Monday, March 6, 2017

विंदा करंदीकर

भाऊंकडे किश्यांचा अफलातून खजिना असायचा. ते आपल्या तिरकस शैलीत तो सांगताना अगदी हरवून जायचे. अनेकांची फिरकी घेण्यात ते पटाईत होते. त्यातून ते स्वत:लाही वगळायचे नाहीत. मजा म्हणजे ते आपले किस्से सांगताना आपण कसे गंडलो, आपली कशी फजिती झाली किंवा आपल्याला शेरास सव्वाशेर कसे भेटले हे सांगतानाही ते आरपार हरवून जायचे. त्यांनी सांगितलेला हा त्यांच्या फजितीचा किस्सा.
तिघांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम त्याकाळात फार गाजत होता.
कार्यक्रमाची व्यवस्था बघण्याची जबाबदारी फिरती असायची. एकदा एका साखर कारखान्याचे निमंत्रण आले.
स्वत: एम.डी. आले होते निमंत्रण घेऊन.
त्यांना दारातच थांबवून व्यवस्थापक कविवर्यांनी त्यांच्या हातात 27 अटींचा कागद सोपवला. पुढच्या वेळी येताना फोन करून वेळ घेऊन यायला बजावले.
लेखी नियमांप्रमाणे अ‍ॅडव्हान्सची रक्कम द्यायला फोन करून, वेळ घेऊन एम.डी. आले.
परत कविंनी त्यांना दारातूनच कटवले.
एम.डीं.नी हा अनुभव चेअरमनना सांगितला. चेअरमन नामांकित बेरकी राजकारणी होते. त्यांनी 27 नियमांचा कसून अभ्यास केला. नियमाप्रमाणे कवींना रेल्वेची फर्स्ट क्लासची तिकीटं पाठवण्यत आली. स्टेशनवर घ्यायला ए.सी. गाडी पाठविण्यात आली. राहण्या-जेवणाची व्यवस्था ठरल्याप्रमाणे उत्तम करण्यात आली.
कार्यक्रमाला तिन्ही कविवर्य सभागृहात पोचले तर तिकडे सभागृह संपुर्ण मोकळे. स्टेजवर फक्त एम.डी. आणि चेयरमन दोघेच.
कवीवर्यांनी श्रोत्यांची चौकशी केली. तेव्हा चेअरमन  म्हणाले, "तुमच्या 27 अटींमध्ये कार्यक्रमाला श्रोते हवेत अशी अटच नाही. आता तुम्हाला या रिकाम्या सभागृहापुढेच कविता वाचाव्या लागतील."
व्य्वस्थापक कविंच्या लक्षात आपली चूक आली.
भाऊ चेअरमनना म्हणाले, "मुदलात आमच्या माणसाकडून काहीतरी आगळीक झाली असणार. आम्ही कवी जरा विक्षिप्त असतो. मी स्वत: तुमची क्षमा मागतो."
चेअरमन म्हणाले, "अहो, आमचा माणूस 400 किलोमीटरवरून तुम्हाला फोन करून तुमची वेळ घेऊन अ‍ॅडव्हान्सची रक्कम द्यायला येतो. तुम्ही त्याला साधं घरातही घेत नाही. पाणीही विचारीत नाही. एव्हढा माणुसघाणेपणा?"
भाऊंनी व्यवस्थापकांच्या वतीने चुक झाल्याचे मान्य केले. माफी मागितली.
चेअरमननी एमडींना शेजारच्या सभागृहात पिटाळले. तिकडे लावण्यांचा फड रंगलेला होता. एमडींनी स्टेजवर जाऊन घोषणा केली, "मंडळी, शेजारच्या सभागृहात एक सांस्कृतिक प्रोग्राम होणार आहे. आपण सर्वांनी तिकडे जायचेय. चेअरमनसाहेबांचा तसा हुकुम आहे. तो कार्यक्रम झाला की हा कार्यक्रम पुन्हा पुढे सुरू होईल. तर आता जरा चेंज."
5 मिनिटात सभागृह खचाखच भरले. तीन कवींचा काव्यवाचनाचा कार्यक्रम इतका रंगला की लोक लावण्यांचा कार्यक्रम विसरले.
भाऊंनी त्यापुढे व्यवस्थापणाची जबाबदारी मात्र स्वत:कडे घेतली.
.....................

विंदा करंदीकरांची तत्वनिष्ठा --


भाऊंना भेटणे, त्यांच्यासोबत गप्पा मारणे हा अतिशय बहारदार अनुभव असायचा.
एकदा भाऊंचा फोन आला. म्हणाले, "हरी, एक कार्यक्रम आलाय. त्यांना आपण तिघे हवे आहोत. दयाशी मी बोललो तो येतो म्हणालाय. तुही वेळ काढ. प्रत्येकी एक हजार रूपये मानधन आणि एकेक नारळ असं मानधन देणार आहेत. जाण्यायेण्याचं भाडं आणि चहा देणार आहेत. ठीकाय ना?"
मी होकार दिला.
कार्यक्रम झकास झाला.
भाऊंनी संयोजकांना बोलावले, म्हणाले," चला, व्यवहाराचे उरकून टाका."
संयोजक आत गेले आणि त्यांनी तीन बंद पाकीटे आणून आम्हाला तिघांना दिली.भाऊंनी पाकीट फोडून पैसे मोजले.पाकीटात 700रूपये होते. भाऊंनी संयोजकांना बोलावले,"मालक, अहो, यात तीनशे रूपये कमी आहेत. आपले प्रत्येकी एक हजार ठरले होते."
आम्हाला दोघांना भाऊ म्हणाले, "अरे तुमचीही पाकीटे फोडून बघा."
पण दयाकाका म्हणाले, "भाऊंचं ठिकय. मोठा माणूसय. आपण असं स्टेजवर कसं पाकीट फोडून बघायचं ना?"
संयोजकांनी भाऊंना तीनशे रूपये आणून दिले. म्हणाले,"माफ करा, कार्यालयातील मंडळींनी पाकीटं भरताना चुकून कमी रक्कम भरली."
आम्ही निघालो. टॅक्सीत बसल्यावर आम्ही दोघांनी आमची मानधनाची पाकिटं फोडून बघितली. दयाकाकांच्या पाकीटात 200रूपये होते आणि माझ्या शंभर.
भाऊंनी टॅक्सी थांबवली. संयोजकांना बोलावलं आणि त्यांना झापलं. ठरल्याप्रमाणं मानधन दिलेलं नाही. दिलेला शब्द तुम्ही पाळलेला नाही. तत्व म्हणजे तत्व, काय समजले? तिघांना प्रत्येकी एक हजार ठरले होते. तुम्ही तिघांना मिळून एक हजार दिलेत. आत्ताच्या आत्ता पुर्तता करा आणि हो, टॅक्सीचा खोळंबा झाल्याने तिच्या भाड्यापोटी पंचवीस रूपये अधिकचे द्या टॅक्सीवाल्याला."
भाऊंचा सात्विक संताप उफाळून आला होता. संयोजकांनी उरलेले पैसे आणून दिले, परत ते कार्यालयातील लोकांनी पाकीटं भरताना घोळ केला वगैरे सांगायला लागले. भाऊ म्हणाले, "तसं असेल तर कार्यालयातील लोकं बदला किंवा किमान तीन वेगवेगळ्या नविन सबबी शोधून ठेवा."
......................
दुसर्‍या दिवशी भाऊंचा फोन आला. त्यांना मंत्रालयात यायचे होते. किल्लारीच्या भुकंपग्रस्तांच्या निधीला मुख्यमंत्री फंडाला त्यांना देणगी द्यायची होती. त्यांच्या दोन अटी होत्या. ही देणगी गुप्त राहायला हवी. तिचा गवगवा व्हायला नको. बातमीदारांना कळता कामा नये. त्यांना सी.एम.ना भेटायचे नव्हते, फक्त देणगीचा चेक देऊन ते परत जाणार होते.
मी भाऊंच्या मंत्रालय प्रवेशिकेची व्यवस्था केली. भाऊ बसने आले. आम्ही मुख्यमंत्री कार्यालयात गेलो. भाऊंनी चेक दिला. पावती घेतली. भाऊंचे नाव ऎकून तो अधिकार चमकला. त्याने भाऊंना खुर्ची दिली. चहा मागवतो म्हणाला. भाऊ म्हणाले, " धन्यवाद. पण मला जरा घाई आहे. तुम्ही मुद्दाम बोलावलत तर चहाला मी परत कधी तरी नक्की येईन. आत्ता नको. एकतर ही माझी चहाची वेळ नाही आणि मी असं ऎकलंय की मंत्रालयातला चहा अंत्यंत मचूळ असतो.माझी चव मला बिघडवून घ्यायची नाही. आता मी माझ्या कामासाठी आलोय. चहाला नाही. जत्रेत पाहुणा ओढून काढू नका."
अधिकार्‍याने भाऊंना दिलेली पावती पंख्याच्या वार्‍याने उडाली. मी ती उचलून भाऊंना दिली, तेव्हा माझी नजर रकमेच्या आकड्यावर पडली. भाऊंनी पाच लाख रूपयांची देणगी दिलेली होती.
आम्ही मंत्रालयाबाहेर आलो. भाऊ बसला उभे राहिले. बसला वेळ होता. मी म्हटलं, "भाऊ, इथला चहा फक्कड असतो. घेऊया का एकेक कटींग?"
भाऊ म्हणाले, "असं म्हणतोस. चल घेऊया. मलाही तल्लफ आलीय. पण एका अटीवर, मी तुझ्यापेक्षा वयानं मोठा असल्यानं पैसे मात्र मी देणार हो."
............................

Sunday, March 5, 2017

जी जात नाही ती जात?

भारतीय समाजात लिंगभाव, जात, वर्ग, धर्म आणि वंश ही प्रामुख्याने संस्थात्मक भेदभाव आणि शोषणाची केंद्रे आहेत. आज पीपल ओ‘फ इंडीयाच्या प्रकाशित 43 खंडांनुसार आज देशात 4635 जाती/जमाती अस्तित्वात आहेत. प्रबोधन, सामाजिक चळवळी, लेखन, आधुनिक शिक्षण, विज्ञान, शहरीकरण, औद्योगिकीकरण, जागतिकीकरण यामुळे जातजाणीव काहीशी कमजोर जरूर झालीय पण ती समूळ गेलेली नाही. तीव्रता कमी झाली असली तरी तिचं स्वरूप बदललय. गुंतागुंत वाढलीय. जातजाणीवेची पाळंमुळं खूप खोलवर रूजलेली असली तरी "जी जात नाही ती जात" असली टाळीबाज विधान तपासून घेतली पाहिजेत असं मला वाटतं. हे खरंय की "डीकास्ट" होणं ही सोपी गोष्ट नाही. मात्र दाखल्यावरून जाती काढल्या की त्या समाजातून आपोआप जातील असं मानणारे लोक मला तरी भाबडे वाटतात. समाजात जात होती म्हणून तर ती दाखल्यावर आली ना? जातीनिर्मुलनासाठी ज्यांनी फार मोठी लढत दिली त्यात प्रामुख्याने महात्मा फुले, महर्षि वि.रा.शिंदे, सयाजीराव गायकवाड, राजारामशास्त्री भागवत, शाहू महाराज, डा. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, डा. राम मनोहर लोहिया, साने गुरूजी आणि इतर अनेकांचा मोठा वाटा आहे. आपल्या देशात प्रत्येक जात हे स्वतंत्र राष्ट्र आहे, असं बाबासाहेब म्हणतात. जातीनं श्रेणीबद्ध विषमता निर्माण केली. पायर्‍यापायर्‍यांची किंवा मनोर्‍याची व्यवस्था निर्माण केली असं ते सांगतात. डा. भांडारकर, डा.श्री.व्यं.केतकर, डा.आंबेडकर, जी.एस.घुर्ये, डा. इरावतीबाई कर्वे, एम.एन. श्रीनिवासन आदींच्या मते जाती टिकवण्याचे मुख्य केंद्र जाती अंतर्गत होणारे विवाह हे आहे. जातीनिहाय समाज मान्यता, आर्थिक व संसाधनांची मालकी, सामाजिक प्रतिष्ठेची उतरंड यांचा विचार केल्याशिवाय जातीची ताकद कळत नाही. आजवर संस्कृतीकरण म्हणजे वरच्या जातींचे अनुकरण हा नियम सर्वजाती पाळत होत्या. आता सर्वांमध्ये मागास होण्याची शर्यत लागलीय. मागासलेपणाचे डोहाळे लागलेला आपला देश महासत्ता व्हायची स्वप्नं बघतोय. 1950पासून आपल्याकडे आलेल्या निवडणुक व्यवस्थेने एक दुटप्पीपणा आणला.नेते तोंडाने सतत म्हणत असतात, " फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्राय.जातीपाती गेल्या पायजेलत." खरी गोष्ट ही आहे की हेच चोर जातीसंस्था, जात पंचायती, जातीचे नेते यांना पोसत असतात.कारण जातीची मतबॅंक त्यांच्याद्वारे सांभाळली जाते. बहुजन म्हणवणार्‍या अनेक नेत्यांनी हे पाप केलेलं आहे. "ब्राह्मण - ब्राह्मणेतर" ही मांडणी फुले शिंदे आंबेडकर करीत होते तेव्हा तो लढा नेतृत्वाविरूद्धचा होता. प्रवृत्तीविरूद्धचा होता. गेल्या 65 वर्षात मात्र तो निवडणुका जिंकण्याच्या रणनितीचा भाग बनलेला आहे. तोंडाने सतत जातीनिर्मुलनाची भाषा करायची पण वर्तन मात्र अस्सल जातीयवादी करायचे हे इथल्या 65 वर्षे सत्ता ताब्यात ठेवणार्‍या सत्ताधार्‍यांचं खरं वर्तन राहिलेलं आहे. काही लोक अतिशय भाबडे आहेत. त्यांना जात खरोखरच जायला हवीय पण जात हा शब्द उच्चारणारे सगळेच त्यांना जातीयवादी वाटू लागतात. जातींची मानसिकता किती घट्ट आहे, ती आधी नीट समजून घ्या असं कोणी लिहिलं की हे त्यांच्यावर जातीयवादी म्हणून तुटून पडतात. काही असे बालीश की त्यांना वाटते आजार झाकून ठेवला की बरा होतो.मी जात मानत नाही म्हटलं की संपली जात. काहीजण म्हणतात,आम्हाला महाविद्यालयात येईपर्यंत जातच माहित नव्हती. हे खरं असेल तर असे लोक जातीव्यवस्थेचे लाभार्थी असू शकतात. जातीव्यवस्थेचे बळी असलेल्यांना ही चैन परवडत नसते. मात्र आता जागतिकीकरणानंतर प्रत्येक जातीत नवे वर्ग तयार झालेत. माणसाचा वर्ग बदलला की त्याची वर्गजाणीव बदलते. आज सर्वाधिक आंतरजातीय विवाह करणारात कोणता समाज पुढे आहे? प्रतिष्ठाभंग झाला म्हणून [ Honour Killing ] तरूण मुलामुलींची रानटीपणे हत्त्या करणारे कोण आहेत? आज कोणत्या समाजात सर्वाधिक लोक "डीकास्ट" झालेले आहेत ते लोक पाहात असतात. आज महाराष्ट्रात धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता, ज्ञानसत्ता, सांस्कृतिक सत्ता, प्रशासकीय सत्ता, न्यायसंस्था आणि माध्यमसत्ता यात कोणते समाज प्रबळ आहेत? धार्मिक, राजकीय, आर्थिक, प्रशासनपातळीवर सर्वाधिक बोलणारे, लिहिणारे, तिकीटं देणारे, शेयर मार्केट, बाजार, उद्योग, सहकारी बेल्ट ताब्यात असलेले कोण आहेत हे सारं दिसत असतं. .................. सार्‍याच जातींमध्ये चार चांगली माणसं असतात आणि सर्वच जातींमध्ये काही लबाड आणि बदमाश लोकही असतात. तेव्हा जात जितकी लवकर जाईल तितकं बरं. पण ती आपोआप जाणार नाही. त्यासाठी फुले शिंदे साने आंबेडकर गांधींचा रस्ता पकडायला हवा. स्त्रीपुरूष समता, ज्ञाननिर्मिती व कौशल्यांचा विकास, संसाधनांचे फेरवाटप, आंतरजातीय विवाह, धर्म चिकित्सा आणि संवाद याला पर्याय नाही. ...................

शून्य मते

1995 साली मी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीला उभा होतो. परभणीच्या साहित्य संमेलनात आमच्या मतदार संघातील एका मोठ्या समीक्षकांचा मला पाठींबा /आशिर्वाद असावेत म्हणून मी त्यांना विनंती केली. त्यांनी आनंदाने मला पाठींबा दिला. मत देण्याचा शब्दही दिला. प्राचार्य म.द. हातकणंगलेकरसरांच्या समोर हे सारे घडले. मी उमेदवारी अर्ज भरला आणि एका परिषदेला दिल्लीला निघून गेलो. आल्यावर पाहतो तो काय, ज्यांनी मला शब्द दिला होता त्यांनीच माझ्याविरूद्ध उमेदवारी अर्ज भरला होता. मी माझ्या जवळच्या सर्व पत्रकार, साहित्यिक,कवी मिंत्रांना घेऊन त्यांच्या घरी गेलो. आम्हाला बघून ते दचकले. खरं तर ते एक उत्तम समीक्षक होते. भला माणूस होते. त्यांच्याबद्दल मला आदर होता. माघार घेण्याचा दिवस निघून गेलेला होता. मी म्हटलं, "सर, तुम्ही साहित्य परिषदेचे मतदार आहात. माझं तुमच्याशी परभणीला बोलणं झालंलं होतं. तुम्ही मला मत देण्याचा शब्द दिला होता, तेव्हढा पाळावा एव्हढीच विनंती करायला आलोय." ते म्हणाले, "असं कसं मी तुम्हाला मत देणार? मी स्वत:च उभा आहे." मी म्हटलं, " काहीच हरकत नाही. तुम्ही अवश्य उभे राहा. तुमचे मत मात्र मला द्या. साहित्य परिषदेच्या विद्यमान घटनेप्रमाणे स्वत:चे मत स्वत:लाच द्यायला हवे असे बंधन नाही." माझ्यासोबत अनेक साहित्यिक मित्र होते. तेही सरांशी हसतखेळत गप्पा मारत होते. सरांचा तणाव निवळला. सर, म्हणाले, "माझा अगदीच नाईलाज झाला, विद्यमान पदाधिकार्‍यांनी मला फारच गळ घातली. इ.इ." मी म्हटलं, "सर, तुम्ही का उभे राहिलात हे आम्ही विचारलेलेच नाही. तुमचा तो हक्कच आहे. फक्त तुमचं मत मात्र मला द्या. बाकी उत्तमच आहे." आमचा मतदारसंघ फार मोठा म्हणजे अख्खा पुणे जिल्हा होता. तो सगळा फिरणं त्यांना वयोमानानुसार शक्य नव्हतं. मी त्यांना शुभेच्छा देताना म्हणालो,"सर, मी मत तुम्हाला देऊ शकत नाही, पण काही कारणाने जे मला मत देणार नसतील त्यांना तुम्हाला मत द्यायला मी नक्की सांगीन. तुम्ही प्रतिनिधीपदाऎवजी परिषदेचे उपाध्यक्ष व्हायला हवे असे मला वाटते. मी निवडून आल्यावर तुमचे नाव नक्की सुचविन." ते म्हणाले, "नाही मी उपाध्यक्षपद स्विकारणार नाही. कारण ते अप्रत्यक्ष निवडणुकीने म्हणजे नियुक्तीने मिळते. मला मागच्या दाराने यायचे नाही." निघताना माझा एक नाटककार मित्र सरांना आदराने म्हणाला, "सर, मनाची तयारी असू द्या, पराभवासाठी. कदाचित तुमचे डिपोझिटही जाऊ शकेल." आणि सगळे मित्र अटीतटीने कामाला लागले.सगळा जिल्हा पिंजून काढला.त्यातले आज कितीतरी नामवंत आहेत. अरूण जाखडे, अरूण खोरे, संजय पवार, प्रमोद मांडे, रामनाथ चव्हाण, शिवाजी चाळके, अतुल देशमुख, आनंद लाटकर, उपेंद्र खरे, डा. रामचंद्र देखणे, उद्धव कानडे आणि अनेक मित्रांनी अपार मेहनत घेतली. त्यावेळी कधी त्यांच्या स्कूटरवरून तर कधी माझ्या ते सारे सोबत प्रचार करीत फिरले. मतदारांपैकी 90% मतदार एका विशिष्ट जातीचे असल्याने आपणच निवडून येऊ असे सरांनी व आमच्या पदाधिकार्‍यांनीही गृहीत धरले होते.निवडणुक अधिकारी आणि यंत्रणा माझ्याशी फटकून होती. मी एकुण एक मतदारांशी बोललो. त्यांचा पाठींबा घेतला. मला मतदार जातपात न बघता मतदान करतील असा विश्वास होता. एक मोठे सुसंस्कृत आणि ग्रंथप्रेमी राजकारणी आमचे मतदार होते. त्यांनी मला लेखी पाठींबा दिला. स्वत:हून एका खासदारांना मला काही मदत लागली तर करायला सांगितली. खासदार पैलवान होते. ते मला म्हणाले, "मला मतदारांची यादी द्या. त्यातल्या कोणाकोणाला उचलायचे ते सांगा. महाबळेश्वर, चिखलदरा, ताडोबा, भंडारदरा, तोरणमाळ अशा ठिकाणी बंदोबस्तात त्यांना ठेवतो. तुम्ही काहीही काळजी करू नका." मी "ही निवडणुक त्यातली नसते, तसे केले तर मी नक्की आपटेन, तुम्ही असं काहीही करू नका" अशी त्यांना कळकळीची विनवणी केली. राजकीय नेत्यांच्या गावचा एक उमेदवार उभा होता. तो त्यांना भेटला आणि त्याने पाठींबा मागितला. नेते म्हणाले, " अरे, तू उशीर केलास. मला आधी सांगितलं असतस तर मी कशाला हरीला पाठींबा दिला असता? शेवटी तू माझा गाववाला म्हणून जवळचा.पण आता माझा शब्द गेलाय." निवडणुकीचा निकाल आला. मला सुमारे 95% मते पडली होती. मान्यवर समीक्षकांची मात्र अनामत जप्त झाली होती. राजकीय नेत्यांच्या गावच्या उमेदवराला शून्य मते पडली होती. हा चमत्कार कसा घडला ते काही मला उमगले नाही. बोलल्याप्रमाणे पहिल्या बैठकीत मी समीक्षकांचे नाव उपाध्यक्ष पदासाठी सुचवले. त्यांच्या बाजूचे पदाधिकारी चक्रावले. ते विरोध कसा करणार? एकमताने समीक्षकांची साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. पदाधिकारी म्हणाले," आता तुम्हीच त्यांना फोन करून बोलवून घ्या. त्यांचं स्वागत करा." मी त्यांना फोन केला, अभिनंदन केले.परिषदेवर बोलावले. ते आले. मी त्यांना हार घातला. पेढे दिले. चहा पिताना ते मला म्हणाले, "माफ करा, मी माझा शब्द पाळू शकलो नाही. पण तुम्ही मात्र शब्दाला जागलात." त्या उमेदवाराला शून्य मते कशी मिळाली ते मात्र कधीच कळले नाही. ..................

Saturday, March 4, 2017

मॅरेज विथ डिफरन्स!

मॅरेज विथ डिफरन्स! - पारदर्शक शाहीथाट आणि भुंकणारे राष्ट्रद्रोही

आयला आता हे फारच झालं. आम्ही आमच्या कोट्यावधींचा चुराडा केला तर तुमच्या बापाचं काय जातं? यांना दरमहा पॅकेज द्या, पाकीटं द्या. "पेड किंवा पेंड" द्या तरी हे भुंकणारच.

या सामाजिक माध्यमवाल्यांनी तर डोक्याला वात आणलाया. काय तर म्हणं, रावसाहेबांनी शाहीथाट का उडवला? मायला, आम्ही उडवणार. तुम्ही कोण विचारणारं? गेल्या 60 वर्षात त्यांनी हत्ती,घोडं, उंटं, रोषणाई, लक्षभोजनं केली तेव्हा तुमची दातखीळ का बसली होती? आम्ही केलेला अवघा पाचपन्नास कोटींचा खर्च एकदम पारदर्शक आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाच्या सगळ्यात मोठ्या राज्यातल्या सगळ्यात मोठ्या अध्यक्षाच्या सगळ्यात मोठ्या इतमामाला शोभायला  नको?  भिकारडे कुठले?

स्पष्ट सांगतो, आमच्यावर भुंकणारे तमाम सगळे कुत्रे राष्ट्रद्रोही आहेत. मायला हाकला यांना पाकिस्थानात.

मोहितेपाटील, जाधवपाटील, खैरेपाटील, रेड्डीपाटील, जाणवेपाटील, दानवेपाटील, देवपाटील, गडकरीपाटील, भोसलेपाटील, कदमपाटील, पाटीलपाटील, देशमुखपाटील, हे सगळेच "दानवपाटील" आहेत काय ?

मायला इव्हेंट आमचा, सत्ता आमची, विमानं आमची, पक्वान्नांच्या राशी आमच्या, पोरगा आमचा, सूनबाय आमची, लक्षभोजनं आमची, विहीरी आमच्या, बर्फ आमचा, सगळा खर्च आमचा, सेट मात्र भाड्याचा, तुमच्या पिताश्रींचं काय जातं?आम्ही तुम्हाला हिंग लावून इचारित नसतो. हिम्मत असेल तर लिहा, पारदर्शक थाट, पारदर्शक पक्वान्नं, पारदर्शक वरबाप आन पारदर्शक वर**! मॅरेज विथ डिफरन्स! मायला.

"अध्यक्षमहाराज, तुमच्यावर खर्चाबाबत होणारी टिका राजकीय आकसातून होत असल्याने मी तुम्हाला क्लीनचिट देतोय अध्यक्षमहाराज. आपला आता नंबर एक असल्याने लग्न पण नंबर एकच व्हायला पाहिजे." असं स्वोता शीएमसाहेब म्हणले.

आणि असं बघा, त्यादिवशी शहरात अनेक गरिबांची लग्नं होती. त्यांची खर्चात बचत व्हावी म्हणून आणि शहरातील लोकान्सीपण पारदर्शक अंधाराचा अनुभव घेता यावा म्हणूनशानी आम्ही डायरेक्ट उर्जामंत्र्यांना सांगून आमच्या घरचा मांडव सोडून उरलेल्यांची लाईट 2 तास बंद ठेवायला लावली. आणखी गरिबांना किती मदत करायची?

तुम्ही उबळ आल्यासारखं कोललाल, कोललाल, पिसाळल्यासारखं भुंकाल, भुंकाल आन निपचित पडाल.

आमचं मतदार किती खुष आहेत, सगळ्यांच्या तोंडी एकच वाहवा ...क्या बात है!, असं लग्न गेल्या 25 वर्षात झालं नव्हतं.

आधी कोणाचं झालं होतं?

कोणाचं म्हणजे काय विचारताय? अहो, नवर्‍या मुलाच्या बापाचं!
हायकाय आन नायकाय.

वाजवा मायला. आन संतोषराव, हनीमून तेव्हढा उरकला की मूक मोर्च्याचं विसरायचं नाय. जायला पाहिजे बाबा. आपल्यासारख्या गरिबांना आरक्षण मिळायला नको का?

Wednesday, March 1, 2017

जयवंत दळवी आणि तीन व्यक्ती

जयवंत दळवी हे माझे आवडते लेखक.
माझे पहिले पुस्तक त्यांना भेट द्यायला मी गेलो तेव्हा ते घरी नव्हते. घराला कुलूप होते. मी दाराच्या फटीतून पुस्तक आत टाकून आलो.
आठवड्यात दळवींचे सुंदर पत्र. "मी तुझे पुस्तक आधीच विकत घेऊन वाचलेले आहे. मला ते आवडलेय. आता ती प्रत मी माझ्या गावच्या वाचनालयाला भेट देईन आणि तुझ्या सहीची भेटप्रत माझ्याकडे ठेवीन. परत भेटायला नक्की ये. सोबत पुस्तकाच्या किमतीएव्हढा चेक पाठवित आहे. तो स्विकारावा."
मी दळवींना आभाराचे पत्र लिहिले. "चेक तुमची आठवण म्हणून जपून ठेवतोय" असे लिहिले.
त्यांचे उलटटपाली उत्तर आले. "चेकची झेरोक्स प्रत काढून ठेव. चेक बॅंकेत भर. तुझी ती हक्काची कमाई आहे."
आजही तो चेक मी जपून ठेवलेला आहे.
...........................
अलिकडेच गाजलेले भाषण किंवा निधन पावलेली व्यक्ती यामुळे बातम्यांमध्ये झळकलेल्या तीन व्यक्तींविषयीचे माझे अनुभव --
क्र.1;-
मराठवाड्यातले हे नामवंत लोकप्रतिनिधी आणि तुफानी वक्ते. साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या एका इतिहासविषयक अनुवाद ग्रंथावर त्यांनी विधान परिषदेत टिकेची तोफ डागली. साक्षेपी संशोधक डा.य.दि.फडके हे  मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांनी मला यासंदर्भात अधिक शोध घ्यायले सांगितले. सदर ग्रंथ ज्या अनुवादकाने उर्दूतून मराठीत केला होता त्यांना भेटलो. प्रकाशित पुस्तक वाचले. अनुवादात पुस्तकाच्या नावापासूनच गंभीर चुका होत्या. या पुस्तकाचे नायक हे महाराष्ट्रातील नामवंत इतिहासपुरूष असल्याने या चुकांवर गदारोळ होण्याची शक्यता होती. सगळी कागदपत्रे अभ्यासल्यावर असे लक्षात आले की सदर अनुवादकाचे नाव मंडळाला याच वि.प.सदस्याने सुचवले होते. त्यांच्या ते लक्षात आणून दिल्यावर ते म्हणाले, "ठीकाय ना. तेव्हा ते गृहस्थ आमच्या महाविद्यालयात प्राध्यापक होते. आता त्यांचे मॅनेजमेंटशी पटत नसल्याने त्यांना काढून टाकण्यात आलेय.
म्हणजे यांच्या मैत्रीची/वादाची झळ मंडळाला बसणार. पुस्तक रद्द करून नष्ट करावे लागले. त्याची वाच्यता होणार नाही याची दक्षता घेण्यात आली.
काही बिन चिपळ्यांचे तर काही चिपळ्यांचे नारद!
...................
क्र. 2 : -
विदर्भातील या नेत्यांचा लौकिक मुलुखमैदान असा. ***वीर वगैरे म्हणुन ते ओळखले जात. खूप दरारा आणि सततची प्रसिद्धीझोतात राहायची त्यांना सवय.पुढे हा दरारा गेला.
एकदा आम्ही चिखलदर्‍याला मित्रमंडळींसह गेलो असताना रात्री उशीरा विश्रामगृहाचे व्यवस्थापक येऊन गयावया करू लागले. ****** ** हे साहेब आलेत. त्यांच्यासमवेत नेहमीप्रमाणे त्यांची प्रिय व्यक्ती आहे. त्यांना द्यायला एकही खोली खाली नाही. त्यांचे रिझर्व्हेशन नसल्याने आमचीही अडचण आहे. तुमच्याकडचा एक सूट त्यांना देता का प्लीज?"
आम्हाला त्यांनी गाजवलेला काळ माहित होता. आम्ही आमचे सामानसुमान आवरून आमच्याकडचा एक सुट खाली करून त्यांना दिला. या मोठ्या विराची ओळख करून घ्यायला आम्ही उत्सुक होतो.
नेते आले ते आडखळतच. तोंडाने शिव्यांचा रट्टा चालू. सूटमध्ये आल्याआल्या नेत्यांनी व्यवस्थापकाच्या कानाखाली वाजवली.एव्हढा उशीर का लागला म्हणून.तो काहीतरी सांगायला गेला तर हे नेते त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवू लागले. आमची ओळख करून घेण्याची इच्छा एव्हाना मावळली होती.
सभागृहातला राजदंड किंवा हाताशी असता तर पेपरवेट त्यांनी कदाचित आम्हालाही फेकून मारला असता!
.........................
प्र. 3 :-
यांचा ज्येष्ठ लेखक, कवी, प्राचार्य म्हणून दबदबा. 28 वर्षांपुर्वी माझे पहिले पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा मी त्यांना ते भेट द्यायला त्यांच्या घरी गेलो.
त्यांनी माझ्या ओळखीतील एका दांपत्याकडून काही जुनी कागदपत्रे नेलेली होती. ती मला बघायला द्यावित असे पत्र मी या दांपत्याकडून मिळवलेले त्यांना दाखवले. त्यांनी उडवाउडवी सुरू केली.
मी नविन असल्याने व पहिलीच भेट असल्याने विनयपुर्वक बोलूनही त्यांनी एकही कागद दाखवला नाही.
मी परतलो.
पुढे त्यांच्या भेटी होत तेव्हा त्यांना काहीही विचारले तर ती माहिती दडवण्याकडे त्यांचा कल असायचा. अशांना मी "जडीबुटी" संशोधक म्हणतो. सामाजिक कागदपत्रांचे धनही आपली खाजगी मालमत्ता म्हणुन दडवून ठेवणारे.
पुढे महात्मा फुले यांची 11 एप्रिल ही जन्मतारिख मी शोधून काढल्यावर मी त्यावर एक लेख राज्यातील आघाडीच्या वर्तमानपत्रात लिहिला.
तो वाचून हे जडीबुटीवाले भडकले. त्यांचे म्हणणे ते लवकरच हे संशोधन करणार होते. त्याच्या आधीच मी ते करणे हे उद्धटपणाचे वगैरे होते.
त्यांचे ते किंवा इतर संशोधन पुढे 28 वर्षात झालेच नाही.
......................

पुणेरी पाहुणचार

आम्ही अस्सल पुणेकर. पुण्याचा आम्हाला कोण अभिमान! पुणेकराचा नाद करायचा नाय. अपुणेकर लोक "आकसापोटी!" उगीचच पुणेकरांना नाकं मुरडत असतात.
विदर्भातले एक पाहुणे आमच्याकडं तीन दिवस राहून परत निघालेले बघून आमची प्रेमळ शेजारीन तत्परतेनं मधाळ हसून त्यांना म्हणाली, "कधी आला होतात? तुम्ही आमच्या शेजार्‍यांचे पाहुणे म्हणजे आमचेही पाहुणे. आम्ही शेजारधर्म पाळतो. काय देऊ?"
पाहुणा गडबडला.त्यानं पुणेकरांबद्दल काहीबाही वाचलेलं/ऎकलेलं. त्याचा विश्वासच बसेना.
सावरत म्हणाला, "आपुलकीनं विचारल्याबद्दल धन्यवाद. आता निघायचय. उशीर झालाय. खरंच धन्यवाद."
बाई म्हणाल्या, "असं कसं? तुम्ही वैदर्भीय, आमचं आतिथ्य किती मन:पुर्वक करता. काही तरी तर घ्यावंच लागेल."
"आता तुमचा इतका आग्रहच आहे तर द्या पटकन काहीतरी."
"बोला काय देऊ, गरम की थंड?"
"द्या गरम."
"चहा, को~फी की दुध?"
"दुध द्या."
"असं म्हणता? बरं दुध देते, पण चितळेचं, गोकुळचं, आरेचं, गायीचं की म्हशीचं?"
"द्या चितळेचं."
"दुधात तुम्हाला साखर टाकून देऊ, वेलची टाकून देऊ की मसाला घालून देऊ?"
"साखर टाका."
"बरं देते, पण एक सांगा, मी तुम्हाला दुध काचेच्या ग्लासातून देऊ, स्टीलच्या, तांब्याच्या की चांदीच्या?"
"अहो बाई, माह्यावाली ट्रॅव्हलबस एव्हढ्या टायमात तर उमरावतीले पोचली असन वो."
"असं म्हणता? मग पुढच्यावेळी आलात की काहीतरी घेतल्याशिवय जायचं नाही हं!"
मला सांगा आमच्या अगत्यशील शेजारणीचं काय चुकलं? पुणेकरांचा नाद करायचा नाय. अपुणेकर लोक "आकसापोटी!" उगीचच पुणेकरांना नाकं मुरडत असतात.
.......................