दरवर्षी 25 डिसेंबरला मनुस्मृती दहन दिनानिमित्त मनुस्मृतीच्या आठवणींना उजाळा मिळतो. मनुविरोधक आणि मनुसमर्थक यातले बहुतेक मूळातले फारसे काहीही न वाचताच "तेव्हढेच ज्ञानप्रकाशात" चमकून घेतात.
त्या सर्व "वाचन निरक्षर ज्ञानीजनांसाठी",
मित्रवर्य बालाजी सुतार यांच्या भिंतीवरील त्यांच्या पोस्टवर मी दिलेली Coment काही मित्रांच्या सुचनेवरून खाली देत आहे...
1.मनुस्मृती हा कायद्यांचा कायदा असलेला प्राचीन ग्रंथ आहे. त्याचे इंग्रजी नाव " Manu's code of Law" "Manav Dharmashastra " आहे. त्यावर महात्मा फुले, पेरियार, डा.बाबासाहेब आंबेडकर आदींनी गंभीर आक्षेप घेतल्यामुळे व 25 डिसेंबर 1927ला महाडला तो बाबासाहेबांनी जाळल्यामुळे त्याची चर्चा जास्त होते.
2.त्याच्या लोकप्रिय आवॄत्त्या बाजारात आहेत त्या प्रामुख्याने वाईच्या बापट शास्त्री यांनी मराठी अनुवादासह प्रकाशित केलेल्या आहेत. प्रकाशक आहेत रमेश रघुवंशी आणि वितरक आहेत गजानन बुक डेपो, मुंबईत दादरला कबुतर खाना आणि पुण्यात भरत नाट्य मंदिरासमोर.
3.हा ग्रंथ 2684 श्लोकांचा आणि 12 अध्यायांचा आहे. मनुस्मृतीचा कालसापेक्ष अर्थ लावणारे मेधातिथी आदी विद्वानांचे भाष्यग्रंथ वाचल्याशिवाय मनुस्मृती वाचणे अर्धवट ठरेल.
4. मेधातिथी ते पुढच्या सर्व भाष्यकारांच्या भाष्याचे भारतीय विद्याभवनने 8 खंड प्रकाशित केलेले आहेत.
5. मनुस्मृतीची संशोधित आवृत्ती प्रकाशित झालेली आहे.
Manu's code of Law, By Patrick Olivelle,OXFORD University Press, 2005.
6. मनुस्मृतीवर टिकात्मक भाष्य करणारे लेखन अनेकांनी केलेले असून त्यातील नरहर कुरूंदकर, पटवर्धन, डा.आ.ह. साळुंखे आणि भदंत आनंद कौशल्यायन यांचे ग्रंथ खूपच गाजलेले आहेत.
7."हिस्ट्री आफ धर्मशास्त्र", धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथात [खंड 1, पृ.306 ते 349] भारतरत्न पां.वा.काणे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा ग्रंथ इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.स. 2 रे शतक याकाळात विकसित झाला.
8. डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते इ.स.4 थ्या शतकात अस्पृश्यता निर्माण झाली तेव्हा त्याची अंमलबजावणी सुरू झाली. "भारतीय जातिसंस्थेचा इतिहास" लिहिणारे इतिहासकार संजय सोनवणी यांच्या मते 11/12 व्या शतकानंतर या ग्रंथाची जबरी पकड भारतीय समाजावर बसली. त्यामुळे सर्व स्त्रिया व शूद्र आणि अतिशूद्र यांना भेदभाव,पक्षपात,अन्याय, शोषण यांची शिकार व्हावे लागले. इतिहासकार उमेश बगाडे यांच्या संशोधनानुसार भारताचा सर्व महसुली कारभार या ग्रंथाच्या आधारे चालवला जाई, अगदी कडव्या औरंगजेबाच्या काळातही महसुलव्यवस्था याच ग्रंथाच्या आधारे चालवली जात होती असे ते म्हणतात.
9. इतर अनेक स्मृती असल्या तरी मनुस्मृतीला एकप्रकारच्या संविधानाचा दर्जा होता. तो केवळ धर्मग्रंथ नव्हता तर तो कायद्याचा ग्रंथ असल्याने, अन्यायकारक कायदे आणि राजदंडाच्या आधारे करण्यात आलेला घटनात्मक अन्याय म्हणून मनुस्मृतीवर जास्त बोलले/लिहिले जाणे स्वाभाविक आहे.
10. अर्थात मनुविरोधक किंवा मनुसमर्थक हे सारे ग्रंथ वाचून मगच आपली मते बनवतात असा आरोप मी करणार नाही.
11. अगदी इंग्रजी राजवटीतही आयपीसी, सीआरपीसी तयार होईपर्यंत अनेक बाबतीत आणि ते तयार झाल्यावरही कौटुंबिक विेषयावर मनुस्मृतीच प्रमाण मानली जाई.
............................
No comments:
Post a Comment