14 जून 1887 रोजी महात्मा फुले यांनी तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि.पुणे येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून एक ऎतिहासिक सामाजिक लढा दिला होता.
न्हावी,धनगर, कुणबी,महार,मांग भंगी आणि माळी समाजातील महिलांनी शिबूबाई विठोबा भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन नारायण काशिबा कर्हेकर या नाभिक बांधवाच्या कन्येचं लग्न सत्यशोधक पद्धतीनं लावलं.
या लग्नांची 5 वैशिष्ट्ये म्हणजे, हुंड्याला नकार, लग्नात अवाजवी खर्च न करणे, मानपानाच्या खर्चात बचत करून ती रक्कम शाळांना देणगी देणं, लग्न कोणत्याही जातीचं असलं तरी गावातल्या महार भगिनीने लग्नमंडपात उपस्थित राहून नवरदेवास ओवाळणे आणि लग्नाला भटजीला न बोलावणे.
त्यामुळे आपली दक्षिणा बुडाली म्हणून तळेगाव, कासारी, तांबूळ ओढा या गावांमधील सीताराम यशवंत भवाळकर आणि लखोबा गोपाळ कुलकर्णी यांनी अशा सत्यशोधक लग्नांना विरोध केला. दुलेराव सटवाजी पिंगळे यांना धमकावण्यात आले. एका देवऋष्याची मदत घेऊन महिलांवर प्रचंड दबाव आणण्यात आला.
अशा वेळी स्वत: महात्मा फुले तेथे गेले आणि त्यांनी सर्व महिला व अलुते, बलुते, दलित यांची एकी घडवून ही लग्नं यशस्वी केली. या भागात सत्यशोधक विवाहांची चळवळ उभी राहिली.
या संघर्षाबाबतचा तपशीलवार वृत्तांत स्वत: महात्मा फुले यांनीच 2 भागात जून आणि जुलै 1887 च्या "दीनबंधू" मध्ये प्रकाशित केला.
महात्मा फुले व सावित्रीबाई तळेगावात एक शाळाही चालवित असत.
हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे हे याच गावचे.
31 वर्षांपुर्वी 1986 साली गावच्या जत्रेत मला कारभारी किसनभाऊ भुजबळ यांनी भाषणाला बोलावले.
माझ्या भाषणात मी हा इतिहास सांगितला. गावात जोतीरावांचे स्मारक करावे अशी विनंती केली.
त्यामुळे गावच्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसराचे नामकरण महात्मा फुले परिसर करण्यात आले. आवारात जोतीरावांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला.
जत्रेतले तमाशे, कुस्त्या, बैलगाडा शर्यती यातील अफाट खर्चात बचत करून शाळा आणि महाविद्यालयाला मदत दिली जावी, गरिब,हुशार मुला-मुलींच्या उच्च शिक्षणाला यातून मदत करावी ह्या सुचनाही अंशत: अमलात आल्या.
गेली 12 वर्षे सोनाई व्याख्यानमालेत राज्यातील नामवंत वक्ते बोलावण्याची प्रथा आपण निर्माण करू शकलो. प्रथमच व्याख्यानमालांची संस्कृती उभी राहू लागली.
पिकतं तिथं विकत नाही अशी म्हण या गावानं चक्क खोटी ठरवली.
माझं भाषण गावात व्हावं म्हणून खुपदा निमंत्रणं आली. पण मी जाऊ शकलो नाही.
यावर्षी 28 नोव्हेंबरला मी आलंच पाहिजे असा ग्रामस्थांचा व कार्यकर्त्यांचा प्रचंड आग्रह होता.
कालच्या व्याख्यानाला तुफान गर्दी लोटली होती.
मुख्य म्हणजे भाषणानंतर तात्काळ त्याचे काही परिणामही दिसले.
महेश बापू ढमढेरे यांनी गावात "शेतकर्यांचा आसूड" या महाग्रंथाचे सामुदायिक वाचन करू अशी घोषणा केली तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा आरतीताई भुजबळ यांनी गावातल्या महिलांना एकत्र आणून गावात दारूबंदी करू अशी घोषणा केली. माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी फुल्यांच्या शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असा शब्द जाहीरपणे दिला.
या कार्यक्रमाला महिला, तरूण आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
31 वर्षांनी का होईना गाव कूस बदलतोय.
शेवटी सामाजिक परिवर्तनाची आपली अशी एक गती असते! वेग असतो.
-प्रा.हरी नरके