Wednesday, October 22, 2014

फटाके : आनंद व्यक्त करण्याची अघोरी पद्धत.

फटाके : आनंद व्यक्त करण्याची अघोरी, अडाणी आणि असंस्कृत पद्धत.

आमच्या कुटुंबात गेली ५० वर्षे आधी गरिबीमुळे फटाके खरेदी करणे परवडत नाही म्हणून आणि नंतर परवडत असूनही विचारपुर्वक वरिल कारणांमुळे फटाक्यांवर बहिष्कार घालण्यात आलेला आहे.
..................................................................

मला फटाक्यांची चीड आहे. कानठळ्या बसवणारा तो गलिच्छ आवाज नको म्हणून गेली अनेक वर्षे आम्ही दिवाळीत शहरात राहणे टाळतो.

ध्वनी आणि हवेचे भयंकर प्रदुषण करणारे फटाके, उडऊन झाल्यानंतर परिसराचा अक्षरश: उकीरडा बनऊन टाकतात. एरव्ही स्वच्छतेबद्दल दक्ष असलेले महानगरी सुशिक्षित लोक फटाक्यांमुळे आपण परिसर अस्वच्छ केलाय तर तो आपणच साफ करायला हवा हे मात्र विसरतात. अशी साफसफाई करणारी एकही व्यक्ती मी गेल्या ५० वर्षात पाहिलेली नाही.याचा अर्थ फटाके उडवणारे सगळेच लोक बेजबाबदार आणि क्रूर असतात.

दुसर्‍यांना त्रास देऊन ज्यांना आनंद मिळतो ते समाजविघातक लोक होत. सर्व प्रकारचा शांतताभंग करणार्‍या नी भयावह प्रदुषणकारी फटाक्यांवर तात्काळ बंदीच घालायला हवी.

फटाक्यांच्या कारखान्यात बालमजुरांना राबऊन घेतले जाते.

आपल्या श्रीमंतीचे नागडेउघडे आणि बिभत्स प्रदर्शन करण्यासाठी मोठमोठे फटाके उडवले जातात.

त्यातून गरिबांनाही परवडत नसले तरी प्रसंगी कर्ज काढून फटाके खरेदी करावे लागतात.

संगित, नाट्य, साहित्य, दिवाळी अंक, फराळ, पर्यटन, खरेदी, सजावट, आकाश कंदील,रांगोळ्या आदी दीपोत्सवाच्या आनंदाचे अनेकानेक मार्ग असताना जे आनंद  व्यक्त करण्याची ही अघोरी, अडाणी आणि असंस्कृत पद्धत वापरतात त्यांची मला चीड येते.

आमच्या कुटुंबात गेली ५० वर्षे आधी गरिबीमुळे फटाके खरेदी करणे परवडत नाही म्हणून आणि नंतर परवडत असूनही विचारपुर्वक वरिल कारणांमुळे फटाक्यांवर बहिष्कार घालण्यात आलेला आहे.

मला फटाके वाजवणारे लोक आवडत नाहीत. जसे मला समाजविघातक लोक आवडत नाहीत.

फटाक्यांना मिळणारी प्रतिष्ठा नष्ट झाल्याशिवाय हे फटाक्यांचे गलिच्छ आकर्षण समाजातून हद्दपार होणार नाही.

फटाके हे दिवाळीचा आनंद नासवणारे भयंकर विषाणू हद्दपार करूया.

दिवाळीचा आनंद द्विगुणीत करू या.

एकाच कुटुंबातील तिघांची हत्या,

................................................http://epaper.esakal.com/sakal/22Oct2014/Enlarge/Ahmednagar/index.htm

पाथर्डीत एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून विहीरीत टाकले

जवखेडे खालसा, ता.पाथर्डी जि.अहमदनगर येथे गवंडीकाम करणारे संजय जगन्नाथ जाधव {वय ४५}पत्नी जयश्री आणि मुंबईत शिकणारा मुलगा सुनिल या तिघांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आलेली आहे. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून ते विहीरीत टाकून देण्यात आलेले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई, खर्डा आणि आता जवखेडे अशा एकाच प्रकारच्या घटना वारंवार का घडत आहेत?

१.पोलीस आणि प्रशासनाची जरब राहिलेली नाही. किंबहुना त्यांच्या संरक्षणात अशा घटना घडत आहेत काय?

२.जातीयवादी राज्यकर्त्यांचे अभय मिळालेली मंडळी ही हत्याकांडे करीत आहेत काय?

३.सरंजामदारी मानसिकतेला बळ देणार्‍या जातीय संघटनांची ढाल पाठीशी असल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत काय?

४. सहकारातून आलेली संपन्नता जातीय मानसिकतेला खतपाणी घालीत आहे काय?

५. ह्या केवळ सुट्या घटना नाहीत.जातीय दंगल जेव्हा  होते तेव्हा त्यामागे आग अनेक महिने धुमसत असते नी प्रासंगिक कारणाने ती पेट घेते तशीच जातीय विषवल्ली - जातीय अहंकार, दलितांविषयीचा तिरस्कार यांचे खदखदणारे रसायन नगर जिल्ह्यात कोठून आले आहे याची पाळेमुळे शोधली जायला हवीत.

घटना घडल्यानंतर चार दिवस चर्चा आणि नंतर सारे शांतशांत असे करून चालणार नाही.

