Saturday, November 18, 2017

22 नोव्हेंबर रोजी डॉ.रखमाबाई यांची 153 वी जयंती-


आज बुधवार दि. 22 नोव्हेंबर रोजी डॉ. रखमाबाई यांची 153 वी जयंती- आज भारत त्यांना विसरलेला आहे.
डॉ. रखमाबाई सावे-राऊत रूग्णसेवा करणार्‍या पहिल्या भारतीय महिला डॅाक्टर
जन्म- 22 नोव्हेंबर, 1864 मृत्यू- 25 डिसेंबर, 1955

सुमारे 92 वर्षे आयुष्य लाभलेल्या या डॉ. रखमाबाई सावे-राऊत यांनी आयुष्यभर झोकून देऊन समर्पित वृत्तीनं रुग्णसेवा केली.
त्या खुप लहान असताना त्याकाळातील बालविवाहाच्या प्रथेप्रमाणे वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचं लग्न दादाजींबरोबर झालं.
लग्नानंतर काही वर्षे त्या माहेरीच राहिल्या.
पुढे त्यांनी सासरी नांदायला यावं अशी त्यांच्या नवर्‍यानं मागणी केली.
रखमाला खुप शिकायचं होतं. डॅाक्टर व्हायचं होतं. त्यासाठी परदेशात जावं लागणार होतं. सासरी गेल्यास हे स्वातंत्र्य मिळणार नाही अशी तिला भिती वाटत होती.
त्याकाळात भारतात महिला डॅाक्टर नव्हत्या.
आनंदीबाई जोशी खुप जिद्दीनं शिकल्या. डॅाक्टर झाल्या. परंतु वैद्यकीय शिक्षण घेऊन त्या भारतात आल्या त्याच आजारी पडून आणि त्याच आजारात त्या गेल्या. त्या एकही पेशंट तपासू शकल्या नाहीत ही दु:खद गोष्ट.
रखमाबाई नांदायला जात नाहीत म्हणून दादाजीनं त्यांच्यावर खटला भरला. तो जगभर गाजला.
इंग्रज न्यायालयाने हिंदू धर्मशास्त्राप्रमाणं रखमाबाईनं नांदायला जावं असा निकाल दिला. न गेल्यास कोर्टाची बेआदबी केल्याबद्दल तुरूंगवास पत्करावा असंही सांगितलं.
बहाद्दर रखमाबाई तुरूंगात जायला तयार झाल्या.
पुढे लोकपुढाकारानं दादाजीबरोबर समझोता झाला नी रखमाबाईला घटस्फोट मिळाला.
वयाच्या 25 व्या वर्षी रखमाबाई इंग्लंडला गेल्या. एम.डी. झाल्या.
मुंबईच्या कामा हास्पीटलमध्ये, सुरतेला आणि राजकोटला त्यांनी आयुष्यभर आरोग्य सेवाकार्य केले. पुढे त्या आजन्म अविवाहीतच राहिल्या.
त्यांचं जीवन हा महिला हक्क चळवळीचा, आरोग्यसेवेचा आणि समर्पित वृत्तीचा धगधगता इतिहास होय. आज भारत त्यांना विसरलेला आहे.
त्यांच्या प्रेरक आणि पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन-
-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment