Saturday, January 14, 2017

एकतर्फी प्रेमाच्या अमानुषतेची प्रभावी कहाणी

Lantouri, Dir. Reza Dormishian,Persian, Iran,2016.
एकतर्फी प्रेमाच्या अमानुषतेची प्रभावी कहाणी
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव.. 2..

PIFF, 15th Edition, 12 to 19 Jan. 2017, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव [12 जाने. ते 19 जाने. 2017]

लॅंटोरी या इराणी चित्रपटाने महोत्सवाचा 3 रा दिवस गाजवला. रझा डोर्मिशियन या तरूणाचा हा तिसराच चित्रपट आहे. त्याच्या आधीच्या दोन्हींप्रमाणे तो अनेक फिल्म फेस्टीवलमध्ये गाजतोय.

एकतर्फी प्रेमातून तरूणींच्या चेहर्‍यावर/अंगावर अ‍ॅसिड हल्ला केल्याच्या रानटी कहाण्या आपण अनेकदा ऎकतो/वाचतो. या चित्रपटातून ज्या भयानक कौर्याची कहाणी आपण पाहतो, ती अक्षरश: हादरवून टाकणारी आहे. मरियम ही एक सामाजिक कार्यकर्ती आहे. तिने "हिंसेला नकार द्या" अशी मोहीम चालवलेली असते. तात्कालीक रागातून गुन्हा घडलेल्या कैद्यांना शिक्षेतून सूट मिळवून देण्यासाठी ती झटत असते. त्यासाठी त्या गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना भेटून त्यांनी गुन्हेगाराला माफ केल्यास कायद्याप्रमाणे शिक्षेत सूट मिळण्याची तरतूद असते.

तेहरानमध्ये लॅंटोरी ही टोळी खंडण्या वसूल करणे, गाड्या चोरणे, पर्स पळवणे अशा गुन्ह्यांसाठी कुख्यात असते. पाशा आणि त्याचे दोन मित्र व एक तरूणी त्या गॅंगमध्ये सक्रीय असतात.
एकदा पाशा मरियमची पर्स पळवतो. तो तिला ती परत करतो. कारण तो तिच्या प्रेमात पडलेला असतो. मात्र हे प्रेम एकतर्फी असते.

तिचे एका तरूणावर प्रेम असल्याच्या संशयातून ही टोळी त्याला मारपीट करून तिच्यापासून दूर पळवून लावते.

पाशाच्या प्रेमाला मरियम होकार देत नाही म्हणून संतापातिरेकाने तो तिच्या चेहर्‍यावर तेजाब शिडकतो.
तिचा सुंदर चेहरा जळून विद्रूप होतो. तिचे डोळे जातात.

इअतरांना माफी मिळवून देणारी मरियम मात्र जेव्हा तिच्यावर बेतते तेव्हा सूडाने पेटते. इस्लामिक कायद्याप्रमाणे डोळ्याच्या बदल्यात डोळा नष्ट करण्याची तरतूद असल्याने ती पाशाचे डोळे अ‍ॅसिड टाकून जाळण्याची मागणी करते.

शिक्षेची अंमलबजावणी तिच्यासमोर होते.

हा चित्रपट अंगावर येणारा आहे. मरियमचा विद्रूप झालेला चेहरा, तिचे गेलेले डोळे हे सारे बघताना प्रेक्षक हादरून जातात.पाशाला शिक्षा दिली जात असताना सूडाचे समाधान मिळवणारी मरियमही खूप सतावून जाते.
अगदी शेवटच्या क्षणाला एक टर्निंग पोईंटही आहे.

या चित्रपटाचे टेकींग जबरदस्त आहे. अकिरो कुरासावाच्या राशोमनच्या पद्धतीने प्रत्येकजण आपल्याला जाणवले ते सांगत जातो. त्यातली तफावत नाट्य वाढवित जाते. अनेक नविन प्रयोग केलेले असल्याने चित्रपट महत्वाचा ठरतो.

Lantouri, Dir. Reza Dormishian,Persian, Iran,2016.

या चित्रपटाला विलक्षण प्रबोधनमुल्य आहे. मोठे शिक्षणमुल्यही आहे. स्त्रीपुरूष समतेच्या आणि लिंगभावाच्या चळवळीतील कोणीही चुकवू नये असा हा चित्रपट आहे.
................................

No comments:

Post a Comment