संपूर्ण नगर जिल्हाच जातीय अत्याचारग्रस्त अतिसंवेदनशील जिल्हा म्हणून घोषित करून तेथील पोलीस आणि प्रशासनावर जबाबदारी निश्चित करायला हवीय का?

कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवली जायला हवी.

महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेला काळीमा फासणार्‍या या मानसिकतेचा तीव्र धिक्कार..

Monday, October 20, 2014

उग्र आणि मुजोर जातीयवादाला चपराक?


सर्वप्रथम मी या सत्तांतराचे जाहीरपणे स्वागत करतो. विजयी मंडळींचे अभिनंदन करतो आणि पराभुतांचे सांत्वन करतो.

राज्याच्या सत्तेचा चेहरा बदलतोय. तो अधिक सर्वसमावेशक होतोय. बहुजनवादाचा बुरखा घालून पेरलेला  उग्र आणि मुजोर  सत्ताधारी जातीयवाद पराभवाच्या दिशेने जाताना दिसतोय. काही मस्तवाल नी जातीयवादी नेत्यांना लोकांनी नाकारले आहे. नवे जागृत मतदार तयार होत आहेत. आम्हाला गृहीत धरणे आणि विद्वेषासाठी वापरून घेणे गेले ५०वर्षे चालूये, ते  आम्ही यापुढे खपऊन घेणार नाही, असे सांगत विद्यमान जातीय मतब्यांकांना भगदाडे पडत आहेत.

पैसा, पेड माध्यमांचा उपयोग करणे, "नोटा"चा वापर, हे वाढत आहेत. मतदारांनी निर्धार केला तर काही मुजोर जातीयवादी असे सरदार, मनसबदार, जहागिरदार, पाटील, देशमुख आणि संस्थानिक पराभूतही होऊ शकतात. पर्याय असेल तर मतदार नक्की तिकडे वळतात, असे राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या  निकालातून स्पष्ट होते असे मला वाटते.

सत्यशोधक चळवळीच्या पुण्याईवर महाराष्ट्राचा सामाजिक चेहरामोहरा बदलला गेला. त्याचेही एक समाजशास्त्रीय महत्व जरूर होते. मात्र लवकरच निवडणुकीच्या तंत्रावर पकड मिळवलेल्या सत्ताधारी, उग्र आणि मुजोर  जातीयवादी टोळ्यांनी  बहुजनवादाचा मूळ विचार आणि सामाजिक ध्येयवाद  बाजूला ठेऊन शिवछत्रपती आणि  फुले-शाहू-आंबेडकर यांचे केवळ नामस्मरण करीत वाटचाल सुरू केली. त्यांना या महापुरूषांच्या  विचारधारेशी काहीही देणेघेणे नव्हते. वापर तेव्हढा करायचा होता. ही केवळ तोंडपाटीलकी होती.

त्यातून सत्तेचा पाया आकुंचित झाला. एकजातीय चेहरा आक्रमक बनू लागला. पण हे लोक चतूर असल्याने त्यांनी चोराच्या उलट्या बोंबा या न्यायाने विरोधी छावणीच जातीयवादी असल्याचा जोरदार डांगोरा पिटला. राज्यात तीनचार समाजाच्याच संघटित मतब्यांका होत्या. त्याच्या जोरावर कधी त्यात युतीच्या नावावर आघाडी नी आघाडीच्या नावावर युती करण्यात आली नी सत्तेच्या चाव्या नी तिजोर्‍या कब्ज्यात ठेवण्यात आल्या.

१९८० च्या दशकात प्रथमच नव्या जाणीवांचा मतदार तयार होऊ लागला. १९९५ ला त्याचा परिणामही दिसला. पण त्याला अवघ्या ५ वर्षात कोप्च्यात ढकलण्यात जुनेजाणते यशस्वी झाले. त्यानंतर  गेल्या १५ वर्षात राज्य ज्या दिशेने जात होते ती नवी मोगलाईच होती.

या निवडणुकीत जाहीरपणे  विदर्भातील काही नेत्यांची नावे घेऊन राज्य "त्यांच्या" ताब्यात देणार काय? अशी उग्र जातीयवादी मांडणी केली गेली. तिला मतदारांनी धुडकाऊन लावले हे बरे झाले. बाबा-दादा-आबा परत आले असले तरी ते मतदारांनी दिलेल्या या फटकार्‍याचा गर्भित अर्थ समजू शकतील काय?

राज्यातील स्वत:ला पुरोगामी/परिवर्तनवादी म्हणवणार्‍या अनेक पढीक पंडीतांना राज्यातील सामान्य मतदारांना जे दिसते ते अजुनही दिसत नाही. हे महाभाग आजही १८१८ ते १९६० याच काळात वावरत आहेत. ते ज्यांना जातीयवादी म्हणून ठोकीत आहेत ते समावेशक बनलेत  नी ज्यांना पुरोगामी म्हणून  ते डोक्यावर मिरवीत आहेत ते जातीयवाद्यांचे आश्रयदाते नी पोशिंदे बनलेले आहेत.

 राज्याची शिक्षण, माध्यमे, प्रशासन, राजकारण या सगळ्यांची सुत्रे आज ज्यांच्या हातात एकवटली आहेत ते जेव्हा उघड नी जहरी जातीयवादाचे प्रवक्ते बनतात तेव्हा संतुलन ढासळते आणि मग परिवर्तन अटळ बनते. तथापि या परिवर्तनाचे आकलन करण्याची क्षमता विद्यमान तथाकथित पुरोगाम्यांकडे आहे काय? याचे उत्तर लवकरच मिळेल.

 मी या सत्तांतराचे जाहीरपणे स्वागत करतो.

Thursday, October 16, 2014

नमोभक्त आणि नमोरुग्ण




"मतदान करा" असे सांगणार्‍या मोहीमा जोरदारपणे चालवूनही सुमारे ६५ % मतदान झाले. हे प्रमाण खरेतर सरासरी ९०% ते ९५ %  पर्यंत जायला हवे. लोक मतदान का करीत नाहीत?

राजकारणाविषयीची तुच्छताबुद्धी, नेत्यांच्या दांभिकतेची लोकांना असलेली चिड आणि पैशाचा महापूर बघून आलेली किळस यातून  जो तिरस्कार मनात साकळतो त्यामुळे मतदान कमी होते का?

आपला देश विभुतीपुजकांचा देश आहे. लोकशाही जरी आपल्याकडे रूजली असली तरी आजही लोकांना एकखांबी तंबूचे जबरदस्त आकर्षण वाटत असते. त्यामुळेच नमोभक्त आणि नमोरुग्ण यांची संख्या खूप मोठी आहे.

आधींच्याबद्दलचा तिटकारा {प्रस्थापित विरोधी जनमत} आणि आक्रमक बाजाराच्या तालावर चालवली गेलेली प्रचारमोहीम यात कोणकोण बाजी मारतेय ते बघायचे.

अभय बंग म्हणाले तसा आता विचारधारेचा फरक हा पाचही प्रमुख पक्षांमध्ये केवळ तोंडी लावण्यापुरताच उरलेला असल्याने आणि निवडणुका लढवणे हे आता केवळ कोट्याधिशांनाच शक्य असल्याने आता फंडे फक्त सत्तेचे ...आणि सत्तेचे...
भाकरी फिरवली जाणार हे चंगलेच म्हणायचे.

Monday, October 13, 2014

Pramitee in "Tu Majha Sangatee" - as Awalee

Alok Jatratkar
1 hr · Kolhapur · 
First look of Pramitee Narke as Awlee in "Tu Majha Sangatee" on Life of Sant Tukaram, Serial on E tv Marathi. From Today at 7.30pm...Proud of you Dear. Congratulations to you and your proud parents Hari Narke and Sangita Narke.....Alok Jatratkar



प्रमिती आवलीच्या भुमिकेत

आज सोमवार दि.१३ आक्टोबरपासून, सायंकाळी ७.३० वाजता, ई टिव्ही मराठीवर,
प्रमिती आवलीच्या भुमिकेत


                                           {महाराष्ट्र टाइम्स, मुंबई, दि.१३ आक्टो.२०१४}


संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी आवली उर्फ जिजाबाई यांची संसारगाथा  "तू माझा सांगाती " सध्या ई टिव्ही मराठीवर दररोज सायं. ७.३० वा.सादर  केली जात आहे.. या अतिशय लोकप्रिय असलेल्या  मालिकेत चिन्मय मांडलेकर या गुणी अभिनेत्याने संत तुकाराम साकार केले असून छोट्या आवलीची भुमिका मृण्मयी सुपाळने केली होती. माझी मुलगी प्रमिती हिची यातल्या मोठ्या आवलीच्या भुमिकेसाठी निवड झाली आहे. तिची छोट्या पडद्यावरची ही पहिलीच भुमिका आहे. पुणे विद्यापिठाच्या ललित कला केंद्रामधून  {नाटयशास्त्र} अभिनयाची पदवी सुवर्णपदकासह प्राप्त केल्यानंतर प्रमिती आज तिच्या करियरला सुरूवात करीत आहे. आपल्या शुभेच्छा आणि आशिर्वाद यांची आवश्यकता आहे.

मालिका दिग्दर्शक आणि निर्माता -- संगीत कुलकर्णी.
संशोधन : उन्मेश अमृते
कथा -- ज्योती सागर.
पटकथा - शिरीष लाटकर.
संवाद : दिग्पाल लांजेकर
संगितकार -- अशोक पत्की.
कला दिग्दर्शक  -- अजित दांडेकर.
क्यामेरा - हर्षल शिपोस्कर
का. निर्माता : सिद्धार्थ नाचणे

आज सायं. ७.३० वा. प्रमितीचा सहभाग असलेला पहिला भाग  दाखवला जाईल.

पुनरप्रक्षेपण : रात्री १०.३०वा., सकाळी ७ वा., सकाळी ९ वा., दुपारी ३.३०वा., आणि सायं.५.३० वाजता
आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत..
........................................

{कात्रण: महाराष्ट्र टाइम्स, मुंबई, दि.१३ आक्टो.२०१४}

Sunday, October 12, 2014

हेच का लोकशिक्षण?






  मतदानाचा अधिकार कोणाकोणाला असावा यावर स्वातंत्र्यानंतर फार मोठी चर्चा झालेली होती. ब्रिटीश सरकारने आयकर भरणारे, पदवीधर आणि राजे महाराजे अशा मर्यादित लोकांनाच मताधिकार दिलेला होता. त्या पार्श्वभुमीवर काहींना असे वाटत होते की, फक्त सुशिक्षितांनाच मताचा अधिकार असावा. याऊलट डा. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आदींचा आग्रह होता की सर्व प्रौढांना मताधिकार असावा. त्यावर त्यांचा समर्थनपर युक्तीवाद असा होता की, निवडणुकांच्या माध्यमातून ज्या प्रचारसभा होतील त्यातून होणार्‍या महाचर्चांमधून लोकशिक्षण - लोकप्रबोधन होईल. या शिक्षणापासून कोणीही भारतीय वंचित असता कामा नये. मतदार यादीत ज्याचे नाव त्याचे देशाच्या सातबार्‍यावर नाव. तोतो - तीती देशाची मालक. स्वातंत्र्यकाळी देशात अवघी १२ टक्के साक्षरता होती. आज ती देशात ७५ नी राज्यात ८५ टक्क्यांच्या पुढे गेलीय. 

