Thursday, December 31, 2020

सावित्रीजोतीरावांनी सहजीवनाचे व्याकरण लिहिले-प्रा.हरी नरके



#सावित्रीउत्सव

जोतीरावांनी लग्नानंतर सावित्रीबाईंना शिकवले. त्या पहिल्या भारतीय प्रशिक्षित शिक्षिका, मुख्याध्यापिका, शिक्षणतज्ञ बनल्या. त्या १ जानेवारी १८४८ ला शिक्षिका बनल्या तेव्हा त्यांचे वय अवघे १७ वर्षे होते. तर भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली तेव्हा जोतीराव अवघे २० वर्षांचे होते. सावित्रीबाई पुढची ५० वर्षे स्त्रिया, मुलं, बहुजन-वंचित समाजासाठी राबत राहिल्या. १८९७ च्या प्लेगमध्ये पेशंट्सवर उपचार करताकरता त्या गेल्या.

आयुष्यभर त्यांनी जोतीरावांना साथ दिली. स्वत: जोतीरावांनी लिहून ठेवल्याप्रमाणे--

(१) ब्राह्मण विधवांसाठी चालवलेल्या बालहत्त्या प्रतिबंधक गृहाची चळवळ,

(२) सत्यशोधक विवाह चळवळ,

(३) १८७२ ते ७६ या सलग चार वर्षे पडलेल्या दुष्काळात शेतकरी- कष्टकर्‍यांच्या १००० मुला-मुलींचे पालनपोषन करण्याची चळवळ,

(४) ब्राह्मण विधवांचे सक्तीने होणारे केशवपन थांबवण्यसाठी नाभिक बांधवांचा घडवून आणलेला संप,

या चारही चळवळींचे नेतृत्व सावित्रीबाईंनी केले. जोतीरावांनी त्यांना सम्पुर्ण साथ दिली.

अनेकदा जोतीराव नेते होते, सावित्रीबाई साथीला होत्या, तर या चार प्रसंगी सावित्रीबाई नेत्या होत्या. जोतीराव सोबत होते. हे होते आदर्श सहजीवन. आदर्श सहजीवनाचे व्याकरण लिहिणार्‍या सावित्री-जोतींना विनम्र अभिवादन,.

-प्रा. हरी नरके, 

Tuesday, December 29, 2020

खुल्या जागांवर सर्वांचा हक्क- सर्वोच्च न्यायालयाचा ऎतिहासिक निकाल : प्रा. हरी नरके





उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकारने पोलीसभरती करताना ओबीसींवर केलेल्या अन्यायाबाबत योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने या निकालाद्वारे चपराक लगावलेली आहे. २०२० च्या डिसेंबर महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यात सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाबाबत एक ऎतिहासिक निकाल दिलेला आहे. खुल्या जागांवर सर्वांचा हक्क असतो, त्या जागा गुणवत्तेवरच भरल्या गेल्या पाहिजेत असा हा ३ न्यायमुर्तींच्या बेंचचा महत्वपुर्ण निकाल आहे. (Saurav Yadav vs The State Of Uttar Pradesh on 18 December, 2020)  देशात ५२ टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसींना न्याय देणार्‍या या निकालाची माध्यमांनी बातमीसुद्धा दिली नाही. माध्यमांनी त्यावर चर्चा करण्याचेही टाळलेले आहे. भारतीय माध्यमे सध्या सनातनी विचारसरणीची गुलाम आहेत आणि त्यात सामाजिक न्यायाला जागा नाही. प्रस्थापित व्यवस्था नेहमीच स्वत:चे उदात्तीकरण करणे आणि महिला, बहुजन, वंचित यांच्या समस्यांबाबत मौनाचा कट करणे यात पटाईत असते.

 न्या. उदय उमेश ललित,  न्या. विनित सरण आणि न्या. एस. रविंद्र भट यांच्या बेंचने हा निकाल दिलेला आहे. 

पोलीसदलात खुल्या जागांवर भरती करण्यात आलेल्या उमेदवारांना प्रवेश परीक्षेत कमी गुण असताना त्यांना योगी सरकारने नोकरी दिली. मात्र त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक गुण असलेल्या ओबीसी उमेदवारांना मात्र नोकरी नाकारण्यात आली नाही म्हणून सौरव यादव यांनी योगी सरकार व अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्ययालयाने आपल्या निकालपत्रात म्हटले आहे की, "The open category is open to all, and the only condition for a candidate to be shown in it is merit, regardless of whether reservation benefit of either type is available to her or him." खुल्या जागा म्हणजे उच्च वर्णियांचे आरक्षण असल्याची समजूत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश अशा भाजपाशाषित राज्यांनी करून घेतली होती. त्यानुसार नोकरभरतीत ओबीसींबाबत खुलेआम भेदभाव आणि पक्षपात करण्यात आलेला होता. उच्च न्यायालयांनीही राज्य सरकारांची तळी उचलून धरणारे निकाल दिलेले होते. त्या सर्वांना सर्वोच्च न्यायालयाने या निकालाद्वारे जबरदस्त चपराक दिलेली आहे. कमी गुण असतानाही केवळ उच्चवर्णिय आहेत म्हणून काहींना नोकर्‍या देणे आणि ओबीसी, एस.सी., एस.टी. उमेदवारांवर अन्याय करणे याची लाटच येऊ लागली होती. ती या निकालाने थोपवली जाईल. खुल्या गटात नोकर भरती करताना जे उमेदवार ओबीसी, एस.सी.एस.टी. प्रवर्गातले असतील व त्यांना उच्चजातीयांपेक्षा अधिक गुण असतील तर त्यांना डावलता येणार नाही असे न्यायालयाने बजावले आहे. 

ओपनच्या जागा ह्या फक्त उच्चजातीयांसाठी असतात, असा भ्रम चतुरपणे पसरवण्यात आलेला आहे. ज्या प्रवर्गांना आरक्षण आहे त्यांनी ओपनमध्ये येऊच नये, तुम्ही दोन्हीकडे असणार तर मग आम्ही उच्चजातीयांनी कुठे जायचे? असले कुटील युक्तीवाद केले जातात. खुल्या जागा काही मूठभरांसाठीच असणे म्हणजे मग ते त्यांचे आरक्षणच होईल. ओपन याचा अर्थच सर्वांसाठीच ओपन. त्यामुळे खुल्या जागांमध्ये तुम्ही कॅटेगिरीवाल्यांनी येता कामा नये हे नॅरेटिव्ह भ्रामक आहे.

आरक्षण हा विषय हेटाळणीचा, वादग्रस्त बनवण्यात या देशातील उच्च्भ्रू आणि ओपिनियन मेकर्स यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रिंट आणि इलेकट्रॉनिक मिडीयात काम करणार्‍या बहुतेकांचे याबाबतचे आकलन शाळकरी स्वरूपाचे असते. अर्थात तरिही ते अधिकारवाणीने त्यावर बोलत असतात, भाष्य करीत असतात हा भाग अलाहिदा. हा लेख आरक्षणद्वेष्ट्यांचे राखीव जागांबद्दल असलेले बालीश आक्षेप आणि २१ अपेक्षित प्रश्नांची अपेक्षित उत्तरे देण्यासाठी लिहिलेला नाही. त्यामुळे पोरकट आणि गावठी मुद्दे उपस्थित करणार्‍या आरक्षणविरोधकांनी या लेखापासून दूर राहावे.

( हा लेख लिहिण्यासाठी अ‍ॅड. बी.एल. सगर किल्लारीकर यांच्याशी झालेल्या चर्चेचा उपयोग झाला.)

- प्रा. हरी नरके,
(२९/१२/२०२०)

Sunday, December 27, 2020

चरित्र मालिकांची शोकांतिका..

 

दातृत्व हा शब्द फिका पडेल इतके काम समाजासाठी करणाऱ्या काही थोर व्यक्ती इतिहासात घडून  गेल्या आहेत. ज्यांनी स्वत:चे मीपण बाजूला सारून, देहभान विसरून, रंजल्यागांजलेल्यांच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. समाजात समता नांदावी आणि माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे एवढीच काय ती अपेक्षा त्यांनी केली. अशाच काही व्यक्तिरेखांवर आधारलेल्या मालिकांना करोनाकाळानंतर प्रेक्षक प्रतिसादाअभावी अर्ध्यातच निरोप घ्यावा लागला आहे.. 

टीआर कमी पडल्याने मालिका बंद होणे स्वाभाविक आहे, कारण सरतेशेवटी हा व्यवहार आहे, लोकांनीच प्रतिसाद दिला नाही तर वाहिन्या आणि निर्मिती संस्था तरी काय करणार?  या घटनेकडे बारकाईने पाहिले तर हा केवळ मालिकाच नाही तर एकूणच अभिरुचीचा मुद्दा वाटतो. कारण चरित्रात्मक पुस्तके वाचण्याचाही कल हल्ली मावळलेला जाणवतो. त्यात महापुरुषांकडे जातीय चष्म्यातून पाहणारा वर्गही अस्तित्वात आहेच. तर दुसरीकडे करोनामुळे लोकांच्या मनावर झालेले परिणाम, जगण्याचे प्रश्न यात लोकांचे प्राधान्यक्रम बदललेले दिसतात. त्यामुळे प्रतिसाद नेमका कशाने कमी झाला हा अजूनही चर्चेचा विषय ठरतो आहे. गेल्या आठवडय़ात ‘सावित्रीज्योती’ मालिका प्रेक्षक प्रतिसादाविना बंद झाली. वर्षभर अथक मेहनतीने उभा केलेला प्रपंच एकाएकी अर्ध्यावर थांबला. अर्ध्यावरच म्हणणे योग्य आहे, कारण अजून चाळीस वर्षांचा आणि महत्त्वाचा कालखंड येणे बाकी होते. सत्यशोधक समाजाची स्थापना, दलितांच्या लढय़ातील योगदान, स्त्रियांसाठी उचललेली पावले, तथाकथिक विचारांना छेद देणारे लेखन अशा नाना गोष्टी मालिकेतून निसटल्या. ज्या लोकांपर्यंत पोहोचायलाच हव्या होत्या. हीच बाब काही महिन्यांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मालिकेविषयीही झाली. कथानक नियोजित वेळेपेक्षा अधिक वेगात नेऊन संपवण्यात आले. यानिमित्ताने अनेक प्रश्न वर डोकावू पाहत आहेत, ते म्हणजे थोर व्यक्तिमत्त्वांविषयी जाणून घेण्याची आपली क्षमता संपली आहे, परिस्थिती बदलली आहे की जाणिवेचा मुद्दा आहे?

अनेक चरित्र मालिका आणि चित्रपटांच्या अभ्यास मंडळावर असलेले प्रा. हरी नरके सांगतात, ही केवळ पुस्तकांवर आधारलेली मालिका नव्हती. कारण मधल्या काळात बरेच संशोधन झाले आहे. लोकांना अजूनही न समजलेल्या गोष्टी या माध्यमातून आम्ही दाखवणार होतो. आपल्याला जोतिबांनी केवळ शाळा सुरू केली एवढेच माहिती आहे. पण शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांनी केलेले काम, शेती आणि उद्योगाचे शिक्षण, शैक्षणिक गळतीचा प्रश्न, ब्राह्मण विधवांच्या बाळंतपणाची सोय, केशवपनाविरोधात नाभिकांचा संप, १८८० ला केलेला पहिला शिवजयंती उत्सव असे बहुमोलाचे कार्य फुले दाम्पत्याने केले आहे. मालिका अर्ध्यावर थांबली नसती तर तेही पोहोचवता आले असते. ‘व्याख्यानांतून, पुस्तकांतून या व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचतात, पण त्याला मर्यादा येतात. मालिकेच्या माध्यमातून त्या अधिक प्रभावी आणि सचित्र समोर उभ्या राहतात. या मालिकेला सुरुवातीला प्रतिसाद होता, परंतु दोन अडीच महिन्यांतच टाळेबंदी झाली आणि टाळेबंदीनंतर कदाचित लोकांच्या गरजा बदलल्याने प्रेक्षक पुन्हा मालिकेकडे वळला नाही. लोकांपुढे जगण्याचा प्रश्न जटिल असल्याने स्थलांतर, आर्थिक विवंचना असेही मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहेत. मुळात फुलेंसारखी मंडळी भरीव कामगिरी करूनही तेव्हाही अंधारात होती आणि आजही अंधारात आहेत याचे दु:ख वाटते’, अशी खंत नरकेंनी व्यक्त केली.

ऐतिहासिकपट अभ्यासू पद्धतीने उलगडणारे दिग्पाल लांजेकर याविषयी बोलताना म्हणाले, ‘मालिका उत्तम सादर केली गेली होती. तिला प्रेक्षक प्रतिसाद का कमी पडला हा संभ्रमच आहे. उत्तम निर्मिती, उत्तम वाहिनी, हरी नरकेंसारखे अभ्यासक, भूमिकेला न्याय देणारे कलाकार सगळी भट्टी उत्तम जमली होती. परंतु प्रेक्षकांचा कल नेमका लक्षात येत नाही. म्हणजे आपण त्यांना एखादी अभिजात गोष्ट देऊ पाहतोय, पण त्यांनाच ती पाहायची नाही का असे वाटते. एखादा वेगळा विषय आणल्यानंतर त्याला तात्पुरता प्रतिसाद मिळतो, परंतु नंतर त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे नाईलाजाने वाहिन्यांनाही सासूसुनांच्या मालिकांचा पर्याय स्वीकारावा लागतो. प्रेक्षकांनी जर अशा विषयांना उचलून घेतले तर आम्हालाही नवे विषय आणायला उत्साह येईल. शेवटी प्रेक्षकच आपल्याला या दुष्टचक्रातून सोडवू शकतात’. हा करोनाचा फटका असावा असेही लांजेकर यांना वाटते. त्यांच्या मते, कारोनाकाळात लोक वैतागले आहेत. त्यामुळे प्रबोधनापेक्षा मनोरंजनाला अधिक पसंती मिळत असावी. विचार करायला लावणाऱ्या गोष्टी, डोक्यावर नको आहेत लोकांना. विशेष म्हणजे याला कोणताही जातीय रंग वाटत नाही, या मालिकांना सर्व स्तरातून प्रेक्षक पसंती मिळालेली मी पहिली आहे. अगदी मालिका बंद झाल्यानंतरही हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या महापुरुषांना आपण एका विशिष्ट चष्म्यातून पाहता कामा नये. सध्या निष्कर्ष काढण्यापेक्षा प्रेक्षकांचा कल अभ्यासणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ‘सावित्रीजोती’ या मालिकांचे निर्माते नितीन वैद्य या विषयावर आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, ‘‘सोनी वाहिनी सुरू झाली तेव्हा आजवर समाजासाठी झटलेल्या २६ व्यक्तिरेखा घेऊन ‘गर्जा महाराष्ट्र’ ही मालिका केली. ज्यामध्ये या सर्व थोर व्यक्तींच्या कामाला उजाळा देण्यात आला. त्यातूनच सुधारणेचा पाया घालणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि फुले दाम्पत्याची कथा मालिकेतून मांडण्याचा विचार आला. त्याला संशोधनाची जोड देण्यात आली. या दोन्ही मालिकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ बहुजनांचाच नाही तर सर्वस्तरातून मिळाला. घडलंय ते लपवायचे नाही आणि नाही ते घडवायचे नाही हे आमचे आधीच ठरले होते. दोन्ही व्यक्तिरेखांचे बालपण, जडणघडण सर्व काही पोहोचवले. जेणेकरून ती माणसे काय परिस्थितीत जगली आहेत हे लोकांसमोर येईल. आम्ही आमच्या बाजूने प्रामाणिक प्रयत्न केला. परंतु करोनामुळे लोकांची दैनंदिन मालिका पाहण्याची सवय मोडली. प्रतिसाद मंदावला. वाहिन्याही आर्थिक अडचणीत आल्या. त्यामुळे इच्छा असूनही पुढचे शंभर भाग करता आले नाही. पण हा अल्पविराम असेल. पुढचे कथानक आम्ही नक्कीच आणू. महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह या महत्त्वाच्या टप्प्यावर मालिका थांबवतो आहोत. परंतु याचा दुसरा भाग करण्याची प्रेरणा कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

‘त्याकाळात विधवा ब्राह्मण स्त्रियांचा कुटुंबीयांकडूनच छळ होई. त्यातून एखादी स्त्री गरोदर राहिली तर तिला आत्महत्या हा एकमेव पर्याय होता. अशा स्त्रियांच्या बाजूने ते उभे राहिले. अनाथ मुलांचा प्रश्न, मुंबईतील अनेक वास्तूंच्या उभारणीत त्यांचा वाटा, सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाची सांभाळलेली धुरा, प्लेगच्या साथीतील योगदान असा बराच काळ आम्ही दाखवणार आहोत’, असेही वैद्य यांनी स्पष्ट केले.- निलेश अडसूळ

चंगळवादाचा प्रभाव वाढल्याने लोकांना डोक्याला वैचारिक ताण नको असतो. त्यामुळे बुद्धी बाजूला ठेवून कौटुंबिक नाटय़ाला पसंती दिली जाते. आज टेलिव्हिजनचा मोठा वर्ग महिला आणि बहुजन आहेत. त्यांनाच जर आपल्या इतिहासाविषयी जाणून घ्यायचे नसेल तर खेदजनक आहे. ही बेफिकिरी आहे. बाबासाहेब म्हणाले होते, ‘ज्यांना आपला इतिहास माहीत नसतो ते कधीही इतिहास घडवू शकत नाही.’ ही मंडळी केवळ इतिहास नाही वर्तमान आणि भविष्यात कसे वागावे याचे मूल्ये देणारी आहेत. त्यामुळे सर्वस्तरातून अशा विषयांना प्रोत्साहन मिळायला हवे.  

– प्रा. हरी नरके, अभ्यासक   

लोकसत्ता, मुंबई, पुणेसह सर्व आवृत्त्या, रविवार, दि. २७ डिसेंबर,२०२०, पृ.११ लोकसत्ता टीम | December 27, 2020 02:36 am

https://epaper.loksatta.com/2938207/loksatta-mumbai/27-12-2020#page/11/1

https://epaper.loksatta.com/2938426/loksatta-pune/27-12-2020#page/8/1

https://www.loksatta.com/manoranjan-news/savitrijoti-tv-serial-closed-due-to-low-response-from-the-audience-zws-70-2365878/

Web Title: Savitrijoti Tv Serial Closed Due To Low Response From The Audience 

Friday, December 25, 2020

सावित्रीजोती मालिकेचा आजचा शेवटचा एपिसोड चुकवू नका - प्रा. हरी नरके


सावित्रीजोती मालिकेचा आज सायं. ७.३० वा. सोनी मराठीवर सादर होणारा अखेरचा भाग ( एपिसोड ) चुकवू नका.

गेल्या साताठ दिवसात समाज माध्यमांवर तसेच प्रिंट व इलेकट्रॉनिक मिडीयावर या मालिकेला जनतेचा जो अभुतपुर्व पाठींबा मिळाला त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचा राज्य शासन आणि वाहिनीला नक्कीच विचार करावा लागेल. राज्य शासनाकडून सावित्रीजोती मालिकेला अर्थसहाय्य मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. माझा असा प्रयत्न राहिल की निर्माते, वाहिनी आणि राज्यशासन यांच्यामध्ये समन्वय घडवून आणून या मालिकेचे मोजक्या आणि गोळीबंद अशा १०० भागांचे (एपिसोड) दुसरे पर्व सादर करायचे. त्यासाठीच्या पुर्वतयारीत काही दिवस जातील. आपली साथ असेल तर सिझन - २ (दुसरे पर्व) मध्ये ब्रेक के बाद नक्कीच भेटू. 

-प्रा. हरी नरके, 

शनिवार, दि.२६/१२/२०२०

Thursday, December 24, 2020

(२०२१) नविन वर्षाचा संकल्प- ना काहू से दोस्ती, ना काहू से बैर - प्रा. हरी नरके

फेसबुक, ट्विटरवरील अनेक दोस्तलोक माझ्याकडे फोन नंबर मागतात. मी देतो. यापुर्वीही दिलेले आहेत. माझ्या मोबाईलमध्ये अशी साठवलेली नावे (मोबाइल नंबर्स) वीस हजारापार गेलेत. आपण स्नेहापोटी नंबर घेता, जिव्हाळ्यापोटी फोनही करता. मी लेखन-वाचन- करताना, वर्गात शिकवित असताना फोन घेत नाही. मग तुमचा गैरसमज होतो. वेळ मिळेल तसा मी कॉलबॅक करतो. आजकाल त्यातले सत्राशेसाठ नंबर्स हे बॅंका, लोन, विमाकंपन्या, भलत्यासलत्या ऑफर्स यांचे बिनकामाचे असतात. त्यामुळे अननोन नंबर्सचे कॉल घेणे वा त्यांना कॉलबॅक करणे तापदायक झालेले आहे. बर्‍याच जणांना मी मेसेजद्वारे तुमचा निरोप पाठवा असे कळवतो, पण व्हॉट्सॅपच्या व्यसनामुळे असले साधे मेसेज वाचण्याचे कष्ट अनेकजण घेत नाहीत. माझ्याकडे तर व्हॉट्सॅप नाही. लोकांना फोनवरच बोलायचे असते. त्यातही प्रस्तावना करण्यात आठदहा मिनिटे वाया घालवली जातात. मुद्द्याचे बोलायचे सोडून दुनियाभरचे विषय लोक बोलत बसतात. मी सगळ्यांशी बोलायला वेळ आणू कुठून?

मला दिवसाकाठी किमान ७५ ते ८० फोन येतात. कधीकधी तर जास्तही येतात. ते सगळे फोन मी घेत बसलो तर दिवसभर मला दुसरे कामच करता येणार नाही. लोकसम्पर्क ही चांगलीच गोष्ट आहे. गरजू आणि होतकरू लोकांना जमेल तेव्हढी मदत करायला मला आवडतेही. 

मी काही राजकारणी नाही की व्यापारी वा उद्योजक नाही. माझ्याकडे पीए (मदतनीस) नाही. तो ठेवणं मला आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही. हे खरंय की काहीलोक खरेच गरजू, होतकरू, समाजाने नाडलेले असतात, त्यांना जमेल तशी मदत करायलाच हवी. कुणाशीही तुसडेपणाने वागण्याचा माझा स्वभाव नाही. स्वभावाला औषद नसते. पण सध्याच्या काळात जसे काही लोक दागिने मोडून खातात, तसे काही लोक गरिबी मोडून खात असतात. काही फुकट मिळतंय म्हटलं की लोक शर्ट फाडूनच रांगेत येऊन उभे राहतात. आपण अतिगरजू असल्याचा बेमालूम देखावा ते उभा करतात. त्यांना ओळखण्यात मी कमी पडतो. त्यावरचा उपाय म्हणजे असल्या तापदायक समाजकार्यातून निवृत्ती घेणं.

लोक मला " जेवन झाले का? आज वार कोणता आहे? आज किती तारीख आहे? तुमच्या घड्याळात किती वाजलेत" असले अवघड प्रश्न विचारीत नाहीत याबद्द्ल मी त्यांचा आभारी आहे. 

अनेक भले लोक मला पुढील कामांसाठी कामांसाठी फोन करतात. " माझ्या चौथीच्या मुलीला फलाण्या विषयावर निबंध लिहायचा आहे, मुद्दे पाठवा, मला शोधनिबंध लिहायचा आहे, तुमच्याकडच्या संदर्भ पुस्तकातले स्क्रीनशॉट मला पाठवा, मला रेशनकार्ड काढून द्या, कुठल्यातरी फलान्याबिस्तान्या लंगोटी पेपरासाठी तुमचा लेख २ दिवसात पाठवा, भाषणासाठी तारखा द्या, वेबिनारसाठी वेळ द्या, अमुकचे जातपडताळणीचे काम अडलेय, ते करून द्या, तमुकला क्रिमीलेयर वा जातीचा दाखला मिळवून द्या, मला वा माझ्या अमूक ढमूक नातेवाईकाला नोकरी मिळवून द्या, लग्नासाठी मला आर्थिक मदत करा, तमूक धार्मिक-सार्वजनिक कार्यक्रमाला वर्गणी पाठवा, माझे लग्न जमवून द्या, मला घटस्फोट मिळवून द्या, अमका भाऊबंद मला त्रास देतोय, पोलिसांना फोन करून मला मदत मिळवून द्या, अमक्यातमक्या मंत्र्याकरवी माझे तमूक व्यावसायिक काम करून द्या, माझी बदली करा किंवा झालेली बदली रद्द करा, तमक्याने फेसबुकवर तमका लेख लिहिलाय त्याला सडेतोड उत्तर द्या, अमुक तमूक विषयावर ताबडतोब पोस्ट लिहा, तमक्यावर किंवा तमकीवर माझे प्रेम आहे, त्यांना पाठवायच्या प्रेमपत्रासाठी मुद्दे पाठवा,...." 

यातले एकही उदाहरण काल्पनिक नाही. यातल्या अनेक कामांशी माझा काडीमात्रही संबंध नसतो. तरी ती कामं मी केली नाहीत की लोक रागावतात, चिडतात, "मग तुमचा उपयोग काय? अजून उत्तर का दिले नाही?" असे थेट विचारतात. जाब विचारतात. नियमबाह्य कामे मी करीत नाही म्हटले की "मग तुमच्याकडे कशाला आलोय?" असा मलाच उलटा प्रश्न विचारतात. कितीतरी खाजगी, व्यक्तीगत कामं जी लोकांनी स्वत: करायची असतात ती करायला लोकं मला सांगतात. ते माझ्यावर मानीव हक्कही दाखवतात. मला काम सांगताना बर्‍याच जणांचा तुम्ही आमचे हक्काचे सेवक आहात असा सूर असतो. ( यालाही अपवाद आहेत, असतात..) 

मी भिडस्त माणूस आहे. कोणलाही दुखवायचे माझ्या जिवावर येते. मी सहज उपलब्ध आहे. फुकटात उपलब्ध आहे. म्हणून तुम्ही तुमच्या सोयीने जमेल तेव्हा फोन करणार आणि थेट हट्ट करणार. सामाजिक मदत म्हणजे भिक नव्हे पण तसाच तो मुलभूत हक्क किंवा अधिकारही नव्हे. आजकाल काही महान लोकांनी व्यावसायिक समाजकार्य किंवा कागदोपत्री समाजकार्य सुरू केल्याने सामान्य लोकांनीही तारतम्य सोडलंय. लोकांमध्ये "तुम्ही आमचं काम करता म्हणजे त्यातही तुमचाच काहीतरी फायदा असणार" असा भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. 

मलाही माझ्या आवडीची, पोटापाण्याची कामं असतात. ती करताकरता मीही थकून जातो. सदासर्वदा लोकसंपर्क नकोसा वाटतो. कधीतरी निवांतपणे वाचत, लिहित बसणं ही माझी गरज असते. त्यांचे काम झालं की लोकांच्या चेहर्‍यावर उमटणारे हसू हे फार मोठे पारितोषिक असते खरे. पण अलिकडे ते फारसे दिसत नाहीत. कृतज्ञतादर्शक भाव दिसण्याऎवजी तुम्हाला " मी ही सेवेची संधी देऊन तुमच्यावरच उपकार केलेत" अशी धारणा वाढत चाललीय. समाजाला अशा सेवाकार्याची फारशी कदर राहिलेली नाही असा अनुभव वरचेवर येतो.

  शिवाय अलिकडे सततच्या भाषणांनी माझा आवाज वरचेवर बसतो. मी जाम थकतो. अगदी गळून जातो. अशावेळी फोनवरही बोलण्याचे मला त्राण नसते. पण लोक ही माझी अडचण समजून घेत नाहीत. त्यांना फक्त त्यांच्या कामाचे पडलेले असते. समाजसेवा ही चांगलीच गोष्ट आहे. आजही तिची गरज आहेच. त्यामुळे यापुढेही ती मर्यादित प्रमाणात, निवडक स्वरूपात चालूच राहिल. पण.. पण... माणसाला कधीतरी निवृत्ती घ्यायला हवी... ४० वर्षे माझ्या अल्प कुवतीनुसार थोडी समाजसेवा करता आली. नव्या पिढीतील युवांनी आता ही जबाबदारी घ्यायला हवी. उरलेल्या आयुष्यात माझ्या आवडीची लेखन-वाचनाची कामं मला करायला हवीत. प्रा. य. दि.फडके मला म्हणायचे, "हरी, तुम्ही लोकसम्पर्कात जो वेळ वाया घालवता तो वाचवला तर तुमच्या हातून दहावीस चांगली पुस्तकं लिहुन होतील. काम वार्‍यावर वाहून जातं. पुस्तकं राहतील."

पुस्तकं लिहून होवोत वा ना होवोत. निदान वाचून तरी नक्कीच होतील. कृपाकरून माझ्याकडे फोननंबर मागू नका. संपर्क करायचा असेल तर मला इमेल करीत चला. तुमच्याकडे आधीच माझा मोबाईल नंबर असेल तर मी फोन उचलला नाही म्हणून परतपरत फोन करण्याऎवजी मेसेजद्वारे संपर्क करा. 

हे खरंय की मलाही अनेकांनी मदत केली म्हणून मी इथवर आलो. तुमच्यापैकीच काहींनी मला संधीची कवाडं उघड़ी करून दिली. आजच्या व्देषमुलक व प्रदूषित खुज्या माणसांच्या, कोरोनाजातीय माणसांच्या जगात गुणांची क़दर करणारी शुध्द माणसं मिळणं दुर्लभच. तुमच्यापैकी काहींनी मला सेवेच्या कामांची संधी दिली, आनंद दिला, त्याबद्दल मी अपार कृतज्ञ आहे. 

कबीरा खड़ा बाज़ार में, सबकी मांगे खैर.

ना काहू से दोस्ती, ना काहू से बैर.

ग्रेस माझे आवडते कवी आहेत. त्यांनी म्हणे दरवाजावर पाटी लावली होती, " आय एम फ्री बट नॉट अव्हेलेबल" 


आपला नम्र,

- प्रा. हरी नरके, 

२४/१२/२०२०

Sunday, December 20, 2020

सावित्री-जोती मालिका अर्ध्यावरच बंद होणार- प्रा. हरी नरके

 








६ जाने. २०२० रोजी सुरू झालेली " सावित्री-जोती : आभाळाएवढी माणसं होती " ही मालिका शनि. २६ डिसेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेतेय. या मालिकेला सर्व स्तरातील जाणत्यांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि सुजाण प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. ती मध्येच बंद होतेय याचे मनस्वी दु:ख आहे. खरं तर आत्ताशी कुठे गोष्टीला सुरूवात झाली होती. मालिका पकडही घेऊ लागली होती. एरवी कोणतीही मालिका न बघणारे काही जाणते लोक ही मालिका आवर्जून बघतात. एक नवा प्रेक्षकवर्ग मालिकांकडे, सोनी मराठीकडे वळू लागलेला होता. काहीलोक वेळ जुळत नसल्याने अ‍ॅपवर ही मालिका बघत होते. पण त्यांची मोजणी टीआरपीमध्ये होत नाही. टीआरपीच्या रेसमध्ये यशस्वी आणि लोकप्रिय असलेल्या सध्याच्या इतर मराठी वाहिन्या आणि मालिकांबदल माझ्या मनात किंचितही आकस नाही. उलट कुतुहलच आहे. कौतुकच आहे. माणसाला निखळ करमणुकीची गरज असते असे मी मानतो. त्याच्या जोडीला ज्ञान, संस्कृती, वर्तमान, जगाचे व जगण्याचे भान वाढवणार्‍या, रंजनातून सामाजिक प्रबोधन, लोकशिक्षण करणार्‍या सावित्रीजोतीसारख्या मालिकाही आवश्यक आहेत. त्या मुल्यभानाची रसद आणि जगण्याचा पैस विस्तारणारी उर्जा पुरवित असतात.


सदैव इतिहासात रमलेल्या मराठी माणसांचा १९-२० व्या शतकातील  समाजसुधारणा, शिक्षण आणि परिवर्तन विचार मनोरंजनतून समजून घेण्यातला रस आटलाय का? कुठलीही कलाकृती ही त्या काळाचं अपत्य असते. प्रस्तुत काळ हा जोती-सावित्रीच्या विचारांना, प्रेरणांना, त्यागाला वा ध्येयवादाला फारसा पोषक नाही. ज्यांच्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग त्या दोघांनी केला त्या स्त्रिया आणि बहुजन समाज हेच टिव्हीच्या सर्व मालिकांचे मुख्य प्रेक्षक आहेत. तेच स्वत:च्या इतिहासाबद्दल, पुर्वजांच्या त्यागाबद्दल, वारशाबदल बेपर्वा आणि बेफिकीर आहेत? बहुजन समाजाला शतकांच्या गुलामीतून बाहेर काढणारे सावित्रीजोतीसारखे लोक बहुजनांनाच आपलेसे न वाटणे हे मला समाजद्रोहासारखे वाटते. हा आप्पलपोटेपणा, करंटेपणा मला फार बोचतो. 


दर्जेदार कंटेण्ट लोकांना हवाच असतो यावर माझा ठाम विश्वास आहे. या मालिकेने सोनी मराठीला एक व्यापक सामाजिक पाया मिळवून दिला. सोनी मराठीचा रिच बहुजनांमध्ये वाढवला. सावित्री-जोतीची कथा सशक्त आहे. दणकट लेखन, कलाकारांचा उत्तम अभिनय, कसदार सादरीकरण, कसबी दिग्दर्शन आणि दशमी क्रिएशनची सर्वोत्कृष्ठ निर्मिती यामुळे ही मालिका अव्वल दर्जाची बनलेली आहे. ही मालिका ज्यांनी बघितली ते तिला अनेक वर्षे विसरणार नाहीत. जे लोक कोणत्याही मालिका बघत नाहीत त्यांना माझी ही पोस्ट लागू नाही.


कदाचित टिव्ही मालिका क्षेत्रातील जाणकारांना, यशस्वी मान्यवरांना माझी ही पोस्ट आवडणार नाही.  " ग्राहक नेहमीच बरोबर असतो, निवडणुकीत पराभूत होणाराने मतदारांना दोष द्यायचा नसतो," या सुभाषितांची माहिती मलाही आहे.  


उंच माझा झोका  ही उत्तम  मालिका चालते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९३५ नंतर आवरती घ्यावी लागते आणि सावित्री जोती तर मध्येच गुंडाळावी लागते. अशाने या जॉनरच्या मालिका करण्याचे धाडस कोण करील? म्हातारी मेल्याचेही दु:ख आहेच, पण काळ बेदरकारपणे सोकावतोय याचे जास्त दु:ख आहे. काहीजण आम्हाला म्हणाले, "टीआरपी नसला तरी मालिका चालू ठेवा." हा भाबडेपणा झाला. व्यवहारात तो चालत नाही. कोणतीही मालिका तयार करायला पैसा लागतो, तो ज्या वाहिनीकडून दिला जातो तिला जाहीरातींद्वारे तो परत मिळत असतो. जाहीराती मिळणे न मिळणे हे सर्वस्वी टीआरपीवरच अवलंबून असते. प्रेक्षकांपासून म्हणजेच टिआरपीपासून फटकून राहून मालिका चालू शकत नाहीत ही कटू असली तरी वस्तुस्थिती आहे.


सावित्री जोती मालिकेला टिआरपी होता, पण तेव्हढा पुरेसा नव्हता. ही बायोपिक असल्याने त्यात हमखास मनोरंजनाचा तद्दन मसाला भरता येत नव्हता. १८२७ ते १८९७ हा काळ उभा करायचा असल्याने प्रवास जास्त खडतर होता. या मालिकेमागचे आमचे, दशमी व सोनी मराठीचे प्रयत्न प्रामाणिक होते. उत्तम टिम आणि ऑनेस्ट स्पिरिट असूनही प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात खेचून आणण्यात आणि टाईमस्पेंड वाढवण्यात आम्ही कुठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण आम्ही नक्कीच करू. 


सोनी मराठी वाहिनी, दशमी क्रिएशन ही निर्मितीसंस्था, सावित्री-जोतीची आमची सगळी टिम यांचे या ऎतिहासिक आणि दर्जेदार निर्मितीबद्दल मी मन:पुर्वक आभार मानतो. विशेषत: सोनी मराठी वाहिनीचे अजय भाळवणकर, सोहा कुलकर्णी, Sohaa D. Kulkarni, किर्तिकुमार नाईक, Kirtikumar Ojasvini, राजेश पाठक, Rajesh Pathak, दशमीचे नितीन वैद्य, Nitin Vaidya, निनाद वैद्य, Ninad Vaidya व अपर्णा पाडगावकर, दिग्दर्शक उमेश नामजोशी, प्रमुख कलावंत, ओंकार गोवर्धन, Omkar Govardhan, अश्विनी कासार, Ashwini Kasar, पूजा नायक, Pooja Nayak, मनोज कोल्हटकर, Manoj Kolhatkar, लेखक अभिजीत शेंडे, Abhijeet Shende,  प्रसाद ठोसर, Prasad Thosar, निर्मिती प्रमुख, (क्रियेटीव्ह हेड) लेखा त्रिलोक्य, Lekha Trailokya, सोहम देवधर, Soham Deodhar आणि या टिममधील पडद्यामागील सहकारी, तंत्रज्ञ या सर्वांचा मी कृतज्ञ आहे. सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही.


प्रत्येक कलाकृतीची एक नियती असावी. महिला, वंचित - बहुजन आणि अल्पसंख्यकांना काय वाचावं, काय बघावं, कोणत्या विचारात आपलं हित आहे, कशानं आपलं भलं होणार आहे याची जाण आजही असू नये हे वेदनादायी आहे. ५ डिसेंबरला मी या विषयावर एक पोस्ट लिहिली असताना, " आम्ही ही मालिका बघतो, ती चालू ठेवा" अशी एकमुखी मागणी तुमच्यापैकी अनेकांनी केली.  तुमच्या कॉमेंट, तुमचे फिडबॅक सांगतात की सर्व थरातील खूप लोक ही मालिका आवर्जून बघतात. तर मग तो प्रतिसाद टिआरपी मशीनवर का दिसत नाही? याचा अर्थ विद्यमान प्रतिसाद पुरेसा नाही. अजून खुप जास्त प्रतिसाद हवा होता. आम्हाला तशी अपेक्षा आणि विश्वासही होता. 


गाईने पान्हा चोरावा तशी प्रेक्षकांची या मालिकेबाबतची वागणूक राहिली. तमाम स्त्रियांना, चंगळवादी वंचित-बहुजन, अल्पसंख्यकांना आता सावित्रीबाई आणि जोतीरावांपेक्षा तुंबळ करमणूकीचा बेहद्द मारा करणार्‍या काल्पनिक मालिकांची जास्त निकड वाटत असावी. यावरून मराठी समाजाला स्वतंत्र विचार करायला लावणारे, मूल्यनिष्ठा शिकवणारे काही वाचायचे, बघायचेच नाहीये असे समजायचे काय? आजच्या बर्‍याच मालिका प्रेक्षकांना दैववाद, भ्रामक आणि खोटा इतिहास, फॉल्स ड्रामा, बेगडी कहाण्या दाखवित आहेत. अज्ञानमग्न आणि आत्मनाशउत्सुक बहुजन समाजाला ज्ञानद्रोहाचा अनेस्थेशिया देण्याचं काम त्या करीत आहेत. ( यालाही अपवाद आहेत, असतात.. काही उत्तम मालिकाही लोकांनी उचलून धरलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे.) दुसरीकडे सनातनी सत्ताधारी, समुहांना विचारहीन, एकसाची, नशेडी, उन्मादी प्राणी बनवण्यासाठीची लस रात्रंदिन टोचित आहेत. आत्ममग्न बहुजन चळवळी आपल्याच मित्रांच्या कमिटमेंट तपासण्यात मश्गुल आहेत. त्या कोमात गेल्याने त्यांना हा उलट्या पावलांचा प्रवास, हे मतलबी वारे दिसतच नाहीत. 


आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही मालिका पुढची किमान १०० वर्षे डिजिटल स्वरूपात टिकणार आहे. आज नसली तरी उद्या, कदाचित परवा पण या मालिकेची गुणवत्ता नव्या पिढीला समजेल असा मला भरवसा वाटतो. आजच्या बहुसंख्य प्रेक्षकांची इयत्ता, आवड आणि कुवत यांची सरासरी बघता ही मालिका त्यांना बहुधा झेपली नसावी. आज कोरोनाच्या दहशतीखाली जगत असताना मेंदूला झिनझिण्या आणणारी, डोक्याला खाद्य पुरवणारी, काळाच्या पुढची सावित्रीजोतीची गोष्ट त्यांना अनावश्यक वाटत असावी. 


तरिही एव्हढ्या लवकर आम्ही हार मानणार नाही. एका महाकवीनं म्हटल्याप्रमाणे, " काळ अनंत आहे आणि पृथ्वी विपुल आहे." कधीतरी समविचारी लोक आम्हाला भेटतीलच. "अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी सावित्रीजोतीची कहाणी...."  ही खंत जरूर आहे. काही गोष्टींना लोकप्रिय उत्तरं नसतात. असली तरी त्यांची जाहीर वाच्यता माध्यमांमध्ये करता येत नाही. काही गोष्टी आमच्या कक्षेबाहेरच्याही असतात. संघर्ष कुणाला चुकलाय? नजिकच्या भविष्यात कधीतरी उरलेल्या कथाभागावरही मालिका येईल अशी बुलंद आशाय. देशाच्या उज्वल भविष्यासाठी, परिवर्तनवादी विधायक कृतींसाठी आम्ही नव्या उमेदीने, अभिजात आशेने, पोलादी चिवटपणे धडपडत राहू. एक दरवाजा बंद होतो तेव्हा दुसरा दरवाजा उघडतो असं ऎकतो. तोवर धडपडणं, झुंजणं चालूच राहिल. 

- प्रा. हरी नरके, 

संशोधन सल्लागार, "सावित्री-जोती : आभाळाएवढी माणसं होती" 

२०/१२/२०२०

Saturday, December 5, 2020

१७२ वर्षांनीही सावित्री-जोतीचा वनवास काही संपत नाही - प्रा. हरी नरके



१) १८४८ साली सावित्री-जोतीने त्यांच्या दलित-ब्राह्मण-मुस्लिम मित्रांच्या सहकार्याने स्त्री शिक्षणाचा पाया घातला त्याला आता १७२ वर्षे उलटली. जोतीरावांच्या मृत्यूला १३० वर्षे होऊन गेली, पण जिवंतपणी त्यांना जो वनवास सोसावा लागला तो आज १७२ वर्षे उलटली तरी संपायला तयार नाही. पेशवाई आणि ब्रिटीशांचे राज्य गेले, लोकशाही आली, स्त्रिया आणि दलित-बहुजन शिकले, शिक्षणसम्राट झाले, राजकीय सत्तेच्या चाव्या त्यांच्यातल्या काहींच्या हातात आल्या, ते फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र, जय जोती-जय सावित्री असला तोंडदेखला गजर करू लागले, पण त्यांच्या विचारांबद्दल, त्यांच्यात तुमच्या ध्येयवादाबद्दल, जीवनकार्याबद्दल आस्था निर्माण झाली का?

२) १९५४ साली आचार्य अत्र्यांनी खूप मेहनत घेऊन "महात्मा फुले" हा मराठी चित्रपट निर्माण केला. चित्रपट दर्जेदार होता. पण तिकिटबारीवर तो चालला नाही. कारण तुमच्या कार्याचे/विचारांचे लाभार्थी चित्रपट गृहांकडे फिरकलेच नाहीत.

या चित्रपटाचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यात कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा, शाहीर अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे, खुद्द आचार्य अत्रे, केशवराव जेधे यांनी भुमिका केलेल्या होता. तो चित्रपट आपल्याला फार आवडल्याचे पत्रही बाबासाहेबांनी अत्र्यांना लिहिले. त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तथापि चित्रपट न चालल्याने अत्रे मात्र कर्जात बुडाले.

३) आज सर्व स्त्रिया, दलित-बहुजन-ओबीसी-अल्पसंख्याक शिकले, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली, त्यांच्यात मध्यम आणि उच्च मध्यम वर्ग तयार झाला. तो उच्चजातीवर्गांचे आंधळे अनुकरण करू लागला. त्याला आपल्या जोती-सावित्रीसारख्या पुर्वजांचे ठार विस्मरण झाले, त्यांच्यासाठी ज्यांनीज्यांनी अपार खस्ता खाल्ल्या त्यांना तो सपशेल विसरला. तो आज निर्बुद्ध करमणुकीत बुडालेला आहे. चंगळवादात आणि दैववादात मश्गूल आहे. त्याला तुम्ही नको आहात.

४) जाने २०२० मध्ये "सावित्री-जोती आभाळाएव्हढी माणसं होती" ही मालिका सोनी मराठीवर दशमी क्रिएशनने सुरू केली. मधला करोना लॉकडाऊनचा चार महिन्यांचा खंड वगळता सुमारे वर्षभर ही मालिका चालू आहे. अनेक जाणकार ही मालिका सवड काढून बघतात. समक्ष भेटीत आणि फेसबुकवर तसे सांगतात. कलावंत, लेखन, दिग्दर्शन, निर्मिती दर्जेदार असल्याचे नमूद करतात पण मग त्याचे टीआरपीमध्ये रुपांतर का होत नाही? ह्या प्रश्नाचे उत्तर काही केल्या मिळत नाही.

५) मनोरंजन वाहिन्यांचे अर्थकारण टीआरपीवर अवलंबून असते. आजूबाजूला प्रचंड स्पर्धा आहे. प्रत्येकजण चांगला टीआरपी मिळवण्यासाठी धडपडतोय. टीआरपी प्रकरण अगम्य आहे. तरिही त्याचा महिमा अगाध आहे. लोकशिक्षण, समाजप्रबोधन, जाणीवजागृती, अभिरूचीनिर्माण यांना त्यात फारसे स्थान असत नाही. असले तर शेवटी कुठेतरी असते. निदान त्यांना प्राधान्य नक्कीच नसते. शिवाय आजचा राजकीय काळही प्रबोधनविरोधी आणि विपरीत. अशावेळी दशमीने आणि सोनी मराठीने वर्षभर अशी मालिका चालवली हेच विशेष. आज या मालिकेचे १८५ भाग पुर्ण झाले. 


१८२७ साली जन्मलेल्या जोतीरावांच्या जडणघडणीची आणि शिक्षण क्रांतीची-कार्याची अतिशय प्रभावी मांडणी मालिकेत करण्यात आली. सध्या मालिकेत १८५२-५३ च्या काळातली कथा दाखवली जात आहे. हाच क्रम आम्हाला १८९७ पर्यंत चालवायचा आहे. पण चालेल का तो? सांगता येत नाही.

६) फेसबुकवर लाइक करण्याला पैसे पडत नाहीत. शिवाय पोस्ट न वाचताही लाईक ठोकता येतो. (एका लाईकला उद्या फेसबुकने शंभर रुपये दर आकारला तर सगळे लाइक चुटकीसरशी गायब होतील.) त्यामुळे फेसबुक/ट्विटरवरची लोकप्रियता अत्यंत फसवी आहे. तिचे शिक्षणात, प्रबोधनात, टीआरपीमध्ये, कशातच रुपांतर होत नाही. फेसबुक्यांची विस्मरण शक्ती अगाध आहे. कृतज्ञताबुद्धी अत्यल्प आहे. 

७) जोतीराव-सावित्रीबाई तुम्ही कपाळकरंट्या, कृतघ्न आणि नतद्रष्ट बहुजनांसाठी अकारण खपलात. तुमचा त्याग सपशेल वाया गेलेला आहे. तुम्ही जे पेरलेत ते फारसे उगवलेले नाही. असलेच तर अत्यल्प उगवलेले आहे. १७२ वर्षांनंतरही अज्ञानमग्न असलेल्या ह्या वाचाळांना, वल्गनावीरांना आणि आत्ममग्न फत्तेलष्करांना माफ करा.

- प्रा. हरी नरके,

०५/१२/२०२०