Monday, January 28, 2019

मी असमाधानी आहे,कारण.....







मी असमाधानी आहे,कारण...प्रा.हरि नरके
प्रा.हरी नरके यांना महाराष्ट्र विचारवंत, संशोधक आणि वक्ता म्हणून ओळखतो. त्यांनी हयातभर केलेल्या प्रबोधनाचा गौरव म्हणून त्यांना आज महाराष्ट्र फाउंडेशनचा समाजप्रबोधन पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पुण्यात ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक शाम बेनेगल यांच्या हस्ते हा सन्मान दिला जाईल. त्यानिमित्त नरके यांची आनंद अवधानी यांनी घेतलेली ही मुलाखत.
विचारकलहात हिरीरीने भाग घेत त्याला समाजहिताचं वळण देऊन, महाराष्ट्राची पुरोगामी वाटचाल अधिक दमदार व्हावी यासाठी हरी नरके काम करतात. त्यासाठी ते वर्तमानपत्रे, साप्ताहिके/मासिके आणि पुस्तके या प्रिंट मीडियाचा वापर तर करतातच. पण फेसबुक, ब्लॉग, टीवी चॅनेल्स यांचाही उपयोग मोठ्या प्रमाणात करतात. शिवाय युनिवर्सिटीतली अभ्यासवर्ग आणि चर्चासत्रं, कार्यकर्त्यांची प्रशिक्षण शिबिरं आणि जाहीर सभांतून व्यक्त होण्यासाठी सातत्याने राज्यभर आणि राज्याबाहेर आणि परदेशातही प्रवास करत असतात. एकाच वेळी क्लास आणि मास यांना अपील होईल अशी त्यांची भाषणे असतात. टीवीवरच्या चर्चेत दोन-तीन मिनिटातही आपला मुद्दा पटवून देण्यात किंवा समोरच्याचा मुद्दा खोडून काढण्यात ते वाकबगार आहेत.

प्रश्नः महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे प्रबोधनकार्यासाठीचा पुरस्कार आपल्याला मिळाला आहे, त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन! प्रबोधनाचं काम करण्यासाठी वाचन, लेखन आणि वक्तृत्वाची बैठक असावी लागते. तुमचा वाचनाचा प्रवास कुठून आणि कधीपासून सुरू झाला?
माझा जन्म उसतोडणी कामगारांच्या कुटुंबामधे झाला. उसतोडणीचं काम मिळेल त्या गावी माझे आईवडील फिरत असत. त्यामुळे हे भटकं कुटुंब होतं, असं म्हणायला हरकत नाही. पुण्याजवळच्या हडपसरमधे ते मजुरीसाठी गेले आणि सलग काम मिळत गेल्याने तिथेच स्थिरावले. अशा कुटुंबात जन्म झाल्यामुळे घरात वाचनाचं वातावरण असण्याची शक्यता नव्हती. वडील माझ्या लहानपणीच वारले. आई आणि भाऊ दोघंही निरक्षर होते, पण त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेमधे मला दाखल करण्यात आलं.
शाळेत तर जात होतो, पण घराच्या आसपासचं वातावरण मात्र रूढार्थाने वाचनाला पोषक नव्हतं. त्या दिवसांत मी पारशी समाजाच्या कब्रस्तानामधे काम करत होतो. तिथल्या संगमरवरी कबरी धुणं, परिसराची झाडलोट करणं आणि झाडांची निगा राखणं असं त्या कामाचं स्वरूप होतं. वाचताना आश्चर्य वाटेल, पण माझ्या वाचनाची सुरवात तिथून झाली. मला खेळण्यासाठी सवंगडी नव्हते, त्यामुळे कब्रस्तानातल्या त्या स्मशान शांततेत मी वाचत बसत असे.

प्रश्नः सुरवातीच्या वाचनाचं स्वरूप काय होतं?
मला आठवतंय त्याप्रमाणे मी सुरवातीला ‘चांदोबा’चे अंक वाचायचो. विक्रम आणि वेताळाच्या सुरस कथा वाचताना मला मजा येत असणार बहुधा. अर्थात, त्या गोष्टींचा उपयोग मी मात्र अगदी भलत्याच ठिकाणी करायचो. बहुजन समाजातल्या अनेक कुटुंबांप्रमाणे आमच्याही घरी चातुर्मास असायचा. आषाढ ते कार्तिक या काळात तो दर वर्षी केला जायचा. दररोज संध्याकाळी पांडवप्रताप, हरिविजय वा रामविजय अशा पोथ्यांचं वाचन होत असे. ते करण्यासाठी गुरुजी येत असत. पण काही कारणाने गुरुजी आले नाहीत, तर पोथी वाचायला मला बसवले जाई.
ऐकण्यासाठी आमच्या वस्तीतली आसपासची माणसं असत. ही सगळी माणसं कष्टकरी वर्गातली असल्यामुळे दिवसभर मजुरीची कामं करून थकून आलेली असत. माझ्या आयुष्यातला हा पहिला श्रोतृवर्ग कंटाळू नये किंवा झोपू नये, म्हणून मी पोथीमधल्या श्लोकांचे अर्थ सांगताना गोष्टी सांगत असे. या गोष्टी एकतर शाळेत शिक्षकांकडून ऐकलेल्या किंवा चांदोबामधे वाचलेल्या असत. आपल्या वाचनाचा अशा प्रकारे होत असलेला उपयोग मला त्या वयात आणखी वाचण्यासाठी ऊर्जा देत असणार.

प्रश्नः लहानपणी चांदोबाचं वाचन तर अनेक जण करतात, म्हणजे त्या काळामधे करत असत; पण त्यासोबत वाचन वाढण्यासाठी आणखी कोणते घटक पोषक ठरले?
घरात पोथी वाचताना गोष्टी सांगायला मिळत. त्याचप्रमाणे वर्गात मॉनिटर असल्यामुळे मुलांना शांत ठेवण्यासाठी गोष्टी सांगायची संधी मिळत असे. मग चांदोबाबरोबरच पंचतंत्र, इसापनीती आणि गोष्टींच्या अनेक पुस्तकांचं वाचन होत असे. काही योगायोग आयुष्याला वळण देत असतात. माझ्या शालेय वयात जुळून आलेल्या एका योगामुळे माझ्या पुढच्या आयुष्याला अर्थ प्राप्त झाला, असं वाटतं. आमच्या शाळेच्या शेजारी राष्ट्र सेवादलाची शाखा भरत असे. तिथे माझी भेट डॉ. बाबा आढाव, डॉ. अनिल अवचट या मंडळींशी झाली.
नाथमाधव किंवा हरी नारायण आपट्यांच्या पुस्तकांत मी रमलेला असताना, नकळतपणे सामाजिक विषयांवरच्या वाचनाकडे ओढला गेलो. परिणामी, घरात डॉ.आंबेडकरांचा फोटो लावण्यासाठी मी मारही खाल्लेला आहे. मध्यम जातींमधल्या कुटुंबांमधे आजही बाबासाहेबांचा फोटो लावला जात नाही, ही गोष्ट प्रखर वास्तव म्हणून स्वीकारलं पाहिजे. या काळात खूप नाही, पण काही प्रमाणात का होईना मी फुले-आंबेडकर आणि इतर परिवर्तनवादी साहित्य वाचू लागलो होतो. त्याच वेळेला पु.ल. देशपांडे, गो.नी. दांडेकर, बाबासाहेब पुरंदरे यांच्यापासून ते जयवंत दळवी आणि जी.ए. कुलकर्णी यांच्या पुस्तकांचं वाचनही जोमानं चालू होतं.
वाचनाच्या या टप्प्यावर माझी भेट ज्येष्ठ विचारवंत गं.बा. सरदार यांच्याशी झाली. ती भेट मौल्यवान ठरली. माझ्या वाचनाच्या आणि विचार करण्याच्या प्रवासाचे ते मार्गदर्शक बनले. ललित आणि वैचारिक वाचनाचा समतोल साधायला त्यांनी मला शिकवलं.

प्रश्नः वाचनाचा उपयोग सामाजिक भान वाढवण्यासाठी कशा प्रकारे झाला?
हडपसरच्या आमच्या जिल्हा परिषद शाळेनंतर मी पुढे पुणे विद्यार्थीगृहात आलो. तिथे आल्यावर तर एकदम वीस हजार पुस्तकांचं ग्रंथालय माझ्यासाठी खुलं झालं. तिथल्या वाचनात साने गुरुजी आणि विनोबा भावे अधिक भावले. ते दोघं जे अत्यंत सोपं, प्रवाही आणि रसाळ मराठी लिहितात त्याच्या प्रेमात तर मी आजही आहे. पण तिथे मराठीच्या बरोबरीने थोडं हिंदीही वाचायला लागलो. त्याच ग्रंथालयात मी प्रेमचंदांची सगळी पुस्तके वाचली. हे चालू असतानाच सेवादलामुळे माझी अनेक नव्या विषयांची, पुस्तकांची आणि कार्यकर्त्यांची ओळख होत होती.
मी नववीत असतानाची गोष्ट आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं, यासाठी आंदोलन सुरू झालं होतं. कार्यकर्त्यांमधे वावरत असल्यामुळे मी मुंबईत झालेल्या सत्याग्रहामधे सहभागी झालो. पोलिसांनी सर्वांनाच अटक केली आणि पुढचे तीन आठवडे मलाही तुरुंगवास घडला. ते तीन आठवडे म्हणजे माझ्या माणूस म्हणून घडणीचा महत्त्वाचा काळ ठरला. त्या काळात कॉ.शरद पाटील, रावसाहेब कसबे, बाबूराव बागुल, ग.प्र. प्रधान यांच्यापासून डॉ.कुमार सप्तर्षी आणि अनिल अवचटांपर्यंत अनेकांचा सहवास लाभला. दिवसाचे चोवीस तास आम्ही एकत्रच होतो. या सगळ्यांच्या चर्चा, वादविवाद आणि गप्पा ऐकता आल्या. सामाजिक क्षेत्राचा दिंडी दरवाजा माझ्यासाठी तुरुंगानं खुला झाला!

प्रश्नः सतत वाचतं राहण्यासाठी आणखी कोणाची प्रेरणा मिळाली?
तशी अनेक नावं सांगता येतील. पण पु.ल. देशपांडे यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. मी नववी-दहावीत असताना पुलंच्या एका वाढदिवसाला त्यांना एक पुस्तक भेट द्यायला गेलो. त्यांनी माझी चौकशी केली आणि वाचनाची आवड पाहून कौतुकही केलं. त्यानंतर ते मला नवनवी पुस्तकं वाचायला द्यायला लागले. यात पुलंसारखा एवढा मोठा लेखक आपल्या वाचनाचं कौतुक करतो याचा त्या वयाला साजेसा आनंद होता. त्या आनंदाचं रूपांतर सकारात्मक ऊर्जेत होऊन माझं वाचन आणखी वाढलं. परिचय वाढल्यानंतर तर पु.ल. नव्याने प्रकाशित झालेली पुस्तकं आवर्जून मला वाचायला देऊ लागले. त्यामुळे रामनगरी, उपरा किंवा बलुतं यांसारखी पुस्तकं अगदी ताजी आणि चर्चेत असताना माझ्या वाचनात आली. त्यामुळे मला दलित, भटके आणि अलुतेदार-बलुतेदारांचे प्रश्न, त्यांचं जगणं आणि भावविश्व समजायला खूपच उपयोग झाला.

प्रश्नः प्रबोधनाच्या प्रवासामधे वाचनाइतकाच भाषणांचाही सहभाग आहे. तुम्ही महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही हजारो भाषणं दिलीत. भाषणांची सुरवात कशी झाली?
मी चौथीत असल्यापासून भाषणं करायला सुरवात केली. निमित्त अर्थातच शाळेतल्या आणि आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धांचं होतं. पुढे आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमधे तर मी भरपूरच सहभाग घेतला. खूप बक्षिसं मिळवली. त्याकाळी स्पर्धेतली भाषणं, टाळ्या, कौतुक आणि बक्षिसं हे सगळं फारच भारी वाटायचं. बक्षिसं मिळवण्याची नशापण काही काळ माझ्यावर स्वार होती. मात्र बक्षिसांच्या अलीकडचं आणि पलीकडचं मी जे मिळवत होतो, ते जास्त मोलाचं होतं.
बक्षिसांच्या अलीकडचं म्हणजे स्पर्धेच्या भाषणांची तयारी करत असताना मला वैचारिक शिस्त खूप लागली. भाषणाची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन घ्यायला मी एकदा गं.बा. सरदार यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडे मुद्दे मागितले. पण आयते मुद्दे द्यायला त्यांनी नकार दिला. मला वाचायला आणि विचार करायला उद्युक्त करणं हा त्यामागचा हेतू होता. मग मी या अनुषंगानं वाचलं. विचार केला आणि काही मुद्दे घेऊन त्यांच्याकडे गेलो. त्यावर आधारित त्यांच्यासमोर पंधरा मिनिटं बोललो. त्यावर ते पंधरा मिनिटं बोलले. त्यातून मी स्पर्धेच्या भाषणाची तयारी केली. या प्रक्रियेनंतर अर्थातच मला पहिलं बक्षीस मिळालं. त्यानंतर ती पद्धतच पडून गेली. प्रत्येक स्पर्धेच्या आधी आम्ही तसं करायचो.
बक्षिसांच्या अलीकडे मला खूप काही मिळालं असं म्हटलं, ते या अर्थानं. बक्षिसांच्या पलीकडचं म्हणजे या स्पर्धांच्या निमित्तानं मला खूप मित्र मिळाले. आपले समवयस्क काय वाचतात, कसा विचार करतात आणि इतर कोणकोणत्या उपक्रमांत भाग घेतात, हे कळत गेलं. कधी त्या गोष्टींचं कौतुक वाटलं, कधी काही बाबी अनुकरणीय वाटल्या तर कधी मतभेदही झाले. शिवाय स्पर्धांच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या अनेक गावांमधे मी प्रथमच गेलो. वेगवेगळ्या संदर्भात त्या गावांविषयी पुस्तकांमधे वाचलेलं होतं; ती गावं प्रत्यक्षात बघण्याची, तिथल्या लोकांना भेटण्याची संधी मिळाली. तो सगळा अनुभव समृद्ध करणारा होता. भाषणांची तयारी करताना शैलीवरही काम करायचो.
माझ्या भाषणांवर कोणाचा प्रभाव आहे असा प्रश्न जर कोणी विचारला, तर अगदी अनपेक्षित नाव सांगावे लागेल. माझी आई आणि भाऊ कामाचा भाग म्हणून म्हशीचं दूध काढायचे. ते दूध कोरेगाव पार्कमधे आचार्य रजनीशांच्या आश्रमात पोचवण्याचं काम माझ्याकडे होतं. तिथे दूध दिल्यानंतर रजनीशांची भाषणं ऐकायला मी थांबत होतो. त्यांची विषयाची मांडणी, त्यात दिलेले संदर्भ, भाषाशैली, उदाहरणं आणि त्या सगळ्यांचा श्रोत्यांवर होणारा परिणाम हे फार विलक्षण होतं. त्यांचं भाषण चालू असताना एक प्रकारचं भारावलेपण सगळ्या वातावरणात भरलेलं असायचं. मी वयानं लहान असल्यानं कदाचित, मला ते अधिक जाणवत असेल. पण मी रजनीशांची दोनशे तरी भाषणं ऐकली.
रजनीशांप्रमाणेच नरहर कुरुंदकर यांचाही प्रभाव माझ्या भाषणांवर होता. त्यांच्या भाषणांना अकादमिक शिस्त होती. शिवाय विरोधकांच्या विचारांचा प्रतिवाद करण्याची त्यांची अशी सभ्यता होती.
‘विरोधकांचे विचार मला मुळीच मान्य नाहीत’ असं म्हणायच्याऐवजी ते म्हणायचे, ‘विरोधकांचं मत मी शांतपणे ऐकलेलं आहे. ते मला समजलेलंही आहे. त्यांच्या म्हणण्याशी सहमत व्हायलाही मला आवडलं असतं. पण नाइलाज आहे. माझ्यासमोरचे पुरावे मला तसं करू देत नाहीत.’
तर वक्ता म्हणून घडण्याच्या काळात कुरुंदकरांच्या भाषणांनी आणि अर्थातच पुस्तकांनीसुद्धा माझ्या विचारांना निश्चित अशी दिशा दिली. माझ्या भाषणांवर प्रभाव असणारं आणखी एक नाव पु. लं. देशपांडे आहे. ते संपूर्ण शरीरानं बोलायचे. त्यांच्या शब्दांआधी त्यांचे डोळे श्रोत्यांशी संवाद साधायचे. भाषण हे एक सादरीकरण असतं, याचं भान मला पुलंमुळे आलं. त्यामुळे वैचारिक भाषण करतानाही ते प्रेक्षकांना कंटाळवाणं होता कामा नये, ही जाणीव सतत मनात तेवत राहिली.

प्रश्नः त्यानंतरची वाटचाल कशी होती?
त्यानंतरच्या काळातही भाषणं चालू राहिलीच, पण त्याला एक वेगळं परिमाण लाभलं. 1989 मधे बाळ गांगल नावाच्या गृहस्थांनी महात्मा फुले यांची बदनामी होईल अशी मांडणी केली. त्यामुळे राज्यात बराच गदारोळ झाला. माझं फुले वाङ्मय वाचून झालेलं असल्यामुळे मीही एक लेख लिहिला. तो लेख वाचल्यानंतर पुलंनी मला बोलावून घेतलं. केवळ लेखावर न थांबता यावर पुस्तक लिहिण्याची सूचना केली.
मी भरपूर तयारी केली आणि गांगलांच्या म्हणण्याचा प्रतिवाद करणारं ‘महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन’ हे पुस्तक लिहिलं. ते सुगावा प्रकाशनाचे विलास वाघ यांनी प्रकाशित केलं. चंद्रपूरला एका कार्यक्रमात पुलंच्याच हस्ते त्याचं विमोचन झालं. त्यानंतर फुल्यांचं स्मृतिशताब्दी वर्ष सुरू होत होतं. त्या पार्श्वभूमीवर मला वेगवेगळ्या भागांमधून भाषणांची निमंत्रणं येऊ लागली.
पुस्तकाच्या निमित्तानं अभ्यास झाला होता. स्पर्धांच्या निमित्तानं भाषणकलेचा सराव झाला होता. त्यामुळे लोकांना माझी भाषणं आवडू लागली आणि निमंत्रणं वाढू लागली. फुले साहित्य या एकाच विषयावर मी पाचशे भाषणं दिली. पण याकडे मी केवळ भाषण म्हणून पाहिलं नाही. गांगल यांच्याप्रमाणेच इतर कोणाच्या मनात फुल्यांविषयी गैरसमज असतील तर ते दूर करावेत आणि लोकांना माहिती नसलेले फुले-विचाराचे पैलू प्रसारित करावेत, या हेतूने मी बोलत गेलो.
आजवर मी दिलेल्या भाषणांचा आकडा मध्यंतरी मोजला, तर तो तब्बल अकरा हजारांच्या घरात आहे. तो आकडा पहिल्यानंतर मला गोविंदराव तळवलकरांची आठवण झाली. भाषणं करण्याच्या ते विरोधात होते. भाषणांमधे ऊर्जा खर्च झाली की लेखन होत नाही, असं त्यांचं मत होतं. आज इतक्या वर्षांनी त्यांच्या बोलण्यामधलं तथ्य माझ्या लक्षात येतं आहे. मी सतत भाषणांमधे व्यग्र असल्यामुळे माझ्या हातून जेवढं लेखन (आणि संशोधन) एरवी होऊ शकलं असतं, तेवढं झालेलं नाही. पण याला दुसरी बाजूही आहे.
आपल्या देशाची आजवरची परंपरा मौखिक आहे. आणि काही निवडक शहरं सोडली, तर उर्वरित महाराष्ट्रात पुस्तकं पोचतच नाहीत. शिवाय जिथे पोचतात तिथेही ती पुरेशा प्रमाणात वाचली जात नाहीत. सर्वदूर पुस्तकं वाचली गेली पाहिजेत, ही भूमिका मान्यच आहे, पण तसं घडत नाही. आणि तोवर आपण वाट बघू शकत नाही. निश्चित विचार पोचवणारी परिणामकारक भाषणं करत राहणं, हाच त्यावरचा उपाय आहे.

प्रश्नः भाषणं करताना अप्रिय बोलण्याचे प्रसंग कधी आले का? कोणते?
‘वर्शिपिंग फाल्स गॉड’ या नावाने अरुण शौरी यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान होईल असा मजकूर त्यात होता. त्या वेळेला मी राज्यभरात मिळून पाचशेपेक्षा जास्त भाषणं केली. अरुण शौरी यांनी दिलेले चुकीचे संदर्भ आणि बाबासाहेबांच्या बोलण्याचा त्यांनी केलेला विपर्यास या दोन बाबींचा समाचार या भाषणांमधून मी घेतला. त्याचबरोबर बाबासाहेबांच्या विचारांची आणि कार्याची सविस्तर मांडणीही केली. या भाषणांना मिळालेला प्रतिसाद संमिश्र स्वरूपाचा होता.
एका वर्गाला ते खूपच आवडत होतं, पण नाराज होणारे श्रोतेही भेटत होते. त्यानंतरच्या काळात सनातनी संस्थांचे कारनामे वाढत गेल्यावर त्यांचा पर्दाफाश करणारी भाषणं मी केली. त्यातल्या काही भाषणांच्या वेळी निदर्शनं केली गेली. ‘हरी नरके यांच्या भाषणांवर बंदी आणावी’ अशीही मागणी केली गेली.
मध्यंतरी भारताच्या राज्यघटनेचं पुनरावलोकन करण्याचा घाट काहींनी घातला होता. त्यावर मी खेड्यापाड्यांत जाऊन पाचशेपेक्षा जास्त भाषणं दिली. राज्यघटना म्हणजे काय, ती लिहिताना घटनाकारांच्या मनात काय होतं, त्याचं स्वरूप कसं आहे आणि नेमका खोडसाळपणा कुठे चालू आहे- या सगळ्याविषयी मी बोलत असे. त्यानंतर राजर्षी शाहूमहाराजांची जयंती हा उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतला. तेव्हा लक्षात आलं की, पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्याच्या इतर भागांत शाहूमहाराजांविषयी फारशी माहिती नव्हती. म्हणून मग शाहूंचं योगदान आणि त्याची सामाजिक फलश्रुती अशा आशयाची पाचशे भाषणं मी दिली.

प्रश्नः ही भाषणं देताना काय शिकायला मिळालं?
एका शब्दात उत्तर द्यायचं तर- लवचिकता. सामाजिक बदलाच्या प्रक्रियेत संघर्ष तर होणारच. जोपर्यंत आपण खोलीत बसून लेखन करतो तोपर्यंत त्याचं स्वरूप वेगळं असतं. पण प्रत्यक्ष लोकांमधे गेल्यावर मात्र तो जमिनीवरचा सामना बनतो. तिथे खूप ताठर राहून चालत नाही. विरोधकांच्या मांडणीमधली शेरेबाजी, शिवराळपणा आणि आक्रस्ताळेपणा बाजूला सारून त्यांच्या बोलण्यात काही तथ्य आहे का, हे शोधता आलं पाहिजे. त्या मुद्द्याचा तर्कसंगत मुकाबला करता आला पाहिजे. मुद्दा असेल, तर तो मान्यही केला पाहिजे.
मुख्य म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वात खुलेपणा असला पाहिजे, हे या काळात मी शिकलो. अन्यथा, विरोधकांप्रमाणेच आपणही वागण्याचा धोका असतो. मात्र भाषणं करायची असतील, तर प्रत्येक विषयावर भूमिका घेता आली पाहिजे. कोणतीच भूमिका न घेण्याचे काही फायदे असतात. कोणाशीच भांडण होत नाही, लोकप्रियता मिळते. पण ज्या समाजासाठी आपण काम करतो, त्यासाठी ते हिताचं नसतं. भूमिका घेणं आणि ती संयतपणे मांडणं, हेही मला भाषणांनीच शिकवलं.

प्रश्नः संस्थात्मक कामाची सुरवात कशी झाली?
दहावीनंतर मी प्रशिक्षणार्थी कामगार म्हणून टेल्को, आताची टाटा मोटर्समधे दाखल झालो होतो. तिथे आठ तासांची नोकरी करून एम.ए. पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. अभ्यासही खूप रस घेऊन केल्यामुळे मला बी.ए. आणि एम.ए.ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुवर्णपदक मिळालं. पुढे १९९० ला फुले शताब्दी वर्षाचे कार्यक्रम चालू असताना राज्य शासनाने अनेक उपक्रमांची आखणी केली. त्या वेळी मुख्यमंत्री शरद पवार यांनी टाटांशी बोलून मला प्रतिनियुक्तीवर मंत्रालयात काम करण्याची संधी दिली. तिथून माझ्या शासनासोबतच्या आणि पर्यायाने संस्थात्मक कामाला सुरवात झाली.
तिथे गेल्यावर लक्षात आलं की, महात्मा फुल्यांचं समग्र साहित्य अत्यंत वाजवी दरात लोकांना उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मग लक्षात आलं की, त्यांचे विचार महाराष्ट्राच्या बाहेर गेलेलेच नाहीत. त्यासाठी स्वतंत्र तरतूद करून आणि यंत्रणा उभी करून इंग्रजीसह तेरा भाषांमधे ते साहित्य उपलब्ध करण्याच्या कामात मला सहभागी होता आलं.
हे चालू असतानाच लक्षात आलं, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं लेखन आणि भाषणांच्या खंडांचं काम सतराव्या खंडापर्यंत होऊन काही कारणांनी थांबलं होतं. मग ती जबाबदारी मी घेतली आणि बाविसाव्या खंडापर्यंत संपादनाचं काम पूर्ण केलं. त्यानंतरच्या काळात शासनाच्या पंचवीसहून अधिक महामंडळांवर काम करता आलं. ज्या इतर संस्थांमधे काम केलं; त्यात महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य महामंडळ, अभिजात भाषा मराठी समिती आणि भांडारकर प्राच्यविद्या इत्यादी संस्थांचा सहभाग आहे. येथील कामांमुळे मला लेखनाचं आणि संपादनाचं काम करता आलं. त्यासाठी य. दि. फडके आणि रा.चिं. ढेरे या ज्येष्ठ संशोधकांसोबत काम करता आलं आणि खूप काही शिकता आलं. या दोघांचाही मी अत्यंत ऋणी आहे.

प्रश्नः इतकी वर्ष काम केल्यानंतर सध्याच्या समाजाकडे बघताना काय वाटतं?
मी असमाधानी आहे, निश्चित अशा ध्येयानं आणि उत्साहानं मी तीस-पस्तीस वर्षांपूर्वी कामाला सुरवात केली आणि स्वत:शी प्रामाणिक राहून सातत्यानं काम करत राहिलो. पण आज समाजाकडे बघताना मन विषण्ण होतं. सगळ्या पुरोगामी चळवळी क्षीण किंवा विस्कळीत झालेल्या आहेत. ज्या प्रतिगामी शक्तींच्या विरोधात यथामती आणि यथाशक्ती लढा दिला, त्यांची ताकद वाढताना दिसते आहे.
महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारातून उभ्या राहिलेल्या चळवळींमुळे शिक्षणाचा प्रसार झाला. त्यातून बहुजन समाजामधे मध्यमवर्ग तयार झाला. पण आज त्या नवमध्यमवर्गाचं वर्तन संतापजनक आहे. फुल्यांची आणि बाबासाहेबांची अशी धारणा होती, की या समाजाला शिक्षण मिळालं, की त्याच्या ज्ञानप्रेरणा जागृत होतील. तो समाज विविध विषयांच्या अभ्यासामधे, अभिजात कलांमधे आणि जीवन समृद्ध करणाऱ्या गोष्टींमधे रस घेईल. पण शिकून, नोकरी करून स्वावलंबी झालेला हा वर्ग मात्र तसं करताना दिसत नाही.

प्रश्नः पुढच्या वीस पंचवीस वर्षाचं आपल्या समाजाचं भवितव्य कसं दिसतं आहे?
मला असं वाटतं की, सकारात्मक पद्धतीनं सामाजिक बदल करण्याची क्षमता कोणत्याही धर्मामधे किंवा विचारसरणीमधे उरलेली नाही. त्यातल्या त्यात आशा असेल तर ती आता कलेकडूनच आहे. त्यामधे साहित्य, नाटक, चित्रपट, टेलिव्हिजन असे सगळेच आले. त्या दृष्टीनं नागराज मंजुळे, जयंत पवार किंवा आसाराम लोमटे ही मंडळी मला खूप महत्त्वाची वाटतात.

प्रश्नः महाराष्ट्र फाउंडेशननं हा प्रबोधनाचा पुरस्कार आपल्याला दिला आहे. त्यादृष्टीनं पुढच्या कामाची दिशा काय दिसते आहे?
मी सध्या जे काम करतो आहे, ते तर चालूच राहणार आहे. पण त्याशिवाय प्रबोधनकार्यासाठी चांगल्या वक्त्यांची, लेखकांची आणि संशोधकांची गरज लागणार आहे. त्यासाठी नव्या पिढीमधून लेखक आणि संशोधकांची फळी उभी करायला आवडेल. समाजाची साथ मिळाली, तर त्यासाठी एखादी संस्थाही उभी करता येईल. त्यातून काही तरी आश्वासक निर्माण होईल, असं वाटत आहे.
प्रा.हरी नरके, २७ जानेवारी २०१९

Thursday, January 17, 2019

Girls of the Sun सर्वोत्कृष्ठ चित्रपट








पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इव्हा हुसेनचा Girls of the Sun सर्वोत्कृष्ठ चित्रपट
श्रेष्ठ चित्रभाषेद्वारे Women, Life, Liberty चा कलात्मक वेध- प्रा.हरी नरके

जागतिक पातळीवरील महत्वाच्या महिला दिग्दर्शक इव्हा हुसेन यांच्या Girls of the Sun या चित्रपटाने सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. अतिरेक्यांच्या तावडीतून कुर्दीस्तानातील आपले गाव मुक्त करण्यासाठी लढणार्‍या कमांडर बहार या विरांगनेची आणि तिच्या महिला सहकार्‍यांची जबरदस्त लढत टिपणारा हा चित्रपट म्हणजे श्रेष्ठ चित्रभाषेद्वारे Women, Life, Liberty चा घेतलेला अस्सल कलात्मक अनुभव होय.

फ्रेंच पत्रकार Mathilde च्या नजरेतून प्रेक्षकांपुढे हा पट उलगडत जातो. कमांडर बहार जिचा पती अतिरेक्यांकडून मारला गेलेला आहे, जिचा लहानगा मुलगा अतिरेक्यांच्या कब्ज्यात आहे अशा स्थितीत ही उच्चशिक्षित युवती शस्त्र हाती घेते. स्त्रियांमध्ये मनोबल निर्माण करते. स्वातंत्र्याच्या शोधात निघालेली ही फौज निव्वळ आशावादाच्या जोरावर कशी आणि किती झेप घेते त्याचा हेलपाटून टाकणारा हा अनुभव म्हणजे स्वातंत्र्याच्या वैश्विक मूल्याचे महाकाव्यच होय.

श्रेष्ठ कथा,पटकथा, बहार [Golshifteh Farahani] आणि  पत्रकार Mathilde [ Emmanuelle Bercot] यांचा दर्जेदार अभिनय, जिवंत छायाचित्रण, हटके एडिटिंग आणि उच्च पातळीवरील दिग्दर्शनाचा अनुभव घ्यायचा असेल तर खिळवून ठेवणारा आणि अस्वस्थ करणारा हा चित्रपट चुकवू नका.


Girls of the Sun 2018 (Official) movie trailer
Original Name: Les Filles Du Soleil
English Name: Girls Of The Sun
Year: 2018
Run time: 115'
Language: French, English, Arabic, Kurdish
Type (Colour/ Black & white): Colour
Country: France
Director: Eva Husson
Producer: Didar Domehri
Cast: Golshifteh Farahani, Emmanuelle Bercot
Screenplay: Eva Husson
Cinematographer: Mattias Troelstrup
Editor: Emilie Orsini
Sound Designer: Olivier Le Vacon, Alexis Place, Emmanuel de Boissieu
Music Composer: Morgan Kibby
Costume Designer: Marine Galliano
Production Designer: David Bersanetti
Production Company: Maneki Films


Festivals:
Cannes IFF 2018
TIFF 2018
BFI London FF 2018
Selected Filmography:
Hope to Die (short) 2004
Those for Whom It’s Always Complicated 2013
Bang Gang (A Modern Love Story) 2015

Director's Biography:
Eva Husson was born and raised in France. She began working as an actress in theatre, and films at very young age. She went to prestigious American Film Institute where she received MFA. Her thesis short film Hope to Die went on to get screening at many festivals across the globe. Her second short was Those for Whom It’s Always Complicated. She directed her debut feature Bang Gang (A Modern Love Story) in 2015. Her recent film Girls Of The Sun was selected to compete for Palm d'Or.

प्रा.हरी नरके, १७ जाने. २०१९

लक्ष्मणराव पाटील : एक भारी राजकारणी -


लक्ष्मणराव पाटील : एक भारी राजकारणी - प्रा.हरी नरके राष्ट्रवादीचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे आज पहाटे निधन झाले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावच्या स्मारक निर्मितीनिमित्त त्यांचा माझा प्रदीर्घकाळ संबंध आला होता. पंचायत राज्यातून लोकसभेपर्यंत वाटचाल केलेले पाटील हे बेरकी राजकारणी होते. साखर कारखाना त्यांच्या ताब्यात होता. तेव्हा त्यांनी एकदा माझे व्याख्यानही ठेवले होते. त्यांचा माझ्यावर एक बहुजन कार्यकर्ता म्हणून विशेष लोभही होता. मी त्याकाळात बहुजन ऎक्याच्या विचारांनी संमोहित झालेलो होतो. मात्र मी पुण्याहून नायगावला येऊन सावित्रीबाईंचे स्मारक आणि संपुर्ण गावाचा कायापालट करण्याच्या कामात पुढाकार घेत असल्याचे बघून ते सावध झाले. मला या भागातून निवडणूक लढवायची असावी अशी त्यांची धारणा बनली. स्पर्धक भावनेने ते अस्वस्थ झाले. माझ्या स्मारकाच्या कामाला विरोध करू लागले.मोडता घालू लागले. सातारा जिल्ह्यातील सर्व आमदार खासदारांना भेटून मी त्यांनी त्यांचा विकासनिधी स्मारकासाठी द्यावा असा प्रयत्न चालवला होता. त्यावेळी मंत्री असलेल्या रामराजे निंबाळकर यांनी ह्या आवाहनाला विधायक प्रतिसाद दिला. ते इतर सर्वांशी बोलले. त्यांनी सर्व आमदार,खासदारांची बैठक बोलावली. मलाही बोलावले. पण कुठून तरी सुत्रे हलली. बैठक रद्द करायला सांगण्यात आली. सज्जन रामराजे बिचारे मनापासून हळहळले. मी खासदार लक्ष्मणराव पाटील यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. चर्चा झाली. मी खासदारनिधीचा विषय काढताच ते म्हणाले, "तुम्ही उशीरा आलात. माझा निधी तर केव्हाच संपला." मी जिल्हाधिकारी कचेरीतून सगळी माहिती काढलेली होती. त्यांच्या निधीतले २५ लाख रूपये शिल्लक असल्याचे मी त्यांना सांगताच ते वरमले. मला म्हणाले, "तुम्ही कशाला या फंदात पडता? सावित्रीबाईंशी आपला काय संबंध? त्यांचा समाज बघून घेईल त्यांच्या स्मारकाचे." सावित्रीबाईंचे कार्य सर्वांसाठीच असल्याचे मी त्यांना सांगितले. ते म्हणाले, "माझा पुतण्या पोलीसखात्यात अधिकारी आहे. त्याची अमूक तमूक पोलीस स्टेशनला बदली करायला गृहमंत्र्यांना सांगा. ते सावित्रीबाईंच्या समाजाचे आहेत. बदली झाली तर मी माझा खासदारनिधी नक्की देतो. खरंतर असल्या उद्योगात पडायचे नाही असा माझा नियम होता. पण आपदधर्म म्हणुन मी गृहमंत्र्यांशी बोललो. ते माझ्यावर चिडले. पण त्यांनी खासदार पाटलांच्या पुतण्याच्या बदलीचे काम केले. मी खासदार पाटलांना ही बातमी सांगायला फोन केला आणि आतातरी सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी निधी द्या असं आवाहन केलं. खासदार पाटील मला म्हणाले, "ही बदली तर मी डीजींकडून स्वत: करून घेतलीय. त्यात गृहमंत्र्यांचा काहीही संबंध नाही. सावित्रीबाईंचे समाजबांधव मला मतं देत नाहीत. मी निधी देऊ शकत नाही." एकदा नायगावचे एक ग्रामस्थ माझ्याकडे आले. आपला मुलगा एस.एस.सी. बोर्डात सोळावा आल्याचे त्यांनी मला सांगितले. सावित्रीबाईंच्या वंशातला हा मुलगा इतके यश मिळवतो, याचा मला आनंद झाला. मी ३ जानेवारीच्या जयंती उत्सवात त्या मुलाचा जाहीर सत्कार करायचे ठरवले. शासकीय कार्यक्रम पत्रिकेत सत्काराचा हा विषय घातला. कार्यक्रम पत्रिका वाचून खासदारांचा जवळचा एक कार्यकर्ता मला भेटला. "तो मुलगा १६ वर्षांपुर्वी बोर्डात आला होता, आता त्याचा सत्कार कशाला करता?" असे त्याने मला विचारले. मी सत्कार रद्द केला. जयंती समारंभाला तो मुलगा, त्याचे आईवडील सजून धजून आले होते. कार्यक्रम संपत आल्याचे बघून ते स्टेजवर माझ्याकडे आले. मी त्यांना १६ वर्षांपुर्वी तुमचा मुलगा बोर्डात आल्याने त्याचा सत्कार आता करणे बरे दिसणार नसल्याने तो रद्द केल्याचे बोललो. त्यांनी मला मुलाची गुणपत्रिका दाखवली. ती तर त्याच वर्षाची होती. म्हणजे मुलाचे वडील खरे बोलत होते. मी स्वत:च कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करीत असल्याने उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधी या मुलाचा सत्कार केला. मुलगा आणि त्याचे आईवडील आनंदून गेले. कार्यक्रम संपल्यावर मी खासदारांच्या त्या कार्यकर्त्याला स्टेजवरच जाब विचारला. " हा मुलगा तुमच्या भावकीतला असूनही तुम्ही माझ्याशी असं खोटं का बोललात?" असं मी त्याला चिडून विचारलं. त्यावर तो थंड आवाजात सराईतपणे म्हणाला, "आम्ही काहीही सांगू. तपासून घ्यायची जबाबदारी तुमची आहे." खासदारसाहेब त्याला टाळी वाजवून दुजोरा देत होते. ग्रामीण भागातले लोक आणि कार्यकर्ते भलेच असतात असा माझा तोवर भाबडा समज होता. पण ती माझी नशा तात्काळ उतरली नी माणसं ग्रामीण असोत की शहरी ती सारखीच असतात याचा धडा मला मिळाला. सातारचे कलेक्टर अनिल डिगीकर, सीईओ दिलीप बंड आणि एस.पी. सुरेश खोपडे यांचे मला या स्मारकाच्या आणि गावाच्या विकासाच्या कामी ड्युटीप्लस सहकार्य लाभले. गावातल्या महिला आणि युवकांनी या स्मारकासाठी मनापासून झटून योगदान दिले. -प्रा.हरी नरके,१७ जाने. २०१९

Wednesday, January 16, 2019

भाई: व्यक्ती की वल्ली" एक हलकाफुलका चित्रपट






"भाई: व्यक्ती की वल्ली" एक हलकाफुलका चित्रपट -प्रा.हरी नरके

सध्या चर्चेत असलेला "भाई: व्यक्ती की वल्ली" हा चित्रपट बघितला.
ताज्या वादाच्या आणि वादंगाच्या पार्श्वभुमीवर या चित्रपटाबद्दल माझे मन साशंक झालेले होते.
तरिही मला हा चित्रपट आवडला. पटकथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन, संगीत झकास वाटले. पुलंचा देव करायची गरज नाही. ते एक रसरशीत असे प्रतिभावंत व्यक्तीमत्व होते.
सामान्य प्रेक्षक डोळ्यापुढे ठेऊन हा चित्रपट काढलेला आहे. त्यामुळे तो निव्वळ कलात्मक, दुर्बोध, अंधारातला वगैरे चित्रपट नाहीये. आणि तोच त्याचा महत्वाचा गुण आहे.
सर्वसामान्य प्रेक्षक वर्तमानपत्री समिक्षणं वाचून चित्रपट बघायला का जात नाहीत याचे उत्तर मिळाले. किंबहुना ज्या चित्रपटांची हे बुद्धीजिवी समिक्षक वाहवा करतात त्यांच्याकडे प्रेक्षक फिरकतच नाहीत. ते त्याच्याकडे नक्कीच पाठ फिरवतात. हलक्याफुलक्या, प्रसन्न करमणूकीशी या विद्वानांचे एव्हढे वाकडे का असते?

हा चित्रपट बघायला दहा हजार अपेक्षा ठेऊन जायचेच कशाला ना? मला तरी हे वादंग म्हणजे अमुक पाहिजे, तमूक पाहिजे होते टाईप अपेक्षांचे गाठोडे वाटले. बदनामीचा आरोप वगैरे तर निव्वळ कांगावा आहे. या चित्रपटात त्याचा मागमूसही नाही.
एकवेळ जगातल्या सगळ्यांच्या सगळ्या अपेक्षा पुर्ण करणे शक्य आहे. पण एव्हरेस्टच्या उंचीच्या बुद्धीजिवी, विद्वान, पत्रकार, समिक्षक असलेल्या जागतिक किर्तीच्या पुणेकरांच्या अपेक्षांची पुर्तता करणे केवळ अशक्य आहे. यापुढे या विद्वानांचे वाचण्याच्या भानगडीत न पडलेले बरे. गड्या आपला सामान्य माणूसच बरा. "या असल्या विद्वानांचे" बोजड ओझे आपल्याला झेपणारे नाही.

माजी आमदार सन्मित्र मोहन जोशी यांनी पुण्यातील साहित्यिक, पत्रकार, राजकीय, सामाजिक नेते यांना आवर्जून निमंत्रित केले होते.
या प्रसंगी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, विद्या बाळ, मुकुंद टाकसाळे, सुधीर गाडगीळ, ॲड. भास्करराव आव्हाड, सतिश देसाई, बुधाजीराव मुळीक, सदा डुंबरे, अरूण खोरे, अंकुश काकडे, प्रशांत कोठडिया,सुनिल माळी, अनिल टाकळकर, सुनिल कडूसकर, न.म.जोशी आणि या चित्रपटातील कलावंत उपस्थित होते.
गणेश मतकरी, रत्नाकर मतकरी, महेश मांजरेकर, अजित परब, सागर देशमुख, इरावती हर्षे, शुभांगी दामले, हृषीकेश जोशी, प्रिया जामकर, सचिन खेडेकर, मृण्मयी देशपांडे, दिप्ती लेले आणि सर्व टिमचे मन:पुर्वक अभिनंदन.

कोणतीही कलाकृती म्हटले की मतभेद हे आलेच.
विद्वान पत्रकार, समीक्षक हे सारे व्यक्तीगत न घेता ही मते वस्तुनिष्ठपणे घेतील अशी आशा असल्याने माझी प्रांजळ मते मांडली. सादर मतभेद हेच पुणेकरांचे ठळक लक्षण किंबहुना पेटंट आहे.

-प्रा.हरी नरके, १७ जाने.२०१९

व्ही.पी.सिंग : मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न्याय यांचे प्रतिक

- सोमनाथ चटर्जी



पंतप्रधान व्ही.पी.सिंग हे सर्वसहमती, मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न्याय यांचे प्रतिक होते.त्यांनी मंडल आयोगाचा अहवाल लागू केला.त्यातून सामाजिक उलथापालथ झाली.उत्तरेकडील राज्यात हिंसाचार उसळला. या प्रश्नावर संसदेत मी म्हणालो, " मंडल शिफारशींना माझा पाठींबा आहे. आजही देशातील इतर मागास वर्गाची दारूण पिळवणूक होते आहे. त्यांची प्रगती आणि विकास व्हावा यासाठी देशाची साधने आणि संसाधने वापरली जात नाहीयेत."

गुणवत्तेचा प्रश्न नेहमी आरक्षणाच्या संदर्भात पुढे केला जातो. गुणवत्ता ही उच्चवर्णियांची मक्तेदारी आहे असे मी मानत नाही. आरक्षण धोरण कायदेशीर आणि न्यायालयीन तपासणीत टिकलेले आहे.

प्रसारमाध्यमांची मंडल आयोगावरील प्रतिक्रिया निराशाजनक होती. माध्यमांनी व्ही.पी.सिंग यांना खलनायक म्हणून रंगवले. नैतिक आणि स्वच्छ राजकारणासाठी लढणारा एक शिपाई ही त्यांची खरी प्रतिमा पुसून टाकून त्यांच्याविरूद्ध अत्यंत दुष्ट आणि बदनामीकारक प्रचार करण्यात आला. हा प्रकार इतिहासात तरी कधीही घडलेला नव्हता.

संसदेत मी त्यावर म्हणालो, "प्रसारमाध्यमांनी योग्य प्रकारे लोकशिक्षण करायला हवे. दोन्ही बाजूंचे चित्र नीट मांडायला हवे. शिफारशी काय आहेत नी विरोध कशाला आहे हे व्यवस्थित मांडले गेले तर दुषित जनमत बदलू शकेल. आईवडील आणि शिक्षक लहान कोवळ्या मुलांना भडकावित आहेत. विरोधी चळवळ समाजविघातक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हातात गेलेली आहे."

