Tuesday, November 21, 2017

मी महंमद खान शपथेवर सांगतो की---


महंमद आमिर खान जुन्या दिल्लीतील गरीब कुटुंबातील मुलगा.
दहावीच्या परीक्षेनंतर कराचीत राहणार्‍या आपल्या मोठया बहिणीला भेटायला गेला. दिल्लीतील गुप्तहेर यंत्रणेचे अधिकारी त्याच्यावर पाकिस्तानातून एक पाकीट आणण्याची कामगिरी सोपवतात.
देशप्रेमापोटी अजाणतेपणे तो होकार देतो.
कराचीत तिथल्या पोलीसांच्या भीतीपोटी तो ते पाकीट फेकून देऊन रिकाम्या हातानं दिल्लीला परततो.
दिल्ली पोलीस त्याचं अपहरण करतात.
गुप्तहेर यंत्रणा त्याचा अतोनात छळ करतात.
त्याच्यावर तब्बल 19 खोटे खटले भरले जातात. त्याला अतिरेकी ठरवले जाते.
खोटे साक्षीदार उभे केले जातात. बनावट पुरावे तयार केले जातात.
चौदा वर्षे त्याला कच्च्या कैदेत तुरूंगात काढावे लागतात.
त्याचे वडील कोर्टात हेलपाटे मारून थकतात. मरून जातात. आईही थकते. अर्धांगवायूनं आजारी पडते. मरते.
अखेर त्याची 17 केसेसमधून निर्दोष सुटका होते. दोन खटले अद्यापही रेंगाळलेत.

पुस्तकाच्या शेवटी तो म्हणतो,"मी पुर्णपणे मुक्त नसलो, तरी तुरुंगातही नाहीये. अन्यायाविरूद्ध लढतोय आणि आपल्यापैकी आणखी काही लोक लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या या लढ्यात सहभागी झाले, तर आपण समाज बदलू शकतो."
एक निरपराध तरूणाची वयाच्या अवघ्या 20 वर्षांपासून तुरुंगवासानं सुरू होणारी ही लढत आज पस्तीशीच्या टप्प्यावर पोचलीय.
एक विलक्षण सुन्न करणारं आत्मकथन-
राजहंस प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती सप्टेंबर 2017, पृष्ठे 156,किंमत रू.180/-
-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment