"महाराज, पोरगं सतत कोंगाड भाषेत बोलतय, डोक्यावर कायतरी परीणाम झालेला असणार. जालीम इलाज करा."
माझी आई देवऋषीला सांगत होते.
देवऋषी म्हणाले, "पोराला लागीर झालंया. मसणवट्यातनं जाताना बाधा झालीया."
पाचवीत आम्हाला भानुदास कोंडीबा गाडे नावाचे शिक्षक इंग्रजी विषय शिकवायचे. ते समर्पित शिक्षक होते. ते भान हरपून विषयात आणि मुलांमध्ये रमायचे. ते बारामतीजवळच्या चोपडजचे असल्यानं त्यांची भाषा आम्हा पुणेकरांना थोडी गमतीची वाटायची. आमच्या वर्गात साधना गांधी नावाची एक मुलगी होती. तिचं किराणा मालाचं दुकान होतं. त्या काळात मोठी रॉकेल टंचाई असायची. तर एके दिवशी सर भर वर्गात तिला म्हणाले,"गांधी तुझ्यात रॉकेल अस्तंय काय?" सगळा वर्ग हसला.
ते दररोज 5 नवे इंग्रजी शब्द शिकवायचे आणि जे विद्यार्थी त्या शब्दांचे स्पेलिंग पाठ करून येतील त्यांना स्वखर्चानं पेन, पेन्सील, खोडरबर भेट द्यायचे. दररोज आपल्याला पहिलं बक्षीस मिळावं म्हणून मी घरीदारी सतत धोसरा घेऊन स्पेलिंग पाठांतर मोहीमेवर असायचो.
देवऋषी महाराजांनी सांगितलेली उपाययोजना फारच तापदायक होती. आई दररोज भल्या पहाटे मला उठवायची. डिसेंबरमधली कडक थंडी.
नदीवर जाऊन त्या कडक थंडीत आंघोळ करायची, मग ओलेत्या कपड्यांनी मसणवट्याशेजारच्या पिंपळाला 101 फेर्या मारायच्या.
पहिल्या नी शेवटच्या फेरीत पिंपळाला उडीद वहायचे. असं हे सव्वा महिना रोज चालू होतं.
मला खुप राग यायचा. पण आई हातात छडी घेऊन स्वत: सुपरव्हिजन करायची.
तिला मी इंग्रजी स्पेलिंग पाठ करतोय हे पटायचंच नाही.
आमच्या झोपडीशेजारी एकुण तीन स्मशानं होती. त्यातल्या पारशांच्या स्मशानात मी नोकरी करीत असल्यानं मला तिकडची भिती वाटायची नाही. शेजारच्या हिंदू नी बाजूच्या मुस्लीम स्मशानात जाताना मात्र थोडी भिती वाटायची. त्यावर उपाय म्हणुन मी मला येत असलेली सगळी स्तोत्रं म्हणायचो.
शेवटी स्वत: गाडेसरांनी घरी येऊन आईची समजूत घातली. त्यावर आईचं म्हणणं, " गुर्जी, तुम्ही म्हणताय तर ठीकच असंल. पण मी म्हणते, असली कोंगाड कोंगाड भाषा आपण शिकावीच कशाला?"
- प्रा. हरी नरके
फोटो- नातीसोबत आई [प्रमिती]-1993
No comments:
Post a Comment