"देशाच्या राजधानीत मंडल समर्थक आमदार खासदारांना घेराव घाला, त्यांना केरोसिनमध्ये बुडवून पेटवून द्या " असा विखारी प्रचार खुलेआम चालू होता. त्याचवेळी भाजपच्या अडवानींनी रथयात्रा काढली. अयोध्येच्या राम मंदिराचा मुद्दा दाखवण्यापुरता होता. त्यांची मुख्य लढाई मंडल आयोगाविरूद्ध होती. मंडल आयोगामुळे मागास जाती संघटित होत होत्या. त्यांच्या विरोधात त्यांना आव्हान देण्यासाठी उच्च जातींचे संघटन करण्यासाठी अडवानींचा हा खटाटोप होता. त्यासाठी धर्माचा वापर केला गेला. संकुचित राष्ट्रवादाला खतपाणी घालणारी भाषणे रथयात्रेता झाली. देशभर विलक्षण धर्मविद्वेषी परिस्थिती तयार करण्यात आली.

अडवानींना बिहारमध्ये अटक झाली. भाजपाने व्ही.पी.सिंग सरकारचा पाठींबा काढला. अडवानींना देशात धर्माच्या नावावर युद्धे घडवायची होती. रथयात्रेच्या मध्यभागी ठळकपणे भाजपाचे निवडणूक चिन्ह मिरवले गेले.

व्ही.पी. सिंगांनी राजीनामा दिला.

सत्ता गमावली तरी एक मुत्सद्दी राजकारणी म्हणून त्यांचा आब वाढला. त्यांची निष्ठा आणि पारदर्शी सरकार देण्याचा त्यांचा प्रयत्न याचे मला फारच कौतुक वाटले. प्रसार माध्यमे अत्यंत कट्टरपणे त्यांच्या विरोधात होती. त्यांनी व्हीपींच्या अश्लाघ्य बदनामीची मोहीमच राबवली. व्हीपींनी जे काही केले ते योग्यच होते. त्यांची पद्धतही योग्यच होती असे मला वाटते.

-सोमनाथ चटर्जी, तत्वनिष्ठेची जपणूक, [आत्मचरित्र], अनुवाद- शारदा साठे, राजहंस प्रकाशन, पुणे, २०१४, किं.३२५ रूपये.

-प्रा.हरी नरके

Income inequality in India: Top 10% upper caste households own 60% wealth -




Income inequality in India: Top 10% upper caste households own 60% wealth - business standard
Although India’s upper caste households earned nearly 47% more than the national average annual household income, the top 10% within these castes owned 60% of the wealth within the group in 2012, as per a recent paper by the World Inequality Database.
Further, the wealthiest 1% among them grew their wealth by nearly 16 percentage points to 29.4% over the decade to 2012, the paper, entitled ‘Wealth Inequality, Class and Caste in India, 1961-2012’ and published in November 2018, said.
The vast inequality of income and wealth between and within castes highlighted in the paper are significant in the light of the Bharatiya Janata Party government’s new bill to entitle poorer sections among the forward castes to a 10% quota in government jobs and higher education institutions, which has been challenged in court.
Not only is the wealth and income gap large, it is growing--across all castes, in the 36 years till 2016, the share of wealth held by the top 10% has increased 24 percentage points to 55%, as IndiaSpend reported on January 2, 2019.
Inequality between castes
Marginalised caste groups such as the scheduled castes (SCs), scheduled tribes (STs) and other backward castes (OBCs) earn much less than the national household income average of Rs 113,222, according to the paper. SC and ST households earn 21% and 34%, respectively, less than the national average. OBC households fare better but still earn 8% or Rs 9,123 less than the annual Indian average.
Among upper caste groups, Brahmins earn 48% above the national average and non-Brahmin forward castes, 45%, said the paper, ‘Wealth Inequality, Class and Caste in India, 1961-2012’.
On January 9, 2019, the Indian parliament approved the Constitution (124th Amendment) Bill to provide 10% reservation in government jobs and higher education institutions for economically weaker sections of the general category of citizens. These are families that do not belong to SC, ST or OBC categories, and earn less than Rs 800,000 annually, own less than 5 hectares of agricultural land and own residential properties smaller than 1,000 sq.ft.
— IndiaSpend (@IndiaSpend) January 7, 2019
Based on the World Inequality Database, the paper combined data from wealth surveys, the National Sample Survey-All India Debt and Investment Survey (NSS-AIDIS), and millionaire lists. It used the censuses, the NSS-AIDIS and the Indian Human Development survey to explore the evolving relationship between class and caste in India.
“Economic ranking follows caste hierarchy, making caste a valid stratification in the society,” the paper noted. “It is important to keep in mind that the standard deviation is also very high in FC groups, i.e. not all are well off in that group. The clustering of social groups in (sic) not perfect.”
Within castes, the highest differences are among forward castes--and growing--and the least wealth differences are to be found among SCs.
“Caste and class are largely co-terminus with few exceptions and life-chances in India continue to be based on one's caste position,” A.R. Vasavi, a social anthropologist and independent researcher, told IndiaSpend. “From allocation of resources, to opportunities, to social capital the distribution pattern matches the skewed social structure; those higher in the ranking gain or get better allocations at the cost of denying the majority.”
India is one of the most unequal countries in the world with the top 10% controlling 55% of the total wealth, up from 31% in 1980, according to the 2018 World Inequality report, as IndiaSpend reported on January 2, 2019.
The National Family Health Survey 2015-16 (NFHS-4) showed that 45.9% of ST population were in the lowest wealth bracket compared to 26.6% of SC population, 18.3% of OBCs, 9.7% of other castes and 25.3% of those whose caste is unknown, IndiaSpend reported on February 28, 2018.
Muslims have lower income than average, non-Hindu, non-Muslim groups have highest
Muslims, while faring better than the SC, ST and OBC population, reported an annual household income 7% less than the national average.
Others (non-Hindu, non-Muslim groups and those who do not fall under the SC, ST and OBC categories) were found to be the richest group, though they make for only 1.5% of the country’s population, the paper said. They earned an annual income of Rs 242,708, twice the annual household income average in India.
PM #NarendraModi announced a cabinet decision today to amend the Constitution & provide 10% reservation for ‘economically backward’ upper castes in direct recruitment in govt services & admissions for higher #education. Follow thread for insights: #Reservation
— IndiaSpend (@IndiaSpend) January 7, 2019
Eligibility will be based on: 1) income < Rs 800,000/yr (less than Rs 66,000/month), equivalent to the salary of an entry-level bureaucrat (IAS officer) or senior software engineer/ developer/ or programmer. #Reservation
— IndiaSpend (@IndiaSpend) January 7, 2019
2) Agri land < 5 acre which includes small, marginal, medium & semi-medium holdings that collectively account for 89% of agricultural holdings. Large holdings that account for 10% of agri-land & which declined almost 11% between 2001-2010 not covered. #Reservation
— IndiaSpend (@IndiaSpend) January 7, 2019
3) House < 1,000 sq ft or residential plot <100 yards (less than 900 sq ft) in municipal areas. This is larger than avg size of flats in new building projects across #Mumbai (<900 sq. ft.) & Pune (<1000 sq. ft) launched in 2016. https://t.co/ABdfr4qSF6 #Reservation
— IndiaSpend (@IndiaSpend) January 7, 2019
4) Or a residential plot < 209 yards (less than 1,800 sq ft) in non-notified (non-residential) areas. https://t.co/GkDH3IQMpg #Reservation
— IndiaSpend (@IndiaSpend) January 7, 2019
The new 10% #reservation will be over and above the existing reservations & will not affect the quota for scheduled castes/scheduled tribes/other backward castes, according to news reports.
— IndiaSpend (@IndiaSpend) January 7, 2019
The proposed bill, to be introduced tomorrow, will amend Articles 15 & 16 of the Constitution as the 10% reservation exceeds the #SupremeCourt limit of 50% on quotas. #Reservation
— IndiaSpend (@IndiaSpend) January 7, 2019
Critics have already pointed out that the move announced towards the end of the winter session of Parliament means it would not be cleared soon. https://t.co/yp1v4o7CFw https://t.co/6Pg8MKrH6V https://t.co/3nVGX11iIW#Reservation
Among OBCs and STs too, top 10% had cornered most wealth. Top 10% of both groups held around 52% of wealth in 2012 and top 10% of SCs' share increased three percentage points to 46.7% till 2012
Shreehari Paliath | IndiaSpend 
Last Updated at January 14, 2019 08:50 IST

Saturday, January 12, 2019

ब्राह्मणी पगडी-

पेशवाईत मुसलमानांच्या पगडीसारखी आमची पगडी अगदी लहान व साधी होती.
पण पेशवाई बुडाली तेव्हा आमची अक्कल आमच्या डोक्यातून बाहेर पडून आमच्या पगडीत शिरली.
कृत्रिम सृष्टीत जर एखादी अत्यंत निरूपयोगी,त्रासदायक व आर्ष वस्तु असेल तर ती ब्राह्मणी पगडी होय.
पागोट्याचा निरूपयोगीपणा पक्का सिद्ध व्हावा म्हणून या पगड्या बनवण्यात आल्या. उकीरड्यावर फेकून देण्याची यांची लायकी.

उपयोगाच्या दृष्टीने ब्राह्मणी पगडीस शंभरपैकी पाच गुणदेखील मिळणार नाहीत. सौंदर्याच्या दृष्टीने हिचा लास्ट नंबर येईल.
अभिनिवेश बाजूला ठेऊन उपयुक्ततेच्या दृष्टीने आमचे जातभाई या पागोट्याचा विचार करतील तर आमच्या विधानातील सत्यता त्यास पटेल.फॅशन उर्फ तर्‍हा हिच्यासारखी दुसरी कोणतीही चीज आंधळी किंवा लहरी नसेल. अंगरखा व पागोटे ही वस्त्रे आम्ही मुसलमानापासून थोडा फेरफार करून उचलली. यज्ञयागात निरंतर गुंतलेल्या ब्राह्मणांस पगडीची गरजच काय? हिंदुस्तान जिंकणार्‍या मुसलमानांच्या किंवा लढाऊ मराठ्यांच्या पदरी जेव्हा ब्राह्मणलोक कारकून म्हणून राहू लागले तेव्हा दरबारात जाण्यासाठी त्यांनी आपला गंगाजमनी पेहराव ठरविला. लग्नात आम्ही जी वाद्ये लावतो तीवरून आम्हांस कोणत्या व किती लोकांचे गुलाम व्हावे लागले हे सहज कळते. नक्राश्रू ढाळणारे श्रीमंत ठोंबे व त्यांच्या पायात घुटमळणार्‍या अजागळ भटभिक्षूकांचे काय सांगावे?

स्थितीप्रमाणे पेहरावात व चालीरितीत फेरफार केला पाहिजे. विचारपुर्वक केलेली सुधारणा टिकाऊ, सुखावह आणि आनंदप्रद असते.

ब्राह्मणी पागोट्यामुळे आमची फारच फसगत झालेली आहे. ती आमची सकलादी कानटोपी किंवा शालजोडी किंवा धोतर वा पंचा कुणीकडे आणि हे छचोर पागोटे किंवा पगडी कोणीकडॆ? ही चवचाल पगडी म्हणजे केळे काय,पट्ट्या काय, पीळ काय,कोकी काय सारेच तर्‍हेवाईक. पेशवाईत मुसलमानांच्या पगडीसारखी आमची पगडी अगदी लहान व साधी होती.

पण पेशवाई बुडाली तेव्हा आमाची अक्कल आमच्या डोक्यातून बाहेर पडून आमच्या पगडीत शिरली. बोलताबोलता हीचा परिघ इतका फुगत गेला की जणु गाडीचे चाकच.
पागोट्याचा निरूपयोगीपणा पक्का सिद्ध व्हावा म्हणून या पगड्या बनवण्यात आल्या. उकीरड्यावर फेकून देण्याची यांची लायकी.

खुद्द आम्हांस पागोटेच नापसंद आहे. त्याची गचाळ प्रतिमा असलेली ही पगडी तर बिल्कूल पसंद नाही.
उपयोग आणि शोभा या दोन्हीदृष्ट्या ब्राह्मणी पगडी टाकाऊ आहे. आवश्यकता व चैन म्हणून ही पगडी हिनकस आहे. आम्ही तिच्या दिखाऊपणावर भाळलो आहोत.
डोक्याचे रक्षण करणे हे पागोट्याचे वा पगडीचे काम असते. मोठा वारा सुटला, जोराचा पाऊस आला, सुर्याचे प्रखर उन पडले तर या पगडीचा काडीचाही उपयोग नाही.

नंदीबैलाच्या मानेप्रमाणे ही पगडी डोक्यावर हालत असते. रूढीच्या पाशाने हातपाय जखडलेले हिंदू म्हणजे गुलामांच्या राष्ट्रातील सजीवांप्रमाणे निर्जीव वस्तूंचीही गुलामगिरी बिनतक्रार करणारे जीव.
उपयोगाच्या दृष्टीने ब्राह्मणी पगडीस शंभरपैकी पाच गुणदेखील मिळणार नाहीत. सौंदर्याच्या दृष्टीने हिचा लास्ट नंबर येईल. या ब्राह्मणी पगडीमुळे आम्ही स्वत:ला रानटी ठरवून घेतो. अर्थात रानटी लोकांना स्वत:चा रानटीपणा कळावा तरी कसा?

- गोपाळ गणेश आगरकर, [ सुधारकातील २ अग्रलेखांचा सारांश]
संकलक- प्रा.हरी नरके, १२ जानेवारी २०१९

Monday, January 7, 2019

गरिबांना आर्थिक आधारावर १० % आरक्षण

राज्यघटनेमध्ये दुरूस्ती करून उच्चवर्णीय गरिबांना १०% आरक्षण देण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या १३ न्यायाधिशांच्या सर्वोच्च घटनापिठाने दिलेल्या निकालानुसार घटनेच्या मुलभूत रचनेत बदल करता येत नाहीत. समता हे मूल्य घटनेच्या मूळ चौकटीचा भाग आहे. सर्वांना समतेचा समान अधिकार हे मूळ सुत्र आहे. आरक्षण हे सामाजिक अन्याय दूर करण्यासाठी, प्रतिनिधित्व देण्यासाठी केलेला अपवाद आहे.अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही.
६० % आरक्षण हे समतेच्या तत्वाचे उल्लंघन असल्याने ही तरतुद रद्द होईल. केंद्र सरकारने आज उच्चवर्णीय समाजातील गरिबांना १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. गरीब मग ते कोणत्याही जातीधर्मातले असोत, त्यांच्यासाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवारा यांची व्यवस्था व्हायलाच हवी. मात्र चुनावी जुमल्याद्वारे त्यांच्या भावनांशी खेळणे योग्य नाही.
जे न्यायालयात टिकणार नाही असे आरक्षण उच्चवर्णीय गरिबांना देणे ही त्याची चेष्टाच होय. आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमिका आग्रहाने मांडणारांची संख्या वाढते आहे.
आर्थिक निकषावर आरक्षण याबाबतची काही तथ्ये मांडणे गरजेचे झालेले आहे.
१] २५ सप्टेंबर १९९१ रोजी नरसिंहराव सरकारने आर्थिक आधारावर दहा टक्के आरक्षण दिले होते. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधिशांच्या घटनापिठाने ते "घटनाविरोधी" ठरवले व रद्द केले हे आपणास माहित आहे काय?
२] पुन्हा आर्थिक आधारावर दिलेले आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. त्यासाठी घटनादुरूस्ती केली तरी ती संविधानाच्या मुळ चौकटीला बाधा आणणारी असल्याने न्यायालयात संमत होणार नाही.
३] आरक्षण हा गरिबीहटावचा कार्यक्रम नाही. तो सामाजिक न्यायाचा कार्यक्रम आहे. ज्या समाजघटकांना शिक्षण, शासकीय पदे आणि लोकपालिकेत प्रतिनिधीत्व डावलले गेलेले आहे त्यांना ते प्रतिनिधित्व विशेष संधीद्वारे देण्याचा हा कार्यक्रम आहे.
४] सर्व समाजातील गरिबांना न्याय मिळायलाच हवा.
पण त्यासाठी आरक्षण हा उपाय नाही. त्यासाठी संविधानाच्या कलम ३८ आणि ४६ मध्ये तरतुदी केलेल्या आहेत.
"बीपीएल" अर्थात दारिद्र्य रेषेखालील सर्व गरिबांना सरकारने शिक्षण, रोजगार, आरोग्य, निवारा, असे संरक्षण द्यायलाच हवे.
पण ते देण्याचा मार्ग आरक्षण हा नाही.
संविधानाच्या कलम ३८ आणि ४६ तरतुदीखालील संरक्षण न मागता त्यांना आरक्षण द्या असे म्हणणे म्हणजे "आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी" असली गत.
५] घटना परिषदेत आरक्षण देताना सामाजिकच निकष का लावायचे आणि आर्थिक निकष का लावायचा नाही यावर सविस्तर चर्चा झालेली आहे. [पाहा : संविधान सभा वृत्तांत, खंड, १ ते १२, ईंग्रजी/हिंदी, लोकसभा सचिवालय प्रकाशन, भारत सरकार.]
६] आपल्या भारतीय समाजात जात, लिंगभाव, वर्ग ही तीन पक्षपाताची आणि शोषणाची केंद्रे आहेत. त्यावर समग्र उपाययोजना करायची असेल तर ती केवळ आर्थिक आधारावर विसंबून करता येणार नाही.
७] आजच्या तीन प्रकारच्या राखीव जागांचा सम्यक विचार केला तर त्यातली राजकीय प्रतिनिधित्व देणार्‍या {ग्रामपंचायत ते संसदेतील आरक्षण ] आरक्षणाला घटनेने कलम ३३४ द्वारे दहा वर्षांची मुदत दिलेली आहे.ती वाढवित नेत आत्ता ती सत्तर वर्षे म्हणजे २०२० पर्यंत केलेली आहे.मात्र घटनेत शिक्षण आणि नोकर्‍यातील आरक्षणाला ही मुदत लागू केलेली नाही. याचा अर्थ हे आरक्षण कायमस्वरूपी आहे काय? तर नाही.
ते तात्पुरतेच आहे.
मात्र ते कधी संपेल तर ज्या दिवशी या सामाजिक घटकांना पर्याप्त प्रतिनिधित्व मिळेल त्या दिवशी आरक्षण संपेल. याचा अर्थ देशात जितक्या लवकर आपण सामाजिक न्याय प्रस्थापित करू तितक्या लवकर आरक्षण संपेल.
८] जातीचे सदस्यत्व जन्माने मिळते. जातीवरून दलित,आदिवासी आणि ओबीसींना काही शतके जर डावलले गेले असेल तर जातीच्या आधारेच हा पक्षपात दूर करावा लागेल. काट्याने काटा काढणे, ही न्यायाची रिती येथे वापरलेली आहे. असे आरक्षण कोणत्याही परिस्थितीत ५०% पेक्षा जास्त असता कामा नये असे डा.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनासभेला बजावले होते याचा विसर पडता कामा नये. [ पाहा: संविधान सभा वृत्तांत, खंड सातवा, पृ. ७०१-०२]
९] उत्पन्न दरवर्षी बदलू शकते. जात मात्र कधीही बदलता येत नाही.
१०] वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असणारे लोक या देशात सुमारे ९८% असावेत. याचा अर्थ या ९८% लोकांना दहा टक्के आरक्षण देणे ही सवलत आहे की फसवणूक? आज देशातील आयकर कायदे धाब्यावर बसऊन सुमारे ३५ कोटी लोक आयकर बुडवतात. अवघे ५ कोटी २९ लाख लोक आयकर देतात.
आर्थिक निकषांवर आरक्षण घेण्यासाठी १३० कोटींपैकी १२९ कोटी लोकांची रांग लागेल आणि अशा रांगेत खर्‍या गरजू, होतकरू आणि वंचितांना जागाच मिळणार नाही.
११] आज ज्यांना आरक्षण मिळते त्यांनाही अंतर्गत आचारसंहिता लावली पाहिजे असे माझे मत आहे. एकाच कुंटुंबाने किती पिढ्या आरक्षण घ्यावे यावर बंधने असली पाहिजेत. तरच इतर दुबळ्यांना न्याय मिळेल.
१२] खाजगीकरणाद्वारे आरक्षण संपतेच आहे. अवघी पंधरा ते वीस वर्षे थांबा. कल्याणकारी राज्य मोडीत काढून पोलीस व सैन्य वगळता बाकी सारी सरकारी खाती खाजगीकरणात जातील.
सैन्यात आरक्षण नाहीच.
१३] जात वडीलांची मिळते. आज आपण पालकांचे उत्पन्न विचारात घेतो म्हणून अतिश्रीमंतांच्या मुलांमुलींना शासकीय लाभ मिळत नाहीत.
आर्थिक आधारावर आरक्षण दिले आणि अंबानी, अडाणी, टाटा, बिर्ला, प्रेमजी, मुर्ती आदींच्या मुलांनी जर उत्पन्न पालकांचे आहे. आम्ही शिकतोय. आम्हाला स्वत:चे उत्पन्न कुठेय? असे विचारले तर त्यांनाही या राखीव जागा द्याव्या लागतील.
प्रा.हरी नरके, ७ जानेवारी २०१९

लेखकांचे स्वातंत्र्य आणि महात्मा फुले - प्रा.हरी नरके

लेखकांचे स्वातंत्र्य आणि महात्मा फुले - प्रा.हरी नरके

१८४९ साली सांस्कृतिक दहशतखोरांमुळे जेव्हा मराठी लेखकांचे स्वातंत्र्यसंकटात सापडले होते तेव्हा महात्मा जोतीराव फुले त्यांच्या मदतीला धावलेहोते. पेशवाई बुडाली आणि इंग्रजी राज्य आले. पेशवाईत ब्राह्मणांना पर्वतीच्यारमण्यात दक्षिणा वाटली जात असे. इंग्रजांनीही तिच पद्धत चालू ठेवली होती.त्यासाठी दक्षिणा प्राईज कमिटी स्थापन करण्यात आली होती. आधुनिक शिक्षण घेतलेल्या लोकहितवादी,गोवंडे,भवाळकर,जोशी आदी सुधारकांनी ही पद्धत बंद करून ती रक्कम लेखकांच्या उत्कृष्ठ ग्रंथांना पुरस्कार देण्यासाठी वापरावी असा सरकारकडे अर्ज केला. ही बातमी कळताच सनातनी भडकले.अर्जदारांना जातिबहिष्कृत करण्याचा हुकूम काढण्याचे ठरले. तुळशीबागवालेराममंदिरात त्यासाठी सभा बोलावण्यात आली.सुधारक मंडळी हादरली. ते सगळे तरण्याबांड जोतीरावांकडे धावले.जोतीरावांनी त्यांना मदतीचे आश्वासन दिले. लेखकांचे स्वातंत्र्य अबाधितराहिले पाहिजे अशी त्यांची भूमिका होती.लोकहितवादींच्या वाड्यावर सगळेजण भल्या पहाटे जमले. जोतीरावांनी आपल्या तालमीतल्या १५० पहिलवानांना तिथे उपस्थित ठेवलेले होते. सर्वात पुढे जोतीराव आणि त्यांच्यामागे हातात काठ्या, भाले घेतलेले १५० कमांडो.मध्ये ब्राह्मण सुधारक. अशी कडेकोट मिरवणूक तुळशीबागवाले राममंदिरात पोचली.जोतीराव आणि त्यांचे सहकारी पहिलवान प्रवेश द्वारावर उभे राहिले.

