Wednesday, March 6, 2013

महिलांचे मानवी अधिकार




८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि १० मार्चला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा स्मृतीदिन आहे. यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष तरतुद केल्याचा बोलबाला आहे.दिल्लीतील महिला अत्याचार प्रकरणानंतर तरुणाईने जो उठाव केला त्यामुळे अलिकडे महिलांच्या प्रश्नांकडे विशेष संवेदनशीलतेने पाहिले जातेय हि चांगली गोष्ट आहे.या जनरेट्यामुळे समाजाच्या विवेकबुद्धीला झडझडून जाग आली आणि आपल्या मानसिकतेमध्ये परिवर्तन झाले तर पुढील काळात आशेला फार मोठा वाव असेल.भारतीय मानसिकता फार मजेदार आहे. आपण स्रियांना देवता मानतो आणि साध्या मानवी अधिकरांपासुनही वंचित ठेवतो.घटनाकार डा.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "कोणत्याही देशाच्या प्रगतीचे मोजमाप त्या देशातील स्त्रियांच्या स्थितीवरुन करायचे असते." हा मापदंड लावला तर आपल्या देशाचा क्रमांक जगात ११५ वा लागतो. आपले शेजारी नेपाळ, बांगला देश, पाकिस्तान आणि श्रीलंका आपल्या कितीतरी पुढे आहेत.

आपली विद्येची देवता सरस्वती असली तरी तमाम घरांतील सरस्वत्यांना मात्र आपल्याकडे हजारो वर्षे शिक्षण बंद होते ही विसंगती आपल्याला बोचत नाही. सावित्रीबाई , जोतीराव, कर्वे,आगरकर, रानडे, आंबेडकर,गांधी, लोहिया यांनी यावर कोरडे ओढले आणि प्रत्यक्ष काम सुरु केले तेव्हा कुठे आजच्या महिला शिकु शकल्या.तथापि आजही सगळ्या जातीधर्मांचा विचार करता प्रत्येक ठिकाणी तेथील पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे शिक्षणाचे प्रमाण कमीच भरते. असा पक्षपात का? आपली संपत्तीची देवता लक्ष्मी! पण घरातील लक्ष्मीच्या नावे संपत्ती किती असते? जमिनीवर राबायला स्त्रियाच पुढे असतात. नेशनल सेंपल सर्व्हेच्या अहवालानुसार शेतमजुरी कारणार्‍या स्त्रिया ६१% असुन पुरुष ३९% आहेत. ९९% जमिनींची मालकी पुरुषांकडे असुन अवघी १% जमिन स्त्रियांच्या नावे आहे. ९३% घरांची मालकी पुरुषांकडे असुन ७% घरे स्त्रिया आणि पुरुष अश्या दोघांच्या नावावर आहेत.त्यातही बर्‍याचदा घरासाठी दोघांच्या पगारावर कर्ज घेतलेले असल्याने घरावर दोघांची नावे लागलेली असतात.पण तिथेही अनेकदा पहिले नाव पुरुषाचे आणि नंतर बाईचे असा क्रम असतो. शेयर मार्केट, उद्योग, व्यापार, दुकाने, होटेल इथेही मालकीहक्कात बायका किती असतात? ही दांभिकता जोवर जाणार नाही तोवर खर्‍या अर्थाने समता प्रस्थापित होणार नाही.

