फेसबुक, ट्विटरवरील अनेक दोस्तलोक माझ्याकडे फोन नंबर मागतात. मी देतो. यापुर्वीही दिलेले आहेत. माझ्या मोबाईलमध्ये अशी साठवलेली नावे (मोबाइल नंबर्स) वीस हजारापार गेलेत. आपण स्नेहापोटी नंबर घेता, जिव्हाळ्यापोटी फोनही करता. मी लेखन-वाचन- करताना, वर्गात शिकवित असताना फोन घेत नाही. मग तुमचा गैरसमज होतो. वेळ मिळेल तसा मी कॉलबॅक करतो. आजकाल त्यातले सत्राशेसाठ नंबर्स हे बॅंका, लोन, विमाकंपन्या, भलत्यासलत्या ऑफर्स यांचे बिनकामाचे असतात. त्यामुळे अननोन नंबर्सचे कॉल घेणे वा त्यांना कॉलबॅक करणे तापदायक झालेले आहे. बर्याच जणांना मी मेसेजद्वारे तुमचा निरोप पाठवा असे कळवतो, पण व्हॉट्सॅपच्या व्यसनामुळे असले साधे मेसेज वाचण्याचे कष्ट अनेकजण घेत नाहीत. माझ्याकडे तर व्हॉट्सॅप नाही. लोकांना फोनवरच बोलायचे असते. त्यातही प्रस्तावना करण्यात आठदहा मिनिटे वाया घालवली जातात. मुद्द्याचे बोलायचे सोडून दुनियाभरचे विषय लोक बोलत बसतात. मी सगळ्यांशी बोलायला वेळ आणू कुठून?
मला दिवसाकाठी किमान ७५ ते ८० फोन येतात. कधीकधी तर जास्तही येतात. ते सगळे फोन मी घेत बसलो तर दिवसभर मला दुसरे कामच करता येणार नाही. लोकसम्पर्क ही चांगलीच गोष्ट आहे. गरजू आणि होतकरू लोकांना जमेल तेव्हढी मदत करायला मला आवडतेही.
मी काही राजकारणी नाही की व्यापारी वा उद्योजक नाही. माझ्याकडे पीए (मदतनीस) नाही. तो ठेवणं मला आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही. हे खरंय की काहीलोक खरेच गरजू, होतकरू, समाजाने नाडलेले असतात, त्यांना जमेल तशी मदत करायलाच हवी. कुणाशीही तुसडेपणाने वागण्याचा माझा स्वभाव नाही. स्वभावाला औषद नसते. पण सध्याच्या काळात जसे काही लोक दागिने मोडून खातात, तसे काही लोक गरिबी मोडून खात असतात. काही फुकट मिळतंय म्हटलं की लोक शर्ट फाडूनच रांगेत येऊन उभे राहतात. आपण अतिगरजू असल्याचा बेमालूम देखावा ते उभा करतात. त्यांना ओळखण्यात मी कमी पडतो. त्यावरचा उपाय म्हणजे असल्या तापदायक समाजकार्यातून निवृत्ती घेणं.
लोक मला " जेवन झाले का? आज वार कोणता आहे? आज किती तारीख आहे? तुमच्या घड्याळात किती वाजलेत" असले अवघड प्रश्न विचारीत नाहीत याबद्द्ल मी त्यांचा आभारी आहे.
अनेक भले लोक मला पुढील कामांसाठी कामांसाठी फोन करतात. " माझ्या चौथीच्या मुलीला फलाण्या विषयावर निबंध लिहायचा आहे, मुद्दे पाठवा, मला शोधनिबंध लिहायचा आहे, तुमच्याकडच्या संदर्भ पुस्तकातले स्क्रीनशॉट मला पाठवा, मला रेशनकार्ड काढून द्या, कुठल्यातरी फलान्याबिस्तान्या लंगोटी पेपरासाठी तुमचा लेख २ दिवसात पाठवा, भाषणासाठी तारखा द्या, वेबिनारसाठी वेळ द्या, अमुकचे जातपडताळणीचे काम अडलेय, ते करून द्या, तमुकला क्रिमीलेयर वा जातीचा दाखला मिळवून द्या, मला वा माझ्या अमूक ढमूक नातेवाईकाला नोकरी मिळवून द्या, लग्नासाठी मला आर्थिक मदत करा, तमूक धार्मिक-सार्वजनिक कार्यक्रमाला वर्गणी पाठवा, माझे लग्न जमवून द्या, मला घटस्फोट मिळवून द्या, अमका भाऊबंद मला त्रास देतोय, पोलिसांना फोन करून मला मदत मिळवून द्या, अमक्यातमक्या मंत्र्याकरवी माझे तमूक व्यावसायिक काम करून द्या, माझी बदली करा किंवा झालेली बदली रद्द करा, तमक्याने फेसबुकवर तमका लेख लिहिलाय त्याला सडेतोड उत्तर द्या, अमुक तमूक विषयावर ताबडतोब पोस्ट लिहा, तमक्यावर किंवा तमकीवर माझे प्रेम आहे, त्यांना पाठवायच्या प्रेमपत्रासाठी मुद्दे पाठवा,...."
