दातृत्व हा शब्द फिका पडेल इतके काम समाजासाठी करणाऱ्या काही थोर व्यक्ती इतिहासात घडून गेल्या आहेत. ज्यांनी स्वत:चे मीपण बाजूला सारून, देहभान विसरून, रंजल्यागांजलेल्यांच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. समाजात समता नांदावी आणि माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे एवढीच काय ती अपेक्षा त्यांनी केली. अशाच काही व्यक्तिरेखांवर आधारलेल्या मालिकांना करोनाकाळानंतर प्रेक्षक प्रतिसादाअभावी अर्ध्यातच निरोप घ्यावा लागला आहे..
टीआर कमी पडल्याने मालिका बंद होणे स्वाभाविक आहे, कारण सरतेशेवटी हा व्यवहार आहे, लोकांनीच प्रतिसाद दिला नाही तर वाहिन्या आणि निर्मिती संस्था तरी काय करणार? या घटनेकडे बारकाईने पाहिले तर हा केवळ मालिकाच नाही तर एकूणच अभिरुचीचा मुद्दा वाटतो. कारण चरित्रात्मक पुस्तके वाचण्याचाही कल हल्ली मावळलेला जाणवतो. त्यात महापुरुषांकडे जातीय चष्म्यातून पाहणारा वर्गही अस्तित्वात आहेच. तर दुसरीकडे करोनामुळे लोकांच्या मनावर झालेले परिणाम, जगण्याचे प्रश्न यात लोकांचे प्राधान्यक्रम बदललेले दिसतात. त्यामुळे प्रतिसाद नेमका कशाने कमी झाला हा अजूनही चर्चेचा विषय ठरतो आहे. गेल्या आठवडय़ात ‘सावित्रीज्योती’ मालिका प्रेक्षक प्रतिसादाविना बंद झाली. वर्षभर अथक मेहनतीने उभा केलेला प्रपंच एकाएकी अर्ध्यावर थांबला. अर्ध्यावरच म्हणणे योग्य आहे, कारण अजून चाळीस वर्षांचा आणि महत्त्वाचा कालखंड येणे बाकी होते. सत्यशोधक समाजाची स्थापना, दलितांच्या लढय़ातील योगदान, स्त्रियांसाठी उचललेली पावले, तथाकथिक विचारांना छेद देणारे लेखन अशा नाना गोष्टी मालिकेतून निसटल्या. ज्या लोकांपर्यंत पोहोचायलाच हव्या होत्या. हीच बाब काही महिन्यांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मालिकेविषयीही झाली. कथानक नियोजित वेळेपेक्षा अधिक वेगात नेऊन संपवण्यात आले. यानिमित्ताने अनेक प्रश्न वर डोकावू पाहत आहेत, ते म्हणजे थोर व्यक्तिमत्त्वांविषयी जाणून घेण्याची आपली क्षमता संपली आहे, परिस्थिती बदलली आहे की जाणिवेचा मुद्दा आहे?
अनेक चरित्र मालिका आणि चित्रपटांच्या अभ्यास मंडळावर असलेले प्रा. हरी नरके सांगतात, ही केवळ पुस्तकांवर आधारलेली मालिका नव्हती. कारण मधल्या काळात बरेच संशोधन झाले आहे. लोकांना अजूनही न समजलेल्या गोष्टी या माध्यमातून आम्ही दाखवणार होतो. आपल्याला जोतिबांनी केवळ शाळा सुरू केली एवढेच माहिती आहे. पण शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांनी केलेले काम, शेती आणि उद्योगाचे शिक्षण, शैक्षणिक गळतीचा प्रश्न, ब्राह्मण विधवांच्या बाळंतपणाची सोय, केशवपनाविरोधात नाभिकांचा संप, १८८० ला केलेला पहिला शिवजयंती उत्सव असे बहुमोलाचे कार्य फुले दाम्पत्याने केले आहे. मालिका अर्ध्यावर थांबली नसती तर तेही पोहोचवता आले असते. ‘व्याख्यानांतून, पुस्तकांतून या व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचतात, पण त्याला मर्यादा येतात. मालिकेच्या माध्यमातून त्या अधिक प्रभावी आणि सचित्र समोर उभ्या राहतात. या मालिकेला सुरुवातीला प्रतिसाद होता, परंतु दोन अडीच महिन्यांतच टाळेबंदी झाली आणि टाळेबंदीनंतर कदाचित लोकांच्या गरजा बदलल्याने प्रेक्षक पुन्हा मालिकेकडे वळला नाही. लोकांपुढे जगण्याचा प्रश्न जटिल असल्याने स्थलांतर, आर्थिक विवंचना असेही मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहेत. मुळात फुलेंसारखी मंडळी भरीव कामगिरी करूनही तेव्हाही अंधारात होती आणि आजही अंधारात आहेत याचे दु:ख वाटते’, अशी खंत नरकेंनी व्यक्त केली.
ऐतिहासिकपट अभ्यासू पद्धतीने उलगडणारे दिग्पाल लांजेकर याविषयी बोलताना म्हणाले, ‘मालिका उत्तम सादर केली गेली होती. तिला प्रेक्षक प्रतिसाद का कमी पडला हा संभ्रमच आहे. उत्तम निर्मिती, उत्तम वाहिनी, हरी नरकेंसारखे अभ्यासक, भूमिकेला न्याय देणारे कलाकार सगळी भट्टी उत्तम जमली होती. परंतु प्रेक्षकांचा कल नेमका लक्षात येत नाही. म्हणजे आपण त्यांना एखादी अभिजात गोष्ट देऊ पाहतोय, पण त्यांनाच ती पाहायची नाही का असे वाटते. एखादा वेगळा विषय आणल्यानंतर त्याला तात्पुरता प्रतिसाद मिळतो, परंतु नंतर त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे नाईलाजाने वाहिन्यांनाही सासूसुनांच्या मालिकांचा पर्याय स्वीकारावा लागतो. प्रेक्षकांनी जर अशा विषयांना उचलून घेतले तर आम्हालाही नवे विषय आणायला उत्साह येईल. शेवटी प्रेक्षकच आपल्याला या दुष्टचक्रातून सोडवू शकतात’. हा करोनाचा फटका असावा असेही लांजेकर यांना वाटते. त्यांच्या मते, कारोनाकाळात लोक वैतागले आहेत. त्यामुळे प्रबोधनापेक्षा मनोरंजनाला अधिक पसंती मिळत असावी. विचार करायला लावणाऱ्या गोष्टी, डोक्यावर नको आहेत लोकांना. विशेष म्हणजे याला कोणताही जातीय रंग वाटत नाही, या मालिकांना सर्व स्तरातून प्रेक्षक पसंती मिळालेली मी पहिली आहे. अगदी मालिका बंद झाल्यानंतरही हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या महापुरुषांना आपण एका विशिष्ट चष्म्यातून पाहता कामा नये. सध्या निष्कर्ष काढण्यापेक्षा प्रेक्षकांचा कल अभ्यासणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ‘सावित्रीजोती’ या मालिकांचे निर्माते नितीन वैद्य या विषयावर आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, ‘‘सोनी वाहिनी सुरू झाली तेव्हा आजवर समाजासाठी झटलेल्या २६ व्यक्तिरेखा घेऊन ‘गर्जा महाराष्ट्र’ ही मालिका केली. ज्यामध्ये या सर्व थोर व्यक्तींच्या कामाला उजाळा देण्यात आला. त्यातूनच सुधारणेचा पाया घालणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि फुले दाम्पत्याची कथा मालिकेतून मांडण्याचा विचार आला. त्याला संशोधनाची जोड देण्यात आली. या दोन्ही मालिकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ बहुजनांचाच नाही तर सर्वस्तरातून मिळाला. घडलंय ते लपवायचे नाही आणि नाही ते घडवायचे नाही हे आमचे आधीच ठरले होते. दोन्ही व्यक्तिरेखांचे बालपण, जडणघडण सर्व काही पोहोचवले. जेणेकरून ती माणसे काय परिस्थितीत जगली आहेत हे लोकांसमोर येईल. आम्ही आमच्या बाजूने प्रामाणिक प्रयत्न केला. परंतु करोनामुळे लोकांची दैनंदिन मालिका पाहण्याची सवय मोडली. प्रतिसाद मंदावला. वाहिन्याही आर्थिक अडचणीत आल्या. त्यामुळे इच्छा असूनही पुढचे शंभर भाग करता आले नाही. पण हा अल्पविराम असेल. पुढचे कथानक आम्ही नक्कीच आणू. महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह या महत्त्वाच्या टप्प्यावर मालिका थांबवतो आहोत. परंतु याचा दुसरा भाग करण्याची प्रेरणा कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
‘त्याकाळात विधवा ब्राह्मण स्त्रियांचा कुटुंबीयांकडूनच छळ होई. त्यातून एखादी स्त्री गरोदर राहिली तर तिला आत्महत्या हा एकमेव पर्याय होता. अशा स्त्रियांच्या बाजूने ते उभे राहिले. अनाथ मुलांचा प्रश्न, मुंबईतील अनेक वास्तूंच्या उभारणीत त्यांचा वाटा, सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाची सांभाळलेली धुरा, प्लेगच्या साथीतील योगदान असा बराच काळ आम्ही दाखवणार आहोत’, असेही वैद्य यांनी स्पष्ट केले.- निलेश अडसूळ
चंगळवादाचा प्रभाव वाढल्याने लोकांना डोक्याला वैचारिक ताण नको असतो. त्यामुळे बुद्धी बाजूला ठेवून कौटुंबिक नाटय़ाला पसंती दिली जाते. आज टेलिव्हिजनचा मोठा वर्ग महिला आणि बहुजन आहेत. त्यांनाच जर आपल्या इतिहासाविषयी जाणून घ्यायचे नसेल तर खेदजनक आहे. ही बेफिकिरी आहे. बाबासाहेब म्हणाले होते, ‘ज्यांना आपला इतिहास माहीत नसतो ते कधीही इतिहास घडवू शकत नाही.’ ही मंडळी केवळ इतिहास नाही वर्तमान आणि भविष्यात कसे वागावे याचे मूल्ये देणारी आहेत. त्यामुळे सर्वस्तरातून अशा विषयांना प्रोत्साहन मिळायला हवे.
– प्रा. हरी नरके, अभ्यासक
लोकसत्ता, मुंबई, पुणेसह सर्व आवृत्त्या, रविवार, दि. २७ डिसेंबर,२०२०, पृ.११ लोकसत्ता टीम | December 27, 2020 02:36 am
https://epaper.loksatta.com/2938207/loksatta-mumbai/27-12-2020#page/11/1
https://epaper.loksatta.com/2938426/loksatta-pune/27-12-2020#page/8/1
https://www.loksatta.com/manoranjan-news/savitrijoti-tv-serial-closed-due-to-low-response-from-the-audience-zws-70-2365878/
Web Title: Savitrijoti Tv Serial Closed Due To Low Response From The Audience
No comments:
Post a Comment