सुधारक आत गेले. जमाव संतापलेला होता. ते या तरुणांना शिव्याशाप देतहोते. कोणी त्यांच्या शेंड्या ओढीत होते. कोणी त्यांना चापट्या मारत होते. कोणी अंगावर थुंकत होते तर कोणी खडे मारीत होते.सुधारक घाबरून गेले होते.सभा सुरु झाली.अध्यक्षस्थानी असलेल्या मोरेश्वरशास्त्री यांनी या तरुणांनी अक्षम्यगुन्हा केल्याचा निकाल दिला.ज्यांनी अर्ज लिहिलाय त्यांना वाळीत टाकण्याचे ठरले.सुधारक आधीच ठरल्याप्रमाणे म्हणाले, " आम्ही हा अर्ज लिहिलेला नसून तोजोतीराव गोविंदराव फुले यांनी लिहिलेला आहे. तुम्ही त्यांना शिक्षा करूशकता."आणि ब्रह्मवृंदांची ती सभा पंक्चर झाली.आज जे उत्कृष्ठ ग्रंथांना पुरस्कार दिले जातात ते सुरु करण्यातअशाप्रकारे जोतीराव आणि त्यांचे ब्राह्मण सुधारक मित्र यांचा मोलाचा वाटाआहे.पुढे न्या.म.गो. रानडे यांच्या प्रयत्नातून साहित्य संमेलन सुरु झाले.त्यांनी जोतीरावांना निमंत्रण दिले.तत्कालीन लेखक ज्वलंत अशा जातिव्यवस्थेच्या सामाजिक प्रश्नावर ठोस भूमिका घेता नसल्याने या उंटावरून शेळ्या हाकणारांच्या साहित्य संमेलनावर जोतीरावांनी बहिष्कार घातला.

- प्रा.हरी नरके, ७ जानेवारी २०१९

Thursday, January 3, 2019

प्लेगबाधित मुलांना पाठीवर नेणाऱ्या सावित्रीबाईंची शौर्यगाथा






प्लेगबाधित मुलांना पाठीवर नेणाऱ्या सावित्रीबाईंची शौर्यगाथा - प्रा. हरी नरके

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस. जोतिरावांकडून घेतलेला शिक्षणाचा वारसा पुढे नेताना लोकांनी सावित्रीबाईंच्या अंगावर शेण फेकलं. त्याला सावित्रीबाईंनी फुल म्हणून गोंजारलं. असे अनेक अपमान झेलतच त्यांनी आपला वसा पुढे नेला. सावित्रीबाईंच्या जडणघडणीतल्या महत्त्वाच्या टप्प्यांसोबतच त्यांची शौर्यगाथा सांगणारा हा लेख.

‘जोतिबांपेक्षा त्यांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडेच होईल. तिची योग्यता काय सांगावी? आपल्या पतीबरोबर तिने संपूर्ण सहकार्य केले आणि त्यांच्याबरोबर राहून वाट्यास येतील त्या हालअपेष्टा भोगल्या. उच्चवर्णीयांतील उच्चशिक्षण घेतलेल्या स्त्रियांतही अशा प्रकारची त्यागी स्त्री आढळून येणे कठीण आहे. त्या उभयतांनी लोककार्यार्थ आपले सारे जीवन खर्च केले.’
नारायण महादेव उर्फ मामा परमानंद (३१ जुलै, १८९०)

स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशात, आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय सुधारणा, यावर एक वाद झालेला होता. इंग्रजांच्या रूपात शत्रू समोर दिसत असल्याने आपण स्वाभाविकच राजकीय स्वातंत्र्याला अग्रक्रम दिला. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवल्यानंतर आता आपले सामाजिक प्रश्नर आपसूक सुटतील असा लोकांचा समज होता. परंतु जसजसं दिवस उलटू लागले, तसतसा लोकांचा भ्रमनिरास होऊ लागला. त्यातून सामाजिक चळवळी हळूहळू जोर पकडू लागल्या.

जोतीराव सावित्रीबाईंची ‘विषयपत्रिका’
विविध क्षेत्रातल्या सामाजिक न्यायाच्या चळवळी संघटित करणार्यांाच्या हे लक्षात येऊ लागलं, की या विषयाची जोतीराव सावित्रीबाईंनी लिहिलेली ‘विषयपत्रिका’ आजही मार्गदर्शक आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचं समग्र क्रांतिकारी चिंतन आजही प्रस्तुत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्यांना यांच्या जीवनकार्य आणि विचारांबद्दल विशेष रस वाटू लागला. आज जो त्यांचा अभ्यास चालू आहे, त्यामागे हे समाजशास्त्रीय वास्तव दडलेलंय.

जोतीराव सावित्रीबाईंवर मराठीत आजवर दोनशेहून अधिक ग्रंथ लिहिले गेलेत. मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी, तेलगू, बंगाली, कन्न ड, पंजाबी, ऊर्दू, सिंधी, गुजराती या भाषांमधेही काही ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. यातल्या सावित्रीबाईंवर लिहिल्या गेलेल्या छोट्यामोठ्या पुस्तकांची संख्या ४० आहे. त्यातील ललितेतर वैचारिक ग्रंथ लक्षात घेतले तर त्यात मुंबईच्या कु. शांताबाई रघुनाथ बनकर यांची १९३९ मधे प्रकाशित झालेली ‘सावित्रीबाई जोतीराव फुले यांचे अल्पचरित्र’ ही पुस्तिका आणि त्यानंतर १९६६ साली सौ. फुलवंताबाई झोडगे यांनी लिहिलेलं ‘क्रांतिदेवता साध्वी सावित्रीबाई फुले’ हे चरित्र महत्त्वाचं आहे.

सावित्रीबाईंचं चिकित्सक चरित्रच नाही
त्यांनाच वाट पुसत डॉ. मा. गो. माळी यांनी ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ हा चरित्र ग्रंथ १९८० साली लिहिला. डॉ. कृ. प. देशपांडे यांनी सावित्रीबाईंच्या जीवन आणि साहित्यावर ‘अग्निाफुले’ हा ग्रंथ १९८२ साली प्रकाशित केला. नंतरचे सगळे ग्रंथ याच माहितीवर आधारित असून त्यात फारसं नवीन काहीही नाही. मात्र सावित्रीबाईंचं आजवर एकही चिकित्सक चरित्र लिहिलं जाऊ नये, हे खेदजनक होय.

सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला झाला. पुण्यापासून जवळपास ५० किलोमीटरवर नायगाव हे त्यांचं जन्मगाव आहे. पुणे-सातारा रस्त्यावर शिरवळपासून ५ किलोमीटरवर हे गाव वसलेलं आहे. सावित्रीबाई या खंडोजी नेवशे पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या होत. १८४० साली वयाच्या १० व्या वर्षी त्यांचं जोतीरावांशी लग्न झालं. ११ एप्रिल १८२७ ला पुण्यात जन्मलेले जोतीराव त्यावेळी १३ वर्षांचे होते.

लग्नाेनंतर जोतीरावांनी सावित्रीबाईंना घरीच शिक्षण दिल्याचं शासकीय कागदपत्रांवरून दिसून येतं. १ मे १८५१ ते ३० एप्रिल १८५२ च्या शैक्षणिक अहवालात म्हटल्याप्रमाणे, ‘जोतीरावांनी स्वत:च्या पत्नीला घरी शिक्षण देऊन शिक्षिका बनवले.’ २२ नोव्हेंबर, १९५१ च्या ‘बॉम्बे गार्डियन’ वृत्तपत्रातल्या बातमीवरून सावित्रीबाईंच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी जोतीरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर (जोशी) यांनी घेतल्याचं दिसतं. सावित्रीबाईंनी अहमदनगर इथे फॅरारबाईंच्या आणि पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमधे अध्यापनाचं प्रशिक्षणही घेतलं. त्यामुळे सावित्रीबाई याच आद्य भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत, हे तत्कालीन दस्तऐवजांवरून स्पष्ट होतं.

शेण नाही, ही तर फुलं आहेत
सावित्रीबाईंनी शिकवण्यासाठी घराच्या उंबरठ्याबाहेर टाकलेलं पहिलं पाऊल हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरवात होय. समाजाकडून होणारा कडवा विरोध सहन करीत आणि शिव्याशाप शांतपणे ऐकत सावित्रीबाई काम करत होत्या. त्या शाळेत जाता  येताना टोळभैरव मुद्दाम रस्त्यावर थांबत. अचकट-विचकट बोलत. कधीकधी दगड मारीत. अंगावर चिखल किंवा शेण टाकीत असत.

शाळेत जाताना सावित्रीबाईंना सोबत २ साड्या न्याव्या लागत. रस्त्याने जाताना खराब झालेली साडी शाळेत गेल्याबरोबर बदलावी लागे. दुसरी परतताना खराब होई आणि तरीही सावित्रीबाई आपल्या कामात खंड पडू देत नव्हत्या. हा छळ असाच चालू राहिल्याने त्यांच्या आणि लहान मुलींच्या संरक्षणासाठी संस्थेने एका शिपायाची नियुक्तीस केली.

त्याने लिहून ठेवलेल्या आठवणीनुसार सावित्रीबाई आपल्या अंगावर दगड किंवा चिखल फेकणार्यांूना म्हणत, ‘मी माझ्या भगिनींना शिकविण्याचे पवित्र कार्य करीत असताना तुम्ही माझ्यावर शेण अगर खडे फेकीत आहात, ही मला फुलेच वाटतात. ईश्वपर तुम्हाला सुखी ठेवो!’ बळवंत सखाराम कोल्हे यांच्या या आठवणी सावित्रीबाईंच्या धैर्यावर प्रकाश टाकणार्याव आहेत.

ब्राम्हण विधवांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह
१८६३ मधे जोतीराव सावित्रीबाईंनी विधवांसाठी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू केलं. याबाबतची अस्सल माहिती अलीकडेच उपलब्ध झालीय. एक तर हे गृह फक्तर ‘ब्राह्मण विधवांसाठीच’ सुरू करण्यात आलेलं होतं आणि त्यात सावित्रीबाईंचा पुढाकार होता. ४ डिसेंबर १८८४ ला जोतीरावांनी मुंबई सरकारच्या अवर सचिवाला लिहिलेल्या पत्रात याबाबतची सगळी माहिती नोंदवलेली आहे.

जोतीराव सावित्रीबाईंनी स्वत:च्या घरात एक वसतिगृह चालवलं. दूरदूरहून मुलं शिक्षणासाठी तिथे येत असत. लक्ष्मण कराडी जाया या मुंबईच्या विद्यार्थ्याने या वसतिगृहात राहून सावित्रीबाईंच्या मायेची पाखरण अनुभवली होती. त्याने आठवणीत म्हटलंय, ‘सावित्रीबाईंसारखी दयाळू व प्रेमळ अंत:करणाची स्त्री मी अजूनसुद्धा कोठे पाहिली नाही. त्या आम्हा मुलांवर आईपेक्षासुद्धा जास्त प्रेम करीत असत.’

दुसर्याा एका मुलाने आपल्या आठवणींमधे सावित्रीबाईंचा स्वभाव, त्यांची साधी राहणी आणि जोतीराव सावित्रीबाईंचे परस्परांवरील अपार प्रेम यांची विलक्षण हृदय नोंद केलीय.

बरोबर काय न्यायचं आहे?
हा महादू सहादू वाघोले लिहितो, ‘सावित्रीबाई फारच उदार होती. तिचे अंत:करण दयेने भरलेले होते. गोरगरिबांवर ती फार दया करी. ती अन्न दान पण फार करी. ती कोणासही जेऊ घाली. गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना ती आपल्या घरातील लुगडी देई. त्यामुळे तात्यांचा खर्च फार होत असे. एखादेवेळी तात्या तिला म्हणत, ‘इतका खर्च करू नये.’ त्यावर ती शांतपणे बारीक हसत असे आणि ‘बरोबर काय न्यायचे आहे?’ असे तात्यांना विचारीत असे. त्यावर तात्या शांतमुद्रेने थोडावेळ गप्प बसत असत. ते दोघे एकमेकांवर अतिशय प्रेम करीत असत.’

सावित्रीबाईंना स्त्रीजातीच्या उन्न तीची फार कळकळ असे. त्या सुस्वरूप आणि मध्यम बांध्याच्या होत्या. त्यांची मुद्रा नेहमी शांत असे. राग म्हणून काय चीज आहे, ती या बाईच्या गावीच नव्हती. ती नेहमीच हसतमुख असे. मात्र तिचं हसू गालांवर तेवढे दिसून येईल इतकेच ते मर्यादित असे. सावित्रीबाईंना सर्व लोक काकू म्हणत असत. पाहुणे मंडळी घरी आली म्हणजे तिला कोण आनंद होत असे. त्यांच्याकरिता मोठ्या आवडीने ती गोडधोड जेवण करीत असे.

जोतीराव सावित्रीबाईंना मोठा मान देत असत. तिला ते बोलताना ‘अहो जाहो’ या बहुमानदर्श शब्दांनी हाका मारीत असत. सावित्रीबाई तात्यांना ‘शेटजी’ म्हणत. या दोघांत पतीपत्नीत्वाचं खरे प्रेम भरलेलं होतं. सावित्रीबाईंनी नको म्हटलेले काम तात्या कधीही करत नसत. सावित्रीबाई सुविचारी आणि दूरदृष्टीची होती. तिच्याविषयी आप्तयजनांत मोठा आदर होता.

पुण्यातल्या शिकलेल्या बायकांचा घरी राबता
मुलींच्या शाळांतून तिने शिक्षिकीणीचे काम केलेलं असल्यामुळे स्त्रीशिक्षणाचा विस्तार झाल्यानंतर सुशिक्षित बायांत तिच्याविषयी पूज्यभाव वाढलेला दिसत होता. तिच्याकडे आलेल्या मुलींना आणि स्त्रियांना ती नेहमी सदुपदेश करीत असे. पुण्यातील मोठमोठ्या सुशिक्षित बाया, पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी आणि रमाबाई रानडे तिच्या भेटीस येत असत.

सावित्रीबाईंचा पोषाख तात्यांप्रमाणेच अगदी साधा असे. तिच्या अंगावर अलंकार नसत. तिच्या गळ्यात एक पोत आणि मंगळसूत्र असे. कपाळावर भलंमोठं कुंकू लावलेलं असे. रोज सकाळी त्या सूर्योदयापूर्वी आंघोळ करून सडासंमार्जन उरकून घेत. त्यांचं घर नेहमी स्वच्छ असे. काकूंना दिवाणखान्यात थोडाही केर अथवा धूळ पडलेली खपत नसे. त्यांच्या घरातील भांडी आणि इतर सामान स्वच्छ असून टापटीपीने ठेवलेलं असे. त्या स्वयंपाक स्वत: करीत. तात्यांच्या खाण्याची आणि प्रकृतीची त्या फार काळजी घेत.

जोतीरावांच्या पश्चाीत सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व केलं. शेवटपर्यंत त्या काम करीत राहिल्या. यशवंत डॉक्टर झाल्यानंतर मिलिट्रीत नोकरीला लागला. त्याला नोकरीनिमित्त अनेक देशात जावं लागलं. त्याची बायको राधा उर्फ लक्ष्मी हिचं ६ मार्च १८९५ ला निधन झालं. सावित्रीबाई घरी एकट्या उरल्या. यशवंत नोकरीनिमित्त त्यावेळी परदेशात होता.

प्लेगच्या साथीत लोकांचे जीव वाचवण्याची धडपड
१८९३ मधे सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षस्थान सावित्रीबाईंनी भूषवलं. १८९६ च्या दुष्काळात सावित्रीबाई खूप राबल्या. १८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्यागच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं.

सावित्रीबाईंनी यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या.

मुलाला पाठीवर घेऊन धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बातमी ‘दीनबंधू’ने शोकाकूल होऊन दिली. पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणार्याा लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ सांगणाऱ्यांनी आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्याि या शौर्यांगणेची मात्र उपेक्षाच केली. सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला.
- प्रा.हरी नरके, ३ जानेवारी २०१९
............................
http://kolaj.in/published_article.php?v=-Savitribai-Phule-storyHJ4370693
०३ जानेवारी २०१९, वाचन वेळ : ७ मिनिटं

Wednesday, January 2, 2019

सावित्रीबाई फुले यांची अस्सल तैलचित्रे






३ जाने. सावित्रीबाई फुले जयंती निमित्त- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची अस्सल तैलचित्रे-

सर्व शाळा,महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये यामध्ये कोणती छायाचित्रे लावायची याबाबत निर्णय घेणारी एक समिती आहे. या राज्य शासनाच्या महापुरूषांच्या छायाचित्रांना मान्यता देणार्‍या या समितीने आजवर फक्त थोर पुरूषांच्याच छायाचित्रांना मान्यता दिलेली होती. त्या मालिकेत एकाही कर्तबगार स्त्रिचा समावेश केलेला नव्हता. पहिल्या भारतीय शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि शिक्षण तज्ञ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राचा समावेश या मालिकेत करावा असा प्रयत्न मी सुरू केला तेव्हा खूप वाईट अनुभव आले. उच्च अधिकार्‍यांची पुरूषी मानसिकता पदोपदी आडवी येत होती.

आम्ही सावित्रीबाईंचे मुळाबरहुकुम अस्सल तैलचित्र प्रकाशित करून दोन दशके उलटली. तरिही नागरिक अजुनही ती जुनीच आणि चुकीची तैलचित्रे वापरतात.
अस्सल गोष्टी रुजायला किती वेळ लागतो आपल्या देशात!

पुण्यातील गोपीनाथ एकनाथराव पालकर यांच्या जुन्या वाड्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे अस्सल छायाचित्र मिळाले. काचेच्या भल्यामोठ्या अस्सल कृष्णधवल निगेटिव्हवरील हा ग्रुपफोटो सुमारे दीडशे जुना असल्याने अस्पष्ट झालेला होता. राज्य शासनाच्या महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समितीतर्फे त्या निगेटिव्हवरून जसेच्या तसे रंगित तैलचित्र तयार करून घ्यायचे ठरवले.
प्रा.विलास चोरमले या चित्रकारांबरोबर अनेक बैठका झाल्या. त्यांनीही जीव ओतून सुरेख तैलचित्र [ हुबेहुब कृष्णधवल निगेटिव्हनुसार ] तयार केले. निळ्या साडीतील हे तैलचित्र अतिशय देखणे, ज्ञानी, कर्तबगार राष्ट्रमातेचे तैलचित्र आहे.

3 जानेवारीला नायगावच्या [ सावित्रीबाईंचे माहेर ] जयंती कार्यक्रमात ते प्रकाशित करायचे ठरवले.

समोर अडचणींचा डोंगर उभा होता.त्यातूनच वाट काढावी लागली.खुप झटापट झाली. बड्या अंमलदारांशी झुंजावे लागले.
मंत्रालयातील एका उपसचिवाने या कामात खूप खोडे घातले. त्यासाठी त्याने कागदोपत्री चक्क लबाड्याही केल्या. तत्कालीन मुख्य सचिव श्री. अरूण बोंगिरवार आपल्या प्रशासनाची बाजू चुकीची असल्याचे कळूनही उपसचिवाचे समर्थन करीत राहिले. खमक्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना खडे बोल सुनावले आणि त्यांचा निर्णय कसा चुकीचा आहे हे त्यांच्यासमोर विशद केले. सज्जड पुरावे बघितल्यावर बोंगिरवार नरमले. 

३१ डिसेंबरला अंतिम निर्णय झाला. सवित्रीबाईंच्या जयंती कार्यक्रमाला अवघे तीनच दिवस शिल्लक होते. त्यातले दोन दिवस शासकीय मुद्रणालयाला सुट्टी होती. निर्णय होऊनही जयंती समारंभात फोटो प्रकाशित करणे अशक्य होते.
अशावेळी माझे मित्र असलेले शासकीय मुद्रणालयाचे संचालक यांना मी साकडेघातले. ते मदतीला धावून आले. त्यांनी रात्रंदिवस अपार मेहनत केली आणि ३ जानेवारीला नायगावच्या शासकीय समारंभात सावित्रीबाईंचे अस्सल तैलचित्र प्रकाशित झाले.

त्या आधी सावित्रीबाईंची दोन काल्पनिक चित्रे प्रसिद्ध झाली होती. एकामागे सदभावना होती तर एकामागे पत्नीप्रेम!

एकाने सावित्रीबाईंचे चरित्र लिहून त्यावर पहिले चित्र छापले.
एकदा एका कार्यक्रमाला त्यांच्या गावात गेलो असताना त्यांनी दुसर्‍या दिवशी घरी चहाला बोलावले.
चहा पोहे द्यायला त्यांच्या पत्नी समोर आल्या. मी त्यांना प्रथमच भेटत होतो.
तरिही त्यांचा चेहरा कुठेतरी पाहिल्याचा भास होत राहिला. तो ओळखीचा वाटत राहिला.
घरी आल्यावर त्यांनी लिहिलेले सावित्रीबाईंचे चरित्राचे पुस्तक पाहिले आणि सगळा उलगडा झाला!
माझं असं मत आहे की संशोधनाची कोणतीही शिस्त न पाळता, केवळ आंधळी भक्ती आणि स्वजातीप्रेम यातून त्या लेखकाकडून ही चूक झाली असणार.

दुसरे तैलचित्र बनवणारे चित्रकारही माझ्या ओळखीचे होते, पण त्यांनी एखाद्या सरदारपत्नीचे काढावे असे "वजनदार तैलचित्र" रंगवलेले होते.

आम्ही ज्ञानज्योती सावित्रीबाईंचे मुळाबरहुकुम अस्सल तैलचित्र प्रकाशित करून १९ - २० वर्षे झाली, तरिही लोक अजुनही ती जुनीच आणि चुकीची तैलचित्रे वापरतात.
अस्सल गोष्टी रुजायला किती वेळ लागतो आपल्या देशात!
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची दोन्ही चित्रे अस्सलबरहुकुम आहेत.

निळ्या साडीतले तरूण सावित्रीबाईंचे वरिल तैलचित्र अधिकृत आहे. ते मुळच्या अस्सल कृष्णधवल छायाचित्रावरून काढलेले आहे.
ते प्रा. विलास चोरमले, अभिनव चित्रकला महाविद्यालय, पुणे, यांनी काढलेले आहे.
लाल काठाच्या साडीतले तैलचित्र हे त्यावरूनच काढलेले असले तरी ते वयस्कर सावित्रीबाईंचे तैलचित्र आहे.
ते सुधीर काटकर, जे.जे. स्कूल आफ आर्ट्स, मुंबई, यांनी काढलेले आहे.
ते पुण्यात महात्मा फुलेवाड्यात व नायगावला सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकात लावलेले आहे.
या पोस्टसोबत दिलेली २ छायाचित्र /तैलचित्रे वगळता बाकी सर्व छायाचित्र /तैलचित्रे काल्पनिक आहेत.
-प्रा.हरी नरके, ३ जानेवारी २०१९