Monday, January 2, 2017

ओबीसी साहित्याची चळवळ -- श्रीधर तिळवे नाईक

या टीपणात श्रीधर तिळवे नाईक सर यांनी अतिशय महत्वाची मांडणी केलीए. यावर साधकबाधक चर्चा झाल्यास त्यातूनच एक संकल्प चित्र तयार होऊ शकेल. सर, धन्यवाद.-- Prof Hari Narke
............................
Shridhar Tilve:-- 6 hrs · 
ओबीसी साहित्याची चळवळ -- श्रीधर तिळवे नाईक
साठोत्तरी साहित्यात ज्या काही महत्वाच्या चळवळी निर्माण झाल्या त्या सर्वच मार्गी साहित्य चळवळीविरुद्ध उभ्या ठाकल्या होत्या 
१ देशीवादी चळवळ 
२ दलित चळवळ 
३ आदिवासी साहित्याची चळवळ
४ अल्पसंख्यांक साहित्य चळवळ उदा ख्रिस्ती व मुस्लिम साहित्य चळवळ 
५ ग्रामीण साहित्य चळवळ 
६ स्त्रीवादी चळवळ
१९९० नंतर मात्र एक नवीन चळवळ उभी राहिलीये ती म्हणजे ओबीसी साहित्य चळवळ मंडल आयोगामुळे नव्याने संघटित झालेल्या ओबीसी जाती यात येतात आणि पारंपरिक क्षत्रिय(कुणबी , लेवा पाटील व धनगर ) , वैश्य(तेली व इतर ) आणि शूद्र (अलुतेदार आणि बलुतेदार )वर्णातील अनेक जाती ह्यात येतात . ११०० च्या आसपास ब्राह्मणांनी सर्वच ब्राह्मणेतरांना शूद्र ठरवल्याने ब्राह्मणेतर टायटलखाली साहित्यिक चळवळी संघटित झाल्या पण मंडल आयोगाने नेमक्या अप्रगत जातीजमाती वेचून काढून आरक्षण सवलतपात्र ओबीसी समाज नव्याने निर्माण केला आणि ह्या समाजातून ही चळवळ निर्माण झाली आहे . प्रश्न असा आहे कि ह्या चळवळीचा वर उल्लेख केलेल्या चळवळींशी नेमका काय संबंध आहे आणि ती वरील चळवळीपासून कशी कुठे आणि का वेगळी आहे . तिच्या साहित्याचे वेगळेपण कशात आहे ?
संख्यात्मक पातळीवर पाहिले तर भारतातील ओबीसी समुदायाची संख्या तब्बल ४२ ते ४५ टक्के आहे म्हणजे एका अर्थाने भारतातील सर्वात विशाल समुदायाची ही साहित्य चळवळ आहे त्यामुळे भविष्यात तिचा आवाज हा सर्वाधिक मोठा होणे अटळ आहे . असे असूनही ह्या साहित्य चळवळीचे स्वतःचे \साहित्यशास्त्र मात्र तयार झालेले नाही हा दुर्विलास नाही का ? त्याचबरोबर साठोत्तरी चळवळीशी ह्या चळवळीने काय संबंध ठेवायचे हा प्रश्न आहे . ओबीसी हा समुदायचं मूळात बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक मांडणीतून तयार झालाय त्यामुळे दलित साहित्यिकांना ह्या चळवळीविषयी विशेष ममत्व वाटते पण ह्या ममत्वाचे काय करायचे हा प्रश्न सुटत नाहीये त्याचबरोबर ओबीसी आपल्या चळवळीचे अर्ध्वयू माळी समाजातून आलेल्या महात्मा फुलेंना मानतात पण जे ममत्व महात्मा फुलेंना दलितांविषयी वाटत होते ते ओबीसींना दलितांविषयी वाटते का ?
