘न्ग्रेसने आपला जनाधार गमावला आहे. दलित-आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यांक हे आजवर को‘न्ग्रेससोबत राहिले. त्यांनाही आपली फसवणूक झाली असे का वाटते? २ आक्टोबर २०११ला सरकारने ओबीसींच्या मागणीवरून आर्थिक व शैक्षणिक जनगणना सुरू केली. जे सरकार १२५ कोटींची दशवार्षिक जनगणना अवघ्या सहा महिन्यात पुर्ण करते त्यांनी अडीच वर्षे झाली तरी हे काम लोंबकळत ठेवले आहे.राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि ओबीसीद्वेष यातून हे घडले असे त्यांनी का मानू नये?
सत्ताधारी मानसिकतेला पराभव पचवणे शक्य होणार नाही. ते आत्मवंचना करीत राहणार. मोदींना टार्गेट करून त्यांनीच मोठे केले. चतुर, मुत्सद्दी आणि कष्टाळू मोदींनी असा सापळा लावला की सत्ताधारी अलगदपणे त्यात येऊन पडले. सत्ताधार्‍यांनो, उठसूठ मोदींना शिव्याशाप देण्याऎवजी जरा आत्मपरिक्षण करा. एकजातीय सत्ता मग ती पहिल्या वर्णाची असो की दुसर्‍या या देशात फार काळ टिकत नाही हे कधीतरी समजून घ्या. मस्ती, मग्रुरी, दादागिरी यांचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा जनता तिसरा डोळा उघडते.तिला गृहीत धरणारे, खिश्यात घालून फिरणारे, आपणच महाराष्ट्राचे एकमेव दुकानदार असे माणणारे यांना जनतेने नाकारले आहे.
अच्छे दिन आनेवाले है, आरामच आराम मिळे, जादुगार मोदी जादूची कांडी फिरवतील आणि सारा भारत सुखी-संपन्न होईल असे मी मानत नाही.विकासात माताबालक मृत्यू दर, शिक्षण, कृषि, वीज, पाणी,रस्ते यात महाराष्ट्र गुजरातपेक्षा पुढे असूनही स्वातंत्र्यानंतर प्रथमच महाराष्ट्रात प्रस्थापितांचे एव्हढे भयंकर पानीपत का झाले? जातीयवाद आणि फसवणूक यांनी कळस गाठल्याने प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी  जनता का एकवटली यावर आत्मचिंतन होणार की सत्ता जाण्याचे सूतक पाळणारे, फक्त उरबडवेपणा करीत बसणार हे येणार्‍या काळात दिसेलच.सत्ताधार्‍यांना विरोधात बसायची सवय नाही.सत्तेत असताना अनेक वर्षे निष्क्रीय राहिले किंवा खिसे भरत राहिले, आता ५ वर्षे आराम करतील.


Friday, May 9, 2014

आमच्या आंतरजातीय लग्नाची गोष्ट-
















माझी आई अतिशय तापट स्वभावाची होती. आईला जेव्हा मी जातीबाहेरच्या मुलीशी लग्न करणार आहे असं सांगितलं तेव्हा ती जाम भडकली. तिनं खूप आदळआपट केली. तू झालास तेव्हा मी तुझ्या नरडीला नख लावून टाकायला हवं होतं. तू जातीबाहेर लग्न केलंस तू आम्हाला मेलास, ...वगैरे हिंदी, मराठी, कन्नड, तेलगू सिनेमातले संवाद तिने म्हणून दाखवले. आपल्या जातीत मुलींचा काय दुष्काळ पडलाय का? तुला हवी तशी मुलगी आणून उभी करते, तू पसंद कर असा तिने आदेश दिला. तू जातीबाहेर लग्न केलं तर आपले नातेवाईक-सोयरेधायरे काय म्हणतील? आपल्याला त्यांनी वाळीत टाकलं तर तुझ्या लहान भावाबहिणींची लग्नं कशी  होणार? तिचा आंतरजातीय विवाहाला ठाम विरोध होता.
मी लग्न करणार तर ते जातीबाहेरच्याच मुलीशी, मात्र मी पळून जाऊन लग्न करणार नाही. लग्न झालं तर ते तुझ्या उपस्थितीतच होईल असा शब्द मी तिला दिल्यावर ती निर्धास्त झाली.


मधे काही वर्षं गेली. दरम्यान मी तिला माझ्या मित्रमैत्रिणींच्या घरी नेत असे. अनेकदा ती तिकडे मुक्काम करील अशी व्यवस्था करीत असे. त्यांना माझ्या घरी राहायला बोलवित असे. त्यांच्या आईवडीलांनाही माझ्याकडे राहायला बोलवित असे. आईसोबत ते राहतील अशी व्यवस्था करीत असे. मी शाळेत असल्यापासून सामाजिक चळवळीत क्रियाशील असल्याने घरी नानाविध जातीधर्माच्या लोकांचा कायम राबता असायचा. आईचीही त्यांच्याशी दोस्ती होत असे. माणसं एकत्र आली, एकत्र प्रवास केला, मुक्कामाला राहिली की जातीपातीचे गैरसमज गळून पडतात. माझी आईही अशीच हळूहळू निवळत गेली. तिची जातीपातीची जळमटं निघून गेली. माझा करीन तर जातीबाहेरच्याच मुलीशी लग्न करीन नाहीतर अविवाहीत राहीन हा निर्धार कायम असल्याचं बघून आईनं माझ्यासाठी जातीबाहेरची एक मुलगी पसंत केली. मी अतितात्काळ, अगदी निमुटपणे होकार दिला. मी याबाबतीत आत्यंतिक आज्ञाधारक मुलगा होतो. मी तिच्या शब्दाबाहेर नाही, तू म्हणशील तिच्याशी मी लग्न करतो असं मी म्हटल्यावर ती एकदम खूष झाली. मीही खूष होतो कारण आईची आणि माझी पसंत एकच होती. अर्थात हा केवळ योगायोग नव्हता तर त्यामागे काही वर्षांची मेहनत होती. चिकाटी आणि विश्वास होता.

प्रख्यात चित्रकार आणि सन्मित्र संजय पवार यांनी एक कलात्मक डिझाईन असलेली निमंत्रणपत्रिका तयार केली. आमच्या दोघांच्या सहीचं ते साधंसं पत्र होतं. आम्ही १ मे १९८६ ला आंतरजातीय विवाह करतोय. शुभेच्छा आणि आशिर्वाद द्यायला तुम्ही आप्तेष्ठ आणि मित्र नक्की यावे असा त्यात मजकूर होता.
आंतरजातीय विवाह करतोय ही पत्रात स्पष्ट नोंद करण्यामागे २ कारणं होती. एकतर आमचे काही जवळचे नातेवाईक फार बेरकी होते. तुम्ही अशा जातीबाहेरच्या लग्नाला कशाला गेलात असं जर कुणी नंतर त्यांना विचारलं असतं तर ते सरळ असं सांगून मोकळे झाले असते की लग्न जातीबाहेर होतंय हे आम्हाला माहितच नव्हतं. दुसरं म्हणजे आंतरजातीय विवाहशिवाय जातीनिर्मुलन शक्य नाही हा फुले-शाहू- गांधी-आंबेडकर यांचा विचार आम्हाला पटलेला होता. मग ताकाला जाऊन भांडं का लपवा?


लग्न करायचं ठरलं तेव्हा ते कोणत्या पद्धतीनं करावं याबाबत स्पष्टता होती. सत्यशोधक पद्धतीनं लग्न करून त्याची नोंदणी करायची असा आमचा निर्णय झालेला होता. तेव्हा मी साडॆसतरा नळी येथील वस्तीत राहत होतो. आजुबाजूला झोपडपट्टी आणि आमचंही घर कच्च्या विटांचं {भेंड्यांचं} वर गवताचं छप्पर. नळ नाही. संडास - बाथरूम नाही. संगिता मुंबईची. तिला याची सवय नसल्यानं या सगळ्याचा त्रास होणार. मग पहिली गोष्ट केली म्हणजे पिंपरीला अजमेरा कॉलनीत वन रुम किचनचा फ्लॅट बूक केला.

लग्न अजिबात खर्चिक असू नये पण ठरवून आंतरजातीय करतोय तर गपचूप किंवा पळून जाऊन केलं असं होऊ नये म्हणून मोजक्या मित्र, नातेवाईकांच्या उपस्थितीत ते करावं असं ठरवलं होतं. पुण्याच्या हॉटेल श्रेयसच्या अंबर सभागृहात विवाह नोंदणी आणि स्वागत समारंभ एकत्रित पार पडला. श्रेयस हॉटेलचाही एक मजेदार किस्सा झाला. आमचे एक मित्र, मार्गदर्शक आणि नेते असं म्हणाले की, " लग्न साडेसतरा नळीवरच करायचं. अवघ्या १० ते १५ लोकांनाच बोलवायचं आणि आलेल्यांना फार फार तर चहा फक्त द्यायचा. बाकी काहीही खर्च करायचा नाही."  

मला हे पटत नव्हतं. आलेल्यांना जेवन द्यावं. माझा गोतावळा प्रचंड असल्यानं निदान १०० लोकांना निमंत्रित करावं असं मला वाटत होतं. नेते मानायलाच तयार नव्हते. शेवटी मी भाईंकडे { पु.ल.देशपांडे यांच्याकडे} गेलो. त्यांना माझी अडचण सांगितली. ते म्हणाले, " हरी, तू अजिबात काळजी करू नकोस. लग्न ही एरंडेल पिऊन स्मशानात करायची गोष्ट नाही. तो आयुष्यतला आनंदसोहळा असतो. तो खर्चिक असू नये हे ठिक आहे. पण आलेल्यांना तुला जेवन द्यायचंय तर अवश्य दे. एकतर आपण पुणेकर आधीच आतिथ्यासाठी "जगप्रसिद्ध " आहोत. त्यात आणखी भर नको. मी बघतो या नेत्यांकडे."

भाईंनी नेत्यांना फोन केला. बोलवून घेतलं. भेटीत त्यांना भाई म्हणाले, " हरी - संगिता लग्न करतायत. तुम्ही जरा लक्ष घाला. काही मंडळी लग्नात त्यांनी जेवन देऊ नये, हॉल घेऊ नये, घरीच लग्न करावं, फक्त चहाच द्यावा असला हेकटपणा करीत असल्याचं माझ्या कानावर आलंय. तुम्ही जरा बघा, ही कोण मंडळी आहेत ते. नी त्यांना सांगा, समजवा. गरज पडली तर मीही त्यांना भेटायला येतो. तुमच्यावर ही जबाबदारी मी सोपवू ना?"

नेते सटपटले. म्हणाले, " मी करतो व्यवस्था. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हीच लग्नाला येताय नी तुमची इच्छा आहे म्हटल्यावर काहीच अडचण नाही भाई."

भाई म्हणाले, "ही हरी - संगिताची इच्छा आहे, नी लग्न त्यांचं आहे, तेव्हा, तुम्ही लागा कामाला."


लग्नाला ज्येष्ट विचारवंत गं.बा. सरदार, पु.ल. नी सुनिता देशपांडे, निळू फुले, बाबा आढाव, विद्या बाळ, भाई वैद्य, लक्ष्मण माने, प्रा. ग.प्र. प्रधान, सय्यद भाई, पन्नालाल सुराणा, लक्ष्मण गायकवाड, सदा डुंबरे, अरूण खोरे, साधना व डॉ. नरेश दधिच, संजय पवार, सुनिल तांबे, ह.मो.मराठे, डॉ. सत्यरंजन साठे, डॉ. अनिल अवचट, यदुनाथ थत्ते, डॉ. निलम गोर्‍हे, जयदेव गायकवाड, विनय हर्डीकर, उज्वला मेहेंदळे आणि प्रा.शशि भावे आणि इतर अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. जवळचे नातेवाईक, मित्र आणि सामाजिक चळवळीतले सहकारी असे सगळे मिळून सुमारे १०० लोकं असतील.

नोंदणी अधिकारी श्री. अंबर पवारही मित्रच असल्यानं त्यांनी नोंदणी फीही घेतली नाही आणि लग्नाचं नोंदणी प्रमाणपत्रही मोफत घरपोच केलं.

माझ्या लग्नात सन्मित्र अ‍ॅड. उपेंद्र खरेनं खूप मेहनत केली. मित्रवर्य डॉ. मंदार परांजपेनं त्याची कार आम्हाला घरी सोडायला दिलेली. रफिक शेख या मित्रानं व्हिडीओ शुटींग केलेले. विद्या कुलकर्णीनं फोटो काढलेले. संजय पवारनं रोजनिशीच्या पानाची सुंदर नी कलात्मक लग्नपत्रिका बनवलेली.

