Thursday, October 2, 2014

सफाईचा राष्ट्रीय फार्स ?

मुख्यपान » संपादकीय » बातम्या
 
1
 
0
 
गांधीजींचा वैशिष्ट्यपूर्ण श्रमविचार
- -
गुरुवार, 2 ऑक्टोबर 2014 - 03:45 AM IST

गांधी जयंती हे जर समाजवास्तवाला नजरेआड करून डोळे मिटून प्रार्थना करण्याचे कर्मकांड होऊ द्यायचे नसेल किंवा सफाईचा राष्ट्रीय फार्स बनू द्यायचा नसेल तर भारतातील जातवास्तव आणि भांडवली अर्थकारणातून निर्माण झालेल्या प्रश्‍नांना गांधी कोणत्या पद्धतीने भिडत होते आणि त्या प्रश्‍नांचा निरास करण्यासाठी कोणता विचार मांडत होते, याचे चिंतन झाले तर अधिक उचित ठरेल.

श्रमप्रतिष्ठा पुनःप्रस्थापित करण्याचा गांधीजींचा प्रयत्न होता. आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादनासाठी शरीरश्रम अनावश्‍यक झाले असले तरी उपासना म्हणून ते करीत राहावेत, असे ते सांगत होते.
- यशवंत सुमंत
गांधी जयंती हे जर समाजवास्तवाला नजरेआड करून डोळे मिटून प्रार्थना करण्याचे कर्मकांड होऊ द्यायचे नसेल किंवा सफाईचा राष्ट्रीय फार्स बनू द्यायचा नसेल तर भारतातील जातवास्तव आणि भांडवली अर्थकारणातून निर्माण झालेल्या प्रश्‍नांना गांधी कोणत्या पद्धतीने भिडत होते आणि त्या प्रश्‍नांचा निरास करण्यासाठी कोणता विचार मांडत होते, याचे चिंतन झाले तर अधिक उचित ठरेल.

रस्किनच्या श्रमकेंद्री उपजीविकेचा विचार आणि टॉलस्टॉयच्या ‘भाकरीसाठी  मजुरी’च्या विचाराने प्रेरित होऊन गांधींनी ‘श्रमविचार’ गीतेच्या परिभाषेत सांगितला व श्रमांकडे पाहण्याची आधुनिक दृष्टी भारतीयांमध्ये रुजवायचा प्रयत्न केला. जातिव्यवस्थेने बुद्धी आणि श्रम यांची अभेद्य अशी फारकत केली होती. ती उच्च-नीचतेच्या श्रेणीत बंदिस्त केली होती. मलमूत्रादी घाण साफ करणे, मेलेल्या जनावरांची कातडी सोलणे यासारखी कामे अस्वच्छता, दुर्गंधीशी संबंधित म्हणून ती नुसतीच हलक्‍या दर्जाची नव्हेत, तर ती अपवित्र आणि ती करणारा वर्ग अस्पृश्‍य आणि बहिष्कृत ठरविण्यात आला. व्यक्तीला स्वतःची ओळख शोधण्याचा, ती सिद्ध करण्याचा व ती इतरांना पटवून देण्याचा अवकाशच जातिव्यवस्थेने खतम केला.या व्यवस्थेमुळे श्रम आणि श्रमिक अप्रतिष्ठित व कलंकितही केले. म्हणूनच डॉ. आंबेडकरांनी जातिजन्य श्रमजीवींच्या आत्मसन्मानाच्या व स्वयंनिर्णीत आणि स्वयंनिर्धारित सामाजिक ओळखीच्या प्रश्‍नाला दलित व मानवमुक्तीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले. आंबेडकरांचा श्रमप्रतिष्ठेबाबतचा विचार हा गांधींपेक्षा खचितच वेगळा होता. पण जातिव्यवस्थेने बुद्धी आणि श्रमांची झालेली फारकत, श्रम व श्रमिकांची झालेली अप्रतिष्ठा याबाबत उभयतांचे  एकमत होते व ते दोघेही श्रमप्रतिष्ठा कशी पुनःप्रस्थापित करता येईल यासाठी प्रयत्नशील होते.

दुसऱ्या बाजूला भांडवली उत्पादन पद्धतीने श्रमाचे वस्तूकरण केले होते. श्रम क्रयवस्तू बनली. स्पर्धाशील आणि महाकाय उत्पादन यंत्रणेत स्वतःसाठी श्रम करून गरजा भागविण्याचा अवकाशच माणसाने गमावला होता. श्रम सर्जनशून्य आणि यांत्रिक बनले. कारण ते दुसऱ्या कोणाच्या तरी गरजा भागविण्यासाठी, माझ्या इच्छेविरुद्ध व माझ्या सर्जनशीलतेला दाबत घडत होते. कामाची क्षमता आणि तयारी असून काम न  मिळणे आणि मिळाले तर कामाच्या/ श्रमांच्या प्रमाणात मोबदला न मिळणे या वास्तवात माणूस अडकला. माणसाला शोषण आणि परात्मतेच्या गर्तेत ढकलणाऱ्या औद्योगिक भांडवलशाहीच्या उत्पादन व्यवस्थेत श्रमप्रतिष्ठा कशी स्थापन करता येईल, हा खरा प्रश्‍न होता. मनुष्यबळ विपुल असलेल्या आशियाई समाजांत भांडवलप्रधान अर्थव्यवस्थेपेक्षा श्रमप्रधान अर्थव्यवस्था उभी करणे बेरोजगारांच्या प्रश्‍नाच्या संदर्भात अधिक हितावह, अशी गांधींची धारणा होती. अवजड यंत्राधारित उत्पादन व्यवस्थेची गरज मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध नसलेल्या पश्‍चिमी देशांना कदाचित उपयुक्त ठरू शकेल; पण अन्यत्र ती बेरोजगारी  वाढवेल असे गांधींना वाटत होते आणि त्याही दृष्टीने श्रमांचा विचार ते करीत होते.

मुख्य म्हणजे श्रमप्रधान उपजीविका माणसाला त्यांची नैतिकता गवसण्यात अधिक साह्यकारी होऊ शकते, ही गांधींची श्रद्धा होती. माणसाच्या शरीरश्रमांस निसर्गदत्त काही मर्यादा असल्याने त्याची उत्पादनशक्तीही निसर्गानेच त्याच्या गरजा भागविण्याइतपत मर्यादित केली आहे. पण यंत्र-तंत्रज्ञानातील प्रगतीने उत्पादनक्षमताच अफाट वाढली असे नाही, तर तो उत्पादक श्रमांपासून सुटका करून घेण्यासाठी उद्युक्त केला गेला. श्रमविन्मुखता हे त्यांचे मूल्य बनले. शरीरश्रमांपेक्षा बौद्धिक श्रम उच्च प्रतीचे, अशी धारणा बनली. या पार्श्‍वभूमीवर समाजधारणेसाठी करावी लागणारी सर्व कामे व त्यासाठीचे श्रम हे सारख्याच मोलाचे व त्यातही अनुत्पादक श्रमांपेक्षा उत्पादक श्रम अधिक महत्त्वाचे आणि बौद्धिक श्रमांपेक्षा शारीरिक श्रम श्रेष्ठ, असे गांधींचे प्रतिपादन होते. उत्पादक श्रम ही समाजधारणेची शर्त म्हणून तर सेवारूप श्रम हे सामाजिक उत्तरदायित्व म्हणून केले पाहिजेत व त्यातच माणसाची आणि म्हणून श्रमांचीही प्रतिष्ठा आहे, असा गांधींचा अभिप्राय आहे. जातिबद्ध समाजात शूद्रांवर उत्पादक श्रमांची सक्ती होती, तर अतिशूद्रांवर सेवारूप श्रमांची. म्हणूनच त्या श्रमांना प्रतिष्ठाही नव्हती. उच्चवर्णीयांनी सफाईची कामे सेवावृत्तीने व अतिशूद्रांप्रतीच्या अपराध भावनेने करावीत, तर भांडवलशाही क्रांतीतून निर्माण झालेले उत्पादक  श्रमांचे, व्यावसायिक व करार स्वातंत्र्याच्या रूपात मिळणारे स्वातंत्र्य सर्वांनाच असले पाहिजे, असे गांधी सांगतात. पण कायद्याचे हे स्वातंत्र्य दिले तरी विषम समाजात हे व्यवसाय/ रोजगार/ करार स्वातंत्र्य शूद्रातिशूद्र वर्गांना उपभोगता येईलच असे नाही. तसेच यंत्रावर आधारित भांडवली उत्पादन व्यवस्थेला सर्वांनाच रोजगार पुरविता आला नाही, ही इतिहासाची साक्ष आहे. या पार्श्‍वभूमीवर निव्वळ यंत्राधारित भांडवली उत्पादन पद्धत लादणे याचा साधा अर्थ शूद्र समजल्या गेलेल्या उत्पादक जातीचे पारंपरिक व्यवसाय उद्‌ध्वस्त करणे होय. पर्यायी रोजगार  उपलब्ध झाल्याशिवाय आहे त्या व्यवसायातून हद्दपार होणे यातून बेरोजगारांची  समस्या उग्र बनणार  होती. या दृष्टीने गांधींनी उत्पादक जातींनी त्यांचे पारंपरिक व्यवसाय करण्यात काहीच गैर नाही, असे म्हटले. पारंपरिक व्यवसायाचा विचार करताना गांधींनी उत्पादक जाती आणि सेवा जाती, असा फरक केल्याचे दिसते. जातींनी त्यांचे पारंपरिक व्यवसाय करावेत, हे गांधींचे म्हणणे मुख्यत्वे शूद्र वर्णातील उत्पादक जातींच्या संदर्भात होते. अतिशूद्र समजल्या गेलेल्या सेवा जातींच्या संदर्भात नव्हते. उत्पादक आणि सेवारूप कामाची व श्रमांची प्रतिष्ठा त्यांना प्रस्थापित करायची होती.

डॉ. आंबेडकरांचा तंत्रज्ञानाच्या विकासाला विरोध नव्हता. मनाच्या विकासासाठी ठराविक काळ  घोर श्रमांपासून मुक्ती मिळायला हवी, असे ते सांगत. शुद्रातिशुद्रांना ती नाकारण्यात आली. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे श्रमांच्या वेठबिगारीतून मुक्त होऊन मन-बुद्धीच्या विकासासाठी अवकाश प्राप्त होईल, असे बाबासाहेबांना वाटत होते. उत्पादनतंत्रामुळे समृद्धी येणार असली तरी माणसाने चंगळवादाकडे जाऊ नये, असे मार्क्‍स आणि आंबेडकर- दोघेही म्हणत होते. माणसे शोषण, पिळवणूक याला कंटाळून कुकर्माकडे वळतात. एकदा अभावग्रस्तता संपली, की माणसे विवेकाने वागतील म्हणून उत्पादनवाढ व त्यातून समृद्धी हवीच. पण तीवर विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नको, हा मार्क्‍सच्या समाजवादाचा आशय होता. पण माणसाची स्खलनशीलता लक्षात घेता अभावग्रस्तता संपल्यावर तो अधिक विवेकाने, नैतिकतेने वागेल याची हमी काय आणि ती कोण देणार, असा प्रश्‍न गांधी उपस्थित करतील. त्यासाठी माणसाला उत्पादनाच्या अशा संरचनेत ठेवायला हवे, की त्याच्या अमर्याद उपभोग क्षमतेला काही संरचनात्मक मर्यादा पडतील. श्रमकेंद्री उपजीविका हा त्यावरचा संरचनात्मक मार्ग आहे. म्हणूनच गांधींच्या मते, उत्पादनाची गरज म्हणून जरी शरीरश्रम अनावश्‍यक झाले तरी उपासना म्हणून ते करीत राहावेत. यातच माणसाची व श्रमांची प्रतिष्ठा आहे.
(लेखक राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)

 
1
 
0
 

फोटो गॅलरी

No comments:

Post a Comment