#सावित्रीउत्सव सावित्रीबाईंनी डॉक्टर यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि हडपसरला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या. १८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं. देशभर प्लेगनं हाहाकार माजवलेला होता. सारे भारतीय दहशतीखाली जगत होते. अनेक नेते स्वत:चा जीव वाचवण्यासाठी दुर रानावनात निघून गेले होते. प्लेग संसर्गजन्य रोग असल्याची व रुग्णाला आपण स्पर्श केला तर आपल्यालाही तो होऊ शकतो याची माहिती त्यांना मुलगा यशवंतकडून मिळालेले होती. तरिही त्या जीव धोक्यात घालून प्लेगयोद्धा म्हणून लढत होत्या. मुलाला पाठीवर घेऊन धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बातमी ‘दीनबंधू’ने शोकाकूल होऊन दिली. पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणार्या झाशीच्या लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ सांगणाऱ्या आम्ही आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्या या शौर्यांगणेची मात्र हवी तेव्हढी दखल घेतली नाही... राजकीय शहीदांचे पोवाडे गाणारी आमची पाठ्यपुस्तके या सामाजिक शहीदाबद्दल तोंडात मिठाची गुळणी धरून असतात. हा भेदभाव, हा पक्षपात का? उर्वरित लेख वाचण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करावे...https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR0ZNPcH1ainQ-evRAbVMcO-WbORCHYjwdIZegBMqwhoV4k1zqXJXlBfjtUसावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला.
सावित्रीबाईंनी आयुष्यभर जोतिरावांना साथ दिली. पण किमान चार आंदोलनांमध्ये त्या आपल्या नेत्याही होत्या असे दस्तुरखुद्द जोतिरावांनीच लिहून ठेवलेले आहे.........
जोतीराव सावित्रीबाईंनी स्वत:च्या घरात एक वसतिगृह चालवलं. दूरदूरहून मुलं शिक्षणासाठी तिथे येत असत. लक्ष्मण कराडी जाया या मुंबईच्या विद्यार्थ्याने या वसतिगृहात राहून सावित्रीबाईंच्या मायेची पाखरण अनुभवली होती. त्याने आठवणीत म्हटलंय, ‘सावित्रीबाईंसारखी दयाळू व प्रेमळ अंत:करणाची स्त्री मी अजूनसुद्धा कोठे पाहिली नाही. त्या आम्हा मुलांवर आईपेक्षासुद्धा जास्त प्रेम करीत असत.’
दुसर्या एका मुलाने आपल्या आठवणींमधे सावित्रीबाईंचा स्वभाव, त्यांची साधी राहणी आणि जोतीराव सावित्रीबाईंचे परस्परांवरील अपार प्रेम यांची विलक्षण हृदय नोंद केलीय.
बरोबर काय न्यायचं आहे?
हा महादू सहादू वाघोले लिहितो, ‘सावित्रीबाई फारच उदार होती. तिचे अंत:करण दयेने भरलेले होते. गोरगरिबांवर ती फार दया करी. ती अन्नदान पण फार करी. ती कोणासही जेऊ घाली. गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना ती आपल्या घरातील लुगडी देई. त्यामुळे तात्यांचा खर्च फार होत असे. एखादेवेळी तात्या तिला म्हणत, ‘इतका खर्च करू नये.’ त्यावर ती शांतपणे बारीक हसत असे आणि ‘बरोबर काय न्यायचे आहे?’ असे तात्यांना विचारीत असे. त्यावर तात्या शांतमुद्रेने थोडावेळ गप्प बसत असत. ते दोघे एकमेकांवर अतिशय प्रेम करीत असत.’
सावित्रीबाईंना स्त्रीजातीच्या उन्नतीची फार कळकळ असे. त्या सुस्वरूप आणि मध्यम बांध्याच्या होत्या. त्यांची मुद्रा नेहमी शांत असे. राग म्हणून काय चीज आहे, ती या बाईच्या गावीच नव्हती. ती नेहमीच हसतमुख असे. मात्र तिचं हसू गालांवर तेवढे दिसून येईल इतकेच ते मर्यादित असे. सावित्रीबाईंना सर्व लोक काकू म्हणत असत. पाहुणे मंडळी घरी आली म्हणजे तिला कोण आनंद होत असे. त्यांच्याकरिता मोठ्या आवडीने ती गोडधोड जेवण करीत असे.
जोतीराव सावित्रीबाईंना मोठा मान देत असत. तिला ते बोलताना ‘अहो जाहो’ या बहुमानदर्शक शब्दांनी हाका मारीत असत. सावित्रीबाई तात्यांना ‘शेटजी’ म्हणत. या दोघांत पतीपत्नीत्वाचं खरे प्रेम भरलेलं होतं. सावित्रीबाईंनी नको म्हटलेले काम तात्या कधीही करत नसत. सावित्रीबाई सुविचारी आणि दूरदृष्टीची होती. तिच्याविषयी आप्तजनांत मोठा आदर होता.
पुण्यातल्या शिकलेल्या बायकांचा घरी राबता
मुलींच्या शाळांतून तिने शिक्षिकीणीचे काम केलेलं असल्यामुळे स्त्रीशिक्षणाचा विस्तार झाल्यानंतर सुशिक्षित बायांत तिच्याविषयी पूज्यभाव वाढलेला दिसत होता. तिच्याकडे आलेल्या मुलींना आणि स्त्रियांना ती नेहमी सदुपदेश करीत असे. पुण्यातील मोठमोठ्या सुशिक्षित बाया, पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी आणि रमाबाई रानडे तिच्या भेटीस येत असत.