दलित . ओबीसी आणि आदिवासी ह्या सगळ्यांनी मिळून एक महाआघाडी उघडावी अशी तळमळ ह्यातील कितीजणांना आहे ? एकेकाळी दलित आणि ओबीसी ह्यांचे एकत्रीकरण होईल असे वाटले होते पण ओबीसींच्यातील जातीयतेने दलितांच्या मांडीला मांडी लावून बसायला नकार दिला त्यातच सगळा ओबीसी हा शैव असल्याने त्याला बौद्ध व्हायचे नाही हे काळाच्या ओघात आता स्पष्ट झाले आहे अशावेळी शैवांच्यातील पुरोगामी विचारवंतांना मान्यता देत आगम आघाडी उघडणे हाच पर्याय होता जो मी गेली कित्येक दशके मांडत आलोय पण त्याला मान्यता मिळणे अजूनही कठीण जाते कारण दलितांच्या डोक्यात अजूनही सगळा भारत बौद्धमय करेन ह्या आंबेडकरांच्या प्रतिज्ञेचा पवित्रा ताजा आहे वस्तुस्थिती अशी आहे की सगळा भारत बौद्ध होणार नाही पण सर्व भारताला बुद्ध आत्मसात करता येईल पण अजूनही बुद्धाला आत्मसात करण्यात ओबीसी कमी पडत आहेत ह्यामुळे एक अनावश्यक दरी दलित आणि ओबीसी ह्यांच्यात निर्माण झाली आहे जिचा अंतिम फायदा भाजपला होतो आहे .
ह्याक्षणी एकेकाळी दलित साहित्यापुढे असलेले सर्व प्रश्न ओबीसी साहित्यापुढे उभे राहणे अटळ आहे हे प्रश्न पुढीलप्रमाणे 
१ दलित साहित्य म्हणजे काय ?
२ दलित साहित्यकृती कशाला म्हणावे ?
३ दलित साहित्यिक कुणाला म्हणावे ?
४ दलितेतर साहित्यिकांच्या कलाकृतींना दलित साहित्य म्हणावे कि म्हणू नये ? म्हणावे तर का आणि म्हणू नये तर का ?
५ जन्माने दलित असणारे पण दलितांविषयी न लिहिणाऱ्या साहित्यिकांचे काय करायचे ?त्यांना दलित म्हणायचे कि नाही ? त्यांना दलित म्हणून चळवळीचा फायदा द्यायचा कि नाही ? कि छुपी भलावण करत उघडपणे नकार द्यायचा ?
दलित साहित्यातले हे प्रश्न अद्यापही सुटलेले नाही असेच प्रश्न ओबीसी साहित्यापुढे उभे राहणे अटळ आहे म्हणजे 
१ ओबीसी साहित्य म्हणजे काय ?
२ ओबीसी साहित्यकृती कशाला म्हणावे ?
३ ओबीसी साहित्यिक कुणाला म्हणावे ?
४ ओबीसींतर साहित्यिकांच्या कलाकृतींना ओबीसी साहित्य म्हणावे कि म्हणू नये ? म्हणावे तर का आणि म्हणू नये तर का ?
५ जन्माने ओबीसी असणारे पण ओबीसीविषयी न लिहिणाऱ्या साहित्यिकांचे काय करायचे ?त्यांना ओबीसी म्हणायचे कि नाही ? त्यांना ओबीसी म्हणून चळवळीचा फायदा द्यायचा कि नाही ? कि छुपी भलावण करत उघडपणे नकार द्यायचा ?
माझी दलित साहित्याविषयीची मते मी इथे प्रथम देतो 
१ दलित जातीजमातींना किंवा दलित जातीजमातीतील व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून लिहिले गेलेले साहित्य म्हणजे दलित साहित्य 
२ दलित जातीजमातींना किंवा दलित जातीजमातीतील व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून लिहिली गेलेली साहित्यकृती म्हणजे दलित साहित्यकृती 
३ दोन किंवा त्याहून अधिक दलित साहित्यकृती लिहिणारा साहित्यिक तो दलित साहित्यिक 
४ साहित्यिकाची धर्म , वर्ण , जात वा जमात पाहू नये दलितेतर लेखकांनी लिहिलेल्या दलित साहित्यकृतीही दलित साहित्यात मोडतात 
५ जन्माने दलित असूनही दलित साहित्य न लिहिणाऱ्या साहित्यिकाला दलित साहित्यिक मानू नये मात्र त्यांच्या साहित्यकृतींचे मूल्यमापन कसलाही पूर्वग्रह न बाळगता करावे ग्रेससारखा कवी मार्गी संस्कृतीत राहून अभिजात दर्जाची निर्मिती करत असेल तर आणि ही निर्मिती करतांना तो वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध बाजूने उभा रहात असेल तर त्याला जरूर दाद द्यावी आणि तो जर वर्णव्यवस्थेच्या बाजूने साहित्यात उभा राहतोय असे वाटत असेल तर तेही नीट उलगडून मांडावे अशावेळी तो केवळ जन्माने दलित आहे म्हणून त्याला सवलत देऊ नये ह्याचबरोबर अदलीत साहित्यात डोकावणाऱ्या वर्णव्यवस्थेच्या समर्थनावर जोरदार हल्ले करत रहावे .