प्रत्यक्ष प्रचार सभा, प्रसारमाध्यमे आणि सोशल मिडीया  यातून या निवडणुकीत जो जंगी बार उडवून देण्यात आलाय त्याला लोकशिक्षण म्हणता येईल?

प्रचाराच्या या घसरलेल्या दर्ज्याला जबाबदार कोण?

परस्परांवर बेलगाम आरोप करणे, अतिशय बेछूट बोलणे, समोरच्यांचे सगळेच श्रेय नाकारणे, आपण नी आपला पक्ष तेव्हढे सर्वगुणसंपन्न असल्याचा डांगोरा पिटणे यात कोणीच मागे नाहीत. नेते आणि पक्ष जनतेला गृहीत धरीत आहेत किंवा ते सराईतपणे जनतेला बेवकुफ बनवीत आहेत असे काहींना वाटते. जयललिता, येडी युरप्पा, लालूप्रसाद ही देशपातळीवरील उदाहरणे बघितली तर भ्रष्टाचार नी गुन्हेगारी यात कोण अडकला यापेक्षा तो आमच्या पक्षातील की आमच्या विरोधकांच्या पक्षातील यावर सगळ्यांच्याच प्रतिक्रिया बेतलेल्या असतात. सारेच पक्ष आणि नेते सत्तेसाठी आटापिटा करणारे. त्यासाठी सगळी साधनसुचिता खुंटीला अडकऊन ठेवलेले. वर आपदधर्म म्हणुन त्याचे निर्लज्यपणे समर्थन करायलाही अजिबात न कचरणारे.

सगळेच उन्मादाचे पुरस्कर्ते. सगळेच पक्षांतराचे समर्थक. पैसा, निर्ढावलेपणा, खोटे बोल पण रेटून बोल, तोंडी लावायला विकास, सेक्युलरवाद, सुशासन, महागाई, भ्रष्टाचार निर्मुलन असले डायलो‘ग्ज...

 आज तुरूंगात असलेल्यांना किंवा जामीनावर सुटलेल्यांना सर्वांनीच तिकीटे दिलेली आहेत. सगळेच कोट्याधीश.  या निवडणुकीत पैशाचा वाहणारा महापूर बघता या निवडणुका म्हणजे उघडपणे पैशाचा खेळ होय हे सांगायला कोणीही कचरत नाही. माध्यमांवर पेडन्यूज आणि पे‘केजचे सरसकट आरोप होत आहेत आणि त्याचे खंडन करण्याएव्हढे बळही कोणात नाही.

राज्यात आजही ४५ लक्ष कुटुंबे दारिद्र्य रेषेखालचे जीवन जगतात.त्यातली २४ लक्ष कुटूंबे बेघर आहेत. ते आणि आर्थिक स्थिती बरी किंवा सधन असणार्‍या मतदारांच्या वतीने असे युक्तीवाद केले जातात की निवडणुका जिंकणारे जर किफायतशीर गुंतवणूक म्हणून या खेळात उतरलेत तर मग त्या नफ्याचा काही हिस्सा आपल्याला आधीच मिळाला तर त्यात वावगे काय?

 परवा रस्त्याने जाताना सहज कानावर पडले,एकजण मोबाईल वर दुसर्‍याला सांगत होता,  " अहो, हे कलीयुग आहे. खाल्ले दोन पैसे तर काय बिघडले? आज कोण खात नाही? सारेच चोर आहेत असे उगीच कशाला म्हणायचे? असली गांधीबाबा आपला. त्याला जे जे जवळ करतील ते ते आपले. खा. खाऊ द्या. सगळे शेवटी पैशासाठीच जगतात ना?"

एकुण काय तर आपल्या वाट्याला आलेली भुमिका आपण खरी वाटेल अशा ताकदीने निभवायची अशा तयारीचे देशात १२५ कोटी आणि राज्यात १२ कोटी कसलेले अभिनेते आणि अभिनेत्री आहेत....


Thursday, October 2, 2014

‘त्यांच्या’साठी कोणता कार्यक्रम?

   
>> प्रतिमा जोशी 
पंतप्रधान मोदींच्या, 'देशानं गांधींना काय दिलं?' या प्रश्नाचं आजवर काही प्रमाणात विशिष्ट समाजघटकांनी दिलेलं उत्तर 'कुचेष्टा' हेच असल्याचं दिसतं. 

आपल्या भाषणातील म. गांधींच्या गौरवपूर्ण उल्लेखापेक्षाही शारीर हत्येनंतरसुद्धा त्यांची कणाकणानं हत्या करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता कार्यक्रम देणार आहेत, हा कळीचा प्रश्न आहे! 
...............................................................

आपल्या भाषणातील म. गांधींच्या गौरवपूर्ण उल्लेखापेक्षाही शारीर हत्येनंतरसुद्धा त्यांची कणाकणानं हत्या करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता कार्यक्रम देणार आहेत, हा कळीचा प्रश्न आहे!

मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील २० हजार भारतीयांसमोर हिंदीतून केलेलं भाषण हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सफल अमेरिका दौऱ्यातील परमोच्च बिंदू होता. ओघवत्या हिंदीतील लयबद्ध भाषण आणि सभागृहांतून त्याला मिळणारा उत्तेजित प्रतिसाद पाहून कित्येकांना स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील धर्मसंसदेतील सुप्रसिद्ध भाषणाची आठवण झाली आ​णि 'त्या नरेंद्रानंतर या नरेंद्राने ओजस्वी वाणीने अमेरिका जिंकली' अशी भावना व्यक्त होऊ लागली. फरक इतकाच होता, की शिकागो येथे जगभरातील विविध वंशांचे व धर्मांचे नागरिक आले होते, तर मोदींसमोरील सर्वच श्रोते अनिवासी असले, तरी भारतीय होते आणि मोदींशी स्पर्धा करणारा दुसरा कोणीही वक्ता नव्हता.

या भाषणात अनेक मुद्द्यांना पंतप्रधानांनी हात घातला असला, तरी त्याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे सुमारे ८० ते ९० मिनिटांच्या या भाषणात त्यांनी तब्बल तीन वेळा म. गांधी यांचा उल्लेख केला. स्वातंत्र्यलढा गांधींनी कसा सामान्यांच्या आंदोलनात परिवर्तित केला होता यावर पंतप्रधानांनी भर दिला. हातात कसलंही हत्यार नसलेला साधा माणूसही स्वातंत्र्ययोद्धा होऊ शकतो हा विचार गांधींनी भारताला दिला अशा आशयाचं वक्तव्य करताना तळमळीनं शिकवणारा शिक्षक, नेकीनं सफाई करणारा कामगार, खादीचेच कपडे वापरीन असा निश्चय करणारे सामान्यजन यांनाही स्वातंत्र्याच्या लढाईत आपलाही याद्वारे सहभाग आहे असे कसे वाटत असे याबद्दल ते बोलले. भारत 'गंदगीमुक्त' करण्यासाठी आपणही असं व्यापक आंदोलन उभारू इच्छित असल्याचं ते म्हणाले. इतकंच नव्हे, तर गांधींनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं, आपण त्यांना काय दिलं? असा प्रश्नही श्रोत्यांना विचारला.

म. गांधींचा शस्त्रविहीन परिवर्तनाचा मार्ग, अहिंसेचं तत्वज्ञान, सहिष्णुतेचा आणि सत्याचा आग्रह हा भारतीय जनतेला आणि जगातील अब्जावधी संवेदनशील माणसांना लढ्याचा अद्भूत मार्ग वाटत आला असला, तरी या मार्गाची खिल्ली उडवणारे असंख्य भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या दुसऱ्या पिढीपासूनच मोठ्या आवाजात बोलू लागले होते. गांधी हा देशावरील आणि हिंदू धर्मावरील कलंक आहे अशा भावनेने त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांना इतिहासाचे नायकत्व बहाल करण्याची धडपड एका गोटातून सातत्याने गेली ६० वर्षे केली जात आहे आणि त्याला गांधीद्वेषाची भरघोस फळेही आलेली दिसत आाहेत. जे आपल्याला अमान्य आहे, पटत नाही, शत्रुवत भासते ते गोळ्या घालून नष्टच केले पाहिजे या भावनेच्या पगड्याखाली गांधीहत्येचे समर्थन करणाऱ्या वर्गाची १९४७च्या दरम्यान असलेली गंगोत्री आज विस्तीर्ण आणि खोल पात्रात रूपांतरीत झाली आहे नि त्यात निर्माण झालेल्या काळ्याशार डोहांमध्ये विखारी मनोवृत्तीची जलपर्णी फोफावली आहे. इतकी, की या पाण्यातला प्राणवायूच संपुष्टात आल्याची भयशंका मनात आल्यावाचून राहत नाही. देशाची फाळणी, पाकिस्तानची निर्मिती, ही जणू गांधींचीच इच्छा किंवा खरं तर कटकारस्थान (पर्यायाने मुसलमानांचे लांगुलचालन) असल्याचा प्रचार करत त्यांना फाळणीचे गुन्हेगार ठरवले गेले.

हा इतिहास उगाळण्याचा प्रश्न नाही; तर या पार्श्वभूमीवर तयार झालेली देशातील बहुसंख्यांची, विशेषतः २० वर्षांपूर्वीच्या उदारीकरण नि जागतिकीकरणामुळे ज्यांचे कल्पनातीत भले झाले अशा वर्गाची वर्तमान मनोभूमिका ही प्रामुख्यानं भारतीय चलनावरील गांधीजींच्या चित्राविषयीच आस्था असणारी आहे, एरव्ही गांधींनी या देशाला काय दिलं असाच प्रश्न ते विचारताना दिसतात. इतकंच नाही, तर पंतप्रधान मोदींनी ज्या 'आंदोलना'चा गौरवानं उल्लेख केला, ती भ्याडांची अहिंसा असल्याचे शेरे मारत स्वातंत्र्यप्राप्तीचं श्रेयही ते गांधींना द्यायला तयार नाहीत. लढे, आंदोलनं वगैरे सैनिकांची किंवा लोकोत्तर व्यक्तींची बाब आहे, आपण सामान्य माणसं, आपण काय करणार, या विचारापासून प्रतीकात्मक कार्यक्रमांद्वारे देशातल्या कोट्यवधी माणसांची मुक्तता करून कोट्यवधी जनता स्वतःच कशी शस्त्र बनू शकते ते सप्रमाण सिद्ध केलेल्या या नेत्याचं अस्पृश्य समाजासंदर्भातील अपराधी भावनेनं उद्गारलेलं, 'एका गालावर मारलं, तर दुसरा पुढे करायला हवा' हे वाक्य अपभ्रंश करत, संदर्भहीन करत टवाळीसारखं वापरलं गेलं. ज्याच्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवातच आणि पुढे अख्खी हयातच परकीय इंग्रजांना हाकलून देण्यासाठी कामी आली, त्यानं देशाला फक्त खजूर, बकरीचं दूध, चरखा इतकंच दिलं... फारफार तर सफाईचा झाडू प्रतिष्ठित केला असा प्रचार गेली पन्नाससाठ वर्षं खुबीनं केला गेला, स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पिढीच्या गळी पद्धतशीर उतरवला गेला. गांधींचे 'सत्याचे प्रयोग' म्हणजे वासनेनं माखलेले रंगिले चाळे असा विकृत प्रचारही बिनदिक्कत केला गेला आहे. आताचं युग टेक्नॉलॉजीचं, सोशल मीडियाचं आहे. महिलांबरोबर नृत्य करतानाचे किंवा त्याहून अश्लील असे मॉर्फिंग केलेले, फोटोशॉप केलेले गांधींचे फोटो कुचाळक्या करणाऱ्या पोस्टसह नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीआधी काही महिने सोशल मीडियावर कसे फिरले आणि त्यावर फाजील कमेंट्सही कशा शेकडोंनी केल्या गेल्या हे लक्षात घेतलं तर अपभ्रंश, विकृतीकरण, अपसमज हे शब्दही फिके वाटू लागतील. पंतप्रधान मोदींच्या, 'देशानं गांधींना काय दिलं?' या प्रश्नाचं आजवर काही प्रमाणात विशिष्ट समाजघटकांनी दिलेलं उत्तर 'कुचेष्टा' हेच असल्याचं दिसतं.

स्वातंत्र्यानंतर गांधींच्या वाट्याला आलेले शल्य असे की, जी जनता या कुचेष्टेच्या परीघात नाही, तिलाही गांधींचा आपमतलबी जप करणाऱ्यांमुळं गांधी फारसे आपले वाटू शकले नाहीत. सत्ताधाऱ्यांचा सामान्यांना आलेला अनुभव हा अनेक बाबतींत पोळून टाकणारा होता. ज्या सामान्य माणसाला गांधींनी 'आंदोलना'चे नायक बनवले, त्या माणसाच्या संघटित गाऱ्हाण्यांनाही जिथं वजन उरलं नाही, तिथं एकेकट्या व्यक्तीच्या वाट्याला उपेक्षा आणि अपेक्षाभंग दोन्ही येणं स्वाभाविक होतं. भ्रष्टाचार, रोजगाराची शाश्वती नसणं, लाल फितीत चांगल्या योजनांचंही भजं होणं, सरकारी यंत्रणेतली माणसं ही परक्या ग्रहावरून आलेली आहेत की काय अशी शंका येण्याइतपत त्यांचं जनतेशी नातं न उरणं आणि त्याचवेळी नेतेमंडळींशी मात्र त्यांचं साटंलोटं असणं हीच सत्ताधाऱ्यांची ओळख या देशात बनली आहे. अशा सत्ताधाऱ्यांनी गांधींचा वारसा सांगणं जर कोणी फारसं मनावर घेतलं नाही, तर त्यात नवल नाही. गांधींचा वारसा सांगणाऱ्यांनी, गांधींचा वारसा नाकारणाऱ्यांनी आणि त्यांनी काही वारसा दिलाय याची जाणच नसणऱ्यांनीही त्यांना या देशात संदर्भहीन बनवलं आहे.

म. गांधींच्या गौरवपूर्ण उल्लेखापेक्षाही शारीर हत्येनंतरसुद्धा त्यांची कणाकणानं हत्या करणाऱ्यांना पंतप्रधान कोणता कार्यक्रम देणार आहेत, हा कळीचा प्रश्न आहे!

सफाईचा राष्ट्रीय फार्स ?

मुख्यपान » संपादकीय » बातम्या
 
1
 
0
 
गांधीजींचा वैशिष्ट्यपूर्ण श्रमविचार
- -
गुरुवार, 2 ऑक्टोबर 2014 - 03:45 AM IST

गांधी जयंती हे जर समाजवास्तवाला नजरेआड करून डोळे मिटून प्रार्थना करण्याचे कर्मकांड होऊ द्यायचे नसेल किंवा सफाईचा राष्ट्रीय फार्स बनू द्यायचा नसेल तर भारतातील जातवास्तव आणि भांडवली अर्थकारणातून निर्माण झालेल्या प्रश्‍नांना गांधी कोणत्या पद्धतीने भिडत होते आणि त्या प्रश्‍नांचा निरास करण्यासाठी कोणता विचार मांडत होते, याचे चिंतन झाले तर अधिक उचित ठरेल.