सावित्रीबाईंचा पोषाख तात्यांप्रमाणेच अगदी साधा असे. तिच्या अंगावर अलंकार नसत. तिच्या गळ्यात एक पोत आणि मंगळसूत्र असे. कपाळावर भलंमोठं कुंकू लावलेलं असे. रोज सकाळी त्या सूर्योदयापूर्वी आंघोळ करून सडासंमार्जन उरकून घेत. त्यांचं घर नेहमी स्वच्छ असे. काकूंना दिवाणखान्यात थोडाही केर अथवा धूळ पडलेली खपत नसे. त्यांच्या घरातील भांडी आणि इतर सामान स्वच्छ असून टापटीपीने ठेवलेलं असे. त्या स्वयंपाक स्वत: करीत. तात्यांच्या खाण्याची आणि प्रकृतीची त्या फार काळजी घेत.
जोतीरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व केलं. शेवटपर्यंत त्या काम करीत राहिल्या. यशवंत डॉक्टर झाल्यानंतर मिलिट्रीत नोकरीला लागला. त्याला नोकरीनिमित्त अनेक देशात जावं लागलं. त्याची बायको राधा उर्फ लक्ष्मी हिचं ६ मार्च १८९५ ला अपघाती निधन झालं. सावित्रीबाई घरी एकट्या उरल्या. यशवंत नोकरीनिमित्त त्यावेळी परदेशात होता.
१८९३ साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षस्थान सावित्रीबाईंनी भूषवलं. मुंबईत यावर्षी झालेल्या हिंदू मुस्लीम दंगलीत जीव धोक्यात घालून सावित्रीबाईंनी शांतता प्रस्थापनेचे काम केले. १८९६ च्या दुष्काळात सावित्रीबाई खूप राबल्या. त्यांच्या मृत्यूची बातमी ‘दीनबंधू’ने शोकाकूल होऊन दिली. पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणार्या झाशीच्या लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ सांगणाऱ्या आम्ही आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्या या शौर्यांगणेची मात्र उपेक्षाच केली. सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला.
सावित्रीबाईंनी आयुष्यभर जोतिरावांना साथ दिली. पण किमान चार आंदोलनांमध्ये त्या आपल्या नेत्याही होत्या असे दस्तुरखुद्द जोतिरावांनीच लिहून ठेवलेले आहे.
* २५ डिसेंबर १८७३ रोजी झालेल्या सत्यशोधक विवाहाचे नेतृत्व सावित्रीबाईंनी केले.
* १८६३ साली स्थापन करण्यात आलेल्या बालहत्त्या प्रतिबंधक गृहाची कल्पना सावित्रीबाईंची होती. तिथे आलेल्या ३५ ब्राह्मण विधवांची बाळंतपणं त्यांनी पोटच्या मुलींची करावीत अशा मायेनं केली.
त्यातलाच एक मुलगा दत्तक घेऊन त्याला डॉक्टर बनवले.
* १८७२ ते १८७६ याकाळात पडलेल्या भीषण दुष्काळात गोरगरिबांची सुमारे एक हजार मुलं त्यांनी सांभाळली. जगवली. स्वत: स्वयंपाक करून त्यांना जेऊखाऊ घातलं.
* ब्राह्मण विधवांचे केशवपन करू नये म्हणून नाभिक समाजाला संघटित करून त्यांचे प्रबोधन करून विधवांचे केशवपन, मुंडन करणार नाही यासाठी त्यांचा संप घडवून आणला.
जोतिरावांच्या मृत्यूनंतर स्वत: सावित्रीबाईंनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. आधुनिक भारताच्या इतिहासातली अशी ही बहुधा पहिलीच घटना असावी.
सावित्रीबाई निव्वळ शिक्षिका नव्हत्या तर त्या कवयित्री आणि शिक्षणतज्ञही होत्या. त्यांचा "काव्यफुले" हा कवितासंग्रह १८५४ साली प्रकाशित झालेला होता. त्यात पर्यावरण जागृती, शिक्षणाचे महत्व,
निसर्ग आणि माणसाचे नाते, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मुलन, स्त्रीपुरूष समता अशा विषयांवरच्या मौलिक कविता आहेत.
त्यांनी श्रमाचे आणि तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देणारे कृतीशील शिक्षण देण्यावर भर दिला. शिक्षणातला गळतीचा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस उपाय सुचवले व ते अंमलात आणले.
स्त्री-पुरूष समता, ज्ञाननिर्मिती, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप, संवाद, वादविवाद, चिकित्सा आणि विद्रोह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे त्यांनी समाज प्रबोधनाचे काम केले. आधुनिक भारताचा स्त्रीपुरूष समतेचा पाया घालण्याचे कार्य त्यांनी केले. भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरूवात त्यांनी केली.
आजच्या स्त्रियांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात भरारी घेतलेली आहे. त्यांना उर्जा देण्याचे कार्य सावित्रीबाईंच्या जीवनकार्यातून होत असते. त्यामुळे यावर्षीपासून राज्यशासनाने सुरू केलेला #सावित्रीउत्सव आणि सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिवस हे उपक्रम अतिशय मोलाचे आहेत. राजस्थानचे गेहलोत सरकारही ही जयंती राज्यभर उत्सव म्हाणून साजरी करते आहे.
- प्रा. हरी नरके,
निमित्त- २/३ जाने. २०२१
संदर्भ-
प्रा. हरी नरके, सावित्रीबाई फुले चरित्र, नागानालंदा प्रकाशन, इस्लामपूर, २००५
प्रा.हरी नरके, [ संपा.] सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१८