आत्ता ह्याच पातळीवर ओबीसी साहित्यावर बोलणे अशक्य नाही
१ ओबीसी जातीजमातींना किंवा ओबीसी जातीजमातीतील व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून लिहिले गेलेले साहित्य म्हणजे ओबीसी साहित्य उदाहरणार्थ आनंद यादव ह्यांची गोतावळा किंवा उद्धव शेळके ह्यांच्या जवळ जवळ सर्वच साहित्यकृती 
२ ओबीसी जातीजमातींना किंवा ओबीसी जातीजमातीतील व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून लिहिली गेलेली साहित्यकृती म्हणजे ओबीसी साहित्यकृती 
३ दोन किंवा त्याहून अधिक ओबीसी साहित्यकृती लिहिणारा साहित्यिक तो ओबीसी साहित्यिक 
४ साहित्यिकाची धर्म , वर्ण , जात वा जमात पाहू नये ओबीसीतर लेखकांनी लिहिलेल्या ओबीसी साहित्यकृतीही ओबीसी साहित्यात मोडतात उदाहरणार्थ तू वेडा कुंभार हे व्यंकटेश माडगूळकरांचे नाटक . 
५ जन्माने ओबीसी असूनही ओबीसी साहित्य न लिहिणाऱ्या साहित्यिकाला ओबीसी साहित्यिक मानू नये मात्र त्यांच्या साहित्यकृतींचे मूल्यमापन कसलाही पूर्वग्रह न बाळगता करावे विलास सारंगसारखा लेखक मार्गी संस्कृतीत राहून अभिजात दर्जाची निर्मिती करत असेल तर आणि ही निर्मिती करतांना तो वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध उभा रहात असेल तर त्याला जरूर दाद द्यावी आणि तो जर वर्णव्यवस्थेच्या बाजूने साहित्यात उभा राहतोय असे वाटत असेल तर तेही नीट उलगडून मांडावे अशावेळी तो केवळ जन्माने ओबीसी आहे म्हणून त्याला सवलत देऊ नये ह्याचबरोबर अओबीसी साहित्यात डोकावणाऱ्या वर्णव्यवस्थेच्या समर्थनावर जोरदार हल्ले करत रहावे .
प्रश्न असा आहे कि ओबीसी साहित्याची चळवळ आवश्यक आहे का ?
ह्यासाठी प्रश्न मुळात पडतात कि ओबीसींचे पुरेसे प्रतिबिंब भारतीय साहित्यात पडले आहे का ?
किती भारतीय साहित्यकृतीत ओबीसी नायक आलेले आहेत ?
लोहार , गुरव , धनगर ह्या सारख्या समाजांना भारतीय साहित्यिकांनी न्याय दिला आहे का ?
ह्यासारख्या प्रश्नांचे उत्तर नकारार्थी असेल तर ओबीसी साहित्याची चळवळ काही काळ तरी आवश्यक आहे हे मान्य करावे लागेल आणि ह्या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे . त्यामुळे एक सामाजिक आपदा म्हणून तरी का होईना ह्या चळवळीची आवश्यकता पटावी .
आता काही साहित्यिक हे निखळ मानवतावादी असणे अटळ तर अशांना ओबीसी साहित्य चळवळीने विरोध करू नये कारण ह्याही चळवळीचा अंतिम उद्देश मानवता हाच असला पाहिला पाहिजे सर्व मानवांना करुणेने कवटाळणे ह्यातच तिचे साफल्य असले पाहिजे अन्यथा संख्येचा फायदा घेऊन ह्या चळवळीत जितके राजकारण घुसण्याची शक्यता आहे तितके इतर साहित्य चळवळीत शक्य नाही . फाटाफूट हा भारतीय चळवळींचा स्वभाव आहे त्या स्वभावापासून रक्षण करण्याची प्रचंड जबाबदारी चळवळीवर आणि चळवळीतील लोकांच्यावर येते . ही साहित्य चळवळ भारतीय साहित्यात नेमका काय रोल निभावते ह्याविषयी एक समाजशास्त्रीय उत्सुकता माझ्या मनात आहे . पाहू सुरवात तर झाली आहे 
------------------------------------------------------------------------------------------
श्रीधर तिळवे नाईक
..............................

No comments:

Post a Comment