वाचकांकडून सर्वाधिक मागणी असलेली "महात्मा फुले समग्र वाड्मय, सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय, आम्ही पाहिलेले महात्मा फुले, युगपुरूष महात्मा फुले," आदी पुस्तके लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याला मी प्राधान्य देणार आहे. याशिवाय बरीच नविन पुस्तके प्रकाशित करण्याच्या कामालाही गती देण्यात येईल. नुकतीच राज्य शासनाने महात्मा फुले ग्रंथ समितीवर सचिव म्हणून माझी नियुक्ती केलेली असून मी नियुक्तीच्या दुसर्याच दिवशी कामाला ताबडतोब सुरुवातही केलेली आहे. मागच्या सरकारच्या काळात ही समिती संपुर्ण निष्क्रीय होती. त्यामुळे तो बॅकलॉगही भरून काढावा लागणार आहे. तशी आव्हाने तर बरीच आहेत. पण मला तक्रारींचा पाढा वाचत बसणे, रडगाणी गाणे यात बिल्कुल रस नाही. कितीही अडचणी असल्या तरी माझी बांधिलकी कामाशी आहे. आऊटपुट म्हणजेच रिजल्टशी आहे. सगळ्या सोयीसुविधांमध्ये तर कुणीही काम करील. जिथे कमी तिथे आम्ही. प्रतिकूलतेवर मात करून काम करण्यात तर खरी मजा आहे.
१. फुले-शाहू-आंबेडकर अशा शासनाच्या तीन स्वतंत्र ग्रंथ समित्या असून अद्याप उरलेल्या दोन समितीच्या नियुक्त्या व्हायच्या आहेत. या तिन्ही समित्यांचे कार्यालय एकत्र असते. फोर्टमधील एका जुन्या इमारतीत सुमारे तीनेकशे चौ. फूट जागेत तिन्ही सचिव व समितीचे कर्मचारी आणि सगळे मौलिक दस्तऎवज यांची व्यवस्था असते. कार्यालयीन जागा तर अपुरी आहेच पण कर्मचार्यांच्या बहुतेक जागाही रिक्तच आहेत. मंजूर पदांमधील फक्त एक लिपिक व एक शिपाई एव्हढेच मनुष्यबळ तिन्ही समित्यांकडे उपलब्ध आहे.
२. गेले अनेक महिने कार्यालयाचा इंटरनेट आणि फोन बंद आहे.
३. लॉकडाऊनच्या काळात कार्यालय बंद होते तेव्हा वाळवीने अनेक नवीकोरी पुस्तके खाऊन टाकलीत.
४. लोकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा असतात. मुबलक गैरसमजही असतात. त्यामुळे तक्रार म्हणून मी हे लिहित नाहीये तर कोणत्या अडचणीत काम करावे लागते ह्याची कल्पना तुम्हाला असावी म्हणूनच केवळ हे नमूद केलेले आहे. त्याच्याकडे अन्यथाबुद्धीने बघू नये.
५. काहीकाही मंडळींचा तर असा गैरसमज असतो की सचिवपदाला, लाल दिव्याची गाडी, बख्खळ मानधन, मुंबईत राहायला बंगला असे कायकाय असते.
६. तर असले काहीही नसते.
७. या पदाचे मानधन किती प्रचंड असते याची तुम्हाला साधारण कल्पना यावी म्हणून सांगतो. तिन्ही सचिवांना मिळून दरमहा नेमके किती मानधन मिळते? सध्या सरकारी चतुर्थश्रेणीतील एका कर्मचार्याला (एका शिपायाला) जेव्हढा दरमहा पगार मिळतो त्यात या तिघां सचिवांचे महिन्याचे सगळे मानधन निघते.
८. प्रवास आणि निवासाची व्यवस्था तुमची तुम्हीच करायची असते. शासन ती जबाबदारी घेत नाही.
९. समिती पुस्तके प्रकाशित करते.पण समितीकडे एकही संशोधन सहाय्यक, संपादन सहाय्यक, मुद्रीत शोधक नसल्याने सचिवालाच पुस्तकाचे सगळे काम करावे लागते.
१०. ह्या समित्या उच्च व तंत्र शिक्षण खात्याकडे असल्या तरी पुस्तकांची छपाई व विक्री उद्योग विभागाकडे असते. त्यामुळे त्यावर सचिवाचे कोणतेही नियंत्रण नसते.
अर्थात हे सगळे असे असले तरी हे प्रश्न सुटोत वा ना सुटोत, तुम्हाला पुस्तकं लवकरात देण्याची हमी मात्र मी देतो.
आपल्या शुभेच्छा/ सदिच्छा मात्र सोबत असू द्याव्यात.
प्रा. हरी नरके,
२८/१/२०२१
No comments:
Post a Comment