लग्नात मी तर प्रचंड गांगरून गेलेलो. माझे फोटो इतके बावळट आलेत की बघितले की आपण असे का वागत होतो? असा प्रश्न पडतो. पुर्वानुभव नसल्यानं बहुधा असं होत असावं. खरेदी अशी काही केलीच नव्हती पिंपरीचा फ्लॅट सोडला तर!

माझी आई, भाऊ, मामा, मावशा, नी सगळेच जवळचे नातेवाईक डेक्कन जिमखान्यावरच्या  श्रेयस हॉटेलमध्ये आयुष्यात पहिल्यांदाच जेवले. कदाचित कोणत्याही हॉटॆलात जाण्याचा त्यांचा आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग असावा.

मुलीकडचे लोक अगदी पाहुण्यासारखे आले. जेवले नी गेले. मुलीच्या लग्नाची काहीही तोशिष आपल्याला पडली नाही, काडीचाही खर्च करावा लागला नाही याचा तरी त्यांना अनंद झाला की नाही, माहित नाही. कायम स्वत:वरची जबाबदारी दुसर्‍यावर झटकून जगणारे आप्पलपोटे लोक.

लग्नानंतर कितीतरी वर्षे घरात टि.व्ही. नव्हता. कृष्णधवल पोर्टेबल टि.व्ही. आला तोच पाचेक वर्षांनी. फ्रीज नी फोन यायला तब्बल १२ वर्षे लागली. घरात सोफा नी डायनिंग टेबल यायला तर २० वर्षे लागली.

काही लोक दागिने मोडून खातात तर काही गरिबी! आम्हाला तसे काहीच करायचे नव्हते. नाही.

आमचा प्रवास झकास झाला तो परस्पर विश्वासानं, सोबतीनं. साथीनं. दिवस कसे भुर्कन उडून गेले. संकटे आली, हल्ले झाले, अजुनही होतात, होतीलही, कारण भुमिका घ्यायची म्हटलं, की प्रस्थापित व्यवस्थेतल्या ज्यांचे हितसंबंध धोक्यात येतात ते अंगावर येणारच. आम्हाला अजातशत्रू व्हायची आकांक्षा नाही. ज्यांची मानसिकता मुलत:च लुटीची, भिकेवर पोसलेली, गुन्हेगारीवृत्तीची आणि दरोडे घालायची असते त्यांच्याशी मैत्री कशाला? ते विरोधात असणे हेच सन्मानाचं नाही का?

म्हणता म्हणता ३२ वर्षे झाली....दिवस किती भुरकन गेले. कालपरवा लग्न झालं असंच वाटतय..."नांदा सौख्यभरे" हे तुम्हा आप्तेष्ठांचे आशिर्वाद जगणं सुखाचं करून गेले. 

- प्रा.हरी नरके, २१ सप्टेंबर २०१८ [ पुनर्लेख ]
...............................

मित्रवर्य श्री. धर्मेंद्र जोरे यांनी सुचना केल्यावरुन लग्नाची काही क्षणचित्रे {१ मे १९८६} सोबत  दिली आहेत. छायाचित्रात सोबत: आदरणीय सुनिता देशपांडे, {आहे मनोहर तरी} प्रा. ग.प्र. प्रधान,श्री.पन्नालाल सुराणा, श्री.सय्यदभाई, माझी आई दिवंगत सोनाई आणि माझा मोठा भाऊ लक्ष्मण, संजय पवार, विद्या कुलकर्णी, सुनिल तांबे, सविता कुडतरकर, आमदार डा. निलम गोर्‍हे, नोंदणी अधिकारी श्री. अंबर पवार, स्थळ: अंबर हाल, हो‘टेल श्रेयस, डेक्कन जिमखाना, पुणे..दि.१ मे १९८६


आणि हे आजचे छायाचित्र.

Thursday, May 1, 2014

आज लग्नाला २८ वर्षे झाली.

आज १ मे..महाराष्ट्र दिन..आंतरराष्ट्रीय कामगार दिन.






आज आमच्या लग्नाला २८ वर्षे झाली. दिवस किती भरभर जातात. कालपरवा लग्न झालं असच वाटतय.एकमेकांच्या साथीने, सोबतीने कधी मजेत, कधी धडपडत, ठेचकाळत पण सतत परिस्थितीशी झगडत, एव्हढा प्रवास कधी झाला ते कळलच नाही.
२८ वर्षापुर्वीच्या आणि या २८ वर्षातल्या कितीतरी छान आठवणी आहेत.
लग्न करायचं ठरलं तेव्हा ते कोणत्या पद्धतीनं करावं याबाबत स्पष्टता होती. नोंदणी पद्धतीनं, सत्यशोधक पद्धतीनं ते करायचा निर्णय झालेला होता. तेव्हा मी साडॆसतरा नळी येथील वस्तीत राहत होतो. आजुबाजूला झोपडपट्टी आणि आमचंही घर कच्च्या विटांचं{भेंड्यांचं} वर गवताचं छप्पर. नळ नाही. संडास - बाथरूम नाही. संगिता मुंबईची.तिला याची सवय नसल्यानं या सगळ्याचा त्रास होणार.मग पहिली गोष्ट केली म्हणजे पिंपरीला अजमेरा को‘लनीत वन रुम किचनचा फ्ले‘ट बूक केला.
लग्न अजिबात खर्चिक असू नये पण ठरवून आंतरजातीय करतोय तर गपचूप किंवा पळून जाऊन केलं असं होऊ नये म्हणून मोजक्या मित्र, नातेवाईकांच्या उपस्थितीत ते करावं असं ठरवलं होतं. हो‘टेल श्रेयसच्या अंबर सभागृहात विवाह नोंदणी आणि स्वागत समारंभ एकत्रितच पार पडला. श्रेयस हो‘टेलचाही एक मजेदार किस्सा झाला. आमचे एक मित्र, मार्गदर्शक आणि नेते असं म्हणाले की, " लग्न साडेसतरा नळीवरच करायचं. अवघ्या १० ते १५ लोकांनाच बोलवायचं आणि आलेल्यांना फारफार तर चहा फक्त द्यायचा.बाकी काहीही खर्च करायचा नाही. मला हे पटत नव्हतं. आलेल्यांना किमान जेवन द्यावं आणि आमचा गोतावळा प्रचंड असल्यानं निदान १०० लोकांना निमंत्रित करावं असं मला वाटत होतं. नेते मानायलाच तयार नव्हते. शेवटी मी भाईंकडे {पु.ल.देशपांडे यांच्याकडे} गेलो. त्यांना माझी अडचण सांगितली. ते म्हणाले, " हरी, तू अजिबात काळजी करू नकोस.लग्न ही एरंडेल पिऊन स्मशानात करायची गोष्ट नाही.तो आयुष्यतला आनंदसोहळा आहे. तो खर्चिक असू नये हे ठिक आहे.पण आलेल्यांना तुला जेवन द्यायचय तर अवश्य दे. एकतर आपण पुणेकर आधीच आतिथ्यासाठी "जगप्रसिद्ध "आहोत. त्यात आणखी भर नको. मी बघतो नेत्यांकडे."
भाईंनी नेत्यांना फोन केला. म्हणाले, "हरी संगिता लग्न करतायत. तुम्ही जरा लक्ष घाला. काही मंडळी त्यांनी लग्नात आलेल्यांना जेवन देऊ नये, हो‘ल घेऊ नये, घरीच लग्न करावं, फक्त चहाच द्यावा असला हेकटपणा करीत असल्याचं माझ्या कानावर आलंय. तुम्ही जरा बघा, ही कोण मंडळी आहेत ते. नी त्यांना सांगा, समजवा. गरज पडली तर मीही त्यांना भेटायला येतो. तुमच्यावर ही जबाबदारी मी सोपवू ना?"
नेते सटपटले. म्हणाले, " मी करतो व्यवस्था. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हीच लग्नाला येताय नी तुमची इच्छा आहे म्हटल्यावर काहीच अडचण नाही भाई."
भाई म्हणाले, "ही हरी संगिताची इच्छा आहे, नी लग्न त्यांचं आहे, तेव्हा, तुम्ही लागा कामाला...."

