Sunday, October 12, 2014

हेच का लोकशिक्षण?






  मतदानाचा अधिकार कोणाकोणाला असावा यावर स्वातंत्र्यानंतर फार मोठी चर्चा झालेली होती. ब्रिटीश सरकारने आयकर भरणारे, पदवीधर आणि राजे महाराजे अशा मर्यादित लोकांनाच मताधिकार दिलेला होता. त्या पार्श्वभुमीवर काहींना असे वाटत होते की, फक्त सुशिक्षितांनाच मताचा अधिकार असावा. याऊलट डा. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आदींचा आग्रह होता की सर्व प्रौढांना मताधिकार असावा. त्यावर त्यांचा समर्थनपर युक्तीवाद असा होता की, निवडणुकांच्या माध्यमातून ज्या प्रचारसभा होतील त्यातून होणार्‍या महाचर्चांमधून लोकशिक्षण - लोकप्रबोधन होईल. या शिक्षणापासून कोणीही भारतीय वंचित असता कामा नये. मतदार यादीत ज्याचे नाव त्याचे देशाच्या सातबार्‍यावर नाव. तोतो - तीती देशाची मालक. स्वातंत्र्यकाळी देशात अवघी १२ टक्के साक्षरता होती. आज ती देशात ७५ नी राज्यात ८५ टक्क्यांच्या पुढे गेलीय. 

प्रत्यक्ष प्रचार सभा, प्रसारमाध्यमे आणि सोशल मिडीया  यातून या निवडणुकीत जो जंगी बार उडवून देण्यात आलाय त्याला लोकशिक्षण म्हणता येईल?

प्रचाराच्या या घसरलेल्या दर्ज्याला जबाबदार कोण?

परस्परांवर बेलगाम आरोप करणे, अतिशय बेछूट बोलणे, समोरच्यांचे सगळेच श्रेय नाकारणे, आपण नी आपला पक्ष तेव्हढे सर्वगुणसंपन्न असल्याचा डांगोरा पिटणे यात कोणीच मागे नाहीत. नेते आणि पक्ष जनतेला गृहीत धरीत आहेत किंवा ते सराईतपणे जनतेला बेवकुफ बनवीत आहेत असे काहींना वाटते. जयललिता, येडी युरप्पा, लालूप्रसाद ही देशपातळीवरील उदाहरणे बघितली तर भ्रष्टाचार नी गुन्हेगारी यात कोण अडकला यापेक्षा तो आमच्या पक्षातील की आमच्या विरोधकांच्या पक्षातील यावर सगळ्यांच्याच प्रतिक्रिया बेतलेल्या असतात. सारेच पक्ष आणि नेते सत्तेसाठी आटापिटा करणारे. त्यासाठी सगळी साधनसुचिता खुंटीला अडकऊन ठेवलेले. वर आपदधर्म म्हणुन त्याचे निर्लज्यपणे समर्थन करायलाही अजिबात न कचरणारे.

सगळेच उन्मादाचे पुरस्कर्ते. सगळेच पक्षांतराचे समर्थक. पैसा, निर्ढावलेपणा, खोटे बोल पण रेटून बोल, तोंडी लावायला विकास, सेक्युलरवाद, सुशासन, महागाई, भ्रष्टाचार निर्मुलन असले डायलो‘ग्ज...

 आज तुरूंगात असलेल्यांना किंवा जामीनावर सुटलेल्यांना सर्वांनीच तिकीटे दिलेली आहेत. सगळेच कोट्याधीश.  या निवडणुकीत पैशाचा वाहणारा महापूर बघता या निवडणुका म्हणजे उघडपणे पैशाचा खेळ होय हे सांगायला कोणीही कचरत नाही. माध्यमांवर पेडन्यूज आणि पे‘केजचे सरसकट आरोप होत आहेत आणि त्याचे खंडन करण्याएव्हढे बळही कोणात नाही.

राज्यात आजही ४५ लक्ष कुटुंबे दारिद्र्य रेषेखालचे जीवन जगतात.त्यातली २४ लक्ष कुटूंबे बेघर आहेत. ते आणि आर्थिक स्थिती बरी किंवा सधन असणार्‍या मतदारांच्या वतीने असे युक्तीवाद केले जातात की निवडणुका जिंकणारे जर किफायतशीर गुंतवणूक म्हणून या खेळात उतरलेत तर मग त्या नफ्याचा काही हिस्सा आपल्याला आधीच मिळाला तर त्यात वावगे काय?

 परवा रस्त्याने जाताना सहज कानावर पडले,एकजण मोबाईल वर दुसर्‍याला सांगत होता,  " अहो, हे कलीयुग आहे. खाल्ले दोन पैसे तर काय बिघडले? आज कोण खात नाही? सारेच चोर आहेत असे उगीच कशाला म्हणायचे? असली गांधीबाबा आपला. त्याला जे जे जवळ करतील ते ते आपले. खा. खाऊ द्या. सगळे शेवटी पैशासाठीच जगतात ना?"

एकुण काय तर आपल्या वाट्याला आलेली भुमिका आपण खरी वाटेल अशा ताकदीने निभवायची अशा तयारीचे देशात १२५ कोटी आणि राज्यात १२ कोटी कसलेले अभिनेते आणि अभिनेत्री आहेत....


No comments:

Post a Comment