Monday, January 7, 2019

गरिबांना आर्थिक आधारावर १० % आरक्षण

राज्यघटनेमध्ये दुरूस्ती करून उच्चवर्णीय गरिबांना १०% आरक्षण देण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या १३ न्यायाधिशांच्या सर्वोच्च घटनापिठाने दिलेल्या निकालानुसार घटनेच्या मुलभूत रचनेत बदल करता येत नाहीत. समता हे मूल्य घटनेच्या मूळ चौकटीचा भाग आहे. सर्वांना समतेचा समान अधिकार हे मूळ सुत्र आहे. आरक्षण हे सामाजिक अन्याय दूर करण्यासाठी, प्रतिनिधित्व देण्यासाठी केलेला अपवाद आहे.अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही.
६० % आरक्षण हे समतेच्या तत्वाचे उल्लंघन असल्याने ही तरतुद रद्द होईल. केंद्र सरकारने आज उच्चवर्णीय समाजातील गरिबांना १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. गरीब मग ते कोणत्याही जातीधर्मातले असोत, त्यांच्यासाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवारा यांची व्यवस्था व्हायलाच हवी. मात्र चुनावी जुमल्याद्वारे त्यांच्या भावनांशी खेळणे योग्य नाही.
जे न्यायालयात टिकणार नाही असे आरक्षण उच्चवर्णीय गरिबांना देणे ही त्याची चेष्टाच होय. आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमिका आग्रहाने मांडणारांची संख्या वाढते आहे.
आर्थिक निकषावर आरक्षण याबाबतची काही तथ्ये मांडणे गरजेचे झालेले आहे.
१] २५ सप्टेंबर १९९१ रोजी नरसिंहराव सरकारने आर्थिक आधारावर दहा टक्के आरक्षण दिले होते. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधिशांच्या घटनापिठाने ते "घटनाविरोधी" ठरवले व रद्द केले हे आपणास माहित आहे काय?
२] पुन्हा आर्थिक आधारावर दिलेले आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. त्यासाठी घटनादुरूस्ती केली तरी ती संविधानाच्या मुळ चौकटीला बाधा आणणारी असल्याने न्यायालयात संमत होणार नाही.
३] आरक्षण हा गरिबीहटावचा कार्यक्रम नाही. तो सामाजिक न्यायाचा कार्यक्रम आहे. ज्या समाजघटकांना शिक्षण, शासकीय पदे आणि लोकपालिकेत प्रतिनिधीत्व डावलले गेलेले आहे त्यांना ते प्रतिनिधित्व विशेष संधीद्वारे देण्याचा हा कार्यक्रम आहे.
४] सर्व समाजातील गरिबांना न्याय मिळायलाच हवा.
पण त्यासाठी आरक्षण हा उपाय नाही. त्यासाठी संविधानाच्या कलम ३८ आणि ४६ मध्ये तरतुदी केलेल्या आहेत.
"बीपीएल" अर्थात दारिद्र्य रेषेखालील सर्व गरिबांना सरकारने शिक्षण, रोजगार, आरोग्य, निवारा, असे संरक्षण द्यायलाच हवे.
पण ते देण्याचा मार्ग आरक्षण हा नाही.
संविधानाच्या कलम ३८ आणि ४६ तरतुदीखालील संरक्षण न मागता त्यांना आरक्षण द्या असे म्हणणे म्हणजे "आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी" असली गत.
५] घटना परिषदेत आरक्षण देताना सामाजिकच निकष का लावायचे आणि आर्थिक निकष का लावायचा नाही यावर सविस्तर चर्चा झालेली आहे. [पाहा : संविधान सभा वृत्तांत, खंड, १ ते १२, ईंग्रजी/हिंदी, लोकसभा सचिवालय प्रकाशन, भारत सरकार.]
६] आपल्या भारतीय समाजात जात, लिंगभाव, वर्ग ही तीन पक्षपाताची आणि शोषणाची केंद्रे आहेत. त्यावर समग्र उपाययोजना करायची असेल तर ती केवळ आर्थिक आधारावर विसंबून करता येणार नाही.
७] आजच्या तीन प्रकारच्या राखीव जागांचा सम्यक विचार केला तर त्यातली राजकीय प्रतिनिधित्व देणार्‍या {ग्रामपंचायत ते संसदेतील आरक्षण ] आरक्षणाला घटनेने कलम ३३४ द्वारे दहा वर्षांची मुदत दिलेली आहे.ती वाढवित नेत आत्ता ती सत्तर वर्षे म्हणजे २०२० पर्यंत केलेली आहे.मात्र घटनेत शिक्षण आणि नोकर्‍यातील आरक्षणाला ही मुदत लागू केलेली नाही. याचा अर्थ हे आरक्षण कायमस्वरूपी आहे काय? तर नाही.
ते तात्पुरतेच आहे.
मात्र ते कधी संपेल तर ज्या दिवशी या सामाजिक घटकांना पर्याप्त प्रतिनिधित्व मिळेल त्या दिवशी आरक्षण संपेल. याचा अर्थ देशात जितक्या लवकर आपण सामाजिक न्याय प्रस्थापित करू तितक्या लवकर आरक्षण संपेल.
८] जातीचे सदस्यत्व जन्माने मिळते. जातीवरून दलित,आदिवासी आणि ओबीसींना काही शतके जर डावलले गेले असेल तर जातीच्या आधारेच हा पक्षपात दूर करावा लागेल. काट्याने काटा काढणे, ही न्यायाची रिती येथे वापरलेली आहे. असे आरक्षण कोणत्याही परिस्थितीत ५०% पेक्षा जास्त असता कामा नये असे डा.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनासभेला बजावले होते याचा विसर पडता कामा नये. [ पाहा: संविधान सभा वृत्तांत, खंड सातवा, पृ. ७०१-०२]
९] उत्पन्न दरवर्षी बदलू शकते. जात मात्र कधीही बदलता येत नाही.
१०] वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असणारे लोक या देशात सुमारे ९८% असावेत. याचा अर्थ या ९८% लोकांना दहा टक्के आरक्षण देणे ही सवलत आहे की फसवणूक? आज देशातील आयकर कायदे धाब्यावर बसऊन सुमारे ३५ कोटी लोक आयकर बुडवतात. अवघे ५ कोटी २९ लाख लोक आयकर देतात.
आर्थिक निकषांवर आरक्षण घेण्यासाठी १३० कोटींपैकी १२९ कोटी लोकांची रांग लागेल आणि अशा रांगेत खर्‍या गरजू, होतकरू आणि वंचितांना जागाच मिळणार नाही.
११] आज ज्यांना आरक्षण मिळते त्यांनाही अंतर्गत आचारसंहिता लावली पाहिजे असे माझे मत आहे. एकाच कुंटुंबाने किती पिढ्या आरक्षण घ्यावे यावर बंधने असली पाहिजेत. तरच इतर दुबळ्यांना न्याय मिळेल.
१२] खाजगीकरणाद्वारे आरक्षण संपतेच आहे. अवघी पंधरा ते वीस वर्षे थांबा. कल्याणकारी राज्य मोडीत काढून पोलीस व सैन्य वगळता बाकी सारी सरकारी खाती खाजगीकरणात जातील.
सैन्यात आरक्षण नाहीच.
१३] जात वडीलांची मिळते. आज आपण पालकांचे उत्पन्न विचारात घेतो म्हणून अतिश्रीमंतांच्या मुलांमुलींना शासकीय लाभ मिळत नाहीत.
आर्थिक आधारावर आरक्षण दिले आणि अंबानी, अडाणी, टाटा, बिर्ला, प्रेमजी, मुर्ती आदींच्या मुलांनी जर उत्पन्न पालकांचे आहे. आम्ही शिकतोय. आम्हाला स्वत:चे उत्पन्न कुठेय? असे विचारले तर त्यांनाही या राखीव जागा द्याव्या लागतील.
प्रा.हरी नरके, ७ जानेवारी २०१९