महिला अत्याचार विषयक कायद्यांमध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव या अधिवेशनात मार्गी लागेल.बलात्काराला फाशीची शिक्षा दिली जावी असे म्हणणारा एक मोठा वर्ग असला तरी त्यामुळे बलात्कारानंतर त्या स्त्रीला मारुन टाकले जाण्याची शक्यता वाढेल अशीही भिती व्यक्त केली जात आहे.त्यात नक्कीच तथ्य आहे. विवाहाअंतर्गत {पती-पत्नी} शरिरसंबंधांनाही बलात्काराच्या तरतुदी लागु केल्या जाव्यात अशी मागणी काही महिला संघटना करीत आहेत.पतीने आपल्यावर बळजबरी केली अशी पत्नीने तक्रार केली तर पतीवर सदर गुन्हा दाखल केला जावा असे त्यांचे म्हणणे आहे. पतीपत्नीचे नाते परस्पर विश्वास आणि एकमेकांविषयीच्या प्रेमावर आधारलेले असते. विवाह करताना परस्पर शरिरसंबंधाना मान्यता दिलेली असते. त्यात शृंगार, अनुनय आणि परस्परांची ओढ असल्याशिवाय ते बंध घट्ट होत नाहीत. ज्यात बळजबरी असेल तर त्यात आनंद कसा असणार? पतीपत्नी संबंधातही संमती हवीच. एकमेकांची मने सांभाळायला हवीत. बळजबरी झाली तर घटस्फोटाचा मार्ग मोकळा आहे.शेवटी स्त्रियाही माणसेच आहेत.त्यांनाही मोह आहेत. त्याही खलनशील आहेत. अश्या स्थितीत पतीपत्नी नात्याला बलात्काराचा कायदा लागू करुन आपण नातेसंबंधात कायमची दहशत निर्माण केल्याने स्त्रियांच्या मानवी अधिकारांना बळकटी मिळेल की आजही ज्या देशात स्त्रियांना सर्व प्रकारचे मानवी उघडपणे अधिकार नाकारले जातात त्या देशातील स्त्रीद्वेष्ट्यांच्या हातात कोलीत दिले जाईल याचाही विचार व्हायला हवा. असा कायदा पाश्चात्त्य देशांमध्ये आहे म्हणुन आपल्याकडेही आणा असा केला जाणारा युक्तीवाद मला तरी गैरलागु वाटतो.तिकडे विवाहसंस्था पुर्णपणे मोडकळीला आलेली आहे.कुटुंबभावनेचा बोजवारा उडालेला आहे.चंगळवाद,व्यक्तीवाद आणि कोरडा व्यवहार यांनी मानवी नात्याचे व्यापारीकरण करुन टाकलेले आहे.बाजाराच्या ताब्यात सगळे काही गेले की मग फक्त नफातोटा तेव्हढा उरतो. भारतात हे आणुन आपण नेमके काय साधणार? याचाही साधकबाधक विचार व्ह्यायला हवा.माथेफिरु व्यक्तीवादासाठी नात्यांची वीण उधळुन लावल्याने स्त्रियांची मुक्ती होईल की गुलामीत वाढ होईल?

आज देशात मुलींच्या संख्येत प्रचंड घट होतेय.स्त्री भृणहत्येच्या समस्येने आपण चिंतीत आहोत.काही टोकाची हादरवुन टाकणारी उदाहरणे समोर आलेली आहेत.डांग जिल्ह्यात स्वरुप नावाच्या एका स्त्रिला आठ सख्ख्या भावांशी लग्न करावे लागले कारण त्या समाजात मुलीच नाहीत. राजस्थानातील बारमेरच्या राठोड या गावात मुलगे ६०० आहेत आणि मुली अवघ्या २ आहेत. मुलीला जन्मच नाकारला जातोय. महाराष्ट्रातील प्रगत जिल्हे असणार्‍या पुणे, सांगली, सातारा, कोल्हापुर,नगर, नाशिक पट्ट्यात मुलींची संख्या बीड नी जळगावचा अपवाद वगळता सर्वात कमी आहे.याउलट मागस भाग असलेल्या गोंदीया,गडचिरोली, चंद्रपुर,नंदुरबार मध्ये मुलींची संख्या सर्वाधिक आहे. शिक्षणाने आणि आर्थिक प्रगतीने माणसे सुधारण्याऎवजी रानटी का बनतात? ती स्त्रीविरोधी का बनतात? ज्या २२ महानगरात सोनोग्राफी मशिन्स सर्वाधिक आहेत तिथे मुलींचे कत्तलखाने उघडले गेले आहेत.

स्त्री अत्याचारांच्या समस्येवर कठोर भुमिका घेतली जायला हवी. महिलांचे सर्व मानवी अधिकार त्यांना मिळायलाच हवेत.पुरुषी आणि भारतीय स्त्रिच्याही मानसिकतेत परिवर्तन व्हायला हवे. त्यासाठी जनजागरण,लोकशिक्षण आणि कायदे असा गोफ विनायला हवा. आज "रमा सावित्री घरोघरी! जोतीभीमाचा शोध जारी!" अशीच घोषणा देण्याची गरज आहे.

Friday, March 1, 2013

समृद्ध आणि शाश्वत मराठी भाषा



{दिव्य मराठी, दि.२६ फ़ेब्रुवारी २०१३}

अमृतातेही पैजा जिंकणार्‍या आणि भाषामाजी भाषा साजरी असणार्‍या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास गट स्थापन केला आहे. आजवर तामिळ, तेलगू, कन्नड व संस्कृत या चार भाषांना केंद्र शासनाने हा दर्जा दिलेला आहे. भाषेच्या अभिजातपणासंबंधीचे केंद्र सरकारचे निकष पुढीलप्रमाणे आहेत - भाषेची प्राचीनता, भाषेची मौलिकता आणि सलगता, भाषिक आणि वाड्मयीन परंपरेचे स्वयंभूपण, प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणार्‍या खंडासह जोडलेले/असलेले नाते. या चारही मुद्यांच्या अनुषंगाने विचार करता मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे, हे सबळ पुराव्यानिशी सिद्ध करता येते. मराठी भाषा अभिजात ठरण्यासाठी काही पूर्वग्रह आणि खोलवर रुजलेल्या गैरसमजुती यांचा अडथळा आहे. मराठी ही संस्कृतोद्भव भाषा आहे आणि तिचे वय एक हजार वर्षांपेक्षा कमी आहे, अशी लोकसमजूत करून देण्यात आली आहे.

प्राचीन महारठ्ठी भाषा, मरहठ्ठी भाषा, महाराष्ट्री प्राकृत भाषा, अपभ्रंश मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा असा मराठीचा प्रवास झाला आहे. या वेगवेगळ्या भाषा नसून, ती मराठी या एकाच भाषेची तीन रूपे आहेत, असे ल. रा. पांगारकर यांनी सोदाहरण दाखवून दिले आहे. 'लीळाचरित्र', 'ज्ञानेश्वरी', 'विवेकसिंधू' हे मराठीतले आद्यग्रंथ नाहीत, तर ते मराठी प्रगल्भ व र्शीमंत झाल्यानंतरचे र्शेष्ठ ग्रंथ आहेत. हे जागतिक तोडीचे ग्रंथ आठशे वर्षांपूर्वी ज्या भाषेत लिहिले गेले ती त्याच्या आधी बारा-पंधराशे वष्रे अत्यंत समृद्ध भाषा होती याचे शिलालेख, ताम्रपट, पोथ्या आणि हस्तलिखित ग्रांथिक पुरावे आज उपलब्ध झाले आहेत. मराठीतला आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ सुमारे दोन हजार वष्रे जुना असून, त्याचे नाव 'गाथासप्तशती' असे आहे. संस्कृतवाणी देवे केली, मग प्राकृत काय चोरापासून झाली, असा संतप्त सवाल संत एकनाथांनी विचारला होता. एकनाथांची भाषा आजची मराठी भाषा असूनही ते तिला प्राकृत म्हणतात. यावरून या दोन वेगळ्या भाषा नाहीत हेच स्पष्ट होते. ज्ञानेश्वरांनी मराठीला देशी भाषा म्हटलेले आहे. हेमचंद्रांचे 'देशी नाममाला' हे या भाषेचे व्याकरण प्रसिद्ध आहे. पाणिनीच्या समकालीन वररुची (कात्यायन) याने लिहिलेला 'प्राकृत प्रकाश' हा व्याकरण ग्रंथ ख्यातनाम आहे. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेकडे सुमारे 30 हजार प्राचीन पोथ्या उपलब्ध असून त्यातील दीड ते दोन हजार वर्षे जुन्या असलेल्या सुमारे 80 ग्रंथांमध्ये मराठी भाषा - त्यात प्रामुख्याने कालिदासाचे शाकुंतल (चौथे शतक), शुद्रकाचे मृच्छकटिक (सहावे शतक), प्रवरसेनाचे सेतुबंध (पाचवे शतक), भद्रबाहूचे आवश्यक नियुक्ती (तिसरे शतक), विमलसुरीचे पौमचरिया (पहिले ते तिसरे शतक) यांचा समावेश आहे.

