Thursday, November 28, 2013

महात्मा जोतीराव फुले हे आद्य भारतीय समाजशास्त्रज्ञकुमार केतकर, शारदा साठे, छगन भुजबळ, हरी नरके, कृष्णकांत कुदळे व इतर मान्यवर
......................
महात्मा फुले पुण्यतिथी -- फोटो - समता भूमी . . . .फोटो-- महेश जांभुळकर - 98600 88820
.......................................


महात्मा जोतीराव फुले हे आद्य भारतीय समाजशास्त्रज्ञ- कुमार केतकर
पुणे: दि.२८ नोव्हें. "डा. जी.एस.घुर्ये आणि एम.एन.श्रीनिवासन यांच्या अनेक वर्षे आधी महात्मा जोतीराव फुले यांनी भारतीय समाजाचे विशेषत: जातीव्यवस्थेचे ज्या पद्धतीने शास्त्रीय विश्लेषण केले होते ते पाहता, जोतीराव हेच आद्य भारतीय समाजशास्त्रज्ञ ठरतात.त्यांचे हे लेखन आंतरराष्ट्रीय दर्जाचे होते. त्यांच्या साहित्यातील हा वैचारिक भाग एकत्र करून त्याची मांडणी करण्याचे काम नव्या पिढीतील अभ्यासकांनी हाती घ्यावे" असे प्रतिपादन दिव्यमराठीचे प्रमुख संपादक कुमार केतकर यांनी आज येथे केले. अ.भा.महात्मा फुले समता परिषदेतर्फे देण्यात आलेला "महात्मा फुले समता पुरस्कार" स्विकारताना ते बोलत होते. राज्याचे सार्व. बांधकाम तथा पर्यटन मंत्री आणि समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी स्त्रीमुक्ती चळवळीच्या नेत्या शारदा साठे,खासदार समीर भुजबळ, आमदार गिरीष बापट, जयदेव गायकवाड, उल्हास पवार, जयंत जाधव, दिप्ती चवधरी, महापौर चंचला कोद्रे, कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, महिला अध्यक्ष पार्वती शिरसाठ,सुधीर गाडगीळ व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यभरातून समतासैनिक प्रचंड मोठ्या संख्येने अभिवादनासाठी उपस्थित होते.
केतकर पुढे म्हणाले, "अमेरिकन यादवी युद्धात अब्राहम लिंकन यांनी कृष्णवर्णीयांच्या मुक्तीसाठी सर्वस्व पणाला लावले. त्याचकाळात जोतीरावांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ या चळवळीला अर्पण करून जागतिक दृष्टीचा प्रत्यय दिला.विचारांचे असे जागतिकीकरण करणारे जोतीराव जातीनिर्मुलनाची चळवळ रुजवून गेले. आपल्याकडे विचारवंत आणि सक्रीय कार्यकर्ते अशी विभागणी झालेली आहे.जोतीराव सक्रीय कार्यकर्ते होतेच पण ते विद्वानही होते. त्यांनी लोकशाही विचारांचा पाया घातला. आज अनेक फ्रेंच आणि जर्मन विचारवंत जोतीरावांचा अभ्यास करीत आहेत. देशातील ६ हजार जातींच्या अस्मिता कुरवाळत न बसता त्यांच्या काचातून समाज बाहेर यावा यासाठी त्यांनी सत्यशोधक चळवळ केली. आज देश संकटातून जात असताना आणि १५-२० वर्षांनी आपला देश कुठे असेल याचा विचार करताना थरकाप उडतो.माओ आणि महात्मा गांधी यांच्या विचारातील अनेक मौलिक सुत्रे आपल्याला शतकभर आधीच जोतीराव देऊन गेले होते."
रुपये एक लक्ष, फुलेपगडी.मानपत्र, स्मृतीचिन्ह, उपरणे आणि फुले समग्र वाड्मय यांचा पुरस्कारात समावेश होता.
यावेळी शारदा साठे, छगन भुजबळ यांची भाषणे झाली. कृष्णकांत कुदळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.प्रीतेश गवळींनी आभार मानले. सुत्रसंचालन विजय लडकत यांनी केले.
कार्यक्रमाला समता परिषदेचे राज्य पदाधिकारी, बापू भुजबळ, डा. कैलास कमोद, डा.संजय गव्हाणे, जयराम साळुंखे, सुशील जाधव, अंबादास गाडेकर, दत्ता घाटगे, मकरंद सावे, बाळासाहेब माळी, आबा खोत, सुभाष राऊत, राजेश मनोरे, पत्रकार अरूण खोरे, संजय शिंदे, अद्वैत मेहता, शैलेंद्र परांजपे उपस्थित होते.


........................................................................................