Wednesday, January 4, 2017

राम गणेश गडकरी तुम्हारा तो चुक्याच....


सावित्रीबाईंची जयंती 3 जाने. हाच मुहुर्त का निवडला असेल बरे?
2019 ला पुढचा नंबर कोणाचा?
.......................
प्राथमिक शाळेत आम्हाला अरण्य नावाचे एक गडकरीभक्त शिक्षक होते. त्यांनी बालवयात गडकर्‍यांची गोडी लावली. बालपण तसे अत्यंत काटेरी आणि खडतर होते.
त्या करपलेल्या वातावरणात ज्यांनी अमाप आनंदाचे झरे खोदले त्यातलं सर्वात लाडकं व्यक्तीमत्व म्हणजे राम गणेश गडकरी.
काय गारूड केलेलं या  भाषाप्रभुनं! सारं बालपण गडकर्‍यांच्या झाडानं झपाटलेलं!
मी वादविवाद, वक्तृत्व स्पर्धांची शेकडो बक्षिसं शाळेपासून महाविद्यालयापर्यंत मिळवली. अनेक विषयांमध्ये पंचेस साठी गडकरी मदतीला धावून यायचे.
राम गणेश गडकरी यांच्या अवतरणांबद्दल त्यांना स्वामित्वधन द्यायचं ठरलं असतं तर त्या काळात मिळवलेल्या पारितोषिकांमधून काही हजार रूपये नक्कीच द्यावे लागले असते.
शाळकरी वयात मी पुस्तकं विकत घ्यायला सुरूवात केल्यानंतर एका लेखकाच्या सर्व पुस्तकांचा पहिला संच खरेदी केला तो गडकर्‍यांचा होता.
त्यावेळी मला स्मशानातील नोकरीचा महिन्याचा पगार मिळायचा 20 रूपये. पुण्याच्या रम्यकथा प्रकाशन, 392 नारायण पेठ च्या वा.ग.मेहेंदळे यांनी प्रकाशित केलेला हा संच 1970 च्या दशकात अवघ्या 25 रूपयांना मिळाला. मला वर्षाचा पगार वाचवून वाचवून साठवलेले हे पैसे त्यासाठी उपयोगी आले.
महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला असताना प्र.ना.परांजपे सर एकदा एका स्पर्धेला मला परिक्षक होते.  रा.ग. गडकरी यांच्या संमोहनातून त्यांनी माझी काही प्रमाणात सुटका केली.
अर्थात आजही गडकरी पुर्वी  इतके नसले तरी आवडतातच.
तेव्हा आम्हाला गडकर्‍यांची जात माहित नव्हती. यापुढे कोणताही ललित लेखक [ कथाकार,कादंबरीकार, नाटककार ] वाचायला घेताना आधी त्यांची जात बघून घेतलेली बरी. यापुढे प्रत्येक  पुस्तक दुकानात लेखकांच्या जातींचा तक्ता ठेवण्याची सक्ती करायला हवी. किंवा पुस्तकाच्या नावासमोरच लेखकाच्या जातीची नोंद अनिवार्य करण्यात यावी.
विशेषत: त्यानं जर शिवकाळाबद्दल काही लिहिलं असलं तर त्यांनी "ए" किंबा "बी" ग्रेडी प्रमाणपत्र घेतले होते किंवा कसे याचा तपास काढायला हवा. कदाचित उद्या लेखक संपले तर वाचक,संग्राहक,प्रकाशक यांच्यावरही मालकांची खप्पा मर्जी व्हायची.
मराठीतले आद्य पोवाडाकार महात्मा फुले आणि दुसरे लेखक म.मो.कुंटे यांचा सुद्धा लवकरच नंबर लागणार हे निश्चित.
गडकरी तुम्ही ज्या जातीत जन्माला आलात तिला शिवराय,शंभुराजे ही पवित्र नावं उच्चारण्याचा अधिकार तरी होता काय?
100 वर्षांपुर्वीच्या तुमच्या गुन्ह्याला माफी नाही.
पुतळा झाला. आता गडकरी यांच्या अस्थीसुद्धा आम्ही सोडणार नाही.
3 जानेवारीला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती असते. यापुढे लोकांचे तिच्याकडे दुर्लक्ष व्हावे आणि राम गणेश पुतळा दिनाचा इतिहास रचला जावा यासाठी तर हा मुहुर्त काढण्यात आला नाही ना?
नाटककार गडकरी, कवी गडकरी, विनोदकार गडकरी यांचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत.
ते इतिहासकार नव्हते.
पण त्या काळातले ख्यातनाम इतिहासकार कृष्णाजी अर्जून केळुस्कर यांचे शिवचरित्र वरदा प्रकाशनाच्या भावे आणि साकेत च्या बाबा भांडांनी अलिकडे पुन्हा एकदा प्रकाशित केलय.
आता केळुसकर पडले मराठा.
2019 च्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचाही नंबर लागणार काय? गेल्या 12 वर्षात दर निवडणुकीआधी एक याप्रमाणे भांडारकर झाले, दादोजी कोंडदेव झाले, वाघ्या कुत्राही सुटला नाही. आता राम गणेशानंतर नंबर कोणाचा?
.......................

No comments:

Post a Comment