रामायण, महाभारतातही शेकडो मराठी शब्द सापडतात. दोन हजार वर्षांपूर्वी 'बृहत्कथा' हा पैशाची भाषेतील ग्रंथ गुणाढय़ या मराठी लेखकाने लिहिलेला आहे. 'विनयपिटक', 'दीपवंश', 'महावंश' या बौद्ध ग्रंथांमध्ये पाली व सिंहली भाषेत महाराष्ट्राचा उल्लेख आलेला आहे. मोगलिपुत्तातिष्य याने काही 'थेर' म्हणजे र्शेष्ठ धर्मोपदेशक निरनिराळ्या देशांना पाठवल्याचा उल्लेख आहे. पैकी 'महारठ्ठ' देशात थेरोमहाधम्मरखिता यास पाठवले, असे त्यात म्हटले आहे. 'रक्खितथेरं वनवासि योनक धम्मरक्खित थेरं अपरंकतं महाधम्मरक्खित थेरं महारठ्ठ.' मराठी ही मुख्यत: महाराष्ट्राची भाषा असून वेदपूर्वकाळापासून चालत आलेल्या लोकभाषांमधून ती तयार झाली आहे. अशाच दुसर्‍या एका लोकभाषेतून संस्कृत जन्माला आलेली आहे. आजपर्यंत मराठीवर आर्यांची बोलभाषा, वैदिक, संस्कृत व विविध प्राकृत तसेच द्रविडी भाषा यांचा परिणाम झाला आहे. मराठीत तत्सम, तद्भव व देश्य यात तीनही प्रकारचे शब्द आढळतात. महाराष्ट्री म्हणून जी प्राकृत भाषेतील विशेष प्रौढ व वाड्मयीन भाषा तीच मराठी होय. मराठी भाषेतील पहिला शिलालेख 2220 वर्षांपूर्वीचा आहे. तो ब्राह्यी लिपीतील असून, तो पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळच्या नाणेघाटातील आहे. या शिलालेखात 'महारठिनो' लोकांचा स्पष्ट उल्लेख आहे. डॉ. वा. वि. मिराशी यांनी आपल्या al145सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख' या ग्रंथात हा शिलालेख प्रकाशित केला आहे. (''..व महरठिनो अंगियकुलवधनस सगरगिरिवलयाय पथविय पथमवीरस वस.. य महतो मह.. '' अनुवाद- ''..महारठी अंगिय कुलोत्पन्न गिरिसमुद्रवलयांकित पृथ्वीवरील वीर्शेष्ठ.. महान अशा पुरुषांत र्शेष्ठ अशा..'') ज्या महारठी भाषेत हा शिलालेख लिहिला गेला आहे ती त्याआधी किमान 200 ते 300 वष्रे अस्तित्वात असली पाहिजे.

महारठ्ठी-मरहठ्ठी- र्म‍हाटी-मराठी असा उच्चारभ्रमाचा प्रवास 'महाराष्ट्री हे महारठ्ठी'चे नामकरण संस्कृत भाषेने, तिच्यातल्या पंडितांनी केले. संस्कृत भाषेला संस्कृत हे नाव मिळण्याआधी महाराष्ट्री भाषा अस्तित्वात होती. एवढेच नाही तर ती प्रगल्भ झालेली होती. हाल सातवाहनाची 'सत्तसई', जयवल्लभाचा 'वज्जालग्ग' हा सुभाषित कोश, प्रवरसेन वाकाटकाचे 'रावणवहो', वाक्पतीराजाचे 'गऊडवहो' ही महाकाव्ये हे महाराष्ट्री प्राकृतातील मुख्य ग्रंथ. पैकी 'सत्तसई' व 'रावणवहो' नि:संशय महाराष्ट्रात लिहिले गेले. 'महाराष्ट्रार्शया भाषां प्रकृष्ट प्राकृतं विदु:।' असे महाकवी दंडी म्हणतो. म्हणूनच महाराष्ट्री प्राकृत हा महाराष्ट्रीयांचा अभिमानविषय आहे. मूलत: ही भाषा महाराष्ट्राचीच, हे नि:संशय. शिवाय प्रचलित मराठीशी महाराष्ट्रीचे निकटचे नाते व साम्य आहे, हे अनेक उदाहरणांवरून व व्युत्पत्त्यांवरून सिद्ध होते. महाकवी बाणभट्ट (सातव्या शतकाचा प्रथमार्ध) याने हर्षचरिताच्या प्रास्ताविकात गाथा कोशाचा उल्लेख केला आहे. अपभ्रंशापासून मराठी निघाली, हे डॉ. वि. भि. कोलते यांनी वाड्मयीन पुराव्याने सिद्ध केले आहे. ज्ञानेश्वरीत मराठी भाषेला 'र्म‍हाठी' या शब्दाबरोबरच 'देशी' हा शब्दही वापरलेला आहे. किंबहुना मराठीचे 'देशी' हेच नाव अधिक रूढ होते. अपभ्रंश भाषेचे साहित्यांतर्गत नाव 'देसी' असेच आहे, अपभ्रंश नव्हे. या देसीचा विकास होऊन जी भाषा निर्माण झाली ती देशी किंवा मराठी. ती अपभ्रंशाच्या 'नागर' या प्रकारापासून निघाली.

पुढे वराहमिहिराने 'बृहत्संहिते'त महाराष्ट्रीयांविषयी 'भाग्ये रसविक्रयिग: पण्यस्त्रीकन्यका महाराष्ट्र': असे म्हटले आहे. (बृहत्संहिता 10.8) ऐहोळे शिलालेखात (इ.स. 634) सत्तयार्शय पुलकेशी (चालुक्य) हा तिन्ही महाराष्ट्राचा सार्वभौम राजा झाल्याचा उल्लेख आढळतो. (एपि. इं. 6.4). प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्यु-एन-त्संग (इ. स. 629 ते 645) महाराष्ट्रास 'मोहोलाश' असे संबोधून त्याविषयी विस्ताराने लिहितो. वात्स्यायन, वररुची व दंडी यांनी केलेले महाराष्ट्राचे उल्लेख प्रसिद्धच आहेत. राजशेखर स्वत:ला 'महाराष्ट्र चुडामणी' म्हणवून घेतो. शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखित पोथ्या, प्रकाशित ग्रंथ या सार्‍यांच्या संशोधनातून मराठीबाबत एक 'प्रमाणक परिवर्तन' (पॅराडाइम शिफ्ट) होणार आहे.

(साभार - लोकराज्य,फ़ेब्रुवारी२०१३) 

Thursday, February 21, 2013

अभिजात मराठी भाषा


चित्रपट


Friday, February 15, 2013

नंदी यांचा जावईशोध


Saturday, January 26, 2013

जातिअंतासाठी पंचसूत्री





जा त आणि वर्णव्यवस्थेचा भारतीय समाजावर हजारो वर्षे पगडा आहे. महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि राजर्षी शाहू महाराज यांनी जातिअंतासाठी ज्या चळवळी केल्या, त्यामध्ये प्राधान्याने पंचसूत्री कार्यक्रमाचा आग्रह आहे. आंतरजातीय विवाह, स्त्री-पुरुष समानता, सर्वांना शिक्षण, धर्माची चिकित्सा आणि संसाधनांचे फेरवाटप ही ती पंचसूत्री आहे. या पंचसूत्रीच्या आधारे जातीचे उच्चाटन होऊ शकते, यावर माझा ठाम विश्वास आहे. आपल्याकडे 1952 पासून सार्वत्रिक निवडणुका होऊ लागल्या. लोकशाहीमुळे भारतात अनेक क्रांतिकारी सामाजिक बदल घडून आले. परंतु निवडणूक व्यवस्थेत सत्ताधारी जातींनी बहुमताच्या आधारे हुकूमशाही निर्माण केली, हेसुद्धा खुपणारे वास्तव आहे. त्यामुळे राजकीय आरक्षण म्हणजे, एक शासनपुरस्कृत जातिसंवर्धनाचा कार्यक्रम बनला. म्हणून आपल्याकडे आजही 99 टक्के विवाह जातीअंतर्गतच होतात. तेव्हा, केवळ दाखल्यावरून हद्दपार केल्याने जात संपुष्टात येईल, हा भाबडा आशावाद आहे. मात्र अशा आदर्शवादाचे स्वागत व्हायलाही हरकत नाही. त्याच वेळी जातीची हजारो वर्षांची परंपरा केवळ कागदी उपायांनी खंडित होईल, असे म्हणणे हे मूर्खपणाचे आहे. अनुसूचित जाती-जमातींना राजकीय आरक्षण लाभल्यामुळे धोरणनिर्मिती, कायदेमंडळ यांमध्ये प्रतिनिधित्व मिळू लागले आहे. त्यांच्या सहभागामुळे अर्थसंकल्पात वाटा उपलब्ध होऊ लागला. राजकीय आरक्षणच रद्द केल्यास या घटकांना अर्थसंकल्पात निधी मिळेल काय? भारतीय राज्यघटनेच्या कलम 334नुसार राजकीय आरक्षण देण्यात आले आहे. 2010मध्ये घटनादुरुस्ती करून सदर आरक्षणाची मुदत 2020 पर्यंत वाढवण्यात आली. आता राजकीय आरक्षण रद्द करायचे म्हटले तरी ते 2020 नंतरच होऊ शकते, त्याचे भान या चर्चेत ठेवणे आवश्यक आहे. एका बाजूला भटके-विमुक्त, इतर मागास या समाजघटकांना राज्य विधिमंडळ किंवा संसद यामध्ये आजही आरक्षण नाही (उर्वरित मजकूर पान 4 वर)



