Saturday, January 9, 2021

धन्य ते समाजकार्य आणि धन्य ते एनजीओचे सीईओ - प्रा. हरी नरके

 माझ्या ओळखीचे बरेच कार्यकर्ते त्यांच्यात्यांच्या एनजीओंच्या माध्यमातून उत्तम समाजकार्य करीत आहेत. परंतु म्हणतात ना, व्यक्ती तितक्या प्रकृती. गेल्या महिन्यात मला एक फोन आला.

"मिस्टर हॅरी नडके, यु नो, मी xyz एनजीओचा सीईओ बोल्तोय. वुई आर इन द बिजनेस ऑफ सोशल वर्क. समबडी सजेस्टॆड मी युवर नेम. वुई आर गोन्ना टू सेलिब्रेट हॅपी बड्डे ऑफ सावित्री. वुई आर गोईंग टू अरेंज अ ग्रेट इव्हेंट ऑन इट. मी सत्यवान-सावित्रीबद्दल रिसर्च केलेला आहे. आम्ही इंटरनॅशनल लेव्हलवर समाजकार्य करतो. ३ जानला आम्ही ज्युनियर सत्यवान-सावित्रीवर एक वेबिनार आयोजित करतोय. त्यात बोलायचा तुम्हाला आम्ही चान्स देणार आहोत. yz वेळी हा अडीच तासांचा प्रोग्रॅम असेल. मग या इव्हेंटसाठी तुमचा होकार मी गृहीत धरतो."

"आणखी कोणकोण वक्ते असणार आहेत?"

"नो. नो. यु नो, तुम्ही एकटेच स्पीकर असाल."

"हा कार्यक्रम कोणत्या संघटनेच्या बॅनरखाली असेल?"

" यु नो, आमच्या १८७ एनजीओ यात सामील होतील. यु नो, वुई आर इन द बिजनेस ऑफ सोशल वर्क."

" मला किती वेळ बोलायचे आहे?"

" यु नो, तुम्ही सविस्तर बोला. आमच्या लोकांना ज्युनियर सावित्रीबद्दल काहीच माहीती नाहीये. यु मे टेक ५ मिनिट्स. तुम्ही पाच मिनिटे बोललात तरी आमची हरकत नसेल. यु नो, मला वाटतं एव्हढा वेळ इनफ होईल तुम्हाला."

" या वेबिनारमध्ये किती लोक, डेलिगेट्स, सहभागी होतील? 

"यु नो, या कार्यक्रमात आठ ते दहा तरी लोक, डेलिगेट्स, नक्की सहभागी होतील असा आमचा प्रयत्न असेल."

" मग उरलेल्या २ तास २५ मिनिटात तुम्ही काय करणार आहात?

" यु सी, मी सावित्रीवर इंट्रो करेन, त्यात मिनिमम २५ मिनिटे जातील. आमचे सहभागी ८ लोक प्रत्येकी १५ मिनिटे सावित्रीवर बोलतील. यु नो, दे ऑल आर व्ही आय पीज."

"....."

"मिस्टर हॅरी आमच्या काही अटी आणि शर्ती असतील."

"बोला."

- " यु नो, तुम्हाला वेबिनारसाठी पुर्णवेळ म्हणजे अडीच तास व बिफोरची पंधरा मिनिटे असा सर्व वेळ द्यावा लागेल.

- " यु नो, वक्त्यांना मानधन देण्याची पद्धत आमच्याकडे नाही.

- " यु नो,  तुमच्या भाषणाचे कॉपीराईट आमच्याकडे राहतील.

- " यु नो, ज्युनियर सावित्रीबद्द्ल आम्हाला जास्त माहिती नसल्याने मला इंट्रो, यु नो, प्रास्ताविकासाठी आणि आम्च्या आठ व्ही आय पी लोकांना ज्यु. सावित्रीवर बोलण्यासाठी कार्यक्रमाच्या एक आठवडा आधी तुम्ही मुद्दे /नोट्स लिहून पाठवल्या पाहिजेत. मुद्दे वेगवेगळे हवेत. त्यात व्हरायटी इज मस्ट.

- "यु नो, या वेबिनारसाठी तुम्हाला आमच्या संस्थेला रुपये एक हजार डोनेशन द्यावे लागेल."

- " यु नो, त्याची रिसिट दाखवल्यावरच तुम्हाला आम्ही झूम लिंक व पासवर्ड पाठवू."

- " यु नो, या इव्हेंटमंदे, तुमची इंट्रो मला करावी लागेल, यु नो, 50 वर्ड्समंदे ती मला व्हॉट्सॅप करा."

- " बाय द वे, मिस्टर हॅरी, तुम्ही काय बिजनेस करता? तुमची शॉर्टमंदे इंट्रो द्या."

" धन्यवाद, " म्हणून मी फोन ठेवला.

-प्रा. हरी नरके 

०९/०१/२०२१

No comments:

Post a Comment