यातले एकही उदाहरण काल्पनिक नाही. यातल्या अनेक कामांशी माझा काडीमात्रही संबंध नसतो. तरी ती कामं मी केली नाहीत की लोक रागावतात, चिडतात, "मग तुमचा उपयोग काय? अजून उत्तर का दिले नाही?" असे थेट विचारतात. जाब विचारतात. नियमबाह्य कामे मी करीत नाही म्हटले की "मग तुमच्याकडे कशाला आलोय?" असा मलाच उलटा प्रश्न विचारतात. कितीतरी खाजगी, व्यक्तीगत कामं जी लोकांनी स्वत: करायची असतात ती करायला लोकं मला सांगतात. ते माझ्यावर मानीव हक्कही दाखवतात. मला काम सांगताना बर्याच जणांचा तुम्ही आमचे हक्काचे सेवक आहात असा सूर असतो. ( यालाही अपवाद आहेत, असतात..)
मी भिडस्त माणूस आहे. कोणलाही दुखवायचे माझ्या जिवावर येते. मी सहज उपलब्ध आहे. फुकटात उपलब्ध आहे. म्हणून तुम्ही तुमच्या सोयीने जमेल तेव्हा फोन करणार आणि थेट हट्ट करणार. सामाजिक मदत म्हणजे भिक नव्हे पण तसाच तो मुलभूत हक्क किंवा अधिकारही नव्हे. आजकाल काही महान लोकांनी व्यावसायिक समाजकार्य किंवा कागदोपत्री समाजकार्य सुरू केल्याने सामान्य लोकांनीही तारतम्य सोडलंय. लोकांमध्ये "तुम्ही आमचं काम करता म्हणजे त्यातही तुमचाच काहीतरी फायदा असणार" असा भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय.
मलाही माझ्या आवडीची, पोटापाण्याची कामं असतात. ती करताकरता मीही थकून जातो. सदासर्वदा लोकसंपर्क नकोसा वाटतो. कधीतरी निवांतपणे वाचत, लिहित बसणं ही माझी गरज असते. त्यांचे काम झालं की लोकांच्या चेहर्यावर उमटणारे हसू हे फार मोठे पारितोषिक असते खरे. पण अलिकडे ते फारसे दिसत नाहीत. कृतज्ञतादर्शक भाव दिसण्याऎवजी तुम्हाला " मी ही सेवेची संधी देऊन तुमच्यावरच उपकार केलेत" अशी धारणा वाढत चाललीय. समाजाला अशा सेवाकार्याची फारशी कदर राहिलेली नाही असा अनुभव वरचेवर येतो.
शिवाय अलिकडे सततच्या भाषणांनी माझा आवाज वरचेवर बसतो. मी जाम थकतो. अगदी गळून जातो. अशावेळी फोनवरही बोलण्याचे मला त्राण नसते. पण लोक ही माझी अडचण समजून घेत नाहीत. त्यांना फक्त त्यांच्या कामाचे पडलेले असते. समाजसेवा ही चांगलीच गोष्ट आहे. आजही तिची गरज आहेच. त्यामुळे यापुढेही ती मर्यादित प्रमाणात, निवडक स्वरूपात चालूच राहिल. पण.. पण... माणसाला कधीतरी निवृत्ती घ्यायला हवी... ४० वर्षे माझ्या अल्प कुवतीनुसार थोडी समाजसेवा करता आली. नव्या पिढीतील युवांनी आता ही जबाबदारी घ्यायला हवी. उरलेल्या आयुष्यात माझ्या आवडीची लेखन-वाचनाची कामं मला करायला हवीत. प्रा. य. दि.फडके मला म्हणायचे, "हरी, तुम्ही लोकसम्पर्कात जो वेळ वाया घालवता तो वाचवला तर तुमच्या हातून दहावीस चांगली पुस्तकं लिहुन होतील. काम वार्यावर वाहून जातं. पुस्तकं राहतील."
पुस्तकं लिहून होवोत वा ना होवोत. निदान वाचून तरी नक्कीच होतील. कृपाकरून माझ्याकडे फोननंबर मागू नका. संपर्क करायचा असेल तर मला इमेल करीत चला. तुमच्याकडे आधीच माझा मोबाईल नंबर असेल तर मी फोन उचलला नाही म्हणून परतपरत फोन करण्याऎवजी मेसेजद्वारे संपर्क करा.
हे खरंय की मलाही अनेकांनी मदत केली म्हणून मी इथवर आलो. तुमच्यापैकीच काहींनी मला संधीची कवाडं उघड़ी करून दिली. आजच्या व्देषमुलक व प्रदूषित खुज्या माणसांच्या, कोरोनाजातीय माणसांच्या जगात गुणांची क़दर करणारी शुध्द माणसं मिळणं दुर्लभच. तुमच्यापैकी काहींनी मला सेवेच्या कामांची संधी दिली, आनंद दिला, त्याबद्दल मी अपार कृतज्ञ आहे.
कबीरा खड़ा बाज़ार में, सबकी मांगे खैर.
ना काहू से दोस्ती, ना काहू से बैर.
ग्रेस माझे आवडते कवी आहेत. त्यांनी म्हणे दरवाजावर पाटी लावली होती, " आय एम फ्री बट नॉट अव्हेलेबल"
आपला नम्र,
- प्रा. हरी नरके,
२४/१२/२०२०
No comments:
Post a Comment