लेखकांचे स्वातंत्र्य आणि महात्मा फुले - प्रा.हरी नरके

लेखकांचे स्वातंत्र्य आणि महात्मा फुले - प्रा.हरी नरके

१८४९ साली सांस्कृतिक दहशतखोरांमुळे जेव्हा मराठी लेखकांचे स्वातंत्र्यसंकटात सापडले होते तेव्हा महात्मा जोतीराव फुले त्यांच्या मदतीला धावलेहोते. पेशवाई बुडाली आणि इंग्रजी राज्य आले. पेशवाईत ब्राह्मणांना पर्वतीच्यारमण्यात दक्षिणा वाटली जात असे. इंग्रजांनीही तिच पद्धत चालू ठेवली होती.त्यासाठी दक्षिणा प्राईज कमिटी स्थापन करण्यात आली होती. आधुनिक शिक्षण घेतलेल्या लोकहितवादी,गोवंडे,भवाळकर,जोशी आदी सुधारकांनी ही पद्धत बंद करून ती रक्कम लेखकांच्या उत्कृष्ठ ग्रंथांना पुरस्कार देण्यासाठी वापरावी असा सरकारकडे अर्ज केला. ही बातमी कळताच सनातनी भडकले.अर्जदारांना जातिबहिष्कृत करण्याचा हुकूम काढण्याचे ठरले. तुळशीबागवालेराममंदिरात त्यासाठी सभा बोलावण्यात आली.सुधारक मंडळी हादरली. ते सगळे तरण्याबांड जोतीरावांकडे धावले.जोतीरावांनी त्यांना मदतीचे आश्वासन दिले. लेखकांचे स्वातंत्र्य अबाधितराहिले पाहिजे अशी त्यांची भूमिका होती.लोकहितवादींच्या वाड्यावर सगळेजण भल्या पहाटे जमले. जोतीरावांनी आपल्या तालमीतल्या १५० पहिलवानांना तिथे उपस्थित ठेवलेले होते. सर्वात पुढे जोतीराव आणि त्यांच्यामागे हातात काठ्या, भाले घेतलेले १५० कमांडो.मध्ये ब्राह्मण सुधारक. अशी कडेकोट मिरवणूक तुळशीबागवाले राममंदिरात पोचली.जोतीराव आणि त्यांचे सहकारी पहिलवान प्रवेश द्वारावर उभे राहिले.

सुधारक आत गेले. जमाव संतापलेला होता. ते या तरुणांना शिव्याशाप देतहोते. कोणी त्यांच्या शेंड्या ओढीत होते. कोणी त्यांना चापट्या मारत होते. कोणी अंगावर थुंकत होते तर कोणी खडे मारीत होते.सुधारक घाबरून गेले होते.सभा सुरु झाली.अध्यक्षस्थानी असलेल्या मोरेश्वरशास्त्री यांनी या तरुणांनी अक्षम्यगुन्हा केल्याचा निकाल दिला.ज्यांनी अर्ज लिहिलाय त्यांना वाळीत टाकण्याचे ठरले.सुधारक आधीच ठरल्याप्रमाणे म्हणाले, " आम्ही हा अर्ज लिहिलेला नसून तोजोतीराव गोविंदराव फुले यांनी लिहिलेला आहे. तुम्ही त्यांना शिक्षा करूशकता."आणि ब्रह्मवृंदांची ती सभा पंक्चर झाली.आज जे उत्कृष्ठ ग्रंथांना पुरस्कार दिले जातात ते सुरु करण्यातअशाप्रकारे जोतीराव आणि त्यांचे ब्राह्मण सुधारक मित्र यांचा मोलाचा वाटाआहे.पुढे न्या.म.गो. रानडे यांच्या प्रयत्नातून साहित्य संमेलन सुरु झाले.त्यांनी जोतीरावांना निमंत्रण दिले.तत्कालीन लेखक ज्वलंत अशा जातिव्यवस्थेच्या सामाजिक प्रश्नावर ठोस भूमिका घेता नसल्याने या उंटावरून शेळ्या हाकणारांच्या साहित्य संमेलनावर जोतीरावांनी बहिष्कार घातला.

- प्रा.हरी नरके, ७ जानेवारी २०१९

Thursday, January 3, 2019

प्लेगबाधित मुलांना पाठीवर नेणाऱ्या सावित्रीबाईंची शौर्यगाथा






प्लेगबाधित मुलांना पाठीवर नेणाऱ्या सावित्रीबाईंची शौर्यगाथा - प्रा. हरी नरके

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस. जोतिरावांकडून घेतलेला शिक्षणाचा वारसा पुढे नेताना लोकांनी सावित्रीबाईंच्या अंगावर शेण फेकलं. त्याला सावित्रीबाईंनी फुल म्हणून गोंजारलं. असे अनेक अपमान झेलतच त्यांनी आपला वसा पुढे नेला. सावित्रीबाईंच्या जडणघडणीतल्या महत्त्वाच्या टप्प्यांसोबतच त्यांची शौर्यगाथा सांगणारा हा लेख.

‘जोतिबांपेक्षा त्यांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडेच होईल. तिची योग्यता काय सांगावी? आपल्या पतीबरोबर तिने संपूर्ण सहकार्य केले आणि त्यांच्याबरोबर राहून वाट्यास येतील त्या हालअपेष्टा भोगल्या. उच्चवर्णीयांतील उच्चशिक्षण घेतलेल्या स्त्रियांतही अशा प्रकारची त्यागी स्त्री आढळून येणे कठीण आहे. त्या उभयतांनी लोककार्यार्थ आपले सारे जीवन खर्च केले.’
नारायण महादेव उर्फ मामा परमानंद (३१ जुलै, १८९०)

स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशात, आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय सुधारणा, यावर एक वाद झालेला होता. इंग्रजांच्या रूपात शत्रू समोर दिसत असल्याने आपण स्वाभाविकच राजकीय स्वातंत्र्याला अग्रक्रम दिला. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवल्यानंतर आता आपले सामाजिक प्रश्नर आपसूक सुटतील असा लोकांचा समज होता. परंतु जसजसं दिवस उलटू लागले, तसतसा लोकांचा भ्रमनिरास होऊ लागला. त्यातून सामाजिक चळवळी हळूहळू जोर पकडू लागल्या.

जोतीराव सावित्रीबाईंची ‘विषयपत्रिका’
विविध क्षेत्रातल्या सामाजिक न्यायाच्या चळवळी संघटित करणार्यांाच्या हे लक्षात येऊ लागलं, की या विषयाची जोतीराव सावित्रीबाईंनी लिहिलेली ‘विषयपत्रिका’ आजही मार्गदर्शक आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचं समग्र क्रांतिकारी चिंतन आजही प्रस्तुत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्यांना यांच्या जीवनकार्य आणि विचारांबद्दल विशेष रस वाटू लागला. आज जो त्यांचा अभ्यास चालू आहे, त्यामागे हे समाजशास्त्रीय वास्तव दडलेलंय.

जोतीराव सावित्रीबाईंवर मराठीत आजवर दोनशेहून अधिक ग्रंथ लिहिले गेलेत. मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी, तेलगू, बंगाली, कन्न ड, पंजाबी, ऊर्दू, सिंधी, गुजराती या भाषांमधेही काही ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. यातल्या सावित्रीबाईंवर लिहिल्या गेलेल्या छोट्यामोठ्या पुस्तकांची संख्या ४० आहे. त्यातील ललितेतर वैचारिक ग्रंथ लक्षात घेतले तर त्यात मुंबईच्या कु. शांताबाई रघुनाथ बनकर यांची १९३९ मधे प्रकाशित झालेली ‘सावित्रीबाई जोतीराव फुले यांचे अल्पचरित्र’ ही पुस्तिका आणि त्यानंतर १९६६ साली सौ. फुलवंताबाई झोडगे यांनी लिहिलेलं ‘क्रांतिदेवता साध्वी सावित्रीबाई फुले’ हे चरित्र महत्त्वाचं आहे.

सावित्रीबाईंचं चिकित्सक चरित्रच नाही
त्यांनाच वाट पुसत डॉ. मा. गो. माळी यांनी ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ हा चरित्र ग्रंथ १९८० साली लिहिला. डॉ. कृ. प. देशपांडे यांनी सावित्रीबाईंच्या जीवन आणि साहित्यावर ‘अग्निाफुले’ हा ग्रंथ १९८२ साली प्रकाशित केला. नंतरचे सगळे ग्रंथ याच माहितीवर आधारित असून त्यात फारसं नवीन काहीही नाही. मात्र सावित्रीबाईंचं आजवर एकही चिकित्सक चरित्र लिहिलं जाऊ नये, हे खेदजनक होय.

सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला झाला. पुण्यापासून जवळपास ५० किलोमीटरवर नायगाव हे त्यांचं जन्मगाव आहे. पुणे-सातारा रस्त्यावर शिरवळपासून ५ किलोमीटरवर हे गाव वसलेलं आहे. सावित्रीबाई या खंडोजी नेवशे पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या होत. १८४० साली वयाच्या १० व्या वर्षी त्यांचं जोतीरावांशी लग्न झालं. ११ एप्रिल १८२७ ला पुण्यात जन्मलेले जोतीराव त्यावेळी १३ वर्षांचे होते.

लग्नाेनंतर जोतीरावांनी सावित्रीबाईंना घरीच शिक्षण दिल्याचं शासकीय कागदपत्रांवरून दिसून येतं. १ मे १८५१ ते ३० एप्रिल १८५२ च्या शैक्षणिक अहवालात म्हटल्याप्रमाणे, ‘जोतीरावांनी स्वत:च्या पत्नीला घरी शिक्षण देऊन शिक्षिका बनवले.’ २२ नोव्हेंबर, १९५१ च्या ‘बॉम्बे गार्डियन’ वृत्तपत्रातल्या बातमीवरून सावित्रीबाईंच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी जोतीरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर (जोशी) यांनी घेतल्याचं दिसतं. सावित्रीबाईंनी अहमदनगर इथे फॅरारबाईंच्या आणि पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमधे अध्यापनाचं प्रशिक्षणही घेतलं. त्यामुळे सावित्रीबाई याच आद्य भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत, हे तत्कालीन दस्तऐवजांवरून स्पष्ट होतं.

शेण नाही, ही तर फुलं आहेत
सावित्रीबाईंनी शिकवण्यासाठी घराच्या उंबरठ्याबाहेर टाकलेलं पहिलं पाऊल हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरवात होय. समाजाकडून होणारा कडवा विरोध सहन करीत आणि शिव्याशाप शांतपणे ऐकत सावित्रीबाई काम करत होत्या. त्या शाळेत जाता  येताना टोळभैरव मुद्दाम रस्त्यावर थांबत. अचकट-विचकट बोलत. कधीकधी दगड मारीत. अंगावर चिखल किंवा शेण टाकीत असत.

शाळेत जाताना सावित्रीबाईंना सोबत २ साड्या न्याव्या लागत. रस्त्याने जाताना खराब झालेली साडी शाळेत गेल्याबरोबर बदलावी लागे. दुसरी परतताना खराब होई आणि तरीही सावित्रीबाई आपल्या कामात खंड पडू देत नव्हत्या. हा छळ असाच चालू राहिल्याने त्यांच्या आणि लहान मुलींच्या संरक्षणासाठी संस्थेने एका शिपायाची नियुक्तीस केली.

त्याने लिहून ठेवलेल्या आठवणीनुसार सावित्रीबाई आपल्या अंगावर दगड किंवा चिखल फेकणार्यांूना म्हणत, ‘मी माझ्या भगिनींना शिकविण्याचे पवित्र कार्य करीत असताना तुम्ही माझ्यावर शेण अगर खडे फेकीत आहात, ही मला फुलेच वाटतात. ईश्वपर तुम्हाला सुखी ठेवो!’ बळवंत सखाराम कोल्हे यांच्या या आठवणी सावित्रीबाईंच्या धैर्यावर प्रकाश टाकणार्याव आहेत.

ब्राम्हण विधवांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह
१८६३ मधे जोतीराव सावित्रीबाईंनी विधवांसाठी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू केलं. याबाबतची अस्सल माहिती अलीकडेच उपलब्ध झालीय. एक तर हे गृह फक्तर ‘ब्राह्मण विधवांसाठीच’ सुरू करण्यात आलेलं होतं आणि त्यात सावित्रीबाईंचा पुढाकार होता. ४ डिसेंबर १८८४ ला जोतीरावांनी मुंबई सरकारच्या अवर सचिवाला लिहिलेल्या पत्रात याबाबतची सगळी माहिती नोंदवलेली आहे.

जोतीराव सावित्रीबाईंनी स्वत:च्या घरात एक वसतिगृह चालवलं. दूरदूरहून मुलं शिक्षणासाठी तिथे येत असत. लक्ष्मण कराडी जाया या मुंबईच्या विद्यार्थ्याने या वसतिगृहात राहून सावित्रीबाईंच्या मायेची पाखरण अनुभवली होती. त्याने आठवणीत म्हटलंय, ‘सावित्रीबाईंसारखी दयाळू व प्रेमळ अंत:करणाची स्त्री मी अजूनसुद्धा कोठे पाहिली नाही. त्या आम्हा मुलांवर आईपेक्षासुद्धा जास्त प्रेम करीत असत.’

दुसर्याा एका मुलाने आपल्या आठवणींमधे सावित्रीबाईंचा स्वभाव, त्यांची साधी राहणी आणि जोतीराव सावित्रीबाईंचे परस्परांवरील अपार प्रेम यांची विलक्षण हृदय नोंद केलीय.

बरोबर काय न्यायचं आहे?
हा महादू सहादू वाघोले लिहितो, ‘सावित्रीबाई फारच उदार होती. तिचे अंत:करण दयेने भरलेले होते. गोरगरिबांवर ती फार दया करी. ती अन्न दान पण फार करी. ती कोणासही जेऊ घाली. गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना ती आपल्या घरातील लुगडी देई. त्यामुळे तात्यांचा खर्च फार होत असे. एखादेवेळी तात्या तिला म्हणत, ‘इतका खर्च करू नये.’ त्यावर ती शांतपणे बारीक हसत असे आणि ‘बरोबर काय न्यायचे आहे?’ असे तात्यांना विचारीत असे. त्यावर तात्या शांतमुद्रेने थोडावेळ गप्प बसत असत. ते दोघे एकमेकांवर अतिशय प्रेम करीत असत.’

सावित्रीबाईंना स्त्रीजातीच्या उन्न तीची फार कळकळ असे. त्या सुस्वरूप आणि मध्यम बांध्याच्या होत्या. त्यांची मुद्रा नेहमी शांत असे. राग म्हणून काय चीज आहे, ती या बाईच्या गावीच नव्हती. ती नेहमीच हसतमुख असे. मात्र तिचं हसू गालांवर तेवढे दिसून येईल इतकेच ते मर्यादित असे. सावित्रीबाईंना सर्व लोक काकू म्हणत असत. पाहुणे मंडळी घरी आली म्हणजे तिला कोण आनंद होत असे. त्यांच्याकरिता मोठ्या आवडीने ती गोडधोड जेवण करीत असे.

जोतीराव सावित्रीबाईंना मोठा मान देत असत. तिला ते बोलताना ‘अहो जाहो’ या बहुमानदर्श शब्दांनी हाका मारीत असत. सावित्रीबाई तात्यांना ‘शेटजी’ म्हणत. या दोघांत पतीपत्नीत्वाचं खरे प्रेम भरलेलं होतं. सावित्रीबाईंनी नको म्हटलेले काम तात्या कधीही करत नसत. सावित्रीबाई सुविचारी आणि दूरदृष्टीची होती. तिच्याविषयी आप्तयजनांत मोठा आदर होता.

पुण्यातल्या शिकलेल्या बायकांचा घरी राबता
मुलींच्या शाळांतून तिने शिक्षिकीणीचे काम केलेलं असल्यामुळे स्त्रीशिक्षणाचा विस्तार झाल्यानंतर सुशिक्षित बायांत तिच्याविषयी पूज्यभाव वाढलेला दिसत होता. तिच्याकडे आलेल्या मुलींना आणि स्त्रियांना ती नेहमी सदुपदेश करीत असे. पुण्यातील मोठमोठ्या सुशिक्षित बाया, पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी आणि रमाबाई रानडे तिच्या भेटीस येत असत.

सावित्रीबाईंचा पोषाख तात्यांप्रमाणेच अगदी साधा असे. तिच्या अंगावर अलंकार नसत. तिच्या गळ्यात एक पोत आणि मंगळसूत्र असे. कपाळावर भलंमोठं कुंकू लावलेलं असे. रोज सकाळी त्या सूर्योदयापूर्वी आंघोळ करून सडासंमार्जन उरकून घेत. त्यांचं घर नेहमी स्वच्छ असे. काकूंना दिवाणखान्यात थोडाही केर अथवा धूळ पडलेली खपत नसे. त्यांच्या घरातील भांडी आणि इतर सामान स्वच्छ असून टापटीपीने ठेवलेलं असे. त्या स्वयंपाक स्वत: करीत. तात्यांच्या खाण्याची आणि प्रकृतीची त्या फार काळजी घेत.

जोतीरावांच्या पश्चाीत सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व केलं. शेवटपर्यंत त्या काम करीत राहिल्या. यशवंत डॉक्टर झाल्यानंतर मिलिट्रीत नोकरीला लागला. त्याला नोकरीनिमित्त अनेक देशात जावं लागलं. त्याची बायको राधा उर्फ लक्ष्मी हिचं ६ मार्च १८९५ ला निधन झालं. सावित्रीबाई घरी एकट्या उरल्या. यशवंत नोकरीनिमित्त त्यावेळी परदेशात होता.

प्लेगच्या साथीत लोकांचे जीव वाचवण्याची धडपड
१८९३ मधे सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षस्थान सावित्रीबाईंनी भूषवलं. १८९६ च्या दुष्काळात सावित्रीबाई खूप राबल्या. १८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्यागच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं.

सावित्रीबाईंनी यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या.

मुलाला पाठीवर घेऊन धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बातमी ‘दीनबंधू’ने शोकाकूल होऊन दिली. पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणार्याा लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ सांगणाऱ्यांनी आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्याि या शौर्यांगणेची मात्र उपेक्षाच केली. सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला.
- प्रा.हरी नरके, ३ जानेवारी २०१९
............................
http://kolaj.in/published_article.php?v=-Savitribai-Phule-storyHJ4370693
०३ जानेवारी २०१९, वाचन वेळ : ७ मिनिटं

Wednesday, January 2, 2019

सावित्रीबाई फुले यांची अस्सल तैलचित्रे






३ जाने. सावित्रीबाई फुले जयंती निमित्त- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची अस्सल तैलचित्रे-

सर्व शाळा,महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये यामध्ये कोणती छायाचित्रे लावायची याबाबत निर्णय घेणारी एक समिती आहे. या राज्य शासनाच्या महापुरूषांच्या छायाचित्रांना मान्यता देणार्‍या या समितीने आजवर फक्त थोर पुरूषांच्याच छायाचित्रांना मान्यता दिलेली होती. त्या मालिकेत एकाही कर्तबगार स्त्रिचा समावेश केलेला नव्हता. पहिल्या भारतीय शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि शिक्षण तज्ञ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राचा समावेश या मालिकेत करावा असा प्रयत्न मी सुरू केला तेव्हा खूप वाईट अनुभव आले. उच्च अधिकार्‍यांची पुरूषी मानसिकता पदोपदी आडवी येत होती.

आम्ही सावित्रीबाईंचे मुळाबरहुकुम अस्सल तैलचित्र प्रकाशित करून दोन दशके उलटली. तरिही नागरिक अजुनही ती जुनीच आणि चुकीची तैलचित्रे वापरतात.
अस्सल गोष्टी रुजायला किती वेळ लागतो आपल्या देशात!

पुण्यातील गोपीनाथ एकनाथराव पालकर यांच्या जुन्या वाड्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे अस्सल छायाचित्र मिळाले. काचेच्या भल्यामोठ्या अस्सल कृष्णधवल निगेटिव्हवरील हा ग्रुपफोटो सुमारे दीडशे जुना असल्याने अस्पष्ट झालेला होता. राज्य शासनाच्या महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समितीतर्फे त्या निगेटिव्हवरून जसेच्या तसे रंगित तैलचित्र तयार करून घ्यायचे ठरवले.
प्रा.विलास चोरमले या चित्रकारांबरोबर अनेक बैठका झाल्या. त्यांनीही जीव ओतून सुरेख तैलचित्र [ हुबेहुब कृष्णधवल निगेटिव्हनुसार ] तयार केले. निळ्या साडीतील हे तैलचित्र अतिशय देखणे, ज्ञानी, कर्तबगार राष्ट्रमातेचे तैलचित्र आहे.

3 जानेवारीला नायगावच्या [ सावित्रीबाईंचे माहेर ] जयंती कार्यक्रमात ते प्रकाशित करायचे ठरवले.

समोर अडचणींचा डोंगर उभा होता.त्यातूनच वाट काढावी लागली.खुप झटापट झाली. बड्या अंमलदारांशी झुंजावे लागले.
मंत्रालयातील एका उपसचिवाने या कामात खूप खोडे घातले. त्यासाठी त्याने कागदोपत्री चक्क लबाड्याही केल्या. तत्कालीन मुख्य सचिव श्री. अरूण बोंगिरवार आपल्या प्रशासनाची बाजू चुकीची असल्याचे कळूनही उपसचिवाचे समर्थन करीत राहिले. खमक्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना खडे बोल सुनावले आणि त्यांचा निर्णय कसा चुकीचा आहे हे त्यांच्यासमोर विशद केले. सज्जड पुरावे बघितल्यावर बोंगिरवार नरमले. 

३१ डिसेंबरला अंतिम निर्णय झाला. सवित्रीबाईंच्या जयंती कार्यक्रमाला अवघे तीनच दिवस शिल्लक होते. त्यातले दोन दिवस शासकीय मुद्रणालयाला सुट्टी होती. निर्णय होऊनही जयंती समारंभात फोटो प्रकाशित करणे अशक्य होते.
अशावेळी माझे मित्र असलेले शासकीय मुद्रणालयाचे संचालक यांना मी साकडेघातले. ते मदतीला धावून आले. त्यांनी रात्रंदिवस अपार मेहनत केली आणि ३ जानेवारीला नायगावच्या शासकीय समारंभात सावित्रीबाईंचे अस्सल तैलचित्र प्रकाशित झाले.

त्या आधी सावित्रीबाईंची दोन काल्पनिक चित्रे प्रसिद्ध झाली होती. एकामागे सदभावना होती तर एकामागे पत्नीप्रेम!

एकाने सावित्रीबाईंचे चरित्र लिहून त्यावर पहिले चित्र छापले.
एकदा एका कार्यक्रमाला त्यांच्या गावात गेलो असताना त्यांनी दुसर्‍या दिवशी घरी चहाला बोलावले.
चहा पोहे द्यायला त्यांच्या पत्नी समोर आल्या. मी त्यांना प्रथमच भेटत होतो.
तरिही त्यांचा चेहरा कुठेतरी पाहिल्याचा भास होत राहिला. तो ओळखीचा वाटत राहिला.
घरी आल्यावर त्यांनी लिहिलेले सावित्रीबाईंचे चरित्राचे पुस्तक पाहिले आणि सगळा उलगडा झाला!
माझं असं मत आहे की संशोधनाची कोणतीही शिस्त न पाळता, केवळ आंधळी भक्ती आणि स्वजातीप्रेम यातून त्या लेखकाकडून ही चूक झाली असणार.

दुसरे तैलचित्र बनवणारे चित्रकारही माझ्या ओळखीचे होते, पण त्यांनी एखाद्या सरदारपत्नीचे काढावे असे "वजनदार तैलचित्र" रंगवलेले होते.

आम्ही ज्ञानज्योती सावित्रीबाईंचे मुळाबरहुकुम अस्सल तैलचित्र प्रकाशित करून १९ - २० वर्षे झाली, तरिही लोक अजुनही ती जुनीच आणि चुकीची तैलचित्रे वापरतात.
अस्सल गोष्टी रुजायला किती वेळ लागतो आपल्या देशात!
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची दोन्ही चित्रे अस्सलबरहुकुम आहेत.

निळ्या साडीतले तरूण सावित्रीबाईंचे वरिल तैलचित्र अधिकृत आहे. ते मुळच्या अस्सल कृष्णधवल छायाचित्रावरून काढलेले आहे.
ते प्रा. विलास चोरमले, अभिनव चित्रकला महाविद्यालय, पुणे, यांनी काढलेले आहे.
लाल काठाच्या साडीतले तैलचित्र हे त्यावरूनच काढलेले असले तरी ते वयस्कर सावित्रीबाईंचे तैलचित्र आहे.
ते सुधीर काटकर, जे.जे. स्कूल आफ आर्ट्स, मुंबई, यांनी काढलेले आहे.
ते पुण्यात महात्मा फुलेवाड्यात व नायगावला सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकात लावलेले आहे.
या पोस्टसोबत दिलेली २ छायाचित्र /तैलचित्रे वगळता बाकी सर्व छायाचित्र /तैलचित्रे काल्पनिक आहेत.
-प्रा.हरी नरके, ३ जानेवारी २०१९

Tuesday, January 1, 2019

भिडेवाडा दुर्लक्षित का?







स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके

शनिवारवाडा, लालमहाल, विश्रामबागवाडा अशा ऎतिहासिक स्थळांचा विकास झाला, स्मारके झाली, मग स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक असलेल्या भिडेवाड्याकडे दुर्लक्ष का? हा वाडा कोणत्याही क्षणी कोसळेल अशा स्थितीत आहे. गेल्या १३ वर्षात स्मारकाच्या घोषणा अनेकदा झाल्या. बैठका, चर्चा रंगल्या. मोर्चे झाले.तरिही वाड्याचे जतन का होत नाहीये?
हे स्मारक कोणाला नकोय?
वाड्यातले भाडेकरू, दुकानदार, बॅंक,स्थानिक लोकप्रतिनिधी, पुण्याचे आजीमाजी कारभारी यांना हा वाडा नष्ट करण्यात रस का आहे?
पुणे महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत २१ फेब्रुवारी २००६ ला भिडेवाड्याचे स्मारक करण्याचा एकमताने ठराव झाला.

वाडा शासनाच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया ५ जून २००८ ला सुरू झाली. स्मारकाला विरोध असलेले भाडेकरू, दुकानदार, बॅंक ८ डिसेंबर २०१० ला मुंबई उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने भूसंपादनाच्या कामाला स्थगिती दिली. तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी व पुण्याचे आजीमाजी कारभारी यांचे आर्थिक हितसंबंध ह्या वाड्यात गुंतलेले असल्याने मनपा आणि राज्य सरकारचे वकील,न्यायालयात अनेकदा गैरहजर राहिले. मनपा अधिकार्‍यांना बिल्डरने खिश्यात घातल्याने ते इथे सावित्रीबाईंची मुलींची पहिली शाळा नव्हतीच अशी पोपटपंची करु लागले. आर्थिक प्रलोभन, राजकीय संगनमत आणि जनतेची उदासिनता यामुळे गेली ८ वर्षे एकही पाऊल पुढे सरकलेले नाही.
शाळेचे समकालीन दस्तावेजांमधील असंख्य पुरावे सादर करूनही ते वारंवार गहाळ केले जातात.
शाळा नसल्याचेच ढोल सगळे मिळून वाजऊ लागतात.

जोतीराव,सावित्रीबाई, भिडे,चिपळूणकर, गोवंडे, जोशी, भवाळकर,म्हस्के, शिंदे,लहुजी वस्ताद,राणबा महार,धुराजी चांभार, गणू मांग,फातिमा आणि उस्मान शेख असे उच्च वर्णीय, बहुजन,दलित, अल्पसंख्यांक एकत्र येऊन १७० वर्षांपुर्वी
एक ऎतिहासिक काम सुरू करतात. देशातली मुलींची पहिली भारतीय शाळा सुरू होते. स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे संस्कारकेंद्र उभे राहते.ज्ञानार्जनाचे, ज्ञाननिर्मितीचे उर्जाकेंद्र साकारले जाते.

आज पुणे हे देशातले सर्वात मोठे आणि प्रगत शैक्षणिक शहर आहे.इथे शेकडो महाविद्यालये व डझनांनी विद्यापिठे आहेत.
स्त्री,बहुजन,दलित चळवळीचे हे शहर म्हणजे मोहळ आहे. मग तरिही लिप सर्व्हीस वगळता काहीच का घडत नाही?
कोणाच कारभार्‍याला हा वाडा टिकवावा असे का वाटत नाही?
-प्रा.हरी नरके, १ जानेवारी २०१९

Sunday, December 30, 2018

महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समितीचा निरोप घेताना









२०१८ मध्ये महत्वाच्या ५ ग्रंथांच्या सुधारित आवृत्त्या मला प्रकाशित करता आल्या.
१. महात्मा फुले : समग्र वाड्मय,
२. सावित्रीबाई फुले : समग्र वाड्मय,
३. आम्ही पाहिलेले महात्मा फुले,
४. महात्मा फुले : साहित्य आणि चळवळ,
५. महात्मा फुले: गौरव ग्रंथ,
या पुस्तकांना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. महात्मा फुले : समग्र वाड्मयच्या आठ महिन्यात तीन आवृत्त्या संपल्या

या मालिकेतला ६वा ग्रंथ, "महात्मा फुले:शोधाच्या नव्या वाटा" हा प्रकाशनासाठी तयार आहे.
इतरही डझनभर पुस्तकांची कामं पुर्णतेच्या जवळ पोचलेली आहेत.
आणखी काही पुस्तकं छपाईच्या प्रक्रियेत पाईपलाईनमध्ये आहेत.
सध्या प्रकाशनाच्या प्रक्रियेत असलेली ही पुस्तके प्रकाशित होतील की नाही हे मला माहित नाही.

सध्या या ग्रंथ प्रकाशन समितीची सुत्रे सनातनी, सरंजामी, जात्यंधाच्या हातात आहेत.
मुलत: फुले आंबेडकरद्वेशावरच ते पोसले गेलेले आहेत. प्रबोधनाशी हाडवैर असलेल्यांना समाजक्रांतीच्या विचारांबद्दल जन्मजात आकस आहे.नफरत आहे. या समतावादी विचारांचे विकृतीकरण करण्यासाठी तसेच हे विचार नष्ट करण्यासाठी आजवर ते कार्यरत होते. आजही आहेत.

सगळेच राजकारणी फुले-शाहू-आंबेडकरांचा जप करीत असतात. मात्र या सरकारी ग्रंथ प्रकाशन समितीकडे एकही मुद्रीतशोधक, संशोधन सहाय्यक किंवा संपादन सहाय्यक नाही. कधीही नव्हते. सगळे काम एकहाती संपादक/सदस्य सचिवाला करावे लागते. त्याचा प्रवासखर्चही मिळाला तर पाच दहा वर्षांनी कधीतरी मिळतो.
सदस्य सचिवाला या पुर्णवेळ कामासाठी शिपाई, हमाल, झाडूवाले आदींच्या मासिक पगाराच्या २५% पेक्षाही कमी मानधन मिळते. अर्थातच तेही आठदहा वर्षांनी कधीतरी मिळते.

खरंतर हा सगळा थॅंकलेस जॉब आहे.भरपूर शिव्या, दूषणे आणि मन:स्तापाचा खुराक मात्र मुबलक मिळतो. टेल्कोतली माझी नोकरी सोडून मी हे काम करण्यासाठी गेलो. अनेक हिन्दी, मराठी, इंग्रजी पुस्तकं प्रकाशित केली. शंभर वर्षात महात्मा फुले साहित्याचे हिन्ही, इंग्रजीत भाषांतर झालेले नव्हते. ते केले. त्यातून बंगाली, तेलगू, गुजराती, उर्दू, मल्याळम, कन्नड, सिंधी, उर्दूत अनुवाद होऊन फुले साहित्य देशभर पोचले. लोकव्यवहार आणि शासनव्यवहार यात फक्त ’स्व’हित पाहिले जाते. सामाजिक कृतज्ञतेचा बहुधा दुष्काळ असतो. फुले-आंबेडकरी चळवळीबद्दलची माझी समज खूपच भाबडी होती असे आज मला वाटते. प्रबोधन चळवळीच्या ह्या कामासाठी टेल्को सोडण्याचा, पुर्णवेळ वाहून घेण्याचा, स्वत:चे प्रचंड आर्थिक नुकसान करून घेण्याचा निर्णय चुकला की काय अशी मला आज शंका येते.

महात्मा फुले यांच्या जीवनावर संशोधनाच्या नव्या प्रकाशात अद्ययावत चित्रपट करावा असा प्रस्ताव मी १९९९ साली राज्य शासनाला दिला होता. तो स्विकारला गेला होता. त्याच्या निर्मितीचे काम एन.एफ.डि.सी. व जब्बार पटेल यांच्याकडे सोपवले गेले होते. विजय तेंडूलकर, य.दि.फडके, गो.पु.देशपांडे, भा.ल.भोळे अशा दिग्गजांसोबत मला संशोधन व स्क्रिप्टवर काम करायला मिळेल हा आनंद होता.
तथापि ही चित्रपटनिर्मिती १८ वर्षे रखडली. त्याची कारणे सरकार, एन.एफ.डि.सी. व जब्बार पटेल हेच सांगू शकतील. या काळात संशोधन व स्क्रिप्ट टीममधल्या काही मान्यवरांचे निधन झाले. आता एन.एफ.डि.सी. व जब्बार पटेलांकडचे हे काम नविन संस्थेकडे सोपवण्यात आलेले आहे.
नवी टिम ह्या कामाला गती देणार आहे.
२०१९ मध्ये ही संस्था महात्मा फुले यांच्या जीवनावरील भव्य अशा हिंदी, मराठी, इंग्रजीतील चित्रपटाची निर्मिती करील अशी आशा आहे.

प्रा.हरी नरके, ३१ डिसेंबर, २०१८

Friday, December 28, 2018

तेथे पाहिजे जातीचे -बॅकलॉग, प्रा.हरी नरके


श्री.विनोद तावडे ज्या ज्या खात्यांचे मंत्री आहेत तिथल्या बहुतेक सर्व समित्या, संस्था, प्राधिकरणे यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती करताना एक सुत्र प्रमुख असल्याचे
दिसते. त्यांनी या ४ वर्षात खालील नियुक्त्या केलेल्या आहेत.
१. बालभारती, इतिहास समिती - अध्यक्ष- प्रा.सदानंद मोरे,
२. भाषा सल्लागार समिती, अध्यक्ष- प्रा.सदानंद मोरे,
३. साहित्य संस्कृती मंडळ, अध्यक्ष- प्रा.सदानंद मोरे,
४. सारथी, अध्यक्ष- प्रा.सदानंद मोरे,
५. ग्रंथ खरेदी तपासणी समिती, अध्यक्ष- प्रा.सदानंद मोरे,
६. साहित्य संस्कृती मंडळ, अध्यक्ष- श्री. बाबा भांड,
७. महाराजा सयाजीराव गायकवाड ग्रंथ समिती, सचिव- श्री. बाबा भांड,
८. उत्कृष्ठ वाड्मयनिर्मिती राज्य पुरस्कार समिती, अध्यक्ष- श्री. बाबा भांड,
९. राजर्षी छ.शाहू ग्रंथ समिती- सचिव- प्रा. रमेश जाधव,
१०. भाषा सल्लागार समिती, अध्यक्ष, प्रा. दिलीप धोंडगे,

११.. १२.. १३.. १४..१५..
अध्यक्ष वा सचिवपदी निवड झालेले हे सर्व गुणवंत मान्यवर त्यांच्या योग्यतेमुळे निवडले गेलेले आहेत यात शंका नसावी..
ते मंत्रीमहोदयांचे स्वजातीय असणे हा निव्वळ योगायोग समजावा. तो काही त्या अध्यक्षांचा वा सचिवांचा गुन्हा नाही.
अशा पद्धतीने गुणीजनांचा आजवर गेल्या ६० वर्षात असलेला बॅकलॉग बहुधा प्रथमच भरला जात असावा.
- प्रा.हरी नरके, २८ डिसेंबर, २०१८