Sunday, January 10, 2021

भिडेवाडा- उंटावरून शेळ्या हाकणारे सरकारी अधिकारी - प्रा. हरी नरके

 




अधिकारी- "हॅलो, मी मंत्रालयातून अमूकतमूक अधिकारी बोलतोय. मी काल तुम्हाला फोन केला होता, तुम्ही का उचलला नाही? मला भिडेवाड्यासंबंधात माहिती हवीय. अमूक ढमूक मंत्र्यांना मला त्याबाबतचा रिपोर्ट सादर करायचा आहे. कुठे आहे हा भिडेवाडा?"

मी- "पुण्यात, बुधवार पेठेत."

अधिकारी- "कोणी बांधलाय तो?"

मी- " तात्यासाहेब भिड्यांनी."

अधिकारी- "त्यांना सगळी कागदपत्रे घेऊन मला भेटायला सांगा."

मी- "ते वारले त्याला आता १७० वर्षे झाली."

अधिकारी- "मग आता कोण मालक आहेत?"

मी- "खाजगी मालकी आहे."

अधिकारी- "वाड्याची अवस्था कशीय?"

मी- " अतिशय वाईट. कुठल्याही क्षणी तो पडेल. तिथले मालक, भाडेकरू दुकानदार, निवासी भाडेकरू कोर्टात गेलेत. मुंबई हायकोर्टात ती केस गेली २० वर्षे पेंडींग आहे."

अधिकारी- "तुम्ही पार्टी आहात का?"

मी- "नाही."

अधिकारी- "मला केस नंबर व कोर्टाची सगळी कागदपत्रे पाठवा. तिथे शाळा कशावरून होती? कोणकोण वादी-प्रतिवादी आहेत त्यांचे मला फोन नंबर द्या. त्यांना मला मंत्रालयात येऊन भेटायला सांगा."

मी- " जोतीराव-सावित्रीबाईंच्या तिथल्या शाळेचे सगळे पुरावे मी कोर्टाला सादर केलेले आहेत. तुम्हाला फक्त निकाल लवकर यावा यासाठी उच्च न्यायालयाकडे शासनामार्फत पाठपुरावा करायला हवा."

अधिकारी- " तुम्ही, मला सगळे पेपर्स आणून द्या आणि वाड्याबद्दलचा रिपोर्ट तयार करून मला मंत्रालयात आणून द्या, मी तो मंत्र्यांना सादर करतो. वाड्याची एकुण जागा किती आहे? सर्व्हे नंबर किती आहे? वाड्याचे जुने व ताजे फोटो काढून मला कागदपत्रांसह २ दिवसात आणून द्या."

मी- " तुम्ही उंटावरून शेळ्या हाकण्याऎवजी जरा बूड हलवा आणि रिपोर्ट बनवा. मी तुमचा नोकर नाही. आणि मला कसले आदेश देताय? तुमच्या कर्मचार्‍यांना जरा कामाला लावा. नाहीतरी फुकटचाच पगार खातात ना ते आणि तुम्हीही?"

- प्रा. हरी नरके,

१०/०१/२०२१


No comments:

Post a Comment