 लग्नाला ज्येष्ट विचारवंत गं.बा. सरदार, पु.ल. नी सुनिता देशपांडे, निळू फुले, बाबा आढाव, विद्या बाळ, भाई वैद्य, लक्ष्मण माने, प्रा. ग.प्र. प्रधान, सय्यद भाई, पन्नालाल सुराणा, लक्ष्मण गायकवाड, सदा डुंबरे, अरूण खोरे, साधना व नरेश दधिच, संजय पवार, सुनिल तांबे, ह.मो.मराठे, सत्यरंजन साठे, अनिल अवचट, यदुनाथ थत्ते, निलम गोर्‍हे, जयदेव गायकवाड, विनय हर्डीकर, उज्वला मेहेंदळे आणि प्रा.शशि भावे आदी आवर्जून उपस्थित होते. जवळचे नातेवाईक, मित्र आणि सामाजिक चळवळीतले सहकारी असे सगळे मिळून सुमारे १०० लोक असतील.
नोंदणी अधिकारी  अंबर पवारही मित्रच असल्याने त्यांनी नोंदणी फीही घेतली नाही आणि लग्नाचे नोंदणी प्रमाणपत्रही मोफत घरपोच केले.
लग्नात मित्रवर्य अ‘ड. उपेंद्र खरेने खूप मेहनत केली. डो‘.मंदार परांजपेने त्याची कार घरी जायला दिलेली. रफिक शेख या मित्राने व्हिडीओ शुटींग केलेले.विद्या कुलकर्णीने फोटो काढलेले. संजय पवारने रोजनिशीच्या पानाची सुंदर नी कलात्मक लग्नपत्रिका बनवलेली.
मी तर प्रचंड गांगरून गेलेलो. माझे फोटो इतके बावळट आलेत की बघितले की आपण असे का वागत होतो? असा प्रश्न पडतो. पुर्वानुभव नसल्याने असे होणारच ना?  खरेदी अशी काही केलीच नव्हती. घर सोडले तर!
माझी आई, भाऊ, मामा, मावशा, नी सगळेच नातेवाईक डेक्कन जिमखान्यावरच्या  श्रेयस हो‘टेलमध्ये आयुष्यात पहिल्यांदाच जेवले.कदाचित कोणत्याही हो‘टॆलात जाण्याचा त्यांचा आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग असणार.
मुलीकडचे पाहुण्यासारखे आले. जेवले नी गेले. मुलीच्या लग्नाची काहीही तोशिष आपल्याला पडली नाही, काडीचाही खर्च करावा लागला नाही याचा तरी त्यांना अनंद झाला की नाही, माहित नाही.
लग्नानंतर कितीतरी वर्षे घरात टि.व्ही. नव्हता. कृष्णधल पोर्टेबल टि.व्ही. आला तोच पाचेक वर्षांनी. फ्रीज नी फोन यायला तब्बल १२ वर्षे लागली. घरात सोफा नी डायनिंग टेबल यायला तर २० वर्षे लागली.
काही लोक दागिने मोडून खातात तर काही गरिबी!!! आम्हाला तसे करायचे नाही.
 आमचा प्रवास झकास झाला तो परस्पर विश्वासाने, सोबतीने. साथीने. दिवस कसे भुर्कन उडून गेले. संकटे आली, हल्ले झाले, अजुनही होतात, होतीलही, कारण भुमिका घ्यायची म्हटलं, की प्रस्थापित व्यवस्थेतल्या ज्यांचे हितसंबंध धोक्यात येतात ते अंगावर येणारच. आम्हाला अजातशत्रू व्हायची आकांक्षा नाही. ज्यांची मानसिकता मुलत:च लुटीची, भिकेवर पोसलेली, गुन्हेगारीवृत्तीची आणि दरोडे घालणारी असते त्यांच्याशी मैत्री कशाला? ते विरोधात असणे हेच सन्मानाचे नाही का?
म्हणता म्हणता २८ वर्षे झाली....दिवस किती भुरकन गेले. कालपरवा लग्न झालं असंच वाटतय..."नांदा सौख्यभरे" हे तुमचे आशिर्वाद जगणं सुखाचं करून गेले...सगळ्यांना धन्यवाद. संगिता, मी तुझा कृतज्ञ आहे...!