Friday, January 18, 2013

PIFF चित्रपट महोत्सव



या वर्षी आपण भारतीय चित्रपट सृष्टीची शताब्दी साजरी करीत आहोत. यानिमित्ताने  १० ते १७ जानेवारीच्या आठवड्यात ११ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडला. जगातील ५० देशांनी या महोत्सवात भाग घेतला होता.वेगवेगळ्या भाषांतील एकुण २०० चित्रपटांचे ३५० शो या महोत्सवात आयोजित करण्यात आले होते.सुमारे दहा हजार प्रेक्षकांनी या महोत्सवाचा आनंद लुटला.समकालीन जागतिक चित्रपट कोणत्या उंचीवर पोचलेला आहे? जगभरचे विचारी लोक कोणत्या दिशेने विचार करतात? चित्रपटासारख्या अत्यंत संवेदनशील आणि प्रभावी माध्यमाचा जनमत घडवण्यासाठी,अभिरुची उंचावण्यासाठी आणि जगण्यातली गुंतागुंत समजावुन घेण्यासाठी किती उत्तम वापर करता येतो याचे यानिमित्ताने आरपार दर्शन घडले.मराठी आणि अनेक भारतीय भाषांमधील श्रेष्ट चित्रपटांचा दर्जा जागतिक तोडीचा असल्याचा अभिमान वाटला.एकुण सगळा अनुभव जगण्याची ईयत्ता वाढवणारा होता.उमेद आणि उर्जा देणारा होता.अभिरुची श्रीमंत करणारा होता.जगभर भली माणसे आहेत आणि ती जग सुंदर करण्यासाठी झटत आहेत, जगात सगळीकडेच चंगळवाद, स्वार्थ आणि अंधार वाढत असला तरी निराश होण्याची गरज नाही.असे होतच असते, चिवटपणे त्याचा सामना करण्यातुनच जगण्याची ताकद वाढते असा विश्वास देणारा हा अनुभव होता.
जानु बरुवा या प्रतिभावंत असामी दिग्दर्शकाचा २६ नोव्हेंबरच्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याचा विषय समर्थपणे हाताळणारा असामी भाषेतील "वेव्ज आ‍‘फ सायलेन्स", अंजली मेनन यांचा मल्याळी भाषेतील केरळी जनजीवन आणि निसर्ग यांचा पट हळुवारपणे उलगडणारा "लकी रेड सीड्स", महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरलेला जर्मनीचा "बार्बरा", पोलंडचा "रोज", उरुग्वेचा "डिले", तुर्कस्थानचा "अराफ," आदी चित्रपटांचा दर्जा चित्रपटसृष्टीला सलाम करावा असा होता. किती नानाविध विषय या चित्रपटांनी हाताळले होते.विषमता,चंगळवाद, दहशतवाद, व्यसने, वृद्धांचे प्रश्न, ढासळणारी कुटुंबव्यवस्था, निसर्गाची हानी, मानवी क्रौर्य, जागतिकीकरणातुन आलेली औद्योगिक संकटे,कामगारांचे संघर्ष, अंधश्रद्धा, स्पर्धा,यु्द्ध आणि हिंसा असे अनेक महत्वाचे प्रश्न या चित्रपटांद्वारे मांडण्यात आले होते.
दुस‍र्‍या महायुद्धातील हिटलर आणि जर्मनांचा उतमात,सैनिकांनी मांडलेला उच्छाद व रानटीपणा किळस यावी असा होता. "सिंडलर्स लिस्ट"सारख्या श्रेष्ट चित्रपटातुन तो यापुर्वीही टिपण्यात आलेला होता. "रोज" या चित्रपटातील युद्धात पती मारला गेल्यानंतर एका विधवेला सोसावा लागलेला भयानक छळ अंगावर काटे आणतो. तिने धैर्याने केलेला सामना आणि तिला साथ देणा‍र्‍या एका सैनिकाची ही कहाणी मानवी जिद्दीची आणि चिवटपणाची विलक्षण प्रेमकथा आहे."फ्रोजन सायलेन्स" या स्पेनच्या चित्रपटातही या युद्धातील सैनिकी जीवनाचे वेगळे पैलु  चित्रीत करण्यात आले होते.
जगभर आयुर्मान वाढत असल्याने वृद्धांचे अनेक प्रश्न पुढे येत आहेत.इस्राईलच्या अमीर मनोर यांच्या "एपिलोग", पोलंडच्या जेर्झी डोमार्डड्जगींच्या "दि फिफ्थ सीजन ओफ दि इयर" आणि उरुग्वेच्या "डिले" या चित्रपटांमधुन ज्या उंचीवरुन हे विषय मांडण्यात आले ते मानवी करुणेला आणि काळजाला हात घालणारे होते. जिवापाड मेहनत करुन मुलांना आणि वडिलांना सांभाळणारी एक महिला शेवटी वडीलांना वृद्धाश्रमात ठेवायला जाते. आश्रमवाले नियम दाखवुन नकार देतात. ती बहिणीला वडीलांना सांभाळायची विनंती करते. बहिण कोरडेपणाने जबाबदारी झटकते. अश्यावेळी पिचलेली ती वडिलांना एके ठिकाणी बाकावर बसवुन पाणी आणते असे सांगुन पळुन जाते. घरी आल्यावर तिचा अपराधभाव तिला कुरतडु लागतो.  मुलगी काही संकटात असेल, नातवंडाना अपघात झाला असेल, आजारी असतील ती म्हणुन तिला यायला उशीर होत असावा या समजुतीने एकडे वडील दिवसभर तिथेच बसुन तिची वाट बघतात.रात्री जिवघेणी थंडी पडते. आजुबाजुचे काही लोक मदतीला येतात, घरी चला म्हणतात, पण म्हातारा नाही म्हणतो. मुलगी आली की चुकामुक व्हायला नको म्हणुन तिथेच बाकावर बसुन राहतो. रात्री म्हातारा थंडीने शेवटचे श्वास घेवु लागतो.मात्र तरीही जागा काही सोडत नाही.मुलगी एव्हाना रात्रभर वेगवेगळ्या दवाखाने आणि वृद्धाश्रमात शोध घेत फिरते. निराश होते. शेवटी ती बाकाजवळ पोचते पण खुप उशीर झालेला असतो. वडिल थंडीने बेशुद्ध पडलेले असतात. ती खुप प्रयत्न करते. आणि वडील शुद्धीवर येतात. तिला का उशीर झाला याची काळजीपोटी विचारपुस करु लागतात. ती काय सांगणार? बाकावरुन निघताना वडील मदत करणारांचे त्यांच्या घरी जावुन आभार मानायला विसरत नाहीत.काळजाला पीळ पाडणारी कथा. सादरीकरण,अभिनय,पटकथा,छायाचित्रण, चित्रभाषा, संवाद या सार्‍यातुन दिग्दर्शक रोड्रिगो प्ला यांची प्रतिभा आणि मेहनत दिसते.
जर्मनीच्या दिग्दर्शक आंद्रे ड्रेसन यांनी "स्टोप्ड एट ट्रेकहोल्ट" या चित्रपटातुन ब्रेन ट्युमर झालेला आणि हातात अवघे दोन महिने असणारा नायक मृत्युला ज्या धैर्याने सामोरा जाताना दाखवला आहे त्याला तोड नाही. मृत्युचा उत्सव ज्या गुंतागुंतीसह त्यांनी चित्रित केलाय त्याला केवळ सलामच.दक्षिण आफ्रिकेच्या  क्रेग फ्रेमोंड यांनी आपल्या "मटेरियल"या चित्रपटातुन एका मुस्लीम कुटुंबातील नव्याजुन्या पिढीतील मुल्यसंघर्ष ज्या ताकदीने आणि हळुवारपणे चित्रित केलाय तो अविस्मरणीय आहे. "अराफ:समव्हेयर इनबिटवीन" या तुर्कस्थानच्या यासीन उस्तोग्लु यांनी गरीब मुस्लीम मुलामुलींचे प्रेमविश्व,त्यातले ताणेबाणे, सनातनी कायदे आणि नायिकेचा एकाकी संघर्ष यांची जबरअदस्त मांडणी केलेली आहे.जेहरा या नायिकेची भुमिका  अक्षरश: जगलेल्या अभिनेत्री नेस्लीहान अटागुलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवलेल्या "बार्बरा" या नायिकाप्रधान चित्रपटात दोन जर्मनीमधील प्रेमिक डाक्टरांची घुसमट, ससेहोलपट आणि चिवटपणाची कहाणी सांगण्यात आलेली आहे.
चंद्रकांत कुलकर्णी हे बहुआयामी प्रतिभेचे श्रेष्ट दिग्दर्शक आहेत.त्यांनी मराठीतील "तुकाराम"मध्ये चमत्कार वगळुन संत तुकारामांच्या जडणघडणीचा,त्यांच्या जागतिक अश्या प्रतिभेचा तो आलेख चितारला आहे तो स्तिमित करणारा आहे.या चित्रपटाचा अवाका फार मोठा आहे.कुलकर्णी आणि त्यांच्या टीमने तो लिलया पेलला आहे.हा तुकाराम प्रत्येक मराठी माणसाने बघायलाच हवा.जागतिक सिनेमाच्या तोडीसतोड देणारा हा मराठी चित्रपट आहे. ख्यातनाम साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी यांनी आपला पहिला चित्रपट वयाच्या ७५व्या वर्षी दिग्दर्शित केला आहे."इन्वेस्टमेंट" हा आजचा चित्रपट आहे. मध्यमवर्गियांची महत्वाकांक्षा, चंगळवाद आणि मुल्यांची मोडतोड करण्याची व्यापारीवृती मतकरींनी ताकदीने पकडली आहे.आजच्या बदलत्या महानगरी स्पर्धाभावनेचा अर्थ-सामाजिक आलेख ते छान मांडतात.
अंजली मेनन आणि जानु बरुवा यांच्यावर स्वतंत्रपणे लिहायला हवे.बदलते सामाजिक वास्तव ,दहशतवाद, कुटुंब,निसर्ग आणि मानवीजीवन यांच्यावरचे त्यांचे भाष्य अफलातुन आहे. हे जागतिक तोडीचे महान दिग्दर्शक आहेत.
जगभराचे समकालीन वास्तव चित्रभाषेत मांडण्याचा अनेक प्रतिभावंत दिग्दर्शक प्रयत्न करीत आहेत. मानवी जीवनाचा अर्थ आणि गुंतागुंत ज्या कलात्मक  उंचीवरुन टिपण्यात येत आहे ती बघुन जगण्याची श्रीमंती वाढते. अवाका वाढतो.अभिरुची उंचावते. जगभर भले लोक आहेत.ते आपल्या कलेतुन गंभीरपणे आणि अपार मेहनतीने जग समृद्ध करीत आहेत. पुणे महोत्सवाचे आयोजक जब्बार पटेल आणि त्यांच्या सहकार्‍यांना खुपखुप धन्यवाद. हा अनुभव प्रत्येक संवेदनशील माणसाने घ्यायलाच हवा.