श्रमप्रतिष्ठा पुनःप्रस्थापित करण्याचा गांधीजींचा प्रयत्न होता. आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादनासाठी शरीरश्रम अनावश्‍यक झाले असले तरी उपासना म्हणून ते करीत राहावेत, असे ते सांगत होते.
- यशवंत सुमंत
गांधी जयंती हे जर समाजवास्तवाला नजरेआड करून डोळे मिटून प्रार्थना करण्याचे कर्मकांड होऊ द्यायचे नसेल किंवा सफाईचा राष्ट्रीय फार्स बनू द्यायचा नसेल तर भारतातील जातवास्तव आणि भांडवली अर्थकारणातून निर्माण झालेल्या प्रश्‍नांना गांधी कोणत्या पद्धतीने भिडत होते आणि त्या प्रश्‍नांचा निरास करण्यासाठी कोणता विचार मांडत होते, याचे चिंतन झाले तर अधिक उचित ठरेल.

रस्किनच्या श्रमकेंद्री उपजीविकेचा विचार आणि टॉलस्टॉयच्या ‘भाकरीसाठी  मजुरी’च्या विचाराने प्रेरित होऊन गांधींनी ‘श्रमविचार’ गीतेच्या परिभाषेत सांगितला व श्रमांकडे पाहण्याची आधुनिक दृष्टी भारतीयांमध्ये रुजवायचा प्रयत्न केला. जातिव्यवस्थेने बुद्धी आणि श्रम यांची अभेद्य अशी फारकत केली होती. ती उच्च-नीचतेच्या श्रेणीत बंदिस्त केली होती. मलमूत्रादी घाण साफ करणे, मेलेल्या जनावरांची कातडी सोलणे यासारखी कामे अस्वच्छता, दुर्गंधीशी संबंधित म्हणून ती नुसतीच हलक्‍या दर्जाची नव्हेत, तर ती अपवित्र आणि ती करणारा वर्ग अस्पृश्‍य आणि बहिष्कृत ठरविण्यात आला. व्यक्तीला स्वतःची ओळख शोधण्याचा, ती सिद्ध करण्याचा व ती इतरांना पटवून देण्याचा अवकाशच जातिव्यवस्थेने खतम केला.या व्यवस्थेमुळे श्रम आणि श्रमिक अप्रतिष्ठित व कलंकितही केले. म्हणूनच डॉ. आंबेडकरांनी जातिजन्य श्रमजीवींच्या आत्मसन्मानाच्या व स्वयंनिर्णीत आणि स्वयंनिर्धारित सामाजिक ओळखीच्या प्रश्‍नाला दलित व मानवमुक्तीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले. आंबेडकरांचा श्रमप्रतिष्ठेबाबतचा विचार हा गांधींपेक्षा खचितच वेगळा होता. पण जातिव्यवस्थेने बुद्धी आणि श्रमांची झालेली फारकत, श्रम व श्रमिकांची झालेली अप्रतिष्ठा याबाबत उभयतांचे  एकमत होते व ते दोघेही श्रमप्रतिष्ठा कशी पुनःप्रस्थापित करता येईल यासाठी प्रयत्नशील होते.

दुसऱ्या बाजूला भांडवली उत्पादन पद्धतीने श्रमाचे वस्तूकरण केले होते. श्रम क्रयवस्तू बनली. स्पर्धाशील आणि महाकाय उत्पादन यंत्रणेत स्वतःसाठी श्रम करून गरजा भागविण्याचा अवकाशच माणसाने गमावला होता. श्रम सर्जनशून्य आणि यांत्रिक बनले. कारण ते दुसऱ्या कोणाच्या तरी गरजा भागविण्यासाठी, माझ्या इच्छेविरुद्ध व माझ्या सर्जनशीलतेला दाबत घडत होते. कामाची क्षमता आणि तयारी असून काम न  मिळणे आणि मिळाले तर कामाच्या/ श्रमांच्या प्रमाणात मोबदला न मिळणे या वास्तवात माणूस अडकला. माणसाला शोषण आणि परात्मतेच्या गर्तेत ढकलणाऱ्या औद्योगिक भांडवलशाहीच्या उत्पादन व्यवस्थेत श्रमप्रतिष्ठा कशी स्थापन करता येईल, हा खरा प्रश्‍न होता. मनुष्यबळ विपुल असलेल्या आशियाई समाजांत भांडवलप्रधान अर्थव्यवस्थेपेक्षा श्रमप्रधान अर्थव्यवस्था उभी करणे बेरोजगारांच्या प्रश्‍नाच्या संदर्भात अधिक हितावह, अशी गांधींची धारणा होती. अवजड यंत्राधारित उत्पादन व्यवस्थेची गरज मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध नसलेल्या पश्‍चिमी देशांना कदाचित उपयुक्त ठरू शकेल; पण अन्यत्र ती बेरोजगारी  वाढवेल असे गांधींना वाटत होते आणि त्याही दृष्टीने श्रमांचा विचार ते करीत होते.

मुख्य म्हणजे श्रमप्रधान उपजीविका माणसाला त्यांची नैतिकता गवसण्यात अधिक साह्यकारी होऊ शकते, ही गांधींची श्रद्धा होती. माणसाच्या शरीरश्रमांस निसर्गदत्त काही मर्यादा असल्याने त्याची उत्पादनशक्तीही निसर्गानेच त्याच्या गरजा भागविण्याइतपत मर्यादित केली आहे. पण यंत्र-तंत्रज्ञानातील प्रगतीने उत्पादनक्षमताच अफाट वाढली असे नाही, तर तो उत्पादक श्रमांपासून सुटका करून घेण्यासाठी उद्युक्त केला गेला. श्रमविन्मुखता हे त्यांचे मूल्य बनले. शरीरश्रमांपेक्षा बौद्धिक श्रम उच्च प्रतीचे, अशी धारणा बनली. या पार्श्‍वभूमीवर समाजधारणेसाठी करावी लागणारी सर्व कामे व त्यासाठीचे श्रम हे सारख्याच मोलाचे व त्यातही अनुत्पादक श्रमांपेक्षा उत्पादक श्रम अधिक महत्त्वाचे आणि बौद्धिक श्रमांपेक्षा शारीरिक श्रम श्रेष्ठ, असे गांधींचे प्रतिपादन होते. उत्पादक श्रम ही समाजधारणेची शर्त म्हणून तर सेवारूप श्रम हे सामाजिक उत्तरदायित्व म्हणून केले पाहिजेत व त्यातच माणसाची आणि म्हणून श्रमांचीही प्रतिष्ठा आहे, असा गांधींचा अभिप्राय आहे. जातिबद्ध समाजात शूद्रांवर उत्पादक श्रमांची सक्ती होती, तर अतिशूद्रांवर सेवारूप श्रमांची. म्हणूनच त्या श्रमांना प्रतिष्ठाही नव्हती. उच्चवर्णीयांनी सफाईची कामे सेवावृत्तीने व अतिशूद्रांप्रतीच्या अपराध भावनेने करावीत, तर भांडवलशाही क्रांतीतून निर्माण झालेले उत्पादक  श्रमांचे, व्यावसायिक व करार स्वातंत्र्याच्या रूपात मिळणारे स्वातंत्र्य सर्वांनाच असले पाहिजे, असे गांधी सांगतात. पण कायद्याचे हे स्वातंत्र्य दिले तरी विषम समाजात हे व्यवसाय/ रोजगार/ करार स्वातंत्र्य शूद्रातिशूद्र वर्गांना उपभोगता येईलच असे नाही. तसेच यंत्रावर आधारित भांडवली उत्पादन व्यवस्थेला सर्वांनाच रोजगार पुरविता आला नाही, ही इतिहासाची साक्ष आहे. या पार्श्‍वभूमीवर निव्वळ यंत्राधारित भांडवली उत्पादन पद्धत लादणे याचा साधा अर्थ शूद्र समजल्या गेलेल्या उत्पादक जातीचे पारंपरिक व्यवसाय उद्‌ध्वस्त करणे होय. पर्यायी रोजगार  उपलब्ध झाल्याशिवाय आहे त्या व्यवसायातून हद्दपार होणे यातून बेरोजगारांची  समस्या उग्र बनणार  होती. या दृष्टीने गांधींनी उत्पादक जातींनी त्यांचे पारंपरिक व्यवसाय करण्यात काहीच गैर नाही, असे म्हटले. पारंपरिक व्यवसायाचा विचार करताना गांधींनी उत्पादक जाती आणि सेवा जाती, असा फरक केल्याचे दिसते. जातींनी त्यांचे पारंपरिक व्यवसाय करावेत, हे गांधींचे म्हणणे मुख्यत्वे शूद्र वर्णातील उत्पादक जातींच्या संदर्भात होते. अतिशूद्र समजल्या गेलेल्या सेवा जातींच्या संदर्भात नव्हते. उत्पादक आणि सेवारूप कामाची व श्रमांची प्रतिष्ठा त्यांना प्रस्थापित करायची होती.

डॉ. आंबेडकरांचा तंत्रज्ञानाच्या विकासाला विरोध नव्हता. मनाच्या विकासासाठी ठराविक काळ  घोर श्रमांपासून मुक्ती मिळायला हवी, असे ते सांगत. शुद्रातिशुद्रांना ती नाकारण्यात आली. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे श्रमांच्या वेठबिगारीतून मुक्त होऊन मन-बुद्धीच्या विकासासाठी अवकाश प्राप्त होईल, असे बाबासाहेबांना वाटत होते. उत्पादनतंत्रामुळे समृद्धी येणार असली तरी माणसाने चंगळवादाकडे जाऊ नये, असे मार्क्‍स आणि आंबेडकर- दोघेही म्हणत होते. माणसे शोषण, पिळवणूक याला कंटाळून कुकर्माकडे वळतात. एकदा अभावग्रस्तता संपली, की माणसे विवेकाने वागतील म्हणून उत्पादनवाढ व त्यातून समृद्धी हवीच. पण तीवर विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नको, हा मार्क्‍सच्या समाजवादाचा आशय होता. पण माणसाची स्खलनशीलता लक्षात घेता अभावग्रस्तता संपल्यावर तो अधिक विवेकाने, नैतिकतेने वागेल याची हमी काय आणि ती कोण देणार, असा प्रश्‍न गांधी उपस्थित करतील. त्यासाठी माणसाला उत्पादनाच्या अशा संरचनेत ठेवायला हवे, की त्याच्या अमर्याद उपभोग क्षमतेला काही संरचनात्मक मर्यादा पडतील. श्रमकेंद्री उपजीविका हा त्यावरचा संरचनात्मक मार्ग आहे. म्हणूनच गांधींच्या मते, उत्पादनाची गरज म्हणून जरी शरीरश्रम अनावश्‍यक झाले तरी उपासना म्हणून ते करीत राहावेत. यातच माणसाची व श्रमांची प्रतिष्ठा आहे.
(लेखक राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)

 
1
 
0
 